दत्तात्रेय : एक हिंदू देवता. पुराणांनुसार तो अनसूयेस अत्री ऋषीपासून झालेला पुत्र होय. त्याच्या जन्माबाबत पुराणांत विविध कथा आल्या आहेत. महाभारतात (अनुशासन पर्व ९१·४-५) मात्र त्याला अत्रिपुत्र न म्हणता अत्रिवंशात जन्मलेला गृहस्थ म्हटले आहे. सर्वसाधारणपणे तो विष्णूचा अवतार मानला जातो. मार्कंडेयपुराणातील त्याच्या वर्णनावरून तो मूलतः शाक्त तांत्रिक देव असावा, असे दिसते. त्रिपुरारहस्यात मदिरा व मदिराक्षीसमवेत रंगलेला दत्तात्रेय आढळतो. वेद, कर्मकांड व चातुर्वर्ण्य यांचे विष्णूने दत्तावतारात पुनरुज्जीवन केल्याचे ब्रह्मपुराणात म्हटले आहे. शंकर हा दत्ताचा गुरू असल्याचाही तेथे निर्देश आहे. भागवतात अवधूतांचे चोवीस गुरू सांगितले आहेत. पुढे हेच चोवीस गुरू दत्तात्रेयाचेही गुरू म्हणून ओळखले जाऊ लागले व दत्तचरित्रातही ते कायमचे प्रविष्ट झाले. शांडिल्योपनिषद, जाबालदर्शनोपनिषद व दत्तात्रेयोपनिषद यांतही दत्तात्रयाचे माहात्म्य वर्णिले आहे.
माहूर, कोल्हापूर व औदुंबर ही दत्तात्रेयाशी निगडित असलेली स्थाने मुळात प्राचीन शक्तिपीठेच होत. ‘दत्तात्रेयतंत्र’ नावाचे एक तंत्रही आहे. रूद्रयामल या प्रसिद्ध तंत्रग्रंथात तसेच तंत्रमहोदधि ह्या मंत्रविद्येवरील ग्रंथात दत्तात्रेयास महत्त्वाचे स्थान आहे. यावरून इ. सनाच्या प्रारंभी त्रिपुरोपासक शाक्त उपासनेत दत्तात्रेयाची निर्मिती होऊन पुढे त्याला देवतास्वरूप आले असावे. त्रिपूरोपासक तंत्रप्रणालीचा दत्तात्रेय नावाचा कोणी महान सिद्धपुरुष असावा आणि त्याचेच पुढे पुराणांच्या अंतिम संस्करणकाली दैवतीकरण झाले असावे, असा अभिप्राय रा. चिं. ढेरे यांनी व्यक्त केला आहे.
पुराणांत भार्गव, परशुराम, अलर्क, कार्तवीर्य सहस्रार्जुन, प्रल्हाद, यदू व आयू हे दत्तात्रेयाचे शिष्य असल्याचे म्हटले आहे. माहूर, कोल्हापूर व पांचाळेश्वर ही दत्तात्रेयाची विहारस्थाने मानली जातात. दत्तात्रेयाने विविध कारणांस्तव सोळा अवतार घेतले, अशी समजूत आहे. वासुदेवानंद सरस्वतींनी श्रीदत्तात्रेयषोडशावतारा: ह्या संस्कृत ग्रंथात ह्या सोळा अवतारांची नावे, कथा आणि माहात्म्य वर्णिले आहे. ⇨ दासोपंत, श्रीपाद श्रीवल्लभ, ⇨ नरसिंह सरस्वती, ⇨ अक्कलकोटकर स्वामी आणि ⇨ माणिक प्रभू या सत्पुरूषांनाही दत्तात्रेयाचेचे अवतार मानले जाते.
दत्तात्रेयाच्या स्वरूपाबाबत विविध वर्णने आढळतात. एकमुखी व चतुर्भुज एकमुखी द्विभुज व मांडीवर लक्ष्मी त्रिमुख व षङ्भुज इ. स्वरूपांत दत्तात्रेय वर्णिला आहे. त्रिमुख व षङ्भुज दत्तात्रेयाचे हल्ली प्रचलित असलेले स्वरूप प्राचीन साहित्यात मात्र आढळत नाही. १००० च्या सुमारास ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्या अंशात्मक स्वरूपात दत्तात्रेयाची उपासना होऊ लागली असावी व तेच स्वरूप आजही रूढ आहे. ह्या त्रिमुख–षङ्भुज दत्तात्रेयामागे एक गाय व आजूबाजूस चार श्वान आहेत. गाय हे पृथ्वीचे, तर चार श्वान वेदांची प्रतीके मानली जातात. ह्या स्वरूपातील दत्तात्रेयाचे ध्यान लोकप्रिय असले, तरी प्रसिद्ध दत्तोपासकांनी आपल्या उपासनेत एकमुखी दत्तात्रेयासच स्थान दिले. औदुंबर वृक्षाखाली दत्तात्रेयाचा वास असतो ह्या समजुतीमुळे हा वृक्ष पवित्र मानतात.
दत्तात्रेयाविषयी नाथ, महानुभाव व वारकरी या संप्रदायांत नितान्त आदर व श्रद्धाभाव आहे. दत्तात्रेय हा योग व तंत्रमार्गातील आचार्य वा योगीराज मानला जातो. अवधूतोपनिषद व जाबालदर्शनोपनिषद या ग्रंथांतील बोध प्रत्यक्ष दत्तप्रणीत असल्याचे ह्या उपनिषदांत म्हटले आहे. अवधूतगीता, त्रिपुरोपास्तिपद्धति व परशुरामकल्पसूत्रम् हे ग्रंथ दत्तप्रणीत मानले जातात. यांतील पहिला ग्रंथ सांप्रदायिक असून उर्वरित दोन ग्रंथ तंत्रविषयक आहेत. दत्तात्रेयाचे एकाक्षरी, षडक्षरी अष्टाक्षरी, द्वादशाक्षरी व षोडशाक्षरी मंत्र असून ‘दत्तगायत्री’ नावाचाही एक मंत्र आहे.
पहा : दत्त संप्रदाय.
संदर्भ : ढेरे, रा. चिं. दत्त संप्रदायाचा इतिहास, पुणे, १९६४.
सुर्वे, भा. ग.
“