थायलंड: (प्राथेट थाय). आग्‍नेय आशियातील एक सार्वभौम देश. प्राचीन काळी भारतीय लोकांनी वसाहती केलेल्या देशांपैकी बृहत् भारतातील महत्त्वाचा देश. ६° ते २०° उ. व ९७° ते १०६° पू. यांदरम्यान असून कमाल दक्षिणोत्तर लांबी १,५०० किमी. व कमाल रूंदी ८३० किमी. आहे. क्षेत्रफळ ५,१४,००० चौ. किमी. असून देशाची एकूण लोकसंख्या ३,९९,५०,३०६ (१९७३). १९३९ पूर्वी याचे ‘सयाम’ असे नाव होते. थाई भाषेत देशाचे नाव मुआंग थाय व अधिकृत नाव प्राथेट थाय (स्वतंत्रांची भूमी) असे असून इंग्रजी भाषेत थायलंड असे नाव १९३९–४५ व त्यानंतर १९४९ पासून आजतागायत प्रचलित आहे. त्यापूर्वी व १९४५–४९ या कालावधीत सयाम हे नाव वापरात होते. थायलंडच्या पूर्वेस व ईशान्येस लाओस, पश्चिमेस व वायव्येस ब्रह्मदेश, आग्‍नेयीस ख्मेर प्रजासत्ताक आणि दक्षिणेस थायलंडचे आखात (सयामचे आखात) असून दक्षिणेस तेनासरीम पट्टीच्या क्रा संयोगभूमीच्या दक्षिण टोकास मलेशियातील मलाया द्वीपकल्पाची सीमा आहे. बँकॉक (लोकसंख्या ३९,६७,०८१–१९७३) ही थायलंडची राजधानी आहे.

भूवर्णन : थायलंड पूर्णपणे उष्ण कटिबंधात मोडतो. देशाचा उत्तर भाग व विशेषतः दक्षिणेचा भाग चिंचोळा व लांब आहे. दक्षिणेचा भाग तेनासरीम म्हणून ओळखला जातो व तो क्रा संयोगभूमीचा भाग आहे. देशास दीर्घ किनारा लाभला असून त्याची लांबी २,७०० किमी. आहे. देशाचा सर्वसाधारण आकार व एकूण भौगोलिक रचना यांबाबत ब्रह्मदेश व थायलंड यांत बरेच साम्य आहे पण थायलंड हा यूरोपीयांची कधीही वसाहत नव्हता. ब्रिटिश आणि फ्रेंच हितसंबंधांबाबत तडजोडीचे धूर्त धोरण ठेवून थाई लोकांनी आपला देश वसाहतीच्या धोक्यापासून स्वतंत्र राखला पण हे करताना आज थायलंड फिलिपीन्सप्रमाणे पाश्चात्त्य धर्तीचे जीवन स्वीकारून बसला आहे.

थायलंडच्या पश्चिम बाजूस डोंगराळ भाग असून त्याची उंची उत्तरेस वाढत जाते. पूर्व बाजूस उत्तरेस रूंद असणारे खोरातचे पठार आहे व मध्यभागी चाऊ फ्राया ह्या देशातील प्रमुख नदीचे सखल मैदान आहे. प्राकृतिक रचनेनुसार देशाचे चार विभाग पडतात : (१) उत्तरेकडील पर्वतप्रदेश (२) मध्य मैदान (३) खोरात (कोराट) पठार (४) तेनासरीम थायलंड (द. चिंचोळी पट्टी – क्राची संयोगभूमी).

उत्तरेच्या डोंगराळ भागात घड्यांचे पर्वत असून त्यांची रचना सामान्यतः दक्षिणोत्तर आहे. दोई इंतानॉन हे थायलंडमधील सर्वोच्च शिखर (२,५९५ मी.) या भागातच आहे. या डोंगररांगांमधूनच चाऊ प्रायाच्या सुरूवातीच्या उपनद्या दक्षिणेस वाहतात, त्यांत पश्चिमेकडून पूर्वेस वाहणाऱ्या पिंग, वांग, यॉम व नान या प्रमुख आहेत. मध्य मैदान किंवा मेनामचे खोरे हाच थायलंडचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. मेनाम (चाऊ फ्राया) या नदीच्या खोऱ्याचा हा प्रदेश दक्षिणोत्तर सु. ५०० किमी. व रूंदीने २५० किमी. आहे. उत्तर पर्वतापासून दक्षिणेस सयामच्या आखातापर्यंत सलगपणे हे मैदान पसरले आहे. चाइनात गावाच्या दक्षिणेस चाऊ फ्रायाच्या उपमुख नद्या सुरू होतात. या उपमुख नद्या व पूर्वेकडील पासाक आणि पश्चिमेकडील मेक्लाँग या नद्या कालव्यांनी परस्परांस जोडल्याने ह्या प्रदेशांत जलमार्गाचे विस्तृत जाळे निर्माण झाले आहे. या कालव्यांस खोलांग म्हणतात. चाऊ फ्राया व इतर नद्यांचा मिळून सयामच्या आखातात संयुक्त त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे (थाई भाषेतील मेनाम किंवा माएनाम या शब्दाचा अर्थ नदी असा आहे व त्यानंतर नदीचे विशेषनाम येते. उदा., माएनाम पिंग, माएनाम चाऊ फ्राया इ. पण चाऊ फ्राया ही नदी इतकी मोठी व महत्त्वाची आहे, की तिचा उल्लेख बऱ्याच वेळा मेनाम–माएनाम–असाच करतात. जसा चीनमध्ये तांदूळ व जेवणे या दोहोंस एकच शब्द आहे.) हा सर्व प्रदेश दक्षिणेस अत्यंत सपाट व सखल आहे. अयुथ्थ्या हे किनाऱ्यापासून १०० किमी. अंतरावरचे शहर केवळ ४ मी. उंचीवर आहे. त्यामुळे दरवर्षी या भागात पुराचे खूपच पाणी साचते.

खोरातचे पठार देशाचा एकतृतीयांश भाग व्यापते आणि त्यावर तेवढीच लोकसंख्या आहे. पठाराची पश्चिम व दक्षिण कडा दाट जंगलमय आहे. पठाराचा उतार मंद व पूर्वेस उतरता असून पठारावरून वाहणाऱ्या माएनाम ची व माएनाम मून या नद्या पूर्वेस वाहतात व पुढे एक होऊन सीमेवर मेकाँग नदी खोरात पठाराच्या पूर्व सीमेवरून वाहते व बऱ्याच अंतरापर्यंत ती थायलंड व लाओस यांमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ची आणि मून नद्यांची खोरी उथळ आहेत व मेकाँगला पूर येताच बरेच पाणी मागे फिरून खोरी जलमय होतात पण रेती खडकापासून बनलेली मातीच नापीक असल्याने पिके फारशी चांगली येत नाहीत.

दक्षिणेकडचा तेनासरीमचा भाग अत्यंत अरूंद असून तो प्राचुआप किरीखान येथे केवळ २५ किमी. रूंद आहे. त्याच्या दक्षिणेस रूंदी वाढते व या भागास द्वीपकल्पीय थायलंड असे नाव आहे. ही पट्टी पुरातन पर्वतांनी बनली असून अधूनमधून छोटी खोरी आहेत.


हवामान : थायलंड मान्सून हवामान प्रदेशात समाविष्ट होतो. त्यामुळे दक्षिणेचे द्वीपकल्प सोडल्यास इतर भागांत मार्च ते मे उन्हाळा, जून–ऑक्टोबर पावसाळा व नोव्हेंबर–मार्च हिवाळा असे तीन ऋतू आढळतात. दक्षिणेस मात्र फेब्रुवारी–सप्टेंबर उन्हाळा व ऑक्टोबर–जानेवारी पावसाळा असे दोन ऋतू आढळतात. सामान्य तपमान २४°–३०° से. च्या दरम्यान व तपमान कक्षा अत्यल्प आढळते. वार्षिक पर्जन्य ८० सेंमी. पासून ४०० सेंमी. पडतो. मध्य मैदानी प्रदेश पर्जन्यछायेच्या प्रदेशात असून पूर्वेच्या खोरातच्या पठारावर अल्प पाऊस पडतो पण उत्तरेस डोंगराळ भागात तसेच दक्षिणेच्या द्वीपकल्पाच्या भागात जोरदार पाऊस पडतो.

