त्स्विकाऊ : पूर्व जर्मनीच्या कार्लमार्क्सस्टाड जिल्ह्यातील कोळसा क्षेत्रातील औद्योगिक शहर. लोकसंख्या १,२४,७९६ (१९७२). हे मुल्ड नदीवर लाइपसिकच्या दक्षिणेस सु. ६५ किमी. आहे. अकराव्या शतकात स्थापना झाल्यावर ११३५–४५ मध्ये मुक्त शाहीनगर म्हणून याचा विकास झाला.

त्स्विकाऊ लोहमार्गाचे प्रस्थानक असून येथे विमानतळही आहे. कापड व लोकर गिरण्या, विणकाम, मोटारगाड्या, ट्रॅक्टर, रंग, रसायने, विद्युत् उपकरणे, खाणींची उपकरणे, चिनी मातीच्या वस्तू, विटा, पियानो, विजेऱ्या, खाणकाम इ. उद्योग येथे आहेत. प्रसिद्ध जर्मन संगीतकार रोबर्ट शूमान याचा जन्म येथेच झाला (१८१०) व जर्मन धर्मसुधारक टॉमस म्यूंटसर याने १५२१ मध्ये येथेच ॲनाबॅप्‍टिस्ट पंथाची स्थापना केली. येथील सेंट कॅथरिन व सेंट मेरी चर्च, टाउनहॉल, ओस्टरस्टाइन किल्ला, शूमान वस्तुसंग्रहालय ही प्रेक्षणीय आहेत.

कांबळे, य. रा.