त्राझिमेअनो : प्राचीन त्रॅसमेनस. इटली द्वीपकल्पातील सर्वांत मोठे सरोवर. हे अंब्रिया प्रांतात मध्य ॲपेनाइन्स पर्वतात, स. स. पासून २५९ मी. उंचीवर, पेरूजाच्या पश्चिमेस १६ किमी. वर आहे. क्षेत्रफळ १२८ चौ. किमी. असून या सरोवराची जास्तीत जास्त खोली ६ मी. व फक्त पश्चिमेची बाजू सोडता तिन्ही बाजूंनी हे टेकड्यांनी वेढलेले आहे. सरोवराच्या आग्नेय किनाऱ्यावर भूमिगत निर्गम द्वार असून ते प्रथम रोमनांनी खणले व त्याचा विकास १४२१ व १६०२ मध्ये केला. परंतु नंतर निर्गम द्वार अंशतः बंद झाल्याने १८९६–९८ मध्ये चर खणून ते टायबर नदीची उपनदी निस्तोरशी जोडून निर्गम द्वार तयार केले. तेव्हापासून सरोवराची पातळी कायम आहे. तेथे विनाशकारी वादळे तयार होतात.