दाहक पोटॅश : (कॉस्टिक पोटॅश). हा पोटॅशियम हायड्राक्साइड या नावानेही ओळखला जातो. रेणुसूत्र KOH. भारतात औषध म्हणून अशुद्ध दाहक पोटॅश वापरीत असत. तो निरनिराळ्या वनस्पतींच्या राखेत चुना मिसळून तयार करीत असत. ही पद्धत सुश्रुत यांच्या काळापासून माहीत आहे. याला ‘क्षार’ असे म्हणत आणि ते दाहक पोटॅश व दाहक सोडा यांचे कमीअधिक प्रमाणातील मिश्रण असे. औषधाशिवाय त्याचा उपयोग इतरत्र केल्याचे उल्लेख आढळत नाहीत. मध्ययुगीन काळात विविध वनस्पतींच्या राखेपासून पोटॅशियम कार्बोनेटासारखा क्षारधर्मी (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवणे देण्याचा गुणधर्म असणारा, अल्कलाइन) पदार्थ मिळविण्यात येत असे. हा पदार्थ अधिक संहतीचा (अधिक प्रमाण असलेला) बनविण्यासाठी तो तयार करताना त्यात चुनकळी मिसळण्यात येई. त्यामुळे दाहक पोटॅश तयार होऊ लागला. त्याचा उपयोग साबण तयार करण्यासाठी करीत असत. एकोणिसाव्या शतकात जर्मनीत पोटॅशियम खनिजांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले व त्यामुळे आवश्यकतेनुसार दाहक पोटॅश तयार करण्यात येऊ लागला.

निर्मिती : एकोणिसाव्या शतकापर्यंत सजल पोटॅशियम कार्बोनेट व कॅल्शियम हायड्रॉक्साइड यांपासून वरील पद्धतीनेच दाहक पोटॅशचे औद्योगिक उत्पादन करण्यात येत असे. यानंतर पोटॅशियम क्लोराइडाच्या विद्युत् विच्छेदनाने (विजेच्या साहाय्याने रेणूचे तुकडे करून) दाहक पोटॅश तयार करण्याची पद्धत प्रचारात आली. या पद्धतीत हायड्रोजन व क्लोरीन हे वायू उप–उत्पादने म्हणून मिळतात. दाहक सोडा तयार करण्याच्या पद्धतीसारखीच ही पद्धती असून त्यात वापरण्यात येणारी यंत्रसामग्रीही सारखीच असते. ऋणाग्राजवळ ६·७% संहतीचा दाहक पोटॅश असलेला विद्राव मिळतो. याचे बाष्पीभवन केल्यास पोटॅशियम क्लोराइडाचे स्फटिक तयार होतात. विद्राव गाळून ते वेगळे करतात. याचे परत बाष्पीभवन करून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करतात. विद्राव थंड केल्यास घन स्वरूपातील दाहक पोटॅश मिळतो. विद्युत् विच्छेदन करताना तयार झालेला क्लोरीन वायू व पोटॅशियम हायड्रॉक्साइड यांचा संपर्क येऊ देत नाहीत. विद्युत् विच्छेदनाने मिळालेला बाजारी दाहक पोटॅश अल्कोहॉलात विरघळवितात, गाळतात व बाष्पीभवनाने शुद्ध स्वरूपातील दाहक पोटॅश मिळवितात.

गुणधर्म : दाहक पोटॅश दिसावयास मेणचट व रंगाने पांढरट असून त्याचे स्फटिक ठिसूळ व सुईसारखे असतात. तो दाणेदार, तुकडे इ. विविध स्वरूपांत बाजारात मिळतो. घनता २·०४ ग्रॅ./सेंमी. वितळबिंदू ३८०° से. उकळबिंदू १,३२०° से. तो चिघळणारा आहे म्हणून काही ठिकाणी त्याचा उपयोग शुष्कताकारक म्हणून करतात. हवेत उघडा राहिल्यास त्यात पाणी व कार्बन डाय–ऑक्साइड शोषले जाऊन तो चिघळतो. पाण्यात तो जलद विरघळतो. विरघळताना उष्णता बाहेर पडते. वाढत्या तापमानाबरोबर ही विद्राव्यता (विरघळण्याचे प्रमाण) बदलते. याचा त्वचेशी संपर्क आल्यास तेथील पेशी नष्ट होतात. हा एक प्रबल क्षारक (बेस) असून तो विरल विद्रावातही आयनीभूत (विद्युत् भारित अणू –K+ व अणुगट –OH या स्वरूपात अलग होणे) होतो. बऱ्याच अम्लांबरोबर आणि अम्लीय ऑक्साइडांबरोबर त्याची विक्रिया होऊन लवणे मिळतात. हा दाहक सोड्यापेक्षा महाग असतो.

उपयोग : पोटॅशियम लवणांच्या निर्मितीत, कापड उद्योगातील साबण व अंग धुण्याचे साबण यांच्या निर्मितीत, प्रक्षालके (डिटर्जंट) व सुवासिक द्रव्यनिर्मितीत, छपाईच्या शाईच्या निर्मितीत, कापडाच्या विरंजनासाठी (रंग घालविण्यासाठी) व मर्सरीकरणासाठी (धाग्याला मुलायमपणा आणण्यासाठी), विद्युत् विलेपनात, शिलामुद्रणात इत्यादींमध्ये दाहक पोटॅशचा उपयोग करण्यात येतो.जगामध्ये जेथे जेथे दाहक सोडा तयार करण्यात येतो तेथे दाहक पोटॅशही तयार करण्यात येतो. दुसऱ्या महायुद्धापूर्वी या उद्योगात जर्मनीची जवळजवळ मक्तेदारी होती. त्यानंतर अमेरिकेची संयुक्त संस्थाने, इझ्राएल इ. देशांतील पोटॅशियम लवणाचे उत्पादन वाढले आहे. तुरळक प्रमाणात आढळणाऱ्या सोऱ्याखेरीज भारतात पोटॅशियमाची खनिजे नाहीत. काही मोठ्या मिठागरांमध्ये पोटॅशियम लवणे मिळविण्यात येतात. १९६३ मध्ये अतुल येथे अतुल प्रॉडक्टस लि. हा दाहक पोटॅश तयार करणारा भारतातील पहिला कारखाना सुरू झाला. या कारखान्यातून १९६५ मध्ये ३६३ टन, १९६६ मध्ये १,१०९ टन, १९६७ मध्ये ३७५ टन व १९६८ मध्ये ८५४ टन इतका दाहक पोटॅश तयार झाला. याशिवाय मुंबई येथील स्टँडर्ड मिल्स कं. लि. हा कारखाना पोटॅशियम कार्बोनेटाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या दाहक पोटॅशचे उत्पादन करतो. दाहक पोटॅशची आयात सोबत दिलेल्या कोष्टकाप्रमाणे आहे.

वर्ष 

आयात 

(टन) 

१९६५–६६ 

१९६६–६७ 

१९६७–६८ 

१९६८–६९ 

१९६९–७० 

२,९५६ 

१,८४६ 

२,९१५ 

९६६ 

१७४ 

 

लेले, आ. मा.