दास, भोलानाथ: (? जुलै १८५८–२ जुलै १९२९). आधुनिक असमिया काव्याच्या आरंभकाळातील भोलानाथ दास हे एक प्रसिद्ध कवी होत. नौगाँग येथे एका गरीब परंतु घरंदाज कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मातापिता पद्मावती व बापीराम. कलकत्ता विद्यापीठात बी. ए. ला असताना घरच्या गरिबीमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. नंतर ते सरकारी नोकरीत शिरले व विविध पदांवर काम करून १९१२ साली निवृत्त झाले.

मायकेल मधुसूदन दत्त (१८२४–७३) यांचे अनुकरण करून असमियामध्ये निर्यमक कविता लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला. १८७८–८० मध्ये त्यांनी सीताहरणकाव्य रचले. ते दहा वर्षांनंतर (१८८८) प्रसिद्ध झाले. अनेक सर्गांत रचलेले हे एक प्रचंड महाकाव्य असून ते रामायणावर आधारित आहे. या काव्यात त्यांनी निर्यमक रचनेचा सर्वत्र उपयोग केला. एका अर्थाने आधुनिक काळातील ते पहिलेच भावकवी होत. त्यांचे कवितामाला (२ भाग, १८८२–८३) व चिंतातरंगिणी (२ भाग, १८८४) हे दोन भावगीतसंग्रह आहेत. आधुनिक असमियातील भावकाव्याचे जनक म्हणून त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण मानले जाते. गौहाती येथे त्यांचे निधन झाले.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) शिरोडकर, द. स. (म.)