वनस्पती व प्राणी: थायलंडचा ६०% भाग जंगलव्याप्त आहे. मान्सून प्रकारचे जंगल असून जास्त पावसाच्या भागात सदाहरित जंगल, तर १०० सेंमी. पेक्षा कमी पावसाच्या भागात विरळ पानझडी जंगल आहे. प्रमुख महत्त्वाच्या झाडांत साग, यँग, शोरिया, रोझवुड, आयर्नवुड, एबनी, रतन व बांबू ही झाडे आहेत. त्यांत साग अत्यंत महत्त्वाचे असून ते पश्चिमेच्या व उत्तरेच्या डोंगराळ भागात आहे. शिवाय केळी, आंबे, अननस, लिंबू जातीची फळे, मँगोस्टीन इ. फळझाडेही विपुल आहेत. १९७३ मधील वन उत्पादन पुढीलप्रमाणे झाले : (आकडे लक्ष घमी.) सागवान १·३३ यँग ७·२० इतर लाकूड ११·४० जळाऊ लाकूड १४·०० रबर उत्पादन ३·८४ लक्ष मे. टन. इतर मोसमी देशांप्रमाणे वन्य प्राण्यांची विविधता या देशात आहे. हत्तींसाठी हा देश पूर्वीपासून प्रसिद्ध असून पांढरा हत्ती हा पूज्य मानला जातो. पूर्वी थाई राजा दरवर्षी पांढरा हत्ती चिनी सम्राटास भेट देत असे. ब्रह्मदेशाप्रमाणेच हत्तीचा लाकूडतोडीत उपयोग करून घेतला जातो. शिवाय वाघ, चित्ते, अस्वले, हरिण, रानडुक्कर, वानर, मगरी व सुसरी हे प्राणी जास्त आहेत. सयामी मांजरे पाळीव प्राण्यांत विख्यात आहेत. सागरी व गोड्या पाण्यांतील मासेमारीमुळे महत्त्वाचा प्रथिन पुरवठा होतो. १९७३ मध्ये १८ लक्ष मे. टन सागरी मत्स्योत्पादन झाले.

इतिहास: थाई लोक सु. एक हजार वर्षांपूर्वी चीनमधून दक्षिण आणि पश्चिम दिशांना इंडोचीन द्वीपकल्पाच्या उत्तर भागाकडे सरकू लागल्याचे आढळते. या काळापूर्वीच्या थाई संस्कृतीचा मागोवा पुराव्याअभावी घेणे शक्य झाले नाही. थाई हे सखल भागातील लोक असून त्यांची घरे नद्यांच्या खोऱ्यांमधून, तर त्यांची अर्थव्यवस्था नद्यांवर अवलंबून होती. थाई हे निर्वाह शेती करणारे. भात हे त्यांचे प्रमुख पीक. कृषिपद्धती प्राथमिक. पाळीव प्राण्यांमध्ये बैल व रानरेडे यांचा शेतीकामांसाठी, तर डुक्कर व बदके–कोंबड्या यांचा आहारासाठी उपयोग केला जाई. थाई लोकांमध्ये कौटुंबिक नातेसंबंध महत्त्वाचे असले, तरी कुलविस्तार वा कुटुंबविस्ताराची कल्पना त्यांना माहीत नव्हती असे दिसते त्याचप्रमाणे त्यांच्यात जातिव्यवस्थेची संकल्पना नव्हती. स्त्रियांना समाजात उच्च स्थान असे त्यांना वारसाहक प्राप्त होता आणि विधवांना पुनर्विवाहाचे स्वातंत्र्य होते. प्रारंभीचा थाई समाज जडप्राणवादी होता. त्यांच्या समजुतीप्रमाणे जीवात्मे परोपकारी व दुष्ट असे दोन्ही प्रकारचे असत. थाई लोक जेव्हा आग्‍नेय आशियात वसती करू लागले, तेव्हा त्यांच्याजवळ सामाजिक संलग्‍नता आणि राजकीय व्यवस्था वा शिस्त हे गुण प्रकर्षाने होते यांच्या योगे त्यांना छोटी मांडलिक राज्ये स्थापन करणे शक्य झाले. थाई लोकांच्या बखरींमधून आपणाला थाईंनी तेराव्या शतकाच्या सुमारास हल्लीचा उत्तर ब्रह्मदेश, चीनचा युनान प्रांत, भारतामधील आसाम राज्य आणि खुद्द थायलंड येथे लहानलहान राज्ये उभारल्याची माहिती मिळते. याच शतकात बरीच राज्ये प्रसिद्धीच्या झोतात आली. इंडो–चीन द्वीपकल्पीय प्रदेशात मॉन व ख्मेर या दोन राज्यांवर भारतीय संस्कृती, धर्म, शासन, कला, ललितकला आणि साहित्य यांचा जबर प्रभाव पडल्याचे दिसून येते. मॉन राज्य ब्रह्मदेशाचा खालचा भाग व मध्य थायलंड यांमध्ये पसरले होते, तर ख्मेर राज्य मेकाँग नदीखोऱ्यात वसले होते. या दोन्ही राज्यांनी आपापल्या भिन्नभिन्न संस्कृत्या तर जोपासल्याच, त्याशिवाय आपापल्या राज्यशासनांमध्ये दरारा व सामर्थ्य निर्माण केले. परंतु तेराव्या शतकाच्या सुमारास ख्मेर राज्याने मॉन राज्यावर आक्रमण करून त्याला नमविले. एवढेच नव्हे, तर मॉन संस्कृतीची हरिपुंजय (हल्लीचा उत्तर थायलंड) या छोट्या प्रांतातच राजकीय स्वातंत्र्याची निशाणी ठेवली. तथापि मध्य व उत्तर थायलंडमध्ये मॉन संस्कृतीचा प्रभाव होता. थेरवाद ब्रौद्ध धर्मावरील त्यांची अतूट निष्ठा ही लक्षणीय होती. ख्मेर संस्कृतीचा लष्करी व कलात्मक उत्कर्षबिंदू सातव्या जयवर्मन् राजाच्या कारकीर्दीत (११८१–सु. १२१९) दिसून आला. परंतु त्यानंतर मात्र या संस्कृतीचे राजकीय वर्चस्व कमीकमी होत गेले आणि थाई राज्यांचा उदयकाल दृग्‍गोचर झाला. तेराव्या शतकात थायलंडमध्ये दोन प्रमुख थाई राज्ये उदयास आली. सुखोथाई राज्य मध्य थायलंडमध्ये (१२२०), तर चीआंगमाई राज्य उत्तर भागात (१२९६). मॉन लोकांपासून थाईंनी थेरवाद बौद्ध धर्म स्वीकारला. तेराव्या शतकाच्या अखेरीस सुखोथाई राज्याने (थाई लोक हेच आपले पहिले ऐतिहासिक राज्य मानतात) मोठा विस्तार केला. सुखोथाईंचा तिसरा राजा रामखामहाएंग याने (१२७९–१३१७) १२९२ च्या सुमारास थाई भाषेत एक शिलालेख कोरून ठेवल्याचे आढळते. त्यावरून थाई राज्य हे समृद्ध व ऐश्वर्यसंपन्न, व्यापारामध्ये प्रगत आणि लोकहितैषी राजाच्या कारभाराने वैशिष्ट्यपूर्ण बनल्याचे दिसते. रामखामहाएंग राजा दक्ष राज्यकर्ता, कुशल योद्धा आणि बौद्ध धर्म व कला यांचा आश्रयदाता होता. त्याचा मुलगा लो थाई (१३१७–४७) याने आपले आयुष्य धर्मासाठीच वेचले. यामुळे सुखोथाई राज्य मोडकळीस आले. १३७८ मध्ये दक्षिणेकडील एका नवीन राज्याच्या आक्रमणात ते राज्य नष्ट झाले. १३५० च्या सुमारास सुखोथाईनंतर अयुथ्थया हे नवीन राज्य उदयास आले. अयुथ्थयाचा पहिला राजा रामातिबोदी याने लाव्हो व ऊथोंग (सध्याच्या थायलंडमधील लॉपबुरी व सूफानबुरी ही गावे या राज्याच्या राजधान्या होत्या) हे दोन्ही प्रांत एकत्र करून एक संघटित व समर्थ राज्य निर्माण केले. अयुथ्थया राज्य चाऊ फ्राया खोऱ्यात वसले. या राज्याच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या शतकात थाई समाजावर कंबोडियाचा प्रभाव अनेक दृष्टींनी पडला. राजा त्रैलोकाच्या कारकीर्दीत (१४४८–८८) हे बदल आणखी खोलवर रूजले. शासनाचे स्वरूप व संघटना यांमध्ये हे बदल विशेषत्वाने झाले. सुखोथाई राजांचे प्रशासन पैतृक वळणाचे होते, तर अयुथ्थयांचे प्रशासन ख्मेर मताला (राज्यकर्ता हा देवस्वरूपी आहे) पुष्टी देणारे होते. दरबारी विधी व ब्राह्मण यांचे महत्त्व वाढले. नोकरशाही तंत्र (अधिकारी वर्ग) अंमलात आणले गेले. राजपुत्र व सरदार यांची अधिकारश्रेणी उदयास आली. आश्रयदात्यांची उतरंड निर्माण झाली. हिचे वरचे टोक अर्थातच राजा व खालचे टोक प्रजाजन हे होते. अयुथ्थया राजांची कायदेपद्धती ही हिंदूंच्या कायदेपद्धतीवर आधारित होती. रामातिबोदी पहिला याच्या कारकीर्दीत विधिसंहिता तयार झाल्याचे मानतात. पुरावा, चोरी, गुलामगिरी, घटस्फोट अशा विविध क्षेत्रांसंबंधी कायदे तयार करण्यात आले. अयुथ्थया राजवटीत थायलंड हे समर्थ व सम्यक्–शासित राष्ट्र होते. त्या काळी समाजामध्ये मुक्त आणि गुलाम असे शेतकऱ्यांचे दोन वर्ग अस्तित्वात होते. थेरवाद बौद्ध धर्माचा मोठा प्रसार झाला होता. अयुथ्थया राजवटीने कंबोडियाशी अनेक युद्धे खेळली. पंधराव्या शतकाच्या सुमारास कंबोडिया हा अयुथ्थया राजसत्तेचा मांडलिक बनला. अयुथ्थया सत्तेने उत्तरेकडील थाई राज्यांशीही (चीआंगमाई व लाओस) अनेक वेळा संघर्ष केला. त्रैलोक राजाने १४६३ मध्ये आपले लष्करी सामर्थ्य बळकट करण्याच्या उद्देशाने आपली राजधानी उत्तरेकडे पीत्सानूलोक येथे नेली. तथापि अयुथ्थया सत्तेला चीआंगमाई राज्यावर शाश्वत असे नियंत्रण करता आले नाही. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात थायलंडला चीआंगमाईवर चिरकाल ताबा मिळविता आला. अयुथ्थया सत्तेला आव्हान देणारे ब्रह्मदेश हे एक राष्ट्र होते. १५४९ च्या सुमारास ब्रह्मदेश व अयुथ्थया यांच्यात संघर्ष सुरू झाले. थाई राजा महाचक्रफत (१५४८–६९) हा आपल्या राणीमुळे (सुरियो थाई) वाचला तथापि राणीला मात्र आपले प्राण गमवावे लागले. १५६९ मध्ये थाईचा पराभव होऊन हे संघर्ष संपले. ब्रह्मदेशाने थायलंडला मांडलिक बनवून १५ वर्षे राज्यकारभार चालविला. अयुथ्थयाला पुन्हा १५८७ मध्ये राजपुत्र नरेश्वन याने स्वातंत्र्य मिळवून दिले तो १५९० मध्ये राजा झाला. सोळाव्या शतकात आशियाकडे जाणारे मार्ग पोर्तुगीजांनी शोधल्यानंतर थायलंडला पोर्तुगीज, डच, ब्रिटिश व फ्रेंच व्यापारी आणि धर्मप्रचारक यांनी भेटी दिल्या. १६०८ व १६१२ मध्ये अनुक्रमे डचांनी व ब्रिटिशांनी अयुथ्थया शहरात व्यापारकेंद्रे उभारली. १६५७ मध्ये फ्रा नाराई गादीवर आला व त्याने ब्रिटिश व डच यांचा प्रभाव कमी करण्यासाठी फ्रेंचांबरोबर राजकीय संबंध दृढतर केले. परिणामी फ्रेंच वकील, धर्मप्रचारक आणि फ्रेंच सैन्य यांचे थायलंडमध्ये बरेच वर्चस्व वाढले. १६८८ मध्ये फ्रेंचविरोधी बंड होऊन फ्रेंचांची थायलंडमधून हकालपट्टी करण्यात आली. १७६७ मध्ये अयुथ्थया सत्तेचा ब्रह्मदेशाच्या थायलंडवरील स्वारीने शेवट झाला. ब्रह्मी सैन्याच्या तावडीतून बचावलेल्या थाई नेत्यांचे अयुथ्थयाच्या विध्वंसानंतर पुन्हा थाई राजवट स्थापन करण्याचे प्रयत्‍न सुरू झाले. फ्राया टॅस्किन या एका थाई सेनापतीने बँकॉकजवळील थॉनबुरी येथे नवी थाई राजधानी वसविली. आपल्या पंधरा वर्षाच्या कारकीर्दीत त्याने जवळजवळ सर्व थाई राजसत्तेची पुनर्रचना करण्यात यश मिळविले.


