दागेअर, ल्वी झाक मांदे : (१८ नोव्हेंबर १७८९–१२ जुलै १८५१). फ्रेंच चित्रकार व भौतिकीविज्ञ. ‘दागेअरोटाइप’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या आद्य छायाचित्रण पद्धतीचे जनक [⟶ छायाचित्रण]. त्यांचा जन्म कॉर्मेइलिस–एन–पॅरिसीस (सीन–एत–ऑइस जिल्हा) येथे झाला. प्रथमतः ते महसूल खात्यात अधिकारी होते. त्यानंतर देखावे रंगविण्याचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी प्रमुख नाट्यगृहांत देखावे तयार करण्याचे काम केले. अर्धपारदर्शक चित्रफलकावर चित्रे रंगवून व त्यांवर निरनिराळ्या तऱ्हांनी प्रकाश टाकून चित्रांतील देखाव्यांची परिणामकारकता वाढेल अशा प्रकारच्या चित्रांचे प्रदर्शन (डायोरामा) त्यांनी सी. एम्. बूताँ यांच्या सहकार्याने पॅरिस येथे १८२२ मध्ये भरविले. अशाच प्रकारचे प्रदर्शन लंडन येथेही त्यांनी सुरू केले परंतु १८३९ साली ते आगीमध्ये नष्ट झाले.
दागेअर यांनी सूर्यप्रकाशाच्या क्रियेने कायम स्वरूपाचे छायाचित्र मिळविण्याच्या दृष्टीने प्रयोग सुरू केले होते. जे. एन्. न्येप्स हेही याच दिशेने १८१४ पासून प्रयत्न करीत होते. एकमेकांच्या कार्याची माहिती मिळाल्यावर १८२९ नंतर दागेअर व न्येप्स यांनी एकत्रितपणे प्रयोग करण्यास प्रारंभ केला. १८३३ साली न्येप्स मृत्यू पावल्यावरही दागेअर यांनी आपले प्रयोग पुढे चालू ठेवले आणि दागेअरोटाइप या पद्धतीचा यशस्वीपणे शोध लावला. न्येप्स यांनी १८२२ सालीच कायम स्वरूपाचे पहिले छायाचित्र (हीलिओग्राफ) तयार केलेले होते पण ते अगदीच अस्पष्ट होते व असे छायाचित्र तयार करण्यास अतिशय वेळ लागत असे. १८३७ साली दागेअर यांनी आपल्या पद्धतीने तयार केलेले पहिले छायाचित्र व न्येप्स यांचे छायाचित्र यांत फारच थोडे साम्य होते. तथापि दागेअर यांनी आपल्या मृत सहकाऱ्यांचे श्रेय जाहीरपणे पूर्णतः मान्य केले होते. १८३९ साली दागेअर यांनी लिहिलेल्या Historique et description des procedes du daguerreotype et du diorama या माहितीपत्रकात दागेअरोटाइपबरोबरच न्येप्स यांच्या हीलिओग्राफीचेही वर्णन आहे.
डी. एफ्. जे. ॲरागो या भौतिकीविज्ञांनी १८३९ साली दागेअरोटाइप पद्धतीचे महत्त्व फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या एका सभेत शास्त्रज्ञांच्या नजरेस आणून दिले. दागेअर यांची लिजन ऑफ ऑनरचे एक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. दागेअर यांनी आपली पद्धत ॲकॅडेमीला कळविण्याच्या अटीवर त्यांना ६,००० फ्रँक्स व न्येप्स यांच्या वारसांना ४,००० फ्रँक्स इतके वर्षासन देण्यात आले. दागेअर यांची पद्धत आणि त्यांची पारदर्शक व अपारदर्शक चित्रे फ्रेंच सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आली. ही पद्धत विशेषतः व्यक्तिचित्रांसाठी १८६० पर्यंत वापरात होती व फक्त इंग्लंडमध्येच तिचे एकस्व (पेटंट) घेण्यात आले होते. ते पॅरिसजवळील पेतित-बाइ-सूर-मार्ने येथे मृत्यू पावले.
सूर्यवंशी, वि. ल.