तुर्कस्तान : (अधिकृत त्यूकींये कुम्हुरियेती). मुख्यतः आशियात व काही अंशी यूरोपात समाविष्ट असलेला मध्यपूर्वेतील देश. क्षेत्रफळ ७,८०,५७६ चौ. किमी. पैकी ९,२४३ चौ. किमी. पाण्याखाली. लोकसंख्या ३,५६,६६,५४९ (१९७०). विस्तार ३५° ५०′ उ. ते ४२° ५′ उ. आणि २५° ४०′ पू. ते ४४° ५०′ पू. यांदरम्यान.
तुर्कस्तानचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आशिया व यूरोप या खंडांना जोडणारा दुवा म्हणून हा देश ओळखला जात असून याच्या दक्षिणेस भूमध्य समुद्रापलीकडे आफ्रिका खंड आहे. तुर्कस्तानची सीमा ईशान्येस रशिया, पूर्वेस इराण, आग्नेयीस इराक, दक्षिणेस सिरिया, वायव्येस ग्रीस व बल्गेरिया या देशांना भिडलेली आहे. तुर्कस्तानच्या उत्तरेस काळा समुद्र, पश्चिमेस इजीअन समुद्र व दक्षिणेस भूमध्य समुद्र आहे. १९२३ च्या लोझॅन करारानुसार दार्दानेल्स व बॉस्पोरस या सामुद्रधुन्या तुर्कस्तानला मिळालेल्या आहेत. बॉस्पोरस सामुद्रधुनी काळा समुद्र व मार्मारा समुद्र जोडते तर भूमध्य समुद्र व मार्मारा समुद्र दार्दानेल्सच्या सामुद्रधुनीने जोडलेले आहेत. मार्मारा समुद्र पूर्णतः तुर्कस्तानच्या सरहद्दीच्या आत आहे. रशियाच्या दृष्टीने हे दोन्ही चिंचोळे समुद्रमार्ग महत्त्वाचे आहेत. दार्दानेल्स आणि बॉस्पोरस या दोन सामुद्रधुन्यांमुळे तुर्कस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे.
बॉस्पोरस सामुद्रधुनीच्या पश्चिमेकडील व दार्दानेल्सच्या उत्तरेकडील सु. २३,७२० चौ. किमी. चा भाग यूरोप खंडात आहे. याला ट्राकाई किंवा थ्रेस असे म्हणतात. दार्दानेल्सच्या सामुद्रधुनीलगतची इमरॉझ आणि बोझजाआदा ही बेटे तुर्कस्तानच्या मालकीच्या आहेत. भूमध्य समुद्रातील सायप्रस बेटाचा तुर्की वस्तीचा भाग तुर्कस्तानने १९७५ मध्ये व्यापला आहे.
भूवर्णन : प्राकृतिक दृष्ट्या तुर्कस्तान हा देश एक लहान खंड म्हणून ओळखला जातो. तुर्कस्तानमधील भूमीस्वरूपे व भूस्तरीय घडण यांची रचना गुंतागुंतीची आणि क्लिष्ट आहे. तुर्कस्तानची निर्मिती टेथिसच्या भूद्रोणीतून झालेली असावी. वलीकरण, प्रस्तरभंग, ज्वालामुखीचे उद्रेक, भूमीचे उद्गमन व निम्मजन आणि खननक्रिया यांमुळे तुर्कस्तानचे, विशेषतः पूर्व आणि आग्नेय भागांतील भूरूप तयार झालेले असावे. बॉस्पोरस व दार्दानेल्स या सामुद्रधुन्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झाल्या.
ट्राकाई म्हणजे यूरोपीय तुर्कस्तान हे एक उंचसखल मैदान असून त्याच्या ईशान्य भागात इस्त्रांजा नावाची लहान पर्वतश्रेणी आहे. या पर्वतश्रेणीतील माया शिखर १,०३१ मी. उंच आहे. ट्राकाईच्या नैर्ऋत्य भागातही डोंगराळ प्रदेश आहे. ट्राकाईच्या पश्चिम भागात एर्गेने नावाची पश्चिमवाहिनी नदी आहे.
आशियाई तुर्कस्तान विस्ताराने ट्राकाईपेक्षा खूपच मोठा असून उत्तुंग पठारे व पर्वतश्रेण्या यांनी बनलेला आहे. आशियाई तुर्कस्तानमध्ये सखल प्रदेश कमी आहेत. आडानाजवळचे सिलिशन मैदान विस्तृत व सुपीक आहे. इजीअन किनाऱ्यालगत गेदिझ आणि ब्यूयूक मेंडेरेस या नद्यांची खोरी आहेत. यांशिवाय डालामान, कॉजा, आक्सू आणि कप्ऱ्यू या दक्षिणवाहिनी व भूमध्य समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्या असून त्यांनी सखल प्रदेश तयार केलेले आहेत. सिलिशनचा सखल प्रदेश सेहान व जेहान या नद्यांमुळे तयार झालेला असून त्याच्या वायव्य भागात ऐतिहासिक कालापासून लष्करी महत्त्व असलेली सिलिशनगेट ही खिंड आहे. आशियाई तुर्कस्तानचे पुढील प्राकृतिक विभाग आहेत : उत्तरेकडील पाँटस पर्वतश्रेणी, दक्षिणेकडील टॉरस व अँटिटॉरस पर्वतश्रेण्या, पूर्वेकडील व आग्नेयीकडील डोंगराळ प्रदेश आणि पश्चिमेकडील विभंग खोऱ्यांचा प्रदेश, पाँटस व टॉरस पर्वतराजींच्या दरम्यानचे ॲनेतोलियाचे पठार.
उत्तरेकडील पाँटस पर्वत हा घडीचा पर्वत असून तो काळ्या समुद्राच्या दक्षिणेकडे आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे या पर्वाताची उंची वाढत जाते. या पर्वताला क्यूरे, चानिक, पूर्व काळा समुद्र पर्वत अशी वेगवेगळी नावे देशाच्या वेगवेगळ्या भागांत आहेत. या पर्वतात अनेक सांरचनिक खोरी आहेत. किझिलइर्मांक आणि येशिलइर्मांक हे दोन उत्तर मध्य किनाऱ्यावरील त्रिभुज प्रदेश सोडता इतरत्र उत्तुंग समुद्रकडे आढळतात.
तुर्कस्तानच्या दक्षिणेस भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याने पसरलेली टॉरस पर्वतश्रेणी आहे. २६° पूर्व रेखांशापासून ३५° पूर्व रेखांशापर्यंत या पर्वतश्रेणीस टॉरस म्हणतात. ३५° पूर्व रेखांशापासून तुर्कस्तानच्या पूर्व सरहद्दीपर्यंत अँटिटॉरस म्हणतात.
पाँटस आणि टॉरस पर्वतश्रेण्या आरास पर्वतातील मौंट ॲरारात (उंची ५,१५६ मी.) येथे मिळतात. हा भाग आर्मेनियन नॉट म्हणून ओळखला जातो. पूर्व तुर्कस्तान भूस्तरीय दृष्ट्या अतिशय अस्थिर भाग आहे व या प्रदेशात भूकंपाचे वारंवार धक्के बसतात. प्रस्तरभंग आणि ज्वालामुखीक्रिया यांमुळे तयार झालेली अनेक भूमीस्वरूपे या भागात आहेत. तुर्कस्तानमध्ये ११० गिरिशिखरे ३,००० मी. पेक्षा जास्त उंच आहेत.
याच पूर्वेकडील प्रदेशात लाव्हारसामुळे खोलगट भागात बांध तयार होऊन निर्माण झालेले वान या नावाचे सरोवर आहे. त्याचा विस्तार ३,७५६ चौ. किमी. आहे. हे जगातील एक अत्यंत खारट सरोवर असून त्याची क्षारता दर हजारी ३३० आहे. वान सरोवराच्या पश्चिमेस घडीच्या पर्वतात टायग्रिस व युफ्रेटीस या नद्यांची उगमस्थाने आहेत. तुर्कस्तानात या नद्यांना अनुक्रमे डीजले व फिरात म्हणतात.
ॲनातोलियाचे पठार आयताकृती असून ते १,४४० किमी. पूर्व–पश्चिम व ४८० किमी. उत्तर–दक्षिण पसरलेले आहे. या पठाराच्या मध्यवर्ती भागाची सरासरी उंची स. स. पासून ९०० मी. असून मध्यवर्ती भागाच्या चार कोपऱ्यांत अंकारा, काइसेरी, कोन्या आणि आफ्यॉनकाराहिसार ही शहरे वसलेली आहेत. पठाराच्या पश्चिम व नैर्ऋत्य भागात भूस्तरीय हालचालींमुळे तयार झालेली अनेक खोरी व खोलगट भाग आहेत. यांपैकी काही भागात सरोवरे तयार झालेली आहेत. स्थानिक भाषेत या खोलगट भागांना ओवा म्हणतात. तूझ हे या भागातील आणखी एक खाऱ्या पाण्याचे मोठे सरोवर आहे. बेशेहिर व एरिडिर ही दोन सरोवरेदेखील मोठी आहेत. पश्चिम ॲनातोलिया हा गट विभंगाचा खडकाळ प्रदेश आहे. या प्रदेशाची सरासरी उंची ७०० मी. असून या भागात अनेक नतिलंब खोरी आढळतात. इजीअन किनारपट्टी प्रस्तरभंगामुळे खंडित झालेली आढळते. दार्दानेल्स व बॉस्पोरस या सामुद्रधुन्या प्रस्तरभंगामुळे तयार झालेल्या दऱ्या समुद्रात बुडून निर्माण झालेल्या असाव्यात. काळ्या समुद्राची किनारपट्टी सरळ असून भूमध्य सागरी किनाऱ्यावर मात्र पश्चिमेकडे आंताल्या आणि पूर्वेकडे इस्केंदेरून अशी दोन आखाते आहेत.
ॲनातोलियाचे पठार आशिया व यूरोप यांमधील दुवा म्हणून ओळखले जाते. त्याला काटकोनात असलेल्या दार्दानेल्स व बॉस्पोरस सामुद्रधुन्यांचा कबजा घेण्यासाठी रशिया, ग्रीस इ. राष्ट्रांबरोबर तुर्कस्तानची अनेक वेळा युद्धे झाली.
मृदा : तुर्कस्तानमध्ये भूरचना व हवामान यांच्या विविधतेमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी आढळतात. एक हजार मी. पेक्षा जास्त उंचीवर अत्यंत खडकाळ जमिनी आहेत. ५००–१,००० मी. उंचीपर्यंत उतरत्या आणि धुपून गेलेल्या जमिनी आढळतात. दक्षिण मध्य पठारी प्रदेशात थोड्याशा रेताड व ओसाड जमिनी आढळतात. भूमध्य आणि इजीअन सागराकडे वाहणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांत मात्र गाळाच्या सुपीक जमिनी आढळून येतात. पूर्व भागातील डोंगराळ प्रदेशात लाव्हापासून तयार झालेल्या सुपीक जमिनी आहेत परंतु असे विभाग थोडे आहेत. किनाऱ्यावर आणि विशेषतः काळ्या समुद्रानजीकच्या किनाऱ्यावर रेताड आणि गाळयुक्त जमिनी आढळतात. १५० सेंमी.पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशातील जमिनी पावसामुळे धुपून गेलेल्या आहेत. तुर्कस्तानमध्ये खतांचा वापर आणि जलसिंचन यांत गेल्या दहा वर्षांमध्ये वाढ होत असल्याने शेतीच्या दृष्टीने नापीक असलेल्या जमिनींची सुधारणा होत आहे.
हवामान : तुर्कस्तानच्या हवामानावर पुढील गोष्टींचा परिणाम झालेला आढळतो : (१) तुर्कस्तानचे ३५° उ. ते ४५° उ. या मध्य अक्षवृत्तांमधील द्वीपकल्पीय स्थान, (२) भूमध्य, इजीअन व काळा समुद्र या जलभागांचे सान्निध्य आणि त्यांवर निर्माण होणारी आवर्ते, (३) पाँटस व टॉरस या पर्वतराजींनी वेढलेले ॲनातोलियाचे पठार.
भूमध्य व इजीअन किनाऱ्यावर भूमध्य सागरी हवामान असून तेथील उन्हाळे उष्ण व कोरडे असतात व तापमान २७° से. वर असते व हिवाळी सरासरी तापमान १०° से. पर्यंत आढळते. हिवाळ्यात दहिवर पडते व हिमवर्षावही होतो. ऑक्टोबर ते मार्चपर्यंत या भागात स्थलपरत्वे सु. ६५–९० सेंमी. पर्यंत पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण किनाऱ्यापासून अंतर्गत भागात कमी होत जाते.
काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर व इस्तंबूलच्या भोवताली वेगळ्या प्रकारचे ऋतुमान आढळून येते. येथे उन्हाळी सरासरी तपमान २७° से. वर असून हिवाळी सरासरी तपमान ९° से. वर असते. या प्रदेशात वर्षभर थोडा थोडा पाऊस पडतो. याच विभागात पश्चिमेकडे पर्जन्यमान हिवाळ्यात जास्त असून पूर्वेकडे मात्र उन्हाळी पर्जन्यमान वाढत जाते. पूर्वेकडे रिझेजवळ पर्जन्यमान २५० सेंमी. पर्यंत आढळते.
ॲनातोलियाच्या पठारावर अत्यंत विषम हवामान आहे. अंतर्गत स्थानामुळे किंवा दूरत्वामुळे येथील उन्हाळे उष्ण आणि समुद्र हिवाळे थंड असतात. उन्हाळी सरासरी तपमान ३५° से. पर्यंत तर हिवाळी सरासरी तपमान ३° से. पेक्षाही कमी असते. या प्रदेशात स्थलपरत्वे ३० सेंमी. पर्यंत पाऊस पडतो.
तुर्कस्तानच्या पूर्व भागात हिवाळी तपमान शून्याखाली –५° से. पर्यंत सु. तीन ते चार महिने असते. परंतु उन्हाळ्यात मात्र हा प्रदेश बराच उष्ण असतो. उन्हाळी तपमान या भागात ३०° से. पर्यंत जाते. हिवाळ्यात या प्रदेशात हिमवृष्टी होते. एकंदर तुर्कस्तानचे ऋतुमान आरोग्यदायक असून हिवाळ्यातही येथे भरपूर सूर्यप्रकाश असतो.
वनस्पती : हवामानाच्या व भूमीस्वरूपाच्या विविधतेमुळे तुर्कस्तानात निरनिराळ्या प्रकारचे वनस्पतीजीवन आढळते. देशाचा सु. २५% भाग जंगलखाली असून पर्वतमय प्रदेशात गुरे चारण्यामुळे व झाडी तोडल्यामुळे जंगलांची हानी झालेली आहे. पाँटस पर्वताच्या, काळ्या समुद्राच्या बाजूकडे, टॉरस पर्वताच्या पूर्व भागात अजूनही उत्कृष्ट जंगले आहेत. इजीअन समुद्राची किनारपट्टी, थ्रेस व भूमध्य सागरी भागातही काही प्रदेशात भूमध्य सागरी प्रकारातील पानझडी जंगले आढळतात. तसेच जंगली ऑलिव्ह, सदाहरित ओक, कॅरोब आणि पाइन वृक्ष या भागात आढळतात. टॉरस पर्वतात अलेप्पो जातीचे सूचीपर्णी वृक्ष, सीडार, पॉप्लर, अक्रोड, बीच व फर यांची जंगले २,००० मी. उंचीपर्यंत आहेत. पठारावर स्टेप कुरणे चरण्यायोग्य आहेत. पठारावरील ज्वालामुखींच्या प्रदेशात मात्र पानझडी वृक्षांची विरळ जंगले आहेत. ॲरारात पर्वताच्या विभागात उंचीनुसार वनस्पतिजीवन बदलत जाते. सु. २,५०० मी. उंचीनंतर पानझडी वृक्षांऐवजी सूचीपर्णी वृक्षांची जंगले दिसू लागतात. टॉरस, पाँटस व अँटिटॉरस या पर्वतश्रेण्यांच्या शिखरांनजीक फक्त उन्हाळ्यात गवत असते व हिवाळ्यात बर्फ असते. जळणाकरिता झाडे तोडण्यामुळे जंगलांची खूप हानी होत आहे.
प्राणिजीवन : तुर्कस्तानात विविध प्राणिजीवन आढळते. दक्षिण भागात चित्ते, ईशान्य भागात तपकिरी रंगाची अस्वले तर मनुष्यवस्ती कमी असलेल्या प्रदेशात लांडगे व तरस आहेत. स्टेप प्रदेशात कोल्हे, हरिण हे प्राणी असून पूर्वेकडे काळवीट, कुरंग, सांबर, ससे इ. प्राणी आढळतात. पॉर्ट्रीज, राजहंस, क्वेल, बास्टार्ड वगैरे पक्ष्यांच्या सु. ५०० जाती असून हिवाळ्यात सायबीरियातून व उत्तर यूरोपातून अनेक पक्षी येतात. बेसुमार शिकारीमुळे व झाडी तोडल्यामुळे प्राणिजीवनास धोका निर्माण झालेला आहे व त्यामुळे बऱ्याच ठिकाणी व विशेषतः नैसर्गिक तलावांच्या परिसरात आता शिकारीस बंदी केलेली आहे.
भागवत, अ. वि. कुमठेकर, ज. व.
इतिहास : आशिया आणि यूरोप या दोन्ही खंडात तुर्कस्तानचा प्रदेश आहे पण तुर्कस्तान स्वतःला यूरोपीय देश समजतो. आशिया मायनर अथवा ॲनातोलिया या नावाने पूर्वी ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशाचा लिखित इतिहास प्राचीन आहे. या इतिहासाचे साधारणपणे तीन कालखंड पडतात : ऑटोमन साम्राज्यापूर्वीच्या प्राचीन कालखंड, ऑटोमन साम्राज्याचा काळ व प्रजासत्ताक तुर्कस्तान किंवा आधुनिक कालखंड.
प्राचीन कालखंड : इ. स. पू. १८५०–१२०० या काळात येथे हिटाइट लोकांचे साम्राज्य होते. हिटाइट साम्राज्याच्या अवनतीनंतर फ्रिझिया (इ. स. पू. १२००–७००) व लिडिया (इ. स. पू. ७००–५४६) यांच्या आधिपत्याखाली हा प्रदेश गेला. इ. स. पू. ५४६ मध्ये इराणी सम्राट सायरसने हा प्रदेश जिंकून इराणी साम्राज्यात समाविष्ट केला. इ. स. पू. ३३४ मध्ये अलेक्झाडरच्या सैन्याने तो जिंकेपर्यंत हा प्रदेश इराणी वर्चस्वाखाली होता. अलेक्झांडरच्या मृत्युनंतर त्याच्या सेनापतींमध्ये राज्याची विभागणी झाली. पुढे इ. स. पू. १३३ मध्ये हा प्रदेश रोमन साम्राज्याच्या आधिपत्याखाली गेला. रोमन साम्राज्याची पूर्व व पश्चिम अशा दोन साम्राज्यांत फाळणी झाल्यानंतर सम्राट कॉन्स्टंटीन याने आपली राजधानी कॉन्स्टँटिनोपल येथे हलविली व आशिया मायनरमध्ये बायझंटिन साम्राज्य दृढमूल झाले. १०७१ मध्ये सेल्जुक तुर्कांनी मँझिकर्त येथे बायझंटिन सैन्याचा पराभव केला आणि हा प्रदेश तुर्की टोळ्यांच्या प्रभुत्वाखाली गेला. या लढाईच्या अगोदरपासूनच भटक्या तुर्की टोळ्या या भागात येऊ लागल्या होत्या. या टोळ्यांचे स्वतंत्र पारंपरिक जीवन होते व आपले वेगळेपण टिकविण्याचा त्यांचा प्रयत्न असे.
ऑटोमन साम्राज्याचा संस्थापक उस्मान (उथ्मान) हा ओगूझ तुर्कांच्यापैकी कायी नावाच्या जमातीचा होता, अशी परंपरागत समजूत आहे. सेल्जुक सुलतानांची सत्ता कमजोर झाल्यानंतर तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात ॲनातोलियात अनेक तुर्की टोळ्यांच्या नेत्यांनी आपापली छोटी राज्ये स्थापन केली. त्यांना नियंत्रित करू शकेल अशी प्रबळ मध्यवर्ती सत्ता नव्हती. या छोट्या राज्यांचे अस्तित्व केवळ लष्करी बळावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्यात आपापसांत लढाया होत. सु. दीडशे वर्षे अशा लढाया सतत चालू होत्या. या अंदाधुंदीतूनच ऑटोमन साम्राज्याचा संस्थापक उस्मान याने आपली नवी सत्ता निर्माण केली.
ऑटोनम साम्राज्य : पहिल्या उस्मानचा (१२५९–१३२६) बाप सीमेवरील लढवय्या गटाचा पुढारी होता. बापाच्या मृत्युनंतर उस्मानकडे पुढारीपण आले. तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंत त्याने बराचसा प्रदेश जिंकला व १२९० मध्ये आपले स्वतंत्र राज्य स्थापले. ग्रीकांची इझनिक व बुर्सा ही दोन मोठी शहरे जिंकण्यासाठी त्याने या शहरांना वेढा घातला. १३२६ साली बुर्सा शहराचा पाडाव झाला व नवोदित साम्राज्याची ती पहिली राजधानी बनली. उस्मानचा मुलगा ओरखान याने १३२६–६२ पर्यंतच्या कारकीर्दीत यूरोपमध्ये ऑटोमन साम्राज्याचा विस्तार केला. बायझंटिनच्या राजाने त्याला आपली मुलगी देऊन अंतर्गत सत्ता–संघर्षात तुर्की सैन्याची मदत मिळविली. या मदतीच्या मोबदल्यात गलिपली येथे कायमचा तळ ठोकण्याची सवलत ओरखानला मिळाली. येथून ऑटोमन साम्राज्याच्या बाल्कनमधील विस्ताराला सुरुवात झाली. ओरखाननंतर त्याचा मुलगा पहिला मुराद (१३२६–८९) गादीवर आला (१३६२). त्या कारकीर्दीत ऑटोमन साम्राज्याचा ॲनातोलियात अंकारापर्यंत विस्तार झाला. त्याने यूरोपमध्ये तुर्की अंमल प्रस्थापित करून मॅसिडोनिया जिंकला आणि एड्रिॲनोपल येथे वास्तव्य केले. १३७३ मध्ये त्याने बायझंटिन सम्राटास खंडणी देण्यास भाग पाडले. त्याचे सेनापती या विजयाने उन्मत्त होऊन स्वतंत्रपणे हालचाल करू लागले. त्यांच्यावर नियंत्रण ठेवता यावे म्हणून मुरादने ख्रिस्ती तरूणांचे जॅनिसेरीझ (नवे सैन्य) नावाचे खडे सैन्य उभारले. १३८८ मध्ये त्याने संपूर्ण बल्गेरिया पादाक्रांत केला. पुढच्या वर्षी यूगोस्लाव्हियात त्याने बाल्कन देशाच्या संयुक्त फौजांचा प्रचंड पराभव केला पण या युद्धाच्या वेळीच कॉसॉव्हॉ येथे त्याचा खून झाला.
मुरादनंतर त्याचा मुलगा पहिला बेयझीद (१३४७–१४०३) १३८९ मध्ये गादीवर आला. तो यिलडिरिम (थंडरबोल्ट) या नावाने ओळखला जातो. त्याला यूरोप व ॲनातोलिया या दोन्ही प्रदेशांतील बंडाळीला तोंड द्यावे लागले. पण सर्व विरोधकांचा बीमोड करून त्याने ॲनातोलिया संपूर्णपणे ताब्यात आणला व बल्गेरिया आपल्या साम्राज्यात सामील करून घेतला. त्यामुळे त्याचा वाढत्या सत्तेमुळे तैमूरलंगला चिंता वाटू लागली व त्याने अंकाराच्या लढाईत बेयझीदचा पराभव केला (१४०२). तैमूरच्या कैदेतच तो पुढे एक वर्षाचे मरण पावला.
बेयझीदच्या मृत्युनंतर त्याच्या मुलांमध्ये गादीसाठी तंटे व लढाया झाल्या. १४०२–१३ हा दुफळीचा काळ होता. इसा आणि मुहंमद या बेयझीदच्या पुत्रांना तैमूरने दोन प्रदेशांचे गव्हर्नर म्हणून मान्यता दिली. सुलेमान बाल्कनमध्ये पळून गेला. या अंतर्गत दुफळीत अखेर पहिला मुहंमद (१३८९–१४२१) हा विजयी झाला. त्याने आपल्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत (१४१३–२१) ऑटोमन साम्राज्याला स्थैर्य आणले. तैमूरच्या स्वारीपूर्वी जेवढे साम्राज्य होते, तेवढे त्याने पुन्हा प्रस्थापित केले. त्याच्या मृत्युनंतर त्याचा वडील मुलगा दुसरा मुराद (१४०३–५१) गादीवर आला (१४२१). त्याला प्रथम अंतर्गत बंडाळी मोडावी लागली व पुढे बाल्कनमध्ये हंगेरी आणि अल्बेनियातील उठावांना तोंड द्यावे लागले. पण १४४८ मध्ये त्याने या संघर्षात निर्णायक विजय मिळविला व आग्नेय यूरोपमध्ये ऑटोमन सत्ता दृढ केली. ही सत्ता पुढे चारशे वर्षे अबाधित राहिली.