१७८२ मध्ये टॅस्किनला वेड लागल्यामुळे पदच्युत करण्यात येऊन दुसऱ्या एका सेनापतीने पारंपरिक (जुनी) राजसत्ता पुन्हा सुरू करण्याचा निर्धार केला. ही नवी उदयास आलेली राजसत्ता ‘चक्रीवंश’ या नावाने आजही प्रचलित आहे. पहिल्या चक्रीराजाने (तो सामान्यतः ‘राम पहिला’ या नावाने ओळखण्यात येत असे. जितके चक्रीराजे गादीवर येतील तेवढे सर्व ‘राम’ या नावानेच अनुक्रमे ओळखले जात) गादीवर आल्यावर थॉनबुरीहून बँकॉकला राजधानी हलविली. असे असले, तरी अयुथ्थया कालखंडापासून थॉनबुरी–बँकॉक कालखंडातील थायलंडमध्ये मागील परंपरा प्रथम पुढे चालू राहिल्याचे दिसून येते. समाजाच्या चालीरीती व राहणीमान तसेच राज्याची सामाजिक भावनिष्ठा यांमध्ये महत्त्वाचे बदल झाले नाहीत. पहिल्या चक्री राजांनी देशांतर्गत व बाह्य असे दुहेरी पुनःस्थापन धोरण अवलंबिले. विधिसंहिता, धार्मिक ग्रंथ आणि वाङ्मयीन साहित्य पुन्हा लिहिले गेले. जुन्या अयुथ्थया शैलीबरहुकूम नवे राजवाडे व नवी मंदिरे बांधण्यात आली. पहिल्या तीन चक्री राजांनी असेच धोरण चालविले. पहिला राम (१७८२–१८०९) याने लष्करी पुनरेकीकरण नीती अवलंबिली आणि कंबोडिया व इतर राज्ये थायलंडच्या अंमलाखाली आणली. दुसरा राम (१८०९–२४) याने कला व साहित्य यांना उदार आश्रय दिला. तो स्वतःच श्रेष्ठ दर्जाचा कवी असल्याने इतर दरबारी कवींना हाताशी घेऊन त्याने हिंदू रामायणाचे थाई भाषेत उत्तम रूपांतर केले, त्याचप्रमाणे इतर अभिजात ग्रंथनिर्मिती केली. तिसरा राम (१८२४–५१) याने थाई साम्राज्याचा उत्तर व दक्षिण अशा दोन्ही दिशांना विस्तार केला. याच काळात बाह्य देशांशी विशेषतः चीनशी व्यापार वाढला चिनी लोकांचे स्थलांतर प्रमाण फार वाढले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास बँकॉकमधील एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या चिनी होती, एवढे चिन्यांचे स्थानांतरण वाढले होते. यूरोपीय हितसंबंधांचा पूर्व आशियामध्ये वाढता प्रभाव दिसू लागला. यूरोपीयांनी थायलंडशी खुला व्यापार आणि त्या देशात राजदूतीय संबंध प्रस्थापित करण्याची मागणी थायलंडजवळ केली. त्या वेळी थायलंडमध्ये राजा माँगकूट (चौथा राम) राज्य करीत होता. त्याच्या १८५१–६८ च्या कारकीर्दीत थायलंडने ग्रेट ब्रिटन (१८५५), अमेरिका (१८५६), फ्रान्स (१८५६) आणि इतर यूरोपीय राष्ट्रे त्यांच्याशी व्यापार सवलतींबाबतचे करार केले. यांच्या योगे यूरोपीय राष्ट्रांशी थायलंडचा व्यापार फार वाढला, देशातील भातशेतीच्या तंत्रांत व पद्धतींत आमूलाग्र बदल घडून आले व परदेशीयांचा देशात फार प्रभाव वाढू लागला. राजा माँगकूटची कारकीर्द गाजली ती याच्या सहिष्णू परराष्ट्रीय नीतीमुळे. शांततापूर्ण करार व तडजोडी यांच्या योगे माँगकूट राजाने आपल्या देशाचे आपल्या छत्राखालील देशांवरील अधिकार व अंमल शिथिल करण्यास सुरूवात केली. १८६७ मध्ये कंबोडियातील आपले सार्वभौमत्वाचे अधिकार थायलंडने फ्रान्सला दिले. यूरोपीय धर्मप्रचारक आणि छपाईकला व लस टोचणे यांसांरख्या नवीन तंत्रविद्या थायलंडमध्ये प्रसृत करण्यात आल्या, त्याचप्रमाणे यूरोपीय प्रशिक्षक, तंत्रज्ञ व लष्करी तज्ञ यांचेही देशात स्वागत करण्यात आले. ॲना लिआनोवेन्स हिने माँगकूट राजाची कारकीर्द द किंग अँड आय या ग्रंथातून प्रशंसिली आणि तो ग्रंथ सर्व जगभर गाजला. माँगकूटने थाई बौद्ध धर्म (थम्मायुत) असा सुधारित धर्मपंथ आपल्या देशात प्रसृत केला. थम्मायुत या धर्मपंथाचा एवढा मोठा प्रभाव पडला, की त्यायोगे फारच थोडे थाई लोक ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले. १८६८ मध्ये माँगकूट राजानंतर चुलालंगकर्ण (पाचवा राम) हा त्याचा पंधरा वर्षे वयाचा मुलगा गादीवर आला. त्याची कारकीर्द (१८६८–१९१०) एवढी झाली. त्याने आपल्या वडिलांचेच उदार धोरण पुढे चालविले आणि फ्रेच व ब्रिटिश यांना अनुक्रमे लाओस व कंबोडिया (१८९३, १९०४ व १९०७) आणि मलाया (१९०९) यांमधील आपल्या अधिकाराखालील प्रदेश दिला. १८९६ मध्ये फ्रेंच व ब्रिटिश साम्राज्यांनी मध्य थायलंडचा भाग हा तटस्थ मध्यगत प्रदेश म्हणून मान्य केला. यूरोपीयांशी मिळतेजुळते घेण्याच्या धोरणाबरोबरच चुलालंगकर्णाने देशांतर्गत सुधारणा करण्यावर भर दिला. या सुधारणा कार्यवाहीत आणण्यामध्ये राजाला छोट्या सयामच्या काही दूरदर्शी नेत्यांनी फार मोठे साहाय्य दिले. त्यांमध्ये राजाचा सावत्र भाऊ युवराज दॅमराँग याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. महत्त्वाच्या सुधारणा पुढीलप्रमाणे होत्या: केंद्रीकृत नोकरशाहीची (अधिकारी वर्गाची) निर्मिती, शासकीय वित्तव्यवस्थेचे दृढीकरण मांडलिक व दूरस्थित अंमलाखालील प्रदेशांचे देशाच्या प्रांतिक प्रशासन प्रवाहात संमीलन गुलामगिरीचे उच्चाटन आश्रयदाता–आश्रित संबंधांचा शेवट सार्वजनिक शिक्षण यासारख्या राज्यस्तरीय सेवेची स्थापना आणि रेल्वे व तारायंत्र व्यवस्था यांसारख्या तांत्रिक नवप्रवर्तनांना प्रोत्साहन. १८७३ मध्ये या अंतर्गत सुधारणांना प्रारंभ झाला. राजाच्या स्थानाला बळकटी येण्याकरिता १८७४ मध्ये कौन्सिल ऑफ स्टेट, प्रिव्ही कौन्सिल यांसारख्या राजकीय सुधारणा कार्यवाहीत आणण्यात आल्या. १८८०–८५ या काळात यूरोपीय देशांतील धर्तीवर नवीन मंत्रिपदे निर्माण करण्यात आली. १८९२ मध्ये वरील सर्व सुधारणा एकवटण्यात येऊन सबंध मंत्रिमंडळाची कार्यात्मक जबाबदारीच्या अनुरोधाने पुनर्रचना करण्यात येऊन गृह, परराष्ट्र व्यवहार, न्याय, वित्त, युद्ध, सार्वजनिक बांधकामे, शिक्षण, कृषीस भांडवल, राजसेवा आणि शाही कुटुंब यांविषयीची मंत्रिपदे निर्माण करण्यात आली. अर्थात थायलंडपुढे हे सर्व करण्यामागे यूरोपीय राष्ट्रांची प्रतिमाने होती. पश्चिमी राष्ट्रांचे आव्हान समर्थपणे झेलण्याकरिता अंतर्गत सामर्थ्य वृद्धिंगत करणे हाच हे करण्यामागील प्रमुख हेतू होता. थायलंडची आंतरिक सुधारणानीती अतिशय यशस्वी झाली तीयोगे थायलंडला आपले स्वातंत्र्य अबाधित राखता आले, देश अधिक बलवान झाला राजेशाहीने सुधारणांना मान्यता व प्रोत्साहन देऊन आपले नेतृत्व स्थिरपद केले.

