दर्द : (? – ६ जानेवारी १७८५). एक श्रेष्ठ उर्दू कवी. संपूर्ण नाव ख्वाजा मीर ‘दर्द’. त्यांचा जन्म दिल्ली येथे झाला. नाला-ए-अंदलीब या प्रसिद्ध सूफी ग्रंथाचे कर्ते ख्वाजा नासिर अंदलीब हे त्यांचे वडील. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली दर्द यांनी पारंपारिक आणि इतर प्रकारचे अध्ययन केले. सुरुवातीला स्वीकारलेला सैनिकी पेशा सोडून वयाच्या विसाव्या वर्षी ते ‘दरवेश’ (फकीर) झाले. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या एकोणचाळिसाव्या वर्षी स्थानिक नक्शबंदी आणि चिश्ती यांचे प्रमुखपद त्यांना मिळाले. नादिरशाह व अहमदशाह अबदाली यांच्या अनुक्रमे १७३९ आणि १७६१ मधील आक्रमणांमुळे निर्माण झालेल्या अराजकाच्या वातावरणातही ग्रामत्याग न करता त्यांनी दिल्ली येथेच राहणे पसंत केले. खऱ्‍या दरवेश्याला साजेलशी निर्भयता व आत्मसंतुष्ट वृत्ती त्यांच्या ठिकाणी होती.

संगीतकलेतही त्यांनी नैपुण्य मिळविले होते. संगीताच्या मैफली व कविसंमेलने यांच्या आश्रमात होत. त्यांचे संतपण आणि सदाचरण यांमुळे आबालवृद्धांचा आदरास ते पात्र झाले. शाह आलम बहादुरशाह पहिला हा मधूनमधून त्यांच्या आश्रमाला भेट देत असे, असे म्हटले जाते. ईश्वराचा साक्षात्कार करून देण्याचे सामर्थ्य संगीतकलेत आहे, अशी निष्ठा असलेल्या सूफी संप्रदायाच्या दरवेशी नावाच्या पंथात त्यांची गणना होते. नाला ए दर्द  या ग्रंथात भक्तिसंगीत (समा) हे ईश्वरानेच नेमून दिले आहे, असे ते म्हणतात. रिसाला-ए-वारिदात, नाला-ए-दर्द, आहे सर्द, दर्दे दिल  आणि इल-मुल-किताब  या आपल्या पर्शियन पुस्तिकांत समाशिवाय सूफी संप्रदायाची इतर अंगे आणि आध्यात्मिक अनुभव यांबद्दलही त्यांनी लिहिले आहे. इल-मुल-किताब  हा त्यांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असून सूफी पंथाचे सिद्धांत आणि व्यवहार यांबद्दलचे त्यांचे विशेष विचार त्यात दिसून येतात. युसुफ हुसेनखान आणि वहीद अख्तर यांच्यासारख्या व्यासंगी विद्वांनानी त्याचे रसग्रहण व विश्लेषण केले आहे. ‘अस्तित्व हा प्रकाश असून मनुष्य हा ईश्वराचा दास व त्याचवेळी त्याचा प्रेमीसुद्धा होय’, हे त्या ग्रंथातील मुख्य प्रतिपादन आहे.

गद्याप्रमाणेच दर्द यांचा पर्शियनमध्ये एक लहनसा ‘दिवान’ही (कवितासंग्रह) आहे पण त्यांच्या उर्दू भाषेतील एकुलत्या एक दिवानामुळेच (दिवाने दर्द ) श्रेष्ठ कवी म्हणून त्यांची कीर्ती झाली. त्यांच्या उर्दू कवितांत सर्वत्र तत्त्वज्ञान आणि गूढवाद यांच्या छटा विखुरलेल्या दिसतात. असे असले, तरी मुख्यतः ते प्रेमाचेच कवी होत. त्यांच्या कविता प्रेमविषयासंबंधी असल्या, तरी त्या नेहमीच उदात्त व गंभीर असतात. त्या सहजसुलभ व प्रवाही असून निर्दोष लघुवृत्तांत लिहिलेल्या आहेत. त्यांतील गेयता आणि लघुता यांमुळे त्यांची नेहमी फार्सी कवी ⇨ हाफीजशी  तुलना केली जाते. ज्यांनी उर्दू भाषेला विकासाच्या प्रारंभिक अवस्थेत उजाळा दिला अशा सौदा, मीर आणि मजहर यांच्याबरोबरच दर्द यांचेही नाव घेतले जाते. त्यांचा उर्दू दिवान दिल्ली येथे प्रथम १८५५ मध्ये प्रकाशित झाला व नंतर त्याच्या कित्येक आवृत्त्या निघाल्या. त्यांपैकी एकीला हबीबुर रहमान खान शिरवानी यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावनाही आहे. दिल्ली येथे ते निधन पावले.

नईमुद्दीन, सैय्यद