त्याच्यानंतर १४५१ मध्ये सत्तेवर आलेला त्याचा मुलगा दुसरा मुहंमद (१४२९–८१) हा ऑटोमन साम्राज्याच्या इतिहासातील एक थोर राजा होय. त्याने जी राज्यव्यवस्था निर्माण केली, ती जवळजवळ साम्राज्याच्या अखेरपर्यंत कायम राहिली. १४५३ मध्ये त्याने अखेर बायझंटिन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) जिंकून घेतली. तीच आपली नवी राजधानी केली. या विजयामुळे त्याला फातिह म्हणजे विजेता असे अभिधान देण्यात आले. त्याला आपल्या कारकीर्दीत सतत लढाया कराव्या लागल्या पण राज्यविस्तार करण्यापेक्षा राज्याला सुसंघटित स्वरूप देण्याकडे व मध्यवर्ती सत्ता प्रबळ करण्याकडे त्याने विशेष लक्ष दिले. तुर्की सरदारांची सत्ता मोडून काढण्यासाठी त्याने जॅनिसेरीझचा विस्तार केला आणि राजघराण्याशी एकनिष्ठ असलेल्या लोकांना त्याने प्रांतिक शासक म्हणून नेमले. राज्यातील सर्व प्रमुख धर्मांच्या लोकांना त्याने धार्मिक स्वातंत्र्य दिले. इस्तंबूलचे उद्योगधंदे व व्यापार यांचे पुनरुज्जीवन करण्यास त्याने मदत केली. अनेक कानून–नामे म्हणजे विधि–संहिता बनवून राजकीय, प्रशासकीय, धार्मिक इ. संस्थांना स्थैर्य आणले. त्याने जुनी राज्यपद्धती बदलून नवीन केंद्रशासित राज्यव्यवस्था अमलात आणली.
दुसऱ्या मुहंमदानंतरच्या शंभर वर्षांत ऑटोमन साम्राज्य ऐश्वर्याच्या कळसाला पोहोचले. दुसऱ्या मुहंमदाचा मुलगा दुसरा बेयझीद (१४४७–१५१३) याची कारकीर्द पुष्कळशी शांततापूर्ण होती. त्याने जॅनिसेरीझ व दरबारातील उमराव यांचे साहाय्य घेऊन आपला भाऊ जेम याचा पराभव केला आणि १४८१ मध्ये सत्ता हस्तगत केली. त्याच्या काळात राजकीय घडामोडीचे केंद्र ॲनातोलियात होते. सोळाव्या शतकाच्या प्रारंभी इराणमध्ये स्थापन झालेली सफाविद सत्ता ॲनातोलियातील असंतुष्टांना आधार वाटू लागली. सिरियातील ईजिप्शियन मामलूक राजेही ऑटोमन सत्तेविरुद्ध कारवाया करीत होते. बेयझीदने या दोन्ही शत्रूंचा बंदोबस्त केला आणि काळा समुद्र व भूमध्य समुद्रावरील नाक्याची बंदरे काबीज करून सागरी सत्ताही बळकट केली. त्याच्या काळात जॅनिसेरीझचा विस्तार झाला आणि साम्राज्याचे आरमारही प्रबळ झाले. तथापि जॅनिसेरीझ याने अखेर त्याचा मुलगा सलीम याच्याशी हातमिळवणी करून त्याला पदच्युत केले व सलीम गादीवर आला (१५१२).
या पहिल्या सलीमने (१४६७–१५२०) दोन महत्त्वाचे विजय मिळविले. १५१४ मध्ये ॲमिदा घेऊन त्याने सफाविदच्या शाह इस्माइलच्या सैन्याचा संपूर्ण निःपात केला. ऑगस्ट १५१६ मध्ये त्याने अलेप्पोजवळ मामलूकांचा पाडाव केला आणि त्यांचे सिरिया, ईजिप्त व अरबस्तानातील सर्व प्रदेश आपल्या अमलाखाली आणले. या विजयामुळे मक्का व मदीना ही इस्लामची पवित्र धर्मस्थाने त्याच्या हद्दीत येऊन तो या धर्मस्थानांचा संरक्षक बनला. त्याने खलीफा ही पदवी धारण केली. त्याच्या या एकाच विजयामुळे साम्राज्याचा विस्तार दुपटीने वाढला. इस्लामी धर्मस्थाने त्याच्या साम्राज्यात येताच मुस्लिम विचरावंत, कलावंत व कारागीर यांचे इस्तंबूल हे केंद्र झाले. त्यांचा प्रभाव जीवनाच्या सर्व क्षेत्रांत पसरला आणि ऑटोमन साम्राज्याला यापूर्वी कधीही न लाभलेले पारंपरिक इस्लामी राष्ट्रसत्तेचे स्वरूप प्राप्त झाले. ऑटोमन साम्राज्याच्या संरक्षणाखाली अरब प्रदेशात स्थैर्य, सुरक्षितता व सुव्यवस्था निर्माण झाली.
पहिल्या सलीमचा अखेरचा काळ इस्तंबूलमध्येच सुलतानाचे सर्वश्रेष्ठ स्थान बळकट करण्याच्या कामात व्यतीत झाला. त्याने जो भरभक्कम पाया रचला, त्याच्यावर राष्ट्रसत्तेची व राष्ट्रीय समाजाची भव्य रचना करण्याचे कार्य त्याच्यानंतर गादीवर आलेला त्याचा पुत्र पहिला सुलेमान (१४९४–१५६६) याच्या कारकीर्दीत झाले. म्हणून यूरोपमध्ये त्याला मॅग्निफिसेन्ट आणि ऑटोमन साम्राज्यात ‘कानूनी’ म्हणजे कायदा करणारा अशी अभिधाने प्राप्त झाली. सलीमने जे अरब प्रदेश जिंकले, त्या प्रदेशांतून साम्राज्याला अफाट संपत्ती आणि शक्ती प्राप्त झाली होती. सुलेमानने त्याचा पूर्ण उपयोग करून साम्राज्याचा पश्चिम आणि पूर्व अशा दोन्ही प्रदेशांत विस्तार केला व साम्राज्याला अतिभव्य स्वरूप दिले. त्यामुळे त्याची कारकीर्द ऑटोमन साम्राज्याचे सुवर्णयुग समजली जाते. यूरोपमध्ये त्याला ऑस्ट्रियाच्या नवोदित पण प्रबळ हॅप्सबर्ग राजसत्तेशी सामना द्यावा लागला. १५२०–२६ या काळात त्याने बूडापेस्ट जिंकून हंगेरीवर प्रभुत्व स्थापन केले. १५२८–४० या काळात हॅप्सबर्गनी हंगेरी पुन्हा जिंकून घेण्याचा प्रयत्न केला पण सुलेमानने त्यांचा पराभव केला व हॅप्सबर्गची राजधानी व्हिएन्नाला वेढा घातला. हा वेढा यशस्वी झाला नाही तरी ख्रिस्ती सत्तांना ऑटोमन सत्तेच्या इस्लामी आक्रमणाची भीती निर्माण झाली. यूरोपमधील राजकारणात सुलेमानला फ्रान्सचा पाठिंबा होता. हॅप्सबर्गच्या वाढत्या सत्तेला पायबंद घालण्यासाठी ऑटोमन सत्तेला उत्तेजन देणे फ्रान्सला इष्ट वाटले. फ्रान्सला आवश्यक असलेल्या व्यापारी सवलती पाहिजे होत्या त्या १५३६ कॅपिच्युलेशन्सच्या कराराखाली देण्यात आल्या. या करारानुसार फ्रेंच नागरिकांना सुलतानाच्या प्रदेशात व्यापार आणि प्रवास करण्याच्या सवलती मिळाल्या. फ्रेंच नागरिकांना ऑटोमन कायदे लागू नव्हते. त्यांचा निवाडा फ्रेंच कायद्यानुसार व फ्रेंच न्यायालयांनीच करावा, अशी सवलत देण्यात आली होती. इतर यूरोपीय देशांनी नंतर या सवलतीचा फायदा घेऊन या कराराच्या धर्तीवर करार केले. या करारामुळे ऑटोमन प्रदेशात तद्देशीय व्यापारी वर्गाचा उदय झाला नाही आणि व्यापारवर परदेशियांचे नियंत्रण राहिले.
सुलेमानच्या काळात प्रबळ आरमारी सत्ताही निर्माण केली. सुलेमानने १५२२ मध्ये रोड्झ काबीज केले. १५२३ मध्ये खैरुद्दीन (बार्बारोसा) इ. प्रसिद्ध नौसेना प्रमुखांच्या साहाय्याने सुलेमानने प्रबळ आरमार संघटित करून भूमध्य समुद्रावर आपले वर्चस्व स्थापन केले. या आरमारामुळे हॅप्सबर्गच्या सागरी सत्तेला पायबंद बसला. पोर्तगिजांच्या वाढत्या हालचालींना आळा घालण्यासाठी सुएझ तसेच इराकमध्ये बसरा येथे त्याने आरमारी तळ स्थापन केले. आपले प्रबळ आरमार १५३८ व १५५४ मध्ये त्याने भारताच्या गुजरात किनाऱ्यापर्यंत पाठविले होते. पूर्व आघाडीवर सुलेमानने दक्षिण कॉकेशस, आझरबैजान आणि इराकमध्ये विजय मिळविले.
सुलेमानच्या कारकीर्दीत ऑटोमन साम्राज्य वैभवाच्या शिखराला पोहोचले तरी त्याच काळात त्याच्या भावी ऱ्हासाची व विनाशाची बीजे पेरली गेली. प्रदीर्घ लष्करी मोहिमांनी सुलतान सुलेमान थकला आणि सार्वजनिक जीवनातून परावृत्त होऊन तो आपला अधिक काळ जनानखान्यात घालवू लागला. त्यामुळे वजीरपदाचे महत्त्व वाढवून त्याच्याकडे अधिक सत्ता देण्यात आली. अधिकार ग्रँड वजिराकडे आले, तरी सुलतानप्रमाणे त्याचे पद लोकांच्या राजनिष्ठेचे केंद्र होऊ शकले नाही. सत्तेचे केंद्र आणि निष्ठेचे केंद्र यांची अशी विभागणी झाल्यामुळे खंबीरपणे राज्यकारभार करण्याची शक्तीही कमी झाली.
सुलेमानच्या उत्तराधिकाऱ्यांनी काही विजय संपादन केले पण त्यांच्या कारकीर्दीत अंतर्गत कलह चालू राहिले. दुसरा सलीम (१५२४–७४) आणि तिसरा मुराद (१५४६–९५) हे दोघे सुलतान निरनिराळ्या गटांना परस्परांविरुद्ध लढवूनच सत्तेवर आले. या गटबाजीत वजिराच्या स्थानाला धक्का बसला. सत्ता जनानखान्यातील स्त्रियांच्या हातात गेली. १५७०–७८ हा आठ वर्षांचा काळ तर महिलांच्या सुलतानगिरीचा काळ म्हणून ओळखला जातो. सलीम व्हेनिसविरुद्ध लढला, तर मुरादने इराकविरुद्ध यशस्वी मोहीम केली. ऑस्ट्रियाविरुद्धची मोहिम १५९३ च्या दरम्यान सुरू झाली.पहिल्या अहमदच्या कारकीर्दीतही (१५८९–१६१७) ती चालूच होती. अहमदच्या कारकीर्दीत जॅनिसेरीझची सतत बंडखोरी चालली होती. त्यानंतर मुस्ताफा (१५९१–१६३९) याच्या कारकीर्दीतही परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. मुस्ताफाला त्याच्या कमकुवतेमुळे दूर सारून त्याचा वारस दुसरा उस्मान गादीवर आला पण त्याचा तर जॅमिसेरीझनी खून केला. तथापि चौथ्या मुरादजवळ (१६१२–४०) मात्र सामर्थ्यशाली लष्कर होते. १६३८ मध्ये त्याच्या कारकीर्दीत ऑटोमन सैन्याने इराणकडे कूच करून एरिव्हान व ताब्रीझ ताब्यात घेऊन बगदादही जिंकले. चौथ्या मुरादचे वारस मात्र राजसत्ता टिकविण्यास असमर्थ ठरले. १६८३ मध्ये तुर्की सैन्याला व्हिएन्नामधून माघार घेणे भाग पडले आणि १६९९ मध्ये त्याला संपूर्ण हंगेरीही गमवावा लागला.