चुलालंगकर्णाची धोरणे त्याच्या वाजिराव्युध (सहावा राम : १९१०–२५) आणि प्रजाधिपोक (सातवा राम: १९२५–३५) या दोन्ही मुलांनी नेटाने पुढे चालविली. वाजिराव्युध राजाने देशातील पहिले विद्यापीठ आपल्या वडिलांच्या नावाने स्थापिले. १९२१ मध्ये त्याने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. लष्करी दक्षतेवर त्याने भर दिला आणि मुलकी नोकरांकरिता ‘वाइल्ड टायगर कोअर’ नामक समांतर सैनिकी संघटना उभारली. पहिल्या महायुद्धात त्याने दोस्तराष्ट्रांच्या बाजूने थायलंडला वळविले आणि युद्धसमाप्तीनंतर, यूरोपीय राष्ट्रांना १८५५ च्या करारान्वये देण्यात आलेल्या राज्यक्षेत्रीय व राजकोषीय हक्क–सवलती थाई शासनाने खंबीरपणे रद्द केल्या. वाजिराव्युधाने थाई राष्ट्रवादाची केलेली जागृती ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी होय. आजही तो थायलंडमध्ये काव्य, नाट्य, निबंध इ. विपुल साहित्यनिर्मिती करणारा म्हणून ओळखला जातो.


राज्यव्यवस्था : थायलंडमध्ये २४ जून १९३२ पर्यंत केवल राजेशाही होती. त्याच दिवशी देशात अवचित सत्तांतर घडून हंगामी संविधान कायदा २७ जून रोजी अंमलात आला. थायलंडची राजसत्ता मर्यादित होऊन घटनात्मक सरकारला सत्ता प्राप्त झाली. प्रीदी फानोभ्यंग व लष्करी अधिकारी पिबुल संग्राम या व्यक्ती महत्त्वाच्या होत्या पण प्रीदींनी सुचविलेल्या आर्थिक सुधारणा विफल झाल्याने १९३९ साली पिबुल संग्राम हे पंतप्रधान झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी जपानशी मैत्री करून दोस्तांविरुद्ध युद्ध पुकारले, पण युद्धात जेव्हा जपानचा पराभव होऊ लागला त्या वेळी युद्ध संपण्यापूर्वी काही दिवस पिबुल संग्राम यांनी राजीनामा दिला व प्रीदी हे पुन्हा पंतप्रधान झाले. परंतु १९४६ मध्ये झालेला राजे आनंद महिडोल (आठवा राम) यांचा अपमृत्यू व सैन्याचा अविश्वास यांमुळे १९४७ साली प्रीदींचे सरकार उलथण्यात आले आणि पिबुल संग्राम हे १९४८ मध्ये पुन्हा पंतप्रधान झाले. आनंद महिडोल यांच्या अपमृत्यूनंतर गादीवर आलेल्या त्यांच्या भूमिबल अदुल्यादेज या भावाला शिक्षणासाठी इंग्‍लंडला पाठविले व देशातील सर्व सत्ता हाती घेतली. १९५७ पर्यंत सैन्याच्या पाठिंब्यावर तेच पंतप्रधान राहिले पण शेवटी देशाचे पोलीस संचालक, सरसेनापती व क्रांतिकारी पक्षाचे नेते प्रभावी बनले व त्यांनी क्रांती घडवून आणली. पिबुल संग्राम देश सोडून परागंदा झाले व प्रथम पोते सरसिन हे पोलीस प्रमुख व नंतर काही दिवसांनी ले. जनरल थानोम कित्तिकाचोर्न हे पंतप्रधान झाले पण २० ऑक्टोबर १९५८ रोजी क्रांतिकारी पक्षाचे नेते सरित थानारत यांनी पंतप्रधानपद हाती घेतले.

फील्ड मार्शल सरित हे थायलंडचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जातात. सत्तेवर येताच त्यांनी कायदेमंडळ बरखास्त केले, घटना स्थगित ठेवली, विरोधी पक्ष बेकायदा ठरविले व नवीन संविधान समिती स्थापन केली. त्यांचे बहुतांश सभासद लष्करी अधिकारी होते. देशाला त्यांनी नवी घटना दिली आणि या संविधान समितीने सरित यांची पंतप्रधान म्हणून अविरोध निवड केली व राजे भूमिबल अदुल्यादेज यांनी तिला मान्यता दिली.

१९७४ च्या संविधानानुसार देशातील २० वर्षांहून अधिक वयाच्या सर्व व्यक्तींस मतदानाचा अधिकार असून येथे संविधानात्मक राजेशाही अस्तित्वात आहे. संसदेची (नॅशनल असेंब्‍ली) वरिष्ठ (सीनेट) व कनिष्ठ (हाउस ऑफ रेप्रेझेंटेटिव्ह्‌ज) अशी दोन सभागृहे आहेत. वरिष्ठ सभागृहाचे १०० सभासद असून ते राजाकडून नामनिर्देशित केले जातात. कनिष्ठ सभागृहाचे २४०–३०० लोकनियुक्त सभासद असतात. कनिष्ठ सभागृहात बहुमत असलेल्या पक्षनेत्याची राजा पंतप्रधान म्हणून निवड करतो. तो राजाच्या सल्ल्याने आपले मंत्रिमंडळ बनवितो. राज्यकारभारासाठी देशाचे एकूण ७१ प्रांत बनविले असून त्यांचे परगणे, जिल्हे व गावे असे विभाग आहेत.

