त्राझिमेअनो : प्राचीन त्रॅसमेनस. इटली द्वीपकल्पातील सर्वांत मोठे सरोवर. हे अंब्रिया प्रांतात मध्य  ॲपेनाइन्स पर्वतात, स. स. पासून २५९ मी. उंचीवर, पेरूजाच्या पश्चिमेस १६ किमी. वर आहे. क्षेत्रफळ १२८ चौ. किमी. असून या सरोवराची जास्तीत जास्त खोली ६ मी. व फक्त पश्चिमेची बाजू सोडता तिन्ही बाजूंनी हे टेकड्यांनी वेढलेले आहे. सरोवराच्या आग्नेय किनाऱ्यावर भूमिगत निर्गम द्वार असून ते प्रथम रोमनांनी खणले व त्याचा विकास १४२१ व १६०२ मध्ये केला. परंतु नंतर निर्गम द्वार अंशतः बंद झाल्याने १८९६–९८ मध्ये चर खणून ते टायबर नदीची उपनदी निस्तोरशी जोडून निर्गम द्वार तयार केले. तेव्हापासून सरोवराची पातळी कायम आहे. तेथे विनाशकारी वादळे तयार होतात.

या सरोवरात माद्‌जोरे, मिनोरे, पॉलव्हीसी अशी तीन द्वीपके आहेत. सरोवराचे काठी कास्टील्यॉने देल लागॉ व पास्सीन्यानॉ ही दोन शहरे आहेत. इ. स. पू. २१७ मध्ये हॅनिबलने रोमनांचा येथे पराभव केल्याने हे रोमन इतिहासात प्रसिद्ध आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिश व जर्मन सैन्यांमध्ये या ठिकाणी चकमकी झाल्या होत्या.

गाडे, नामदेव