तेनॉच्तित्लान : मेक्सिकोमधील प्राचीन शहर. हे पूर्वीच्या ॲझटेक साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते. ११७६ मध्ये मेक्सिको खोऱ्यात ॲझटेक इंडियनांनी प्रवेश केला तेव्हा त्यांनी कॅक्टसवर पंजात साप पकडून बसलेला गरुड पाहिला. तेथेच या शहराची स्थापना करून त्यांनी १३२५ मध्ये ती आपल्या साम्राज्याची राजधानी केली. ही राजधानी तेस्कोको सरोवरातील एका बेटावर होती. हे चांगले भरभराटलेले शहर होते. पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून भक्कम भित्ती बांधलेल्या होत्या आणि तीन पुलांनी हे मुख्य भूभागाशी जोडलेले होते. शहरात कालव्यातून वाहतूक होत असे. शहराच्या मध्यभागी सभास्थान होते. तेथे मोठे पिरॅमिड व त्यावर देऊळ बांधलेले होते. सरकारी इमारती, सम्राटांचे महाल आणि बाजारपेठा सभास्थानाच्या भोवताली असत. याची तुलना व्हेनिस शहराशी करण्यात येते.

येथील माँतेझूमा राजाच्या धमक्यांना न जुमानता १५१९ मध्ये कोर्तेझने या राजधानीत प्रवेश केला. येथे येणारा हा पहिलाच गोरा होय. ॲझटेकांच्या हल्ल्यांमुळे स्पॅनिशांना परत जावे लागले. परंतु कोर्तेझने १५२१ मध्ये त्लास्कालाचे सहाय्याने शहरावर हल्ला करून ते उद्‌ध्वस्त केले व तेथेच हल्लीचे मेक्सिको सिटी हे शहर वसविले.

कांबळे य. रा.