दुसरा मुस्ताफा (१६६४–१७०३) दुसऱ्या अहमदनंतर १६९५ मध्ये गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत (१६९५–१७०३) जॅनिसेरीझनि बंडाचा पुन्हा उठाव केला आणि अराजक माजविले. मुस्ताफाचा भाऊ तिसरा अहमद (१६७३–१७३०) गादीवर आला (१७०३), तेव्हा त्याला जॅनिसेरीझच्या मागण्यांपुढे मान तुकवावी लागली. तो शांतताप्रिय शासक होता. त्याचा कालखंड ट्युलिपचे युग म्हणून प्रसिद्ध आहे कारण त्याच्या काळात ट्युलिप फुलांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. या फुलांची लागवड हा पाश्चात्त्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावाचे लक्षण होते. हा प्रभाव केवळ अनुकरणात्मक होता. छापखान्यांची स्थापना ही या काळातील एकमेव आधुनिक सुधारणा होती.
तिसऱ्या अहमदनंतर त्याचा मुलगा तिसरा मुस्ताफा (१७१७–७३) हा गादीवर आला (१७५७). त्याच्या कारकीर्दीत तुर्कस्तानने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले. १७६८–७४ पर्यंत ते सतत चालू होते परंतु शेवटी तुर्कस्तानला अपमानास्पद तह करावा लागला. मुस्ताफाच्या दोन वारसांनी, तिसरा सलीम (कार. १७९९–१८०७) आणि दुसरा मुहंमद (कार. १८०८–३९) यांनी लष्करात सुधारणा करण्याचे प्रयत्न केले. या सुधारणांना जॅनिसेरीझनी विरोध केल्यामुळे तिसऱ्या सलीमने निजाम–इ–जदीद (नव्या व्यवस्थेचे सैन्य) या नावाने एक नवीन लष्कर संघटित केले. हे नवे लष्कर यूरोपीय धर्तीचे होते. तिसऱ्या सलीमने शस्त्रे आणि दारूगोळा तयार करण्याचे कारखानेही काढले. परंतु सनातनी गटांनी त्याच्याविरुद्ध बंड करून त्याला राजवाड्यात कैद केली आणि चौथ्या मुस्ताफाची (१७७८–१८०८) गादीवर स्थापना केली (१८०७). मुस्ताफाने सर्व सुधारणा रद्द केल्या पण सुधारणावाद्यांनी पुन्हा उठाव करून दुसऱ्या मुहंमदला गादीवर बसविले (१८०८). त्याने जॅनिसेरीझना चिरडून टाकले. त्याने सुभेदारांची सत्ताही नष्ट केली. उलेमांचा प्रभाव कमी केला. नवे रस्ते बांधले. टपालसेवा सुरू केली व केंद्रसत्तेचा अंमल दूरदूरच्या प्रदेशांपर्यंत पोहोचविला. मुलकी शासनात सुधारणा करून तुर्कस्तानच्या राज्ययंत्रणेला आधुनिक बनविण्याचे विविध प्रयत्न केले. त्याच्या काळात साम्राज्यातील प्रदेशाचा संकोच झाला, तरी अंतर्गत संघटना अधिक भरीव झाली. मुख्य म्हणजे त्याने सुधारणांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.
मुहंमदाचा मुलगा पहिला अब्दुल (कार. १८३९–६१) आणि अब्दुल अझीझ (कार. १८६१–७६) या सुलतानांच्या काळात सुधारणांचा एक व्यापक कार्यक्रम अमलात आला. या सुधारणांना तंझिमत (पुनर्घटना) म्हणून संबोधले जाते. लंडन व पॅरिस येथे राजदूत म्हणून दीर्घकाळ काम केलेले मुस्ताफा रशीद पाशा यांनी ही सुधारणांची योजना तयार केली व पहिल्या अब्दुल मजीदच्या काळात ती प्रसृत करण्यात आली. या सुधारणांचे स्वरूप विविध होते, ते पुढीलप्रमाणे : (१) लष्करात सुधारणा करून प्रशियन पद्धतीच्या सक्तीच्या लष्करभरतीचे धोरण, (२) केंद्रीय व प्रादेशिक पातळ्यांवरील प्रशासनव्यवस्थेत सुधारणा, (३) शिक्षणव्यवस्थेत व कायद्यात सुधारणा करून समाजपरिवर्तन घडवून आणणे इत्यादी. १८४६ मध्ये सरकारतर्फे शिक्षण देण्याची व्यापक योजना अंमलात आली. प्राथमिक शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत सर्व शिक्षणाची जबाबदारी सरकारने स्वीकारली. कायद्यात केलेल्या सुधारणांचे उद्देश दोन होते : एक म्हणजे फ्रेंच नागरिकांना मिळालेले विशेष हक्क रद्द करून साम्राज्यातील सर्व नागरिकांना समान अधिकार देणे व एकाच कायद्याच्या अंमलाखाली सर्वांना आणणे व दुसरे म्हणजे पारंपरिक इस्लामी कायद्याचे आधुनिकीकरण. कायद्याच्या अंमलबजावणीचे काम उलेमांकडून काढून ते सरकारी न्यायालयांकडे सोपविण्यात आले. १८३९–७७ या काळात आधुनिक शाळा स्थापन करण्यात आल्या.
तंझिमतचा एक परिणाम म्हणून तरुण तुर्क नावाची बुद्धिवादी देशभक्त तरुणांची संघटना पुढे आली. त्यांपैकी नामिक केमाल (१८४०–८८) याचा सुधारणांच्या पुढील कार्यक्रमावर बराच प्रभाव पडला. त्याचा पाश्चात्त्याच्या अंधानुकरणाला विरोध होता. त्यानेच प्रथम देशाला एक संविधान असावे, ही कल्पना लोकप्रिय केली. निष्ठा ही ऑटोमन–पितृभूमीला असावी, असा राष्ट्रभक्तीचा नवा विचार त्याने लोकांपुढे मांडला. त्यांच्या प्रयत्नामुळे अब्दुल अझीझनंतर गादीवर आलेल्या सुलतान दुसऱ्या अब्दुल हमीदला (कार. १८७६–१९०९) पहिले ऑटोमन संविधान स्थापन करणे भाग पडले (२३ डिसेंबर १८७६).
अब्दुल हमीदने क्रीटमध्ये झालेले बंड मोडून काढले. परंतु यूरोपीय राष्ट्रांनी क्रीटला स्वयत्तता देण्यास त्याला भाग पाडले. अरबस्तानात मात्र ऑटोमन सत्ता अबाधित राहिली. अब्दुल हमीदचा कारभार जुलमी होता. त्याच्याविरुद्ध अनेक कट आणि बंडे झाली. पहिले बंड १८८७ मध्ये ‘इत्तहाद वे तरक्की’ (ऑटोमन एकता आणि प्रगती संघ) या संघटनेने केले. अशा अनेक संघटना देशात स्थापन झाल्या होत्या. १९०८ मध्ये त्यांनी सुलतान अब्दुल हमीदला संविधानात्मक कारभार सुरू करण्यास भाग पाडले. पुढे अब्दुल हमीदला पदच्युत करण्यात येऊन (१९०९) त्याचा भाऊ पाचवा मुहंमद याला गादीवर बसविण्यात आले (कार. १९०९–१८). संविधानात दुरुस्ती करण्यात येऊन संसदेला मोठे अधिकार देण्यात आले. १९०८–१८ हा कालखंड तरूण तुर्क संघटनेच्या प्रभुत्वाचा काळ ठरला.
तुर्कस्तानला बाल्कन युद्धात (१९१२-१३) आपले यूरोपीय प्रदेश गमवावे लागले आणि पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या बाजूने युद्धात पडल्यामुळे पराभानंतर ऑटोमन साम्राज्याचे तुकडे पडून अरब प्रदेशातील त्यांची सत्ता नष्ट झाली. १९२० च्या तहनाम्यानुसार ऑटोमनकडे फक्त इस्तंबूल व थ्रेसचा काही भाग ठेवण्यात आला. या वेळी इस्तंबूलमध्ये गादीवर असलेला छत्तीसावा आणि अखेरचा सुलतान सहावा मुहंमद (१९१८–२२) याने दोस्त राष्ट्रांच्या या अटींना विरोध करण्यात अर्थ नाही असे ठरविले. परंतु ऑटोमनचे युद्ध काळातील एक नामांकित सेनानी मुस्ताफा ⇨ केमालपाशा यांनी या अपमानास्पद तहनाम्याविरूद्ध लढून ऑटोमनचे संपूर्ण स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याचा निर्धार केला. १९२० मध्ये केमालने अंकारा येथे पहिली विराट राष्ट्रीय सभा बोलाविली व ग्रीकांच्या विरुद्ध तीन वर्षे सतत लढा देऊन त्याने ऑटोमनचे स्वतंत्र्य प्रस्थापित केले. लोझॅनच्या परिषदेने तुर्कस्तानच्या नव्या राष्ट्रीय सीमा ठरविल्या (१९२३). १ नोव्हेंबर १९२१ रोजी राष्ट्रीय सभेने प्रथम सुलतानपद बरखास्त केले आणि पुढे खिलाफत बरखास्त करून ऑटोमन राजघराण्यातील सर्व लोकांना हद्दपार केले. तत्पूर्वी २९ ऑक्टोबर १९२३ रोजी राष्ट्रीय सभेने तुर्कस्तानचे गणराज्य घोषित करून केमालची पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली होती. १९२४ च्या एप्रिलमध्ये संपूर्ण प्रजासत्ताक संविधानही संमत करण्यात आले. अशा प्रकारे सु. सहाशे वर्षेपर्यंत अखंड राहिललेले ऑटोमन साम्राज्य संपुष्टात आले व नवीन प्रजासत्ताक तुर्कस्तान राष्ट्र जन्माला आले.
आधुनिक कालखंड : प्रजासत्ताकाच्या स्थापनेपासून तुर्कस्तानच्या इतिहासाचा हा कालखंड सुरू होतो. या तुर्कस्तानचा संस्थापक केमाल हा थोर सेनानी आणि आधुनिक राष्ट्रवादी होता. त्याने राजकीय, सामाजिक, धार्मिक इ. सर्व क्षेत्रांत अनेक सुधारणा घडवून आणल्या. भारतीय मुसलमानांच्या अवास्तव मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्याने १९२४ मध्ये खिलाफत बरखास्त केली होती. १९२५ मध्ये त्याने फेजऐवजी हॅट वापरावी असा हुकुम काढला. १९२६ मध्ये नवीन मुलकी कायदा अंमलात आला. त्यानुसार सर्व तुर्की नागरिक कायद्याच्या दृष्टीने समान मानण्यात आले. १९२८ साली संविधानात सुधारणा करण्यात येऊन इस्लामचा राजधर्म म्हणून असलेला दर्जा काढून घेण्यात आला. तुर्कस्तान निधर्मी राज्य झाले. त्याचा परिणाम म्हणून स्त्रियांच्या स्थितीत व दर्जात सुधारणा झाली. त्याने अरबी लिपीला मनाई केली व तुर्की भाषा रोमन लिपीत लिहिली जाऊ लागली.
मुस्ताफा केमालने संपूर्ण देशाचे आधुनिकीकरण केले. त्याच्या प्रगतिशील आणि राष्ट्रवादी कल्पनांना लोकगृहांनी उचलून धरले. १९३१ मध्ये बहुतेक सर्व शहरांत स्थापन करण्यात आलेल्या ह्या लोकगृहांना हल्क एव्हलरी म्हणून संबोधिले जात असे. केमालला आतातुर्क ही पदवी देण्यात आली.