सरित थानारत यांच्या सरकारने अनेक निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी धडाडीने केली. त्यांनी कम्युनिस्ट चीनबरोबरचा व्यापार पूर्णपणे बंद केला. देशात अफू ओढण्यास बंदी घातली, शासनातील लाचलुचपतीस कठोर शासन करून आळा घातला व पाश्चात्त्य देशांबरोबरचे राजकीय व व्यापारी संबंध दृढ केले. सरित थानारत १९६३ मध्ये मृत्यू पावले व त्यांच्या जागी १९५७ च्या क्रांतीतील त्यांचे सहकारी व अल्पकाळ पंतप्रधानपदी असणारे जनरल थानोम कित्तिकाचोर्न हे पुन्हा पंतप्रधान झाले. कित्तिकाचोर्न यांच्यानंतर सन्या धर्मशक्ती हे थायलंडचे पंतप्रधान झाले (१९७३–७४). त्यानंतर कुक्रित प्रमोज हे वर्षभर पंतप्रधानपदावर होते (१९७५–७६). ४ एप्रिल १९७६ रोजी थायलंडमध्ये गेल्या ४४ वर्षांतील संविधानीय लोकशाहीमधील बारावी निवडणूक घेण्यात आली. या ४४ वर्षांमध्ये देशाने १४ पंतप्रधान आणि ३७ मंत्रिमंडळे यांचा उदयास्त पाहिला. कुक्रित प्रमोज यांचा ४ एप्रिल १९७६ च्या निवडणुकीत पराभव झाला. त्यांचेच भाऊ सेनी प्रमोज यांच्या डेमॉक्रॅटिक पार्टीने २७९ सदस्य असलेल्या कनिष्ठ सभागृहात पूर्वीच्या ७२ ऐवजी ११५ जागा मिळविल्या व ते विजयी झाले. सेनी प्रमोज हे थायलंडचे नवे पंतप्रधान बनले. ६ ऑक्टोबर १९७६ रोजी देशात अवचित सत्तांतर होऊन लष्कराने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. बँकॉकमधील थम्मासाट विद्यापीठात झालेल्या पोलीस व डाव्या गटाचे विद्यार्थी यांच्यामधील संघर्षावरून हे अवचित सत्तांतर घडून आले. दुसऱ्या महायुद्धापासूनचे देशातील हे चौदावे अवचित सत्तांतर होय. ॲडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म कमिटी या लष्करी संघटनेने ८ ऑक्टोबर १९७६ रोजी थॅनिन क्राइव्हिशियेन या ४९ वर्षे वयाच्या कायद्याचे प्राध्यापक व सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले. १३ ऑक्टोबर १९७६ रोजी थॅनिन यांनी मार्गदर्शित लोकशाहीचा कार्यक्रम जाहीर केला.


न्यायव्यवस्था: थायलंडमधील न्यायिक कारभार थाई मंत्रिमंडळातील न्यायमंत्र्याच्या अखत्यारीत चालतो. ह्या कारभारावर एका न्यायिक समितीची देखरेख असून न्यायाधीशांच्या नेमणुका, बदल्या किंवा बडतर्फी ह्या समितीच्या शिफारशींनुसार राजाज्ञेने होते. एक सर्वोच्च न्यायालय (थाई भाषेत डिका) बँकॉक या राजधानीच्या शहरात कार्यान्वित असून २० दंडाधिकारी न्यायालये (क्वाएंग) व ८५ प्रांतिक न्यायालये (चांगवड) देशात आहेत.

संरक्षण: १९६० च्या कायद्याप्रमाणे लष्कराचे सरसेनापती, आरमाराचे सर्वोच्च अधिकारी व वायुदल प्रमुख यांचे थाई संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक संरक्षण मंडळ नेमण्यात आले असून, त्या देशाचे संरक्षणविषयक सर्व प्रश्न त्या मंडळाकडे सोपविण्यात आले आहेत.

देशात १९५४ च्या कायद्यान्वये २१ ते ३० वर्षे वयातील प्रत्येक थाई व्यक्तीला संरक्षणाच्या कोणत्यातरी एका शाखेत किमान २ वर्षे शिक्षणाची सक्ती करण्यात आली आहे. सक्तीच्या संरक्षण शिक्षणानंतर प्रथम ६ वर्षे राखीव दलात व त्यानंतर १० वर्षे दुसऱ्या राखीव दलात त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार राहता येते. संरक्षण दलांतील अधिकारी तयार करण्याकरिता राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय, सैनिकी अधिकारी महाविद्यालय व सैनिकी शाळा अशा तीन संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. सैन्य, आरमार व वायुदल अशी तिन्ही संरक्षक दले थायलंडमध्ये सुसज्‍ज असून समुट प्राकान (पाकनाम) येथे एक शाही नाविक अकादमी आहे. विविध संरक्षक दलांस भरपूर युद्धसामग्री अमेरिका व इतर परकीय राष्ट्रांकडून पुरविण्यात येते. भूसेनेमध्ये पाच पायदळ विभाग (चार रणगाडे विभागांसहित) व दोन स्वतंत्र लढाऊ विभाग आहेत. भूसेनेमध्ये १·३ लक्ष सैनिक आहेत. १९७५ मध्ये नौदलात चार मोठ्या व दोन लहान फ्रिगेट, चार सुरूंगकाढी, एक सर्वेक्षण जहाज, सुरूंग पेरणारी दोन जहाजे व १७ गस्ती जहाजे, १३ किनारी गनबोटी इ. असून २०,००० चे नौसैन्य होते. वायुदलात सर्व प्रकारची आधुनिक १५० लढाऊ विमाने असून अधिकारी व सैनिक मिळून सु. ४०,००० संख्या आहे.

आर्थिक स्थिती : थायलंड मुख्यतः शेतीप्रधान देश असला, तरी १९५२ पासून शेतीचे देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनातील प्रमाण १९६५ पर्यंत ४४ टक्क्यांवरून ३३ टक्क्यांवर आले होते. देशातील प्रमुख उत्पादन तांदूळ हे असून तेच राष्ट्रीय प्रमुख अन्न व देशाची प्रमुख निर्यात बाब आहे. देशाच्या एकूण जमिनीपैकी २३% भूमी शेतीयोग्य आहे पण प्रत्यक्षात शेती केवळ २०% जमिनीतच होते. त्यापैकी फक्त ३ ते ५% जमिनीसच जलसिंचन उपलब्ध आहे. १९५२ पासून शेतीतील एकूण श्रमिकांची संख्या कमी होत असून शेतीखालील जमीन व उत्पादन मात्र वाढत आहे. एकूण उत्पादकता वाढल्याचा हा परिणाम आहे. आज शेतीत ७५% श्रमिक गुंतले असून देशाचे ६५% परकीय चलन शेतीउत्पादनेच मिळवून देत आहेत.

शेती : थायलंडमधील ८५% जनता शेतीवरच उपजीविका करणारी आहे. १९५२ च्या राज्यक्रांतीनंतर थाई सरकारने खालील उद्दिष्टे आपल्यासमोर ठेवली :

(१) देशात उत्पन्न होणाऱ्या तांदुळाला परकीय बाजारपेठा शोधणे, (२) शेती व्यवसाय अद्ययावत करणे, (३) उत्पादनात विविधता, हेक्टरी वाढ, (४) शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करून त्यांच्यात सहकारी तत्त्वांचा प्रसार करणे, (५) व्यापारातील मध्यस्थांची उचलबांगडी करणे, (६) तांदुळाच्या उत्पादनाची खरेदी–विक्री सरकारी पातळीवरून करणे व त्याकरिता सरकारने एक स्वतंत्र तांदूळ विकास मंडळ स्थापन करणे, (७) जमिनीची मशागत शास्त्रीय पद्धतीने करण्याकरिता शेतकऱ्यांस शेतीविषयक माहिती आणि सल्ला शक्य तो मोफत देण्याची व्यवस्था करणे. थायलंड अन्य आशियाई देशांपेक्षा शेतजमिनीबाबत अधिक नशिबवान आहे. देशातील शेताचा सरासरी आकार २६ राय (१०·४ एकर = ४ हेक्टर) एवढा आहे. भातशेती हे प्रमुख पीक आहे. तांदुळाचे उत्पादनसुद्धा १,३६० किग्रॅ. वरून १,५१० किग्रॅ. इतके वाढले आहे. प्रमुख भातशेतीचा प्रदेश मध्य मैदान व ईशान्य भागात आहे. मध्य मैदानात उत्पादनही हेक्टरी १,६६० किग्रॅ. पर्यंत आहे. भूमिहीन शेतमजूर किंवा अत्यंत मोठ्या प्रमाणावर शेताची विभागणी व ग्रामीण कर्जबाजारीपणा हे प्रश्न थायलंडमध्ये जवळजवळ नाहीत. तांदूळ हे एकमेव पीक असल्याने निर्माण होणाऱ्या समस्या कमी व्हाव्यात म्हणून पिकांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्‍न होत आहे. मका, केनाफ व ताग ही पिके महत्त्वाची बनली आहेत. कापसाचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्‍न अजून यशस्वी झालेले नाहीत. ऊस व तंबाखू ह्या पिकांकडेही लक्ष पुरविले जात आहे.


रबर हे पीक महत्त्वाचे आहे. जवळजवळ ४० लाख हेक्टर जमीन रबराखाली असून मळे छोटे आहेत. थायलंडमध्ये एका व्यक्तीस ४० राय इतकी भूमिमर्यादा असल्याने जास्त क्षेत्राचे मळे जप्त करण्यात आले आहेत पण एकूण दर्जा मलेशियातील मळ्यांपेक्षा कमी असून उत्पादनही कमी आहे. मलेशियाच्या धर्तीवरच मळे सुधारण्याची राष्ट्रव्यापी योजना हाती घेण्यात आली आहे. भाताखाली सु. ७५·२६ लक्ष हे. क्षेत्र असून नवीन जलसिंचन योजनांमुळे लागवडक्षेत्र वाढत आहे. १९७३ मधील प्रमुख कृषिउत्पादने पुढीलप्रमाणे होती (आकडे लक्ष मे. टनांत): भात ११६·७ मका २३·० ऊस १३०·८० नारळ ७·२० भुईमूग २·०८ कापूस ०·२८ तंबाखू ०·९८ तीळ ०·२२ टॅपिओका ४७·५ मूग २·७५ सोयाबीन १·० केनाफ ५·७० ताग ०·२०.

