पर्युषण पर्व : जैन धर्माचे लोक इतर धर्मीयांच्या सहवासाने आणि सामाजिक रूढींमुळे इतर काही सण साजरे करीत असले, तरी त्यांचे काही विशिष्ट धार्मिक सण आहेत. ‘चातुर्मास’ (आषाढ शुद्ध १४ ते कार्तिक शुद्ध १४) हा त्यांचा एक पर्वकाल आहे. या वेळी जैन साधू विहार न करता एके ठिकाणी राहून धर्माचरण आणि धर्मोपदेश करतात. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा व अमावस्या (विशेषतः चातुर्मासातील) हे पर्वदिवस मानलेले आहेत. यांशिवाय अक्षय्य तृतीया (वैशाख शुद्ध ३), श्रुतपंचमी (ज्येष्ठ शुद्ध ५), पर्युषण पर्व (भाद्रपद शुद्ध ५ ते १४), जीवदया अष्टमी (आश्विन शुद्ध ८), वीरनिर्वाण (आश्विन वद्य १४, उत्तररात्र) इ. प्रमुख जैन धर्मीय सण किंवा पर्वदिवस आहेत. यांमध्ये पर्युषण पर्व हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा पर्वकाल आहे. ‘दशलक्षण पर्व’ असेही त्याचे नाव आहे. श्वेतांबर हे ‘पजूसण’ पर्व श्रावण वद्य १२ ते भाद्रपद शुद्ध ५ पर्यंत पाळतात. या वार्षिक पर्वकालात मंदिरामध्ये पूजा-अर्चा, तत्त्वार्थाधिगमसूत्रासारख्या ग्रंथाचे वाचन (स्वाध्याय) आणि इतर कार्यक्रमही होतात. विशेषतः क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, आकिंचन्य आणि ब्रह्मचर्य या दशधर्मांचे या विशेष स्वरूपाच्या पर्वकालात चिंतन-मनन किंवा व्याख्यान-चर्चा केली जाते. आत्मशुद्धी करण्याला अतिशय अनुकूल असा हा पर्वकाल असल्याने, तो पर्वराज म्हणूनही ओळखला जातो. या दहा धर्मांचा साधुधर्मामध्ये अंतर्भाव होतो परंतु या कालात श्रावक-श्राविकांनीही ते आचरणात आणण्याच्या प्रयत्न करावा, हा उद्देश या पर्वाच्या पाठीमागे आहे. या पर्वाच्या समाप्तिकाली ‘क्षमापण’ हा समारंभही केला जातो. त्या वेळी समाजातील लहानथोर सर्वजण एकमेकांना भेटून एकमेकांची क्षमा मागतात.

संदर्भ : सगरे, गं. दा. जैनपर्व–परिचय, बेळगाव, १९७४.

पाटील, भ. दे.