फ्रेझ्नो : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅलिफोर्निया राजयाच्या फ्रेझ्नो काउंटीचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,६५,९७२ (१९७०). हे शहर किंग्ज व सॅन वाकीन या नद्यांदरम्यान सॅन फ्रॅन्सिस्कोच्या आग्नेयीस सु. २९८ किमी., तर लॉस अँजेल्सच्या वायव्येस सु. ३५८ किमी.वर वसले आहे.

दक्षिण पॅसिफिक लोहमार्गावरील (पूर्वीचा मध्य पॅसिफिक लोहमार्ग) स्थानक म्हणून १८७२ मध्ये हे वसविण्यात आले. ‘फ्रेझ्नो’ या स्पॅनिश शब्दाचा अर्थ ‘ॲश ट्री’ (पारिजातकासारखे फुलझाड) असून येथील त्याच्या विपुलतेमुळे हे नाव शहरास पडले.

या शहराच्या आसपास बागायती प्रदेश असल्याने येथे मुख्यतः बदाम, अंजीर, द्राक्षे, लिंबू जातीची फळे तसेच कापूस, अन्नधान्य, दूधदुभत्याचे पदार्थ यांची निर्मिती फार मोठ्या प्रमाणावर होते. येथील उद्योगधंद्यांत मद्ये तयार करणे, फळे डबाबंद करणे, फळे सुकविणे हे विशेष महत्त्वाचे आहेत. यांशिवाय गालिचे विणणे, लाकूड कापणे, तेलघाणे, कृषिअवजारे, यंत्रे व त्यांचे सुटे भाग तयार करणे, प्लॅस्टिके यांसारखे उद्योगधंदेही येथे चालतात. शहरात कॅलिफोर्निया राज्य विद्यापीठ असून अनेक शैक्षणिक सुविधा आहेत. शहराच्या सु. १४४ किमी. परिसरात योसेमाइटी, सिक्वॉइया, किंग्ज कॅन्यन ही प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने आहेत. यांशिवाय ऐतिहासिक वस्तुंग्रहालय व मोठे प्राणिसंग्रहालयही येथे आहे. कला-करमणुकीच्या क्षेत्रातील ऑपेरा असोसिएशन, कम्यूनिटी थिएटर, सिंफनी व फिलार्मानिक ऑर्केस्ट्रा यांसारख्या संस्था उल्लेखनीय आहेत. अमेरिकन लेखक व नाटककार विल्यम सारोयान (१९०८-८१) याचे हे जन्मस्थान.

कापडी, सुलभा