भारताप्रमाणेच या देशात शेतीमध्ये गुरांस महत्त्व आहे पण रेडा हा प्राणी जास्त महत्त्वाचा आहे. आग्‍नेय आशियातील ४०% रेडे आणि २८% गुरे व डुकरे या देशात आहेत. १९७३ मध्ये पुढीलप्रमाणे पशुधन होते (आकडे लक्षांत): घोडे १·६८ रेडे ५६·३४ गुरे ४५·७१ डुकरे ४५·७३ कोंबड्या ३७७ बदके १३५. १९६७ साली पाळीव हत्ती ११,५०० होते. पशुपालनाचा परंपरागत दर्जा सामान्य आहे.

उद्योग: दुसऱ्या महायुद्धानंतर उद्योगधंद्यांत लक्षणीय वाढ झाल्याचे आढळते. १९६० साली औद्योगिक गणना पूर्ण करण्यात आली. तीनुसार देशात १३८ लाख श्रमिक होते, त्यांपैकी केवळ ४·७ लाख उद्योगांत होते आणि बरेच खाजगी निर्वेतन सेवक होते. देशात १६,००० नोंदविलेले उद्योग होते पण ५० पेक्षा जास्त मजूर असणाऱ्या उद्योगांची संख्या केवळ ३०० होती. उत्तरेस व खोरातच्या पठारावर अद्यापिही ग्रामीण उद्योगपद्धतीच चालू आहे. भारताप्रमाणेच थाई सरकारने अनेक उद्योग स्वतःच सुरू केले आहेत. त्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक विकास निगम स्थापन करण्यात आला आहे. या निगमाने साखर कारखाने, ताग गिरण्या व कागद कारखाने सुरू केले आहेत. चिनी लोकांचे उद्योगधंद्यांतील प्राबल्य कमी व्हावे, हा एक प्रमुख उद्देश सरकारी उद्योग स्थापन करण्यामागे आहे. प्रमुख उद्योग हे शेतमाल, जंगल–उत्पादने व खनिजे यांवर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. त्यांत भात गिरण्या, साखर, लाकूडसामान, सिगारेट, ताग गिरण्या, सिमेंट हे उद्योग महत्त्वाचे आहेत. सर्वांत मोठा उद्योग म्हणजे थाई ऑईल कॉर्पोरेशनने बांधलेला तेल शुद्धीकरण कारखाना. हा बँकॉकजवळ असून वार्षिक शुद्धीकरणक्षमता १७·५ लाख मे. टन आहे. १९७७ सालापासून या कारखान्याचे हस्तांतर सरकारकडे होईल. थायलंडच्या आखातात खनिज तेलाचा शोध घेण्यासाठी शासनाने सवलती देऊ केल्या आहेत. तसेच जर्मनीतील क्रप कंपनीच्या सहकार्याने पोलाद कारखाना स्थापन करण्याचे प्रयत्‍न चालू आहेत. जपानी भांडवलदार थायलंडमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत व विशेषतः कापड उद्योगात त्यांनी २ लाखांपेक्षा जास्त चात्या सुरू केल्या आहेत. टोयोटा व होंडा या कंपन्या मोटारसायकली व मोटारींची जुळणी कारखाने उभारीत आहेत. १९६५ मध्ये फायरस्टोन कंपनीने देशात टायरचा प्रचंड कारखाना सुरू केला असून आज स्थानिक गरज पूर्णांशाने भागवून हा कारखाना टायर निर्यात करतो. साखर, कागद व सिमेंट कारखान्यांना अवजड कच्चा माल लागतो, त्यामुळे हे कारखाने कच्च्या मालाच्या प्रदेशात विखुरलेले आहेत, पण अन्य कारखाने मात्र बँकॉकच्या परिसरात एकवटलेले आहेत. सरकारने भिन्न प्रांतांत औद्योगिक वसाहती स्थापन करून विक्रेंद्रीकरणाचे जोराचे प्रयत्‍न चालविले आहेत. त्यात चीआंगमाई, नाखोन रातचासीमा व मालामो औद्योगिक वसाहत ही ठिकाणे प्रमुख आहेत. उत्तर भागात एक लिग्‍नाइट खाण जवळच असून यूरिया व अमोनियम सल्फेट कारखानाही उभारण्यात आला आहे.

सिमेंट, उच्च प्रतीची साखर व शुद्धीकृत पेट्रोलियम या पदार्थांच्या बाबतींत थायलंड स्वयंपूर्ण झाला आहे. १९७२–७३ मध्ये देशात खालीलप्रमाणे प्रमुख उद्योगांची उत्पादने झाली: (मे. टन) सिमेंट ३७·०६ लक्ष पांढरे सिमेंट ३९,५०३ उच्च प्रतीची साखर ७·१७ लक्ष गोणपाटाची पोती ९१२ लक्ष नग कागद ४२,४०० (१९७२) तंबाखू १९,४२२ गोड केलेले संघनित दूध ९२,१४४ बाष्पीकृत दूध १९,८५० काचपत्रे ४४,२१४ नग बीर ४३२ लक्ष लिटर सुती कापड ४३·४८ कोटी चौ. मी. कृत्रिम कापड २२·१६ कोटी चौ. मी. प्लायवुड पत्रे ३५,६९,८२३ नग व्हिनिल टाइल ५,०९,९६४ चौ. मी. (१९७२).

थायलंडमध्ये कामगार संघटनांना मनाई असून १९६६ च्या कामगार कलह कायद्यान्वये चांगली कामाची स्थिती व उचित वेतन यांबाबत हमी देण्यात आली आहे. कामगार व कामगार खाते यांचा व्यवस्थापकीय प्रतिनिधींशी करार व तडजोड होऊ शकली नाही, तरच संप उद्‌भवतात. एप्रिल १९७२ मध्ये अंमलात आलेल्या नवीन कामगार कायद्यानुसार किमान वेतन अस्तित्वात आले असून गृहमंत्रालयास कामगार कलहांबाबत निवाडे देणे तसेच आवश्यकता असेल तेथे दंड वा सजा देणे यांचे अधिकार प्राप्त झाले आहेत.


थायलंडमध्ये प्रामुख्याने जलविद्युत् केंद्रे, औष्णिक केंद्रे आणि डीझेल संयंत्रे यांपासून वीजउत्पादन होते. जलविद्युत् केंद्रांचे प्रमाण निम्म्याहून अधिक आहे. पिंग नदीवर बांधलेले भूमिफोल धरण (पूर्वीचे यान ही धरण) हे देशातील सर्वांत मोठे असून त्याची विद्युत्‌निर्मितिक्षमता १·४ लक्ष किवॉ. वरून ३·५ लक्ष किवॉ. पर्यंत वाढविण्याची योजना आहे. तसेच उबोलरतन धरण प्रकल्पाची विद्युत्‌निर्मितिक्षमता २५,००० किवॉ. आहे. देशाचे पहिले अणुशक्तिचलित विद्युत्‌निर्मिती संयंत्र सीराचा जिल्ह्यातील आओ पै येथे १९८१ पर्यंत चालू करण्याची योजना आहे.

व्यापार : थायलंड हा कृषिप्रधान देश असल्याने ह्या देशातून निर्यात होणाऱ्या वस्तूंत रबर, मका, तांदूळ, केनाफ, ताग, कथिल धातू, सागवान, टॅपिओका यांसारखा कच्चा माल व आयातीत मुख्यतः अन्नधान्य (गहू वगैरे), पैये व तंबाखू, अशोधित कच्चा माल, कापड, यंत्रे आणि त्यांचे सुटे भाग, सायकली, मोटारी, तेले, खनिज इंधने व वंगणे, वनस्पती तेले, रसायने, निर्मितिउद्योगाचा तयार माल वगैरे आहे. १९७४ मध्ये एकूण आयात आणि निर्यात अनुक्रमे ६,४०३·२ कोटी बाट व ५,०३६·३ कोटी बाट झाली. आयातीमध्ये अनुक्रमे जपान, अमेरिका, प. जर्मनी, ग्रेट ब्रिटन, मलेशिया, सौदी अरेबिया यांचा वाटा असून निर्यात व्यापारात जपान, अमेरिका, नेदर्लंड्स, हाँगकाँग, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया हे देश येतात.