विदेशी नीतीत मुस्ताफा केमालची भूमिका अंतर्गत शांतता आणि देशाबाहेर शांतता ही होती. ग्रीस, रूमानिया आणि यूगोस्लाव्हिया यांच्याशी १९३४ साली व इराक, इराण आणि अफगाणिस्तान यांच्याशी १९३७ साली त्याने मैत्रीचे करार केले. तुर्कस्तानचे धोरण तटस्थेतेचे होते. १९३२ मध्ये त्या वेळच्या राष्ट्रसंघाचा तुर्कस्तान सदस्य झाला. मुस्ताफा केमालच्या मृत्युनंतर (१९३८) इस्मेत इनोनू याने त्याच्याच धोरणांचा पाठपुरावा केला. दुसऱ्या महायुद्धात तुर्कस्तान तटस्थ राहिला. परंतु १९४५ साली त्याने दोस्तांच्या बाजूने युद्धात प्रवेश केला. कारण त्याला राष्ट्रसंघांच्या परिषदेत दोस्तराष्ट्रांच्या समवेत सॅन फ्रॅन्सिस्को येथे सहभागी व्हावयाचे होते. युद्धानंतर रशियाने पूर्व आशिया मायनर आणि ईशान्य ॲनातोलियातील बऱ्याच मोठ्या प्रदेशावर हक्क सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा तुर्कस्तानने संरक्षासाठी अमेरिकेची मदत मागितली. येथूनच तुर्कस्तानने यूरोपशी निकट संबंध ठेवण्याचे धोरण स्वीकारले. १९५० पर्यंत इनोनू हा सत्तेवर होता. नंतर डेमॉक्रॅट पक्षाचा जलाल बायर हा राष्ट्राध्यक्ष झाला आणि मेंदेरेस हा पंतप्रधान झाला. त्यांच्या नव्या कारकीर्दीत तुर्कस्तान १९५२ साली नाटो व १९५८ साली सेन्टो या संघटनांचा सभासद झाला. १९५१ साली भारताशी मैत्रीचा करार करण्यात आला. तुर्कस्तानातील डेमॉक्रॅट पक्षाचे शासन अखेरच्या काळात बऱ्याच प्रमाणात हुकूमशाहीत परिणत झाले, असे म्हटले जाते. शासनाला डोईजड असे परकीय कर्जही झाले आणि म्हणूनच १९६० साली लष्कराने जनरल ग्यूर्सेल याच्या आधिपत्याखाली ते सरकार उलथून पाडले. डेमोक्रॅटिक पक्ष बरखास्त करण्यात आला व मेंदेरेस प्रभृती पुढाऱ्यांना फाशी देण्यात आले. १९६१ साली नवीन संविधानाचा स्वीकार करण्यात आला आणी त्यानुसार द्विसदनी विधिमंडळ अस्तित्वात आले. १९६१–६५ या काळात कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती परंतु मुख्यतः इनोनू यांच्या धोरणामुळे पुन्हा लष्करी हस्तक्षेप झाला नाही. १९६५ मध्ये जस्टिस पक्षाला बहुमत मिळाले आणि सुलेमान देमिरेल यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मंत्रिमंडळ अधिकारावर आले.
देमिरेल यांची जस्टिस पार्टी (जेपी) व केमालपाशाने स्थापन केलेली रिपब्लिकन पीपल्स पार्टी (आरपीपी) तुर्कस्तानच्या राष्ट्रीय राजकारणातील दोन प्रमुख पक्ष आहेत. ‘आरपीपी’ ही केमालप्रणीत सहा तत्त्वांच्या अधिष्ठानावर धोरणाची व कार्यक्रमाची आखणी करते. ही सहा तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत : (१) प्रजातंत्रवाद, (२) राष्ट्रवाद, (३) लोकानुवर्तित्व (पॉप्युलिझम), (४) शासननियंत्रित अर्थव्यवस्था, (५) निधर्मवाद व (६) सुधारणावाद. केमालच्या काळापासून या पक्षाला शहरातील बुद्धिजीवी वर्ग आणि बडे जमीनदार यांचा पाठिंबा असे. १९६५ मध्ये या पक्षाने लोकशाही समाजवादाचा स्वीकार केला. जस्टिस पक्ष हा सेवानिवृत्त सेनापती रागिप न्यूमयूस्पाल यांनी १९६१ मध्ये स्थापन केलेला पक्ष आहे. या पक्षाला जुन्या डेमॉक्रॅटिक पक्षातील बहुसंख्य लोकांचा पाठिंबा मिळाला. सनातनी धर्मनिष्ठ गट, शेतकरी व्यावसायिक आणि व्यापारी इत्यादींचा या पक्षाला पाठिंबा असतो, जस्टिस पक्षाने औद्योगिकीकरण व समाजकल्याणविषयक कायदे यांवर भर दिला परंतु १९६७–७० या काळात विद्यार्थी आणि कामगारांत असंतोष वाढला व त्यांची उग्र निदर्शने झाली. १९६९ मध्ये पुन्हा निवडणुका घेण्यात आल्या पण त्याही वेळी जस्टिस पक्षच अधिकारावर आला. जस्टिस पक्षाचे निर्णायक बहुमत १९७३ च्या निवडणुकीत समाप्त झाले आणि रिपब्लिकन पीपल्स पार्टीला निर्णायक बहुमत नव्हे तरी जास्तीतजास्त जागा मिळाल्या. नॅशनल सॉल्व्हेशन पार्टीच्या सहकार्याने बुलंद एकेवित याचे मंत्रिमंडळ अधिकारावर आले. एकेवित हे १९६७ पासून आरपीपीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे मंत्रिमंडळ काही महिनेच टिकले परंतु याच काळात सायप्रस येथील गंभीर पेचप्रसंग उद्भवला. १५ जुलै १९७४ रोजी सायप्रसमधील ग्रीक अधिकाऱ्यांनी उठाव करून अध्यक्ष मॅकरिऑस यांचे सरकार उलथून पाडले. मॅकरिऑस याने इंग्लंडमध्ये आश्रय घेतला. सायप्रसमधील तुर्की अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्यासाठी सायप्रसच्या स्वातंत्र्याची हमी देणारा देश म्हणून २० जुलै १९७४ रोजी तुर्कस्तानने आपल्या फौजा तेथे उतरविल्या. दोन दिवसांच्या लढाईत तुर्की लोकसंख्या असलेला बराचसा प्रदेश तुर्की फौजांनी व्यापला. संयुक्त राष्ट्रांनी याची दखल घेतली व सुरक्षा समितीने २२ जुलै १९७४ रोजी युद्धबंदीचा ठराव केला तो दोन्ही पक्षांनी मान्य केला. सायप्रसची ग्रीक व तुर्की भागांत फाळणी करणे अथवा त्याचे ग्रीसशी विलिनीकरण करणे, या दोन्ही पर्यायांना तुर्कस्तानचा विरोध होता. सायप्रसमध्ये संघराज्यात्मक व्यवस्था असावी अशी तुर्की भूमिका आहे. या भूमिकेनुसार त्यांनी व्याप्त केलेल्या प्रदेशात तुर्कीसायप्रीअट लोकांचे वेगळे सरकारही त्याने अस्तित्वात आणले. सायप्रससंबंधीच्या या निश्चयी धोरणामुळे एकेवित यांची वैयक्तिक लोकप्रियता वाढली, तरी त्यांचे संमिश्र सरकार आठ महिन्यांतच गडगडले. १९७५ मध्ये पुन्हा लष्करी अधिकाऱ्यांनी बंडाचा अयशस्वी प्रयत्न केला. ३१ मार्च १९७५ पासून देमिरेल यांचे राष्ट्रीय आघाडीचे सरकार अधिकारावर आहे.
सायप्रसमधील तुर्की आक्रमणाचे वेळी अमेरिकेने शस्त्रपुरवठ्यावर बंदी घातली आणि त्याला प्रतिशह म्हणून तुर्कस्तानने १९६९ सालचा अमेरिकेशी झालेला संरक्षणाचा करार रद्द केला आणि अमेरिकेची तुर्कस्तानमधील २५ संरक्षण केंद्रे बंद केली. १९७५ च्या ऑक्टोबरमध्ये या प्रश्नावर यशस्वी वाटाघाटी झाल्या. अमेरिकेने शस्त्रबंदी उठविली व तुर्कस्तानमधील आपली संरक्षण केंद्रे तुर्कस्तानच्या नियंत्रणाखाली ठेवण्यास मान्यता दिली. अथेन्समध्ये फेब्रुवारी १९७६ मध्ये बाल्कन सत्रांच्या परिषदेत तुर्कस्तान सहभागी झाला. बल्गेरिया, रूमानिया, यूगोस्लाव्हिया, ग्रीस व तुर्कस्तान यांचीही परिषद ग्रीसच्या पुढाकाराने झाली. जून १९७६ मध्ये त्यांनी चेकोस्लोव्हाकियाशी आर्थिक सहकार्याचा करार केला.
राज्यव्यवस्था : तंझीमतच्या काळात २३ डिसेंबर १८७६ साली पहिले ऑटोमन संविधान जारी करण्यात आले. सुलतान अब्दुल हमीदच्या कारकीर्दीत तयार झालेल्या या पहिल्या घटनेत सुलतानाचे सर्व कार्यकारी अधिकार कायम ठेवण्यात आले होते. सर्व मंत्री व्यक्तिशः सुलतानाला जबाबदार असत. कायदे करण्यात सुलतानाला मदत करण्यासाठी एक अप्रत्यक्ष निवडलेले खालचे (हाउस ऑफ डेप्यूटीज) व दुसरे नियुक्त सभासदांचे वरिष्ठ (सीनेट) अशी दोन सभागृहे स्थापन करण्यात आली. या पार्लमेंटची बैठक एकदाच मार्च १८७७ मध्ये झाली व एक वर्षातच त्याची बैठक बेमुदत तहकूब करण्यात आली. १९०८ पर्यंत ते पुन्हा बोलावण्यात आले नाही. १९०९ मध्ये सुलतान अब्दुल हमीद स्थानभ्रष्ट होऊन पाचवा मुहंमद हा सुलतान पदावर आल्यानंतर घटनेत बदल करून पार्लमेंटला भरीव सत्ता देण्यात आली.
केमालपाशाच्या कारकीर्दीतच घटनात्मक राज्यव्यवस्थेचा विकास झाला. केमालने १९१९ मध्ये एर्झरूम येथे सर्व देशातील प्रतिनिधींची जी विराट राष्ट्रीय सभा भरविली तीच त्याची प्रातिनिधीक सभा होती. या संसदेने २९ ऑक्टोबर १९२३ रोजी तुर्कस्तान प्रजासत्ताक घोषित करून केमालपाशाची पहिले अध्यक्ष म्हणून निवड केली. १९२४ मध्ये खिलाफत बरखास्त करण्यात येऊन ऑटोमन घराण्यातील सर्व व्यक्तींना तुर्कस्तानमधून हद्दपार करण्यात आले. १९२४ मध्ये सर्व धार्मिक न्यायालये व शाळा बरखास्त करण्यात येऊन धर्मनिरपेक्ष असा कौटुंबिक कायदा अंमलात आणला.
या प्रजातांत्रिक व्यवस्थेचा अधिक विकास दुसऱ्या महायुद्धानंतर झाला. राजकीय पक्ष स्थापनेचे स्वतंत्र्य, प्रौढ व सार्वत्रिक मतदानाचा हक्क आणि प्रत्यक्ष निवडणुका या सुधारणा करण्यात आल्या.
नवीन घटना परिषद १९६४ मध्ये भरवून घटनेचा नवा मसुदा तयार करण्यात आला व त्यावर लोकमत (रेफरेंडम) घेण्यात आले. त्यांत ६१ टक्के मते मिळून नवी घटना प्रसृत झाली.
या घटनेने तुर्कस्तानचे प्रजासत्ताक राष्ट्रवादी लोकशाहीनिष्ठ निधर्मी म्हणून घोषित करण्यात आले असून राष्ट्राचे हे प्रजासत्ताक स्वरूप स्थापित करणाऱ्या घटनेच्या कलमात कधीही बदल करता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली आहे. कायद्याने सर्व नागरिकांना समानत्व देण्यात आले असून त्यांच्या मूलभूत स्वातंत्र्याचा अपहार करता येणार नाही असे घटनेचे एक कलम आहे.
तुर्कस्तानच्या विराट राष्ट्रीय सभेची दोन सदने आहेत. एक राष्ट्रीय सभा व दुसरे सीनेट. राष्ट्रीय सभेचे एकूण प्रतिनिधी ४५० असतात व त्यांची निवडणूक दर चार वर्षांनी होते. सीनेटची सभासद–संख्या १५० असून एक तृतीयांश सभासद दर दोन वर्षांनी निवडले जातात. राष्ट्रीय सभेच्या प्रतिनिधींची निवडणूक प्रौढ मतदानाच्या तत्त्वानुसार सार्वत्रिक निवडणुकीने होते.
अध्यक्षाची निवडणूक विराट राष्ट्रीय सभेकडून म्हणजे दोन्ही सदनांच्या संयुक्त प्रतिनिधींकडून होते. ही निवडणूक खुल्या अधिवेशनात दोन तृतीयांश बहुमताने केली जाते. अध्यक्ष सदनांच्या सभासदांमधून निवडला जातो. त्याची मुदत सात वर्षांची असते.
बहुमत मिळालेल्या पक्षाच्या नेत्यास अध्यक्ष पंतप्रधान म्हणून नेमतात आणि पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या अन्य सभासदांची नेमणूक करतात. संविधानाने न्यायालयांना स्वतंत्र्य दिले असून शासकीय आणि वैधानिक शाखांनी न्यायालयाच्या निर्णयांचा आदर करावा, अशी तरतूद करण्यात आली आहे.
