दंती : (दंतिमूळ हिं. हाकुम क. कडुहरलू सं. दंतिका, रेचनी, विशोधिनी लॅ. बॅलिओस्पर्मम माँटॅनम कुल–युफोर्बिएसी). हे एक लहान कणखर ०·९–१·८ मी. उंचीचे झुडूप असून त्याचा प्रसार हिमालयात काश्मीर ते भूतानमध्ये ९३० मी. उंचीपर्यंत, आसाम, खासी टेकड्या, उत्तर बंगाल, बिहार, मध्य भारत, पश्चिम द्वीपकल्प, बांगला देश, ब्रह्मदेश, मलेशिया इ. प्रदेशांत आहे. महाराष्ट्रात रूक्ष सपाट मैदानात किंवा मोसमी जंगलात व कोकणात आढळते. याला तळापासून अनेक फांद्या फुटतात पाने खोडावर खाली मोठी, हस्ताकृती (३–५ खंडित), पर्णतलाजवळ दोन प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त) व वरच्या पेऱ्यांवर लहान भाल्यासारखी व दंतुर असतात. फुले एकलिंगी, एकत्र आणि पिवळट असून कक्षास्थ मंजरीवर किंवा आखूड परिमंजरीवर डिसेंबरात येतात सर्वच पुं–पुष्पे किंवा काही स्त्री–पुष्पे संदले ४–५ प्रदले नसतात पुं–पुष्पात सु. २० केसरदले व ६ प्रपिंडांचे बिंब असते स्त्री–पुष्पात बिंब बारीक, वलयाकार व अखंड असते [⟶ फूल] फळ (बोंड) केसाळ, त्रिखंडी व प्रत्येक कुडी दोन शकलांची असते. बीया गुळगुळीत, लांबट गोलसर व ठिपकेदार असतात. पुष्क तैलयुक्त. ही वनस्पती रेचक, कृमिनाशक, मूत्रल (लघवी साफ करणारी), संसर्गरक्षक आहे जलोदर, सूज, त्वचारोग, जखमा, पांडुरोग, मूळव्याध, श्वेत कुष्ठ इत्यादींवर गुणकारी असते. हिचे मूळ ‘दंतिमूळ’ या नावाने विकले जाते आणि ते काविळीवर गुणकारी व रेचक आहे. पानांचा काढा दम्यावर देतात बीया एरंडीसारख्या, तीव्र रेचक व तेलकट अधिक प्रमाणात घातक आणि विषारी असतात म्हणून त्यांना जंगली जमालगोटा म्हणतात [⟶ जमालगोटा]. बियांतील तेल संधिवातावर वरून लावण्यास चांगले असते. सु. चौथ्या शतकातील एका आयुर्वेदीय ग्रंथात केशरंजन या नावाखाली ज्या वनस्पती सांगितल्या आहेत, त्यांमध्ये दंतीचा उल्लेख केला आहे.
पहा : यूफोर्बिएसी वनस्पति, विषारी.
पटवर्धन, शां. द.
“