निझामाबाद : आंध्र प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,१५,६४० (१९७१). पूर्वी हे शहर इंदूर या नावाने ओळखले जात असे. हे हैदराबादच्या उत्तर वायव्येस सु. १६१ किमी. असून, हैदराबाद–मनमाड या मध्य लोहमार्गावरील व हैदराबाद–नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. शहराच्या नैर्ऋत्येकडील टेकडीवर रघुनाथदासाने बांधलेल्या देवालयाच्या ठिकाणी एक किल्ला असून, आता सध्या तेथे पाण्याची टाकी आहे. इंदूरचा किल्ला या नावाने ओळखला जाणारा तटबंदीयुक्त किल्ला नैर्ऋत्येस असून तेथे आता तुरुंग आहे. शहरात कला व विज्ञान महाविद्यालय आहे. सुंदर कोरीवकाम असलेली दोन जैन मंदिरे व एक अमेरिकन मिशन येथे आहे. शहराच्या आसमंतात पिकणाऱ्या शेतमालाच्या बाजारपेठेचे हे केंद्रे असून, आसपासच्या भागांशी ते रस्त्यांनी जोडलेले आहे. कापूस वटवणी, भातसडीच्या गिरण्या, निझाम शुगर फॅक्टरी (पॉवर अल्कोहॉल आणि मिठाई कारखान्यांसह), प्रबलित काँक्रीटचे पाण्याचे पाइप तयार करण्याचा कारखाना व अनेक कुटिरोद्योग हे येथील महत्त्वाचे उद्योगधंदे होत. याच्या आसंमतात उसाचे पीक जास्त होते. शहरात प्राथमिक व माध्यमिक शाळा, एक औद्योगिक शाळा, महाविद्यालय, दवाखाना इ. सोयी उपलब्ध आहेत.

चौधरी, वसंत