संरक्षण : तुर्कस्तान १९५२ मध्ये ‘नाटो’ कारारात सामील झाला. अमेरिकेबरोबर संरक्षणाचे खास संबंध असून अमेरिकेकडून शस्त्र–पुरवठा होतो. अमेरिकन लष्करी तज्ञांच्या सल्ल्यानुसार लष्कराची पुनर्घटना व आधुनिकीकरण करण्यात आले.
लष्करी सेवेचा काळ २२ महिन्यांचा असतो. १९७३-७४ मध्ये शस्त्रदलांचे एकूण संख्याबळ ४,५५,००० होते. लष्करात ३,६५,००० आरमार ४०,००० व विमान–दलात ५०,००० अशी त्याची विभागणी आहे. १९७३–७४ मध्ये संरक्षण संकल्प १,१०० दशलक्ष टर्किश लिरा इतके होते.
मंत्री, सरसेनापती व अन्य शस्त्रदलांचे प्रमुख यांचे राष्ट्रीय सुरक्षा मंडळ असून राष्ट्राध्यक्ष त्याच्या बैठकीचे अध्यक्ष असतात.
नईमुद्दीन, सैय्यद साक्रीकर, दिनकर
आर्थिक स्थिती : मुस्ताफा केमाल म्हणजेच आतातुर्कने तुर्कस्तानला प्रगतिपथावर नेण्याचा, तुर्कस्तानच्या आधुनिकीकरणाचा व पाश्चात्त्यीकरणाचा चंग बांधला. ज्या तत्त्वांनुसार तुर्कस्तानची राष्ट्रउभारणी सुरू झाली त्यांना एटाटिझम असे नाव आहे. शेती व्यवसाय हा तुर्की राजकारणाचा पाया होता व अजूनही आहे. परंतु १९३० सालापर्यंत जो आर्थिक विकास झाला त्यात शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष केले गेले व त्यामुळे देशात असंतोष माजला. तो शमविण्याकरिता आतातुर्कने एकपक्षपद्धती किंवा हुकूमशाही बंद करून इतर पक्ष स्थापन करण्याचे स्वतंत्र्य दिले. त्यामुळे देशाचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली. काही विभागांत असलेल्या सुपीक जमिनी, मंद उतराचा भूप्रदेश, विविध प्रकारचे हवामान व लोकांची कष्ट करण्याची प्रवृत्ती या शेतीच्या दृष्टीने जमेच्या बाजू आहेत. परंतु तुर्कस्तानात हिवाळ्यात दहिवर असते, अनेक ठिकाणी बेताचा अल्प पाऊस असतो आणि पूर्वेकडील डोंगराळ, उंचसखल प्रदेश शेतीस निरुपयोगी आहे.
कृषिपद्धती : तुर्की शेतीची पद्धत १९२५ सालापर्यंत अशास्त्रीय व मागसलेली होती परंतु नंतरच्या वीस वर्षांत अन्नधान्यांचे उत्पादन दुप्पट झाले. पारंपरिक कृषिपद्धतीत तुर्की शेतकऱ्यांनी बदल केला. स्टेप प्रकारचे हवामान असलेल्या विभागात कोरडवाहू शेतीची पद्धत सुरू झाली. रासायनिक व हिरव्या खतांचा वापर सुरू झाला. त्यामुळे दर हेक्टरी उत्पादन वाढले. अनिश्चित पावसाच्या प्रदेशात पिकांच्या ऐवजी कुरणांचा विकास करण्यात आला. शेतात पाणी मुरण्यासाठी वर्षाआड जमीन पडीक ठेवणे हे आपल्या हिताचे आहे हे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने निमदुष्काळी विभागातील शेतकरी वर्षाआड जमिनी पडी ठेवू लागले. दलदली हटवून शेतीसाठी नवीन जमिनी तयार करण्यात आल्या व २५ अंशाचे उतार असलेल्या जमिनींना बांध घालून त्यांचे पायऱ्या पायऱ्यांत रूपांतर करून जमिनीचे संधारण करण्यात आले. देशाच्या वेगवेगळ्या विभागांत शेती संशोधन केंद्रे स्थापन करण्यात आली. कमी पावसाच्या प्रदेशात उतारावरील जमिनींना काटकोनात बांध घालून पाणी जमिनीत मुरवले. यामुळे दर हेक्टरी उत्पादनात वाढ होत आहे. १९७१ मध्ये २,४५,२७० चौ. किमी. मध्ये शेती होत असे.
पाणीपुरवठा : किनाऱ्यावरील प्रदेश वगळता तुर्कस्तानच्या इतर भागांत जलसिंचनाची आवश्यकता आहे, कारण पाऊस अगदी अनिश्चित स्वरूपाचा आहे. सेहान, साकार्या, किझिलइर्मांक, मेंडरेस, गेदिझ व युफ्रेटीस या नद्यांवर प्रकल्प आहेत. त्यांपैकी सेहान प्रकल्प व केमेर प्रकल्प (मेंडेरेस) हे बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून ओळखले जातात. वीज निर्मितीनंतर जमा झालेले पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाते.
पिके : हवामान व जमिनींच्या विविधतेमुळे तुर्कस्तानात अनेक प्रकारची पिके होतात. गहू हे तुर्कस्तानातील मुख्य अन्नधान्य असून बहुतेक भागात ते हिवाळी पीक म्हणून घेतले जाते. अंतर्गत भागातील खोऱ्यात दर हेक्टरी जास्तीतजास्त उत्पन्न आहे. तीस वर्षांपूर्वी तुर्कस्तान हा गव्हाची आयात करणारा देश होता, आता तो गव्हाची निर्यात करतो. १९७१ मध्ये गव्हाचे उत्पादन १३·५ लाख टन होते. किझिलइर्माक नदीच्या खोऱ्यात उत्तर मध्य किनाऱ्यावर व दक्षिणेकडे सेहान नदीच्या खोऱ्यात जास्त पावसाचा विभाग व गाळाच्या जमिनी आहेत. तेथे तांदूळ होतो. कमी पावसाच्या प्रदेशात ॲनातोलियाच्या पठारावर राय, ओट ही पिके होतात. लिंबूजातीच्या फळांचे भरपूर उत्पादन होते. भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर त्याच्या अती दक्षिणेकडील स्थानामुळे उन्हाळे जास्त काळ टिकतात. पाऊसही निश्चित स्वरूपाचा आहे. यामुळे या विभागात संत्री, मोसंबी ही फळे होतात. सुलताना जातीच्या मनुका व बेदाणे जगप्रसिद्ध असून त्यांची निर्यात होते. इजीअन समुद्राची किनारपट्टी, टायग्रिस–युफ्रेटिस नद्यांचे वरचे खोरे येथे भरपूर द्राक्षे होतात. १९७१ मध्ये द्राक्षांचे उत्पादन ३८·५ लाख मे. टन होते. याशिवाय वरील विभागात सफरचंद, पीच, जरदाळू, तुती, पेअर, अलुबुखार ही फळे होतात. ऑलिव्हचे पीकदेखील अतिशय महत्त्वाचे आहे. इजीअन व भूमध्य समुद्र किनाऱ्यालगत सु. ७०० मी. उंचीपर्यंत हे झाड वाढते. ऑलिव्ह वृक्षास जलसिंचनाची आवश्यकता नसते व २० सेंमी. पर्यंत पाऊस असणाऱ्या प्रदेशातही ते होते. चुनखडीच्या प्रदेशातील जमिनीवर ऑलिव्हचे पीक चांगले होते. अक्रोड, पिस्ते, बदाम ही फळेदेखील ट्रॅबझॉन, अंकारा, इस्तंबूलच्या परिसरात होतात. आडाना व इझमिर शहरालगत कापूस होतो. बुर्सा शहरालगत रेशमाची पैदास केली जाते. बार्ली, मका ही पिकेही आज महत्त्वाची आहेत.
अनेक शतकांपासून तुर्कस्तानच्या किनारपट्टीवर उत्कृष्ट प्रकारच्या सोनेरी रंगाच्या तंबाखूचे उत्पन्न होते. बाफ्रा या शहरालगत जगातील अत्युत्कृष्ट तंबाखू होतो. मेंडेरेस, किझिलइर्माक आणि येशिलइर्माक नद्यांच्या खोऱ्यांत चांगल्या प्रतीचा तंबाखू होतो. तंबाखूची मुख्यत्वेकरून अमेरिकेला निर्यात करतात. अलीकडे तंबाखूऐवजी कापसाची लागवडही बऱ्याच ठिकाणी होऊ लागली आहे.
शर्करा कंद हे तुर्कस्तानातील तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे नगदी पीक आहे. यूरोपियन तुर्कस्तानच्या सखल प्रदेशात, येशिलइर्माक व साकार्या नद्यांच्या खोऱ्यांत कंद पिकवले जातात. साखर उत्पादनाच्या बाबतीत तुर्कस्तान हा देश स्वयंपूर्ण आहे. १९७१ मध्ये १९·५ लाख टन शर्करा कंदाचे उत्पादन झाले. याशिवाय तीळ, अफू, हिरडा, चहा ही पिके होतात.
तुर्कस्तानात शेती व्यवसाय अर्थकारणाचा पाया असून ६०% लोकसंख्या शेतीत गुंतलेली आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या सु. ३०% उत्पादन शेती व्यवसायापासून मिळते व एकूण निर्यातीमध्ये ७०% वाटा शेतमालाचा असतो, अर्थात औद्योगिक विकासामुळे हळूहळू हे प्रमाण कमी होत आहे. जलसिंचन, कृषी व्यवसायाचे यांत्रिकीकरण, शास्त्रीय पद्धतींचा अवलंब, यांमुळे व शेतकऱ्यांना बी बियाणे, कीटक नाशके, शेतीची अवजारे व कर्जे देण्यासाठी स्थापन केलेल्या सहकारी संस्था यांमुळे तुर्कस्तानातील शेती आज प्रगतीपथावर आहे.
पशुसंवर्धन : तुर्कस्तानात ॲनातोलियाच्या अंतर्गत भागात पावसाचे प्रमाण कमी असून जमिनीही बेताच्याच आहेत. त्यामुळे तेथे पिकांच्या ऐवजी कुरणांची वाढ करून पशुपालनाचा व्यवसाय शेतकरी व भटके पशुपालक असे दोघेही करतात. १९७२ मध्ये ३,८८,०६,००० मेंढ्या, १·५ कोटी शेळ्या, ३६,४३,००० अंगोरा शेळ्या, १·३ कोटी गुरे, १७,०१,००० गाढवे, ९,६२,००० घोडे व १०,३०,००० म्हशी होत्या. अंगोरा जातीच्या बकरीपासून मोहेर नावाची रेशमासारखी मऊ लोकर मिळते. बकऱ्यांपासून दूधही मिळते. येथील ‘योगुर्त’ (दही) प्रसिद्ध आहे. कुर्दिश लोकांच्या टोळ्या उन्हाळ्यात डोंगरावरील सकस गवत प्राण्यांना उपलब्ध व्हावे म्हणून स्थलांतर करतात व हिवाळ्यात सखल प्रदेशात परत येतात. डोंगरावरील बर्फ उन्हाळ्यात वितळते असे पाणी जमवून ते चराऊ रानांना देण्याच्या अनेक योजना तुर्की सरकारने आखलेल्या आहेत. १९७० मध्ये ४७,००० टन लोकरीचे व ७,००० टन मोहेरचे उत्पादन झाले.
ग्रामीण उद्योगधंदे : पूर्वेकडील भागात हातमागावर कापड विणणे, घोंगड्या विणणे, बकरीच्या दुधापासून चीज तयार करणे हे कुटिरोद्योग आहेत. इजीअन व भूमध्य समुद्रालगतच्या खेड्यांत रेशमी कापड तयार केले जाते. मध्य, उत्तर व पश्चिमेकडील ग्रामीण विभागात चिरूट व सिगारेट तयार केल्या जातात. पठारी प्रदेशात अंगोरा बकरीच्या लोकरीपासून गरम कपडे तयार करतात.
ग्रामीण उद्योगधंदे संघटीत करणे, त्यांना भांडवल पुरविणे व निर्यातीच्या वस्तू ग्रामीण उद्योग व्यवसायातून तयार करणे तसेच ग्रामीण व्यवसायांना औद्योगिक शक्ती पुरविणे हे प्रश्न तुर्की सरकारला सोडवावयाचे आहेत. निमदुष्काळी प्रदेशात ग्रामीण उद्योगांकडे पूरक व आणीबाणीच्या (नैसर्गिक) काळातील व्यवसाय म्हणून पाहिले जाते.
विविध उद्योगधंदे : तुर्कस्तानमधील उद्योगधंदे अल्पविकसित असून मोठ्या प्रमाणात केंद्रीय झालेले आहेत पण १९४५ नंतर औद्योगिक उत्पादन दुप्पट झाले आहे. काराब्यूक येथे लोह–पोलाद प्रकल्प असून मार्डिन येथे तेलशुद्धीकरण कारखाना आहे. पश्चिम भागात वस्त्रोत्पादन व गालिचे विणण्याचा उद्योग केंद्रित झालेला आहे. चांगला कापूस व अंगोरा लोकर यांचा स्वस्त पुरवठा, जादा लोकसंख्येमुळे स्वस्त मजूरवर्ग उपलब्ध, मोठ्या नगरांच्या केंद्रीकरणामुळे मोठा ग्राहकवर्ग कोळशाचा पुरवठा ही कारणे त्यामागे आहेत. इस्तंबूल, आडाना, इझमिर, इस्पार्ता, गेम्लिक येथे सर्व प्रकारचे वस्त्रोत्पादन होत असून बेर्गामा, काइसेरी ही शहरे गालिच्यांकरिता प्रसिद्ध आहेत. काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर उद्योगधंदे कमी आहेत. येथे पर्यटन, मासेमारी हे व्यवसाय व सिगारेट, गुलाबाचे तेल व इतर सुगंधी पदार्थ तयार करण्याचे कारखाने आहेत. सिनॉप, एरेली, सामसून, ट्रॅबझॉन व बॉर्जा या शहरांत वरील उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण झालेले आढळते. साखर कारखाने व मद्यार्क तयार करणारे कारखाने तेकिर्दा (थ्रेसमध्ये), तूर्हाल, ऊशाक या शहरांत आहेत. इस्तंबूल व इस्पार्ता ही शहरे निरनिराळ्या प्रकारच्या उद्योगधंद्यांसाठी प्रसिद्ध आहेत. तुर्कस्तानात शेतमाल व प्राणिज पदार्थ यांवर आधारित उद्योगधंदे पुष्कळ असून खनिजे व रासायनिक वस्तू यांवर आधारित उद्योग कमी आहेत. अंतर्गत भागात उद्योगधंदे कमी असल्याने ते भाग बरेच अविकसित आहेत. हल्ली तुर्कस्तानला संयुक्त संस्थाने, पश्चिम यूरोपीय देश यांच्याकडून औद्योगिक विकासाला भरपूर मदत होते. तुर्कस्तान, इराण व पाकिस्तान यांचे औद्योगिक विकासाबाबत सहकार्य आहे. उद्योदव्यवसायांचे राष्ट्रीयीकरण करण्याचे तुर्कस्तानचे धोरण बदलले असून खाजगी उद्योगधंद्यांना पूर्वेतील इतर देशांच्या व खुद्द तुर्कस्तानच्या लष्कराला लागणाऱ्या रणसाहित्यामुळे आता औद्योगिकीकरणास सुरुवात झाली आहे. सिमेंट, लोह–पोलाद, वस्त्रोत्पादन, ट्रॅक्टर, काच, कातडे व रबराच्या वस्तू यांच्या उत्पादनात वाढ होत आहे. १९७१ मध्ये निर्मिति उद्योगांत ५,१२,००० बांधकाम १,१४,००० वाहतूक वगैरे ७३,००० खाणी ७९,००० सेवा २,०३,००० अशी कामगारांची संख्या होती.
शक्तिसाधने : कोळसा, तेल व नैसर्गिक वायू ही महत्त्वाची शक्तिदायी खनिजे असून लाकूड, शेण व जलविद्युत यांचाही वापर इंधन म्हणून केला जातो. काळ्या समुद्रालगत एरेली व झाँगूल्डाक येथे बिट्युमेनस कोळशाच्या खाणी आहेत. पश्चिम तुर्कस्तानात लिग्नाइट कोळशाचे साठे सु. एक अब्ज टन असावेत, यूरोपीय तुर्कस्तानात मानिसा, बॉलू व चॉरूम प्रांतातही दगडी कोळसा आढळतो. १९७२ मध्ये ४,६०,००,००० टन कोळसा व ४,७८,००,००० टन लिग्नाइट कोळशाचे उत्पादन झाले.
तुर्कस्तानमध्ये खनिज तेलाचे उत्पादन गरजेच्या फक्त २०% आहे. त्यामुळे उर्वरित ८०% परदेशातून आयात करावी लागते. १९४० साली आग्नेय तुर्कस्तानात रामांदा येथे तेलाच्या उत्पादनास सुरुवात झाली. इझमिर आणि बाटमान येथे तेलशुद्धीकरण कारखाने आहेत. गार्झानजवळच एक नवीन तेलक्षेत्र सापडले आहे. १९७२ साली देशात ३३·८ लाख मे. टन तेल उत्पादन झाले. हल्ली इराणमधून तुर्कस्तानातील भूमध्य समद्रावरील बंदरापर्यंत तेलवाहिनी टाकण्याचे काम चालू आहे. यामुळे तुर्कस्तानला अल्प खर्चात तेल पुरवठा होऊ शकेल.
जलशक्तीच्या विकासाला योग्य अशा पुष्कळ जागा पूर्व व आग्नेय तुर्कस्तानात व टॉरस आणि पाँटस पर्वतांत आहेत. युफ्रेटिस नदीवरचे केबान धरण एक लक्ष किवॉ. क्षमतेची जलशक्ती निर्माण करते. सरीयार (साकार्या नदी) व हिरफेनली (किझिलइर्माक नदी) ही धरणे मोठी असून त्यांपासून दीड लक्ष किवॉ. वीज तयार होऊ शकते. मोठमोठ्या धरणांना योग्य अशा ५० पेक्षा जास्त जागा तुर्कस्तानात उपलब्ध आहेत. सुप्त जलशक्ती ५,६०० कोटी किवॉ. तास असून १९७० मध्ये उत्पादित जलशक्ती ९७८ कोटी किवॉ. तास होती.
लोहखनिज भरपूर प्रमाणात असून तुर्कस्तानच्या औद्योगिकरणास पुरेसे आहे. आशियाई तुर्कस्तानच्या वायव्य भागात साकार्या नदीच्या खोऱ्यात व मध्य ॲनातोलियात डिव्हरीजवळ लोहखनिज सापडते. १९७२ साली १९ लाख मे. टन लोहखनिजाचे उत्पादन झाले.
तुर्कस्तानात क्रोमियमचे साठे पुष्कळच असून नैर्ऋत्य तुर्कस्तानात फेतियेजवळ किनाऱ्यालगत क्रोमियम आहे. त्यामुळे निर्यातीसाठी वाहतूक अल्पखर्चात होई शकते. एर्गानी व दियार्बाकजवळ म्हणजे फिरात नदीच्या वरच्या टप्प्यात व बुर्साच्या दक्षिणेसही क्रोमियमचे मोठे साठे आहेत. १९७२ साली उत्पादन ६,५०,००० मे. टन होते व हा देश पहिल्या चार क्रमांकांतील क्रोमियम उत्पादक आहे.
ईशान्य तुर्कस्तानात बॉर्जाजवळ तांबे सापडत असून एलाझजवळ शिसे व इस्पार्ताजवळ गंधक सापडते. यांशिवाय अँटिमनी व पारा हे धातूही सापडतात. १९७२ साली तांबे १७ हजार टन, गंधक २१ हजार टन व मँगॅनीज १४ हजार टन उत्पादन झाले.
देशाचा २५% भाग जंगलांच्या खाली असून पाँटस व टॉरस पर्वतांवरील जंगले आर्थिक दृष्ट्या उपयोगाची आहेत. बकऱ्या नवीन लावलेल्या झाडांचे अंकूर खातात त्यामुळे वनीकरणात अडचणी निर्माण होतात. देशातील सर्व जंगले प्रत्यक्ष सरकारी नियंत्रणाखाली आहेत.
भूमध्य, इजीअन व काळ्या समुद्रात मासेमारी चालते व त्यासाठी सागरी हद्द १२ नॉट्सपर्यंत आहे. इस्तंबूल, इझमिर ही मासेमारीची केंद्रे असून बॉस्पोरस आणि दार्दानेल्स या सामुद्रधुन्यांतून हिवाळ्यात मासे स्थानांतर करतात त्यामुळे इस्तंबूलच्या जवळ मासेमारी भरपूर प्रमाणात चालते. काळ्या समुद्राच्या पूर्व भागात कॅव्हियर जातीचे मासे सापडतात.
कामगार, कामगार संघटना व कामगार कल्याण : कामगारविषयक सामाजिक कायदेकानून होण्यास तुर्कस्तानात मंद गतीने व उशीरा म्हणजे १९४० नंतर सुरुवात झाली. सरंजामी पद्धतीमुळे दुसऱ्याला मदत करावी या पारंपरिक भूमिकेवर तुर्की कामगार जगत होते. परंतु तुर्कस्तानचे यूरोपीकरण चालू झाले तेव्हा तुर्की कामगारांना संरक्षण मिळाले. १९४५ साली कामगार मंत्रालय स्थापन झाले. आता लहान मुलांच्या व अज्ञानांच्या कामावर नियंत्रण असून अनेक ठिकाणी व्यवसायमार्गदर्शन केंद्रे व औद्योगिक निवाडा केंद्रे आहेत. खाणी कामगारांच्या संघटना आहेत. पाश्चात्त्य देशांतील कामगार संघटनांच्या तुलनेने त्यांचा दर्जा कमी असून अधिकारही फारसे नाहीत. कामगार संघटनांची सभासद संख्या अगदी कमी असून संप करणे हा १९६३ पर्यंत गुन्हा होता. १९७२ मध्ये कामगारांच्या ६६० व मालकांच्या १०९ संघटना होत्या. १९४६ साली विमा व प्रसूतिकालातील रजेबद्दलचा कायदा झाला. तुर्की कामगारांची शिस्त व धीरोदात्तपणा यांमुळे मालक व सरकारी वर्गाकडून कामगार कल्याणाच्या योजना व कायदे केले गेले. १९६१ साली राष्ट्रीय आरोग्य योजना तयार झाली.
व्यापार : तुर्कस्तानचा अंतर्गत व्यापार विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत निर्माण झालेला आढळतो. किनाऱ्यावरील प्रदेशात व विशेषतः पश्चिमेकडील प्रदेशात संपन्न शेती असल्याने व विविध प्रकारची पिके होत असल्याने त्या प्रदेशाकडून ॲनातोलियाच्या पठाराकडे बरेचसे पदार्थ पाठविले जातात. यांत मासळीचाही समावेश असतो. अंतर्गत भागातून सुकी फळे, रसायने, तंबाखू, अंगोरा बकरी व लोकर हे पदार्थ येतात.
दळणवळण : जलद दळणवळणाचा अभाव व साधनांची कमतरता यांमुळे तुर्कस्तानच्या आर्थिक विकासात बरेच अडथळे निर्माण झालेले आढळतात. लोकसंख्येच्या विरळतेमुळे ही दळणवळणाच्या साधनांचा योग्य प्रकारे विकास करता येत नाही व आर्थिक दृष्ट्या ती तोट्यात जातात. पश्चिम किनाऱ्यावर व ॲनातोलियाच्या पठाराच्या मध्यभागात रेल्वे व रस्ते यांचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे. शेतमाल तयार करणारे ग्रामीण विभाग औद्योगिक केंद्रांशी रेल्वेने जोडलेले आहेत. इस्तंबूल, इझमिर, सामसून, आंताल्या व इस्केंदेरून ही किनाऱ्यावरील शहरे इस्पार्ता, अंकारा, कोन्या, काइसेरी, आडाना, एर्झरूम, सिवास या अंतर्गत भागातील शहरांशी जोडलेली आहेत. पूर्व तुर्कस्तानातील कार्स हे गाव रशियातील लेनिनकान शहराशी जोडलेले आहे.
देशात १९२३ पूर्वी लष्करी हालचाली सुकर होण्यासाठी व राजकीय हेतूंनी रेल्वेमार्ग आखण्याचे धोरण होते. आता ही स्थिती थोडी बदलली असली, तरीदेखील ग्रीस सरहद्दीनजीक (जलसीमा) आणि सायप्रस बेटासमोरील किनाऱ्यावर लष्करी हेतूंनीच रेल्वे व रस्त्यांचा विकास केला जात आहे. तीव्र चढउतार व रूक्ष हवामान यांमुळे रेल्वेमार्ग सुव्यवस्थित राखणे कठीण जाते व खर्च वाढतो. डबे, वाघिणी व एंजिनांचा तुटवडा असून असंख्य वळणांमुळे प्रवासाचा वेगही सर्वसाधारण पणे कमी आढळतो. १९७२ साली ८,१३३ किमी. लांबीचे रेल्वेमार्ग देशात होते व ते सरकारी मालकीचे आहेत.
तुर्कस्तानात १९७२ मध्ये ५९·४४८ किमी. रस्ते असून अनेक राजमार्गांची दुरुस्ती आवश्यक आहे. १९७० मध्ये मालाची ४३% व प्रवाशांची ७०% वाहतूक सडकांवरून झाली. ५५% मालाची आणि २८% प्रवाशांची रेल्वेने वाहतूक झाली. हजारो किमी. लांबीची किनारपट्टी असूनही इस्तंबूल, इझमिर, सामसून, इस्केंदेरून, मेर्सिन व ट्रॅबझॉन ही सहा प्रमुख बंदरे आहेत. यांपैकी इस्तंबूल व इझमिर या बंदरांतून तुर्कस्तानचा ८४% व्यापार चालतो. आंताल्या, झाँगूल्डाक, सामसून ही नौदल केंद्रे आहेत. रशियन जलसीमेनजीक काळ्या समुद्रावर व सायप्रस संघर्षामुळे भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर असलेल्या बंदरांचा विकास तुर्कस्तान करीत असल्याने त्याचा किनाऱ्यावरील व्यापारावर व विदेशी व्यापारावर सुपरिणाम होणार आहे. रस्ते व बंदरे यांच्या सुधारणांमुळे मध्यपूर्वेतील देशांत तुर्कस्तानातील रस्ते व रेल्वे सोयी सर्वांत जास्त विकसित ठरल्या.
तुर्कस्तानात सरकारी मालकीची हवाई वाहतूक संघटना असून अंकारा राजधानी इस्तंबूल विमानमार्गाने जगाच्या इतर मोठ्या शहरांशी जोडली आहे. हवाई वाहतूक वर्षभर चालते. दळणवळणाच्या विकासाला लष्करी करारामुळे अमेरिका व इराण यांनी बराच हातभार लावलेला आढळून येतो. ‘तुर्क हवायोल्हारी अनोनिय ओर्ताक्लिगी’ ही तुर्की कंपनी हवाई वाहतूक करते.
देशात १९७४ मध्ये ८,०७,२९४ दूरध्वनी आणि १९७२ मध्ये ३९,३३,७१८ रेडिओ होते. अंकारा व इस्तंबूल येथे नभोवाणी केंद्रे असून अंकारा येथे १९६५ मध्ये दूरचित्रवाणी केंद्र सुरू झाले आहे.
तुर्कस्तानचा विदेशी व्यापार मर्यादित आहे. शेतमालापैकी फारच थोड्या वस्तू निर्यात होतात. उत्तम प्रकारचा तंबाखू, अन्नधान्ये, सुकी फळे, कॅव्हियर मासे, अंगोरा जातीच्या बकऱ्या, घोडे व अंगोरा लोकर, कापूस, क्रोमाइट व रासायनिक पदार्थ यांची निर्यात होते. तुर्कस्तानचा संरक्षण खर्च खूपच असल्यामुळे निर्यातीपेक्षा आयात जास्त आहे. तुर्कस्तान, इराण व पाकिस्तान यांचे प्रादेशिक सहकार्य असल्याने तुर्कस्तानमधील कोळसा, खते व कोळशापासून बनविलेल्या वस्तू आता दोन देशांत निर्यात होतील व त्यामुळे तुर्कस्तानला बरेच परकीय चलन मिळऊन औद्योगिक विकासाला चालना मिळेल. उत्तम प्रकारचा गहू व गव्हाचे बी यांचीही हल्ली मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागलेली आहे. वरील सर्व पदार्थ संयुक्त संस्थाने, जर्मनी (पश्चिम), ग्रेट ब्रिटन, फ्रान्स या देशांत निर्यात केले जातात.
अर्थकारण : तुर्की लिरा हे अधिकृत चलन असून १०० कुरूसचा एक तुर्की लिरा बनतो. ५,१०, २५ व ५० कुरूसची आणि १, २·५ लिरांची नाणी व ५, १०, २०, ५०, १०० आणि ५०० लिरांच्या नोटा असतात. १९७३–७४ च्या अर्थसंकल्पात अपेक्षित जमा ७५,६५,७५,७६,००० लिरा व खर्च ८२,४१,१४,११,००० लिरा होता. कुमुरिव्येत मर्केझ बँकासी ही तुर्कस्तानमधील मध्यवर्ती बँक चलनावर नियंत्रण ठेवते. १९३१ साली मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली. या बँकेव्यतिरिक्त उद्योगधंद्यांना मदत करणाऱ्या इतर १३ मोठ्या बँका तुर्कस्तानात आहेत. १९७० साली तुर्की लिराचे ६६% अवमूल्यन करण्यात आले.
जमिनीवरील कर, उत्पन्न, उत्पादन यांवरील कर, मक्तेदारीवरील जकात व राष्ट्रीय उद्योग यांपासून तुर्की सरकारला उत्पन्न मिळते. संरक्षण, शिक्षण व आर्थिक विकास यांवर प्रामुख्याने खर्च होतो. देशात उत्पादक बाजारपेठ नसल्यामुळे तुर्की सरकारला वार्षिक तूट भरूण काढणे कठीण जाते परंतु अमेरिकन मदतीमुळे जमाखर्चात संतुलन राखणे थोडे सोपे झाले आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधी व यूरोपीय सामायिक बाजारपेठ या आर्थिक संघटनांचा तुर्कस्तान सभासद आहे.
भागवत, अ. वि. कुमठेकर, ज. ब.
लोक व समाजजीवन : सांप्रतच्या रशियातील अरल समुद्राजवळ तुर्की लोकांची प्राचीन वस्ती असावी. तेथून हळूहळू ते पश्चिमेकडे सरकले व अकराव्या शतकात आशिया मायनर येथे सेल्जुक तुर्कांनी वर्चस्व प्रस्थापित केले. मध्य आशियामधून आलेल्या तुर्कांच्या दुसऱ्या टोळीत ओगूझ जमातीचा समावेश होता. त्यांनी तेराव्या शतकात सेल्जुकांची जागा घेतली. पुढे ऑटोमन साम्राज्याचा उदय झाला. सध्याचे तुर्की लोक हे ऑटोमन तुर्कांचे वंशज होते. ते मुख्यतः गौरवर्णी आणि गोल चेहेऱ्याचे असून वांशिक दृष्ट्या बरेच एकजिनसी आहेत. आधुनिक तुर्कस्तानात सु. ९०% लोक तुर्क असून उर्वरित लोकसंख्येत ग्रीक, चरकस, आर्मेनियन आणि अरब यांचा समावेश होतो.
देशातील सु. ६५% लोक ग्रामीण विभागात राहतात. सात शहरांची लोकसंख्या एक लाखांहून अधिक आहे. इस्तंबूल व अंकारा ही दोन सर्वांत अधिक लोकसंख्येची शहरे होत. लोकसंख्या उत्तरेकडे आणि पश्चिम किनाऱ्यावर सर्वाधिक व पूर्वेकडे सर्वांत कमी आहे. देशात एकूण लोकसंख्येच्या ९९% लोक इस्लाम धर्माचे आहेत. ते मुख्यतः सुन्नी पंथीय असून मुसलमानेतरांत ख्रिस्ती व ज्यू यांचा समावेश होतो. लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा असून सु. ७७% लोक शेतीवर, १०% कारखान्यांतून आणि बाकीचे नोकरी करून आपली उपजीविका करतात. मध्ययुगीन तुर्कस्तानात व्यापाऱ्यांच्या स्वतंत्र संघटना होत्या व त्यांच्या खास परंपरा होत्या. आपली व्यापारी गुपिते ते काळजीपूर्वक राखीत असत. अशाच एका आंशिक धर्मनिष्ठ कारागिरांच्या संघटनेला ‘अखी’ म्हणत. औदार्य व बंधुता यांसाठी ती प्रसिद्ध होती. अखी–प्रमुख दररोज सायंकाळी आपल्या अनुयायांना एका सभागृहात भेटत असे व मार्गस्थ पथिकांचेही त्या ठिकाणी आतिथ्य होई. चर्मकार–संघटना ही अखीवादावर आधारित होती. मध्ययुगात मौलविया, बेकताशिया, बैरामिया आणि खलवतिया यांसारखे धार्मिक पंथसुद्धा होते. या सर्वांत ‘डान्सिंग दरवेशीज’ म्हणून यूरोपात ओळखला जाणारा मौलविया पंथ सर्वाधिक प्रसिद्ध होता. आधुनिक काळात मात्र व्यापाऱ्यांच्या संघटना व धार्मिक पंथ लुप्त झाले.
चालीरीती व कौटुंबिक जीवन: तुर्की लोक शौर्य व आतिथ्यशीलता यांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. ते अत्यंत कष्टाळू, समाजशील आणि निरोगी आहेत. केमालपाशाच्या सुधारणावादाचा आधुनिक तुर्की समाजजीवनावर फार मोठा परिणाम झाला. म्हणूनच अबालवृद्ध, स्त्रीपुरुष ‘आपण कठोर परिश्रम व प्रगती केली पाहिजे’, असे आवर्जून म्हणत असतात. पाश्चात्त्य पद्धतीचीच प्रगती आधुनिक समाजाला अभिप्रेत असली, तरी त्यांना आपल्या मुळच्या परंपरेचा विसर पडलेला नाही. लोकनृत्य व लोकसंगीत यांचा ते प्रसन्न मनाने आस्वाद घेताना दिसतात. इस्तंबूल आणि अंकारा यांसारख्या मोठ्या शहरांत उत्सवरजनी साजरी केली जाते. त्या त्या नगराची वैशिष्ट्ये असलेली नृत्ये या समारंभात सादर केली जात असल्याने हे उत्सव–रजनीचे समारंभ ‘एर्झरूम–रजनी’ किंवा ‘चोरूम–रजनी’ म्हणून त्या त्या शहराच्या नावाने सादर केले जातात.
त्याचप्रमाणे द्रुतगतीने झालेल्या पाश्चात्त्यीकरणानंतरही जुने शिष्टाचार नामशेष झाले नाहीत. एखाद्या आजारी माणसाची विचारपूस करताना, स्नानगृहात जाताना, कोणाला कार्यमग्न पाहताना किंवा भोजनप्रसंगी तुर्की लोक शुभेच्छा व्यक्त केल्याशिवाय राहत नाहीत.
प्रजासत्ताकाच्या प्रस्थापनेनंतर आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला दिवाणी विधिसंहितेमुळे गती मिळाली. तीनुसार कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान आहेत. ही दिवाणी संहिता स्विस विधिसंहितेच्या नमुन्यावर तयार केलेली आहे. १९२८ पासून तुर्कस्तानात इस्लाम हा देशाचा अधिकृत धर्म राहिलेला नाही.
१९३४ मध्ये सर्वांना पाश्चात्त्य पद्धतीची आडनावे स्वीकारण्यास शासनाने भाग पाडले. तसेच जुन्या तुर्की टोपीचेही (फेज) उच्चाटन झाले व लोकांनी पाश्चात्त्य पद्धतीची वेशभूषा स्वीकारली. स्त्रियांनी बुरखापद्धतीचा त्याग केला असून १९२६ पासून बहुपत्नीकत्वाची प्रथा कायद्याने बंद करण्यात आली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने मताधिकार व इतर स्वातंत्र्ये बहाल करण्यात आली. विवाह व घटस्फोट यांबाबतीतही तेथे स्त्रियांना पुरुषांइतकेच हक्क आहेत. पहिल्या महायुद्धात (१९१४–१८) स्त्रियादेखील सहभागी झाल्या होत्या. उच्च व मध्यमवर्गीय स्त्रियांनी हळूहळू आपल्या समाजविन्मुख, बंदिस्त, विलासी व परावलंबी जीवनाचा त्याग करून कचेऱ्यांतून व कारखान्यांतून कामे करावयास सुरुवात केली आहे. आधुनिक तुर्की स्त्रिया कुटुंब व समाज यांत सारख्याच मोकळेपणाने वावरतात. एवढेच काय, पण आपला जीवनसाथी निवडण्याचेही स्वातंत्र्य त्यांना आहे. यूरोपीय स्त्रियांप्रमाणे सार्वजनिक नृत्यांतसुद्धा त्या भाग घेतात. विवाहाची कायदेशीर नोंदणी आवश्यक असून विवाहानंतर पतिपत्नी विवाहमुद्रिका धारण करतात. बायकोशी बोलताना तुर्की माणूसदेखील मराठी माणसासारखाच ‘