खनिज संपत्ती : कॅसिटराइट (कथिल खनिज) व वूलफ्रॅम (टंगस्टन खनिज) ही थायलंडमधील सर्वांत महत्त्वाची खनिजे आहेत. जस्ताच्या जागतिक उत्पादनात थायलंडचा तिसरा क्रमांक आहे. देशात कथिलाच्या सु. ६५० वर खाणी आहेत. फूकेट येथे १९६५ पासून एक कथिल शुद्धीकरणाचा कारखाना सुरू झाला असून वार्षिक उत्पादन २०,००० टन आहे. जस्ताच्या खाणींच्या भागांत शिसेही सापडते. दक्षिण थायलंडमध्ये थोडासा कोळसा सापडतो आणि उ. थायलंडमध्ये लिग्‍नाइटची एक खाण आहे. चांदी, सोने, हिरे, पाचू, लोखंड, तांबे, मॉलिब्डेनम, मँगॅनीज, झिर्‌कॉन, चुनखडी व संगमरवर ही इतर खनिजे तुरळक प्रमाणात आढळतात. प्रमुख खनिजांचे १९७१ सालातील उत्पादन मेट्रिक टनांत खालीलप्रमाणे होते: जस्त २९,६०९ वूलफ्रॅंम ४,८६५ शिसे ५,५२५ अँटिमनी ५,४८५ मँगॅनीज १३,९८२ लोहखनिज ३९,५३२ फ्ल्युओराइट ४,२६,४९९ जिप्सम १,६७,९०४ लिग्‍नाइट ४,४५,०८४ चिकणमाती ४,८९,७३२.

अर्थकारण: थायलंडमधील कायदेशीर चलन बाट आहे. पूर्वी यालाच टिकाल असे म्हणत. सतांग हे लहान नाणे असून १०० सतांग म्हणजे १ बाट होतो. हल्ली चलनामध्ये चांदीचा वापर केला जात नाही. त्याऐवजी निकेल, तांबे, जस्त, ब्राँझ अशा हलक्या धातूंचा उपयोग करण्यात येऊ लागला आहे. १/२, १, ५, १०, २०, २५, ५० सतांग व १ बाट अशी नाणी पाडण्यात येतात. १९०२ पासून कागदी चलनास सुरूवात झाली असून ५० सतांग आणि १, ५, १०, २०, १०० व ५०० बाटच्या नोटा प्रचारात आहेत. १९७५ च्या अखेरीस १ स्टर्लिंग पौंड = ४१·१७८ बाट आणि १ अमेरिकी डॉलर = २०·३७५ बाट असा विनिमय दर होता.

थायलंडमध्ये १९४२ च्या कायद्याने ‘बँक ऑफ थायलंड’ ह्या मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यात आली. बँक ऑफ इंग्‍लंडच्या धोरण व व्यवहारांप्रमाणे बँक ऑफ थायलंडचा कारभार चालू आहे. कागदी चलन, विदेश विनिमयाकरिता लागणारे सोने वगैरे बाबतींत ह्या बँकेला सर्वाधिकार दिले आहेत. याशिवाय १४ व्यापारी (देशांतर्गत ६९० व परदेशांत ११ शाखा) व १४ परदेशी बँका असून खाजगी उद्योगांच्या विकासार्थ एक शासकीय निगम, गुंतवणूक मंडळ व एक विकास बँक आहे. देशात एकच शेअरबाजार असून १६ देशी–परदेशी विमाकंपन्या आहेत. १९७४–७५ च्या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न ३,७८८·१ कोटी बाट प्राप्ती व संपत्ती यांवरील कर, आयातनिर्यात जकाती, तांदूळ निर्यात अधिमूल्य, अप्रत्यक्ष कर, नफा व लाभांश यांवरील कर वगैरेंपासून मिळाले. त्याच सालच्या खर्चाची एकूण रक्कम ४,५६७·२ कोटी बाट व खर्चाच्या बाबी शिक्षण, राष्ट्रीय संरक्षण, अर्थसेवा, शेती, समाजसेवा आणि आरोग्य ह्या होत्या.

वाहतूक व संदेशवहन : देशाची वाहतूक व्यवस्था संपूर्णपणे विकसित झाली नसली, तरी तिचा जलद विकास होत आहे. १९७३ साली थायलंडमध्ये एकंदर १७,००० किमी. लांबीचे महामार्ग आणि राज्यमार्ग असून त्यांपैकी १०,००० किमी. लांबीच्या पक्क्या सडका होत्या. १९७३ मध्ये नोंदणीकृत वाहनांपैकी २,१६,५६७ मोटारगाड्या, २५,८७० बसगाड्या, १,५१,१८५ ट्रक आणि ४,१३,४२५ मोटारसायकली होत्या.


थायलंडमध्ये १९७४ अखेर एकंदर ८,२०७ किमी. लांबीचे सरकारी मालकीचे लोहमार्ग होते. त्यांचा विस्तार व आधुनिकीकरण यांसाठी जागतिक बँकेकडून २२० लक्ष डॉलरचे कर्ज मिळाले आहे. सर्व सरकारी लोहमार्ग एका व्यवस्थापनाखाली आहेत. दक्षिण रेल्वेमार्गाची एक शाखा किनाऱ्याने जाऊन सुग्‍नाई कोलोक येथे मलेशियातील रल्वेला जोडलेली आहे.

थायलंडमधील नदी व कालवे हे अंतर्गत जलवाहतुकीचे महत्त्वाचे प्रकार आहेत. त्यांद्वारा ७५% मालवाहतूक होते. थायलंडमध्ये चाऊ फ्राया नदी हाच एकमेव अंतर्गत जलवाहतुकीचा मार्ग आहे. चाऊ फ्राया नदीच्या मुखापासून (सयामच्या आखातापासून) बँकॉक बंदर ३० किमी. दूर आहे. बँकॉक बंदरात ३ थाई व ४० परदेशी जलवाहतुक कंपन्यांची जहाजे मालाची चढउतार करतात. देशात २२ बंदरे असून त्यांपैकी बँकॉक हे सर्वांत मोठे, गजबजलेले व लाओसचे प्रवेशबंदर आहे. देशाचा ९५% आयात व्यापार व ८५% निर्यात व्यापार याच बंदरातून चालतो. बँकॉक बंदराची विस्तारयोजना चालू आहे.

दुसऱ्या महायुद्धसमाप्तीपासून बँकॉक हे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. बँकॉकहून देशातील निरनिराळ्या भागांशी व परदेशांशी हवाई वाहतूक करण्याचा थाई सरकारकडे मक्ता आहे. ३० कोटी बाट भांडवल असलेली ‘थाई एअरवेज कंपनी’ (१९४७) ही एकमेव सरकारी कंपनी देशांतर्गत ११ मार्गांवरून व तीन आंतरराष्ट्रीय मार्गांवरून हवाई वाहतूक करते. ‘थाई इंटरनॅशनल एअरवेज’ ही कंपनी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक करण्यासाठी १९५९ साली स्थापण्यात आली. १९७२ मध्ये ३८ परराष्ट्रांच्या प्रमुख हवाई वाहतूक कंपन्यांनी विमान वाहतूक केली. १९६९ पासून ‘एअर–सयाम एअर कंपनी’ ही एक खाजगी कंपनीही प्रवासी व माल यांची वाहतूक करीत आहे. देशात २० हून जास्त लहान विमानतळ आहेत. १९७४ मध्ये देशात ५५५ डाकघरे, ३४१ परवाना असलेली डाकघरे व ५४५ रेल्वे स्थानक–डाकघरे, तसेच दूरध्वनी यंत्रे ३·५ लक्ष (पैकी २·७ लक्ष एकट्या बँकॉकमध्ये), रेडिओसंच ५१ लक्ष व दूरचित्रवाणीसंच ७·१४ लक्ष, दैनिके २९ (सर्व बँकॉकमधूनच निघणारी, १९७२) पैकी १३ थाई भाषेतील, ४ इंग्रजी व १२ चिनी होती. जमिनीवरील उपग्रह संदेशवहन केंद्र श्रीराचा येथे १९६८ मध्ये पूर्ण झाले. दुसरे केंद्र त्याच ठिकाणी १९७० मध्ये उभारण्यात आले.

लोक व समाजजीवन : १९७३ सालच्या जनगणनेप्रमाणे थायलंडची लोकसंख्या ३,९९,५०,३०६ होती. तीपैकी २,०१,४३,५९० पुरूष व १,९८,०६,७१६ स्त्रिया होत्या. जननप्रमाण हजारी ३३ व मृत्युप्रमाण दर हजारी ७ इतके होते. लोकसंख्या मुख्यतः चिनी व आग्‍नेय आशियाई मंगोलियन वंशीयांचे मिश्रण असणारी असून धर्म, संस्कृती, भाषा या दृष्टींनी एकजीव होती. थायलंडमध्ये इतिहास, भाषा, धर्म, राहणीमान या दृष्टिकोनांतून ३० वांशिक गट असून त्यांपैकी थाईंचे तीन प्रमुख व तीन उपप्रमुख अशा गटांत विभाजन करता येते. प्रमुख गट थाई (सयाम), पूर्व थाई (लाओ) व उत्तरेकडील थाई हे असून उपप्रमुख गट पुथाई, शान आणि लू हे आहेत. अल्पसंख्यांक गटांत पुढील महत्त्वाचे गट होत: चिनी, भारतीय, मलायी, कंबोडियन, कुई, कालेउंग, मोन, व्हिएटनामी (अन्नामी), कारेन. देशात अनुक्रमे बौद्ध, इस्लाम, कन्फ्यूशियन, ख्रिस्ती, शीख अशा विविध धर्मांचे लोक राहत असून बौद्ध धर्म हा राष्ट्रीय धर्म मानला जातो. कारण ९० टक्क्यांहून जास्त लोकसंख्या या धर्माची आहे. थायलंडमधील आरोग्य व कल्याणसेवा अपुऱ्या आहेत. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या लोकांचे आर्थिक प्रलोभनामुळे (उच्च पगाराच्या नोकऱ्या) पाश्चात्त्य देशांकडे जाणे यांमुळे थायलंडमधील आरोग्यसेवांचा दर्जा सुधारण्याचे शासकीय प्रयत्‍न अयशस्वी ठरत आहेत. वैद्यकीय सेवासुविधा नसलेल्या जागी त्या पोहोचविण्याच्या कामी फिरती वैद्यकीय पथके व हेलिकॉप्टर सहकार्य देतात. १९७३ साली देशात ११,२५,६०६ खाटांची ८,१८८ रुग्णालये, १,२६,३२७ वैद्य व ४०,२९३ दंतवैद्य होते. आरोग्य विमा, बेकारी विमा, वार्धक्यनिवृत्तिवेतने यांसारख्या सामाजिक सुरक्षेच्या योजना देशात कार्यान्वित झाल्या आहेत.

कला व क्रीडा इ.: थायलंडच्या कलेवर भारतीय संस्कृतीची फार मोठी छाप आहे. देशात २१,३७० बौद्ध मंदिरे आहेत. भारताप्रमाणेच थायलंडमध्येही कलेची अभिव्यक्ती धार्मिक प्रतिमांमधून झालेली दिसते. बँकॉकमधील ‘टेंपल ऑफ डॉन’ हे प्रसिद्ध मंदिर आहे. ब्राँझच्या बुद्धमूर्तींसाठी थायलंड प्रसिद्ध आहे व या मूर्तींचा परमविकास तेराव्या शतकात सुखोथाई काळात झाला होता. रामायणाचा थायलंडमध्ये ‘रामा कियात’ (रामाख्यान) नाटक, संगीत, साहित्य यांवर सखोल परिणाम झाला आहे. भारताप्रमाणेच रामायणकथा नृत्य व गायनातून सादर केल्या जात. प्रमुख नाट्यप्रकार म्हणजे ‘खोन’ यात मुखवटे वापरले जातात, तर ‘नांग’ हा कार्यक्रम छायादर्शनाचा आहे. भारतीय काव्यांचा प्रभाव नागरी संस्कृतीवर जास्त आहे, पण ग्रामीण भागात लोक तांदुळाची देवता व अनेक भुताखेतांची उपासना करतात. कलाकुसरीच्या वस्तूंवर आज यंत्रयुगातील वस्तूंचा प्रभाव पडला आहे. तसेच कलेला राजाश्रयही कमी झाला आहे. त्यामुळे आज थायलंडमधील परंपरागत काव्य, शिल्प कमी होत आहे. थायलंडचे पर्यटन खाते आज त्यांच्या विकासासाठी प्रयत्‍न करीत आहे.


थाई लोकांस खेळ फार प्रिय आहेत. ‘टकरॉ’ हा शटल बॉलने खेळण्याचा खेळ आबालवृद्धांत प्रिय असून त्यात १० खेळाडू भाग घेतात. ह्या खेळात रत्तन लाकडापासून बनविलेला चेंडू या पायावरून त्या पायावर चवडा व ढोपर यांच्या साहाय्याने खेळवत ठेवतात. गोल्फ, बॅडमिंटन, थाई मुष्टियुद्ध आणि पतंग उडविणे हे खेळ अतिशय लोकप्रिय आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर फुटबॉल हा खेळही खूपच प्रसृत झाला आहे.

भाषा व साहित्य: थाई भाषा हीच देशाची अधिकृत भाषा आहे. ती चिनी भाषिक गटातील असून एकावयवी शब्दाची आहे. वर्णमाला कंबोडियन वर्णमालेवर आधारित आहे. थाई लिपीत ३९ स्वर व ४४ व्यंजने असून लेखन डावीकडून उजवीकडे केले जाते. याशिवाय चिनी, मलाई, हिंदी व इंग्रजी या भाषांचाही उपयोग केला जातो. राज्यकारभारात इंग्रजीचा वापरही बराच आहे. थाई साहित्यात पौराणिक व ऐतिहासिक कथांचा विशेष भरणा आहे. थाई भाषेतील धार्मिक ग्रंथावर भारतीय विचारांचा फार मोठा प्रभाव पडल्याचे दिसून येते. थायलंडमधील पहिली कादंबरी यलो रेस, व्हाइट रेस या शीर्षकाने युवराज ‘अकात दामकोएंग’ याने १९४० साली लिहिली.

शिक्षण : थायलंडमध्ये १९६० साली राष्ट्रीय शिक्षण योजना कार्यान्वित झाली. ७–१४ या वयोगटातील मुलांचे प्राथमिक शिक्षण सक्तीचे परंतु मोफत आहे. माध्यमिक शिक्षण सामान्यतः पाच वर्षांचे, पण व्यावसायिक शिक्षण सहा वर्षांचे असते. १९७२–७३ साली देशात प्राथमिक शाळांमधून ६२,२८,४६९ विद्यार्थी व १,९२,३१८ शिक्षक माध्यमिक शाळांतून ६,६६,७५५ विद्यार्थी व २८,०६४ शिक्षक व्यावसायिक शाळांमधून १,२९,०२५ विद्यार्थी व ८,२७७ शिक्षक शिक्षक प्रशिक्षण विद्यालयांमधून ४९,८४१ विद्यार्थी व ३,७६७ शिक्षक आणि उच्च शिक्षणसंस्थांमधून (विद्यापीठ समाविष्ट) ६३,९४० विद्यार्थी व ८,४४८ प्राध्यापक होते. देशात एकूण १३ विद्यापीठे आहेत.

महत्त्वाची स्थळे: विविध देवळे, राजवाडे व पॅगोडे यांबद्दल थायलंड फार प्रसिद्ध आहे. बँकॉक येथील राजप्रसाद जगप्रसिद्ध आहेत. १९७४ साली ११·१ लक्ष पर्यटकांनी या देशास भेट दिली. बँकॉक हे राजधानीचे शहर व देशातील एकमेव महानगर असून व्यापार, कला, ललित कला, शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून सुविख्यात आहे. येथे ३०० च्या वर बौद्धमठ (वाट) असून त्यांद्वारा थाई वास्तुकला प्रतिबिंबित होते. चीआंगमाई हे बँकॉकनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर (लोकसंख्या ८९,२७२ १९७० अंदाज) पिंग नदीवर वसले असून धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वाहतूकविषयक केंद्र म्हणून उत्तर थायलंडला त्याचे फार महत्त्व आहे. ‘उत्तरेकडील गुलाब’ (रोझ ऑफ द नॉर्थ) म्हणून ओळखले जाणारे हे शहर इतर गर्दीच्या आशियाई शहरांप्रमाणे न बनता टुमदार, स्वच्छ, विस्तृत आणि परंपराबद्ध असे राहिले आहे. थाई हस्तव्यवसायांचे केंद्र म्हणूनही चीआंगमाई प्रसिद्ध आहे. येथील ‘वाट फ्रा धाद डोई सूथेप’ हा बौद्धमठ थायलंडमधील सुविख्यात तीर्थयात्रा–स्थानांपैकी एक मानतात. नाखोन रातचासीमा हे शहर (लोकसंख्या १,०२,०९५ १९७० अंदाज) म्हणजे ईशान्य थायलंडचे वाहतूक, संदेशवहन, वाणिज्य, वित्त आणि शासन यांसंबंधीचे केंद्रच मानले जाते. शहरात १८२८ मधील लाओसच्या थायलंडवरील आक्रमणामध्ये शहराचे नेतृत्व केलेल्या थाओ (खुनयिंग) सुरनारी या वीर महिलेचा पुतळा आहे. लांपांग (लोकसंख्या ४०,५३३ १९७० अंदाज) हे व्यापारी शहर व साखर उद्योगाचे मोठे केंद्र आहे.

संदर्भ : 1. Chu, V. Thailand Today, New York, 1968.

           2. Exell, F. K. The Land and People of Thailand, London, 1960.

           3. Muscat, R. J. Development Strategy in Thailand: A Case Study of Economic Modernization, London, 1966.

           4. Silcock, T. H. Ed. Thailand: Social and Economic Studies, Canberra, 1967.

गद्रे, वि. रा. कांबळे, य. रा. डिसूझा, आ. रे.


थायलंड


शाही राजवाडा, बँकॉक

पवित्र बुद्धपादविहार, बँकॉक

संगममरवरी बुद्धमंदिर बँकॉक

अभिजात थाई नृत्य
धर्मचक्र : राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, बँकॉक सम्राट नरेश्वरचा पुतळा , सूपानबुरी हत्ती : थायलंडमधील मुख्य भारवाहक
थालयंडमधील भातशेती थाई पारंपारिक काष्ठकला भव्य बुद्धमूर्ती, वात इंद्रविहार, बँकॉक

तरती बाजारपेठ, बँकॉकपारंपारिक थाई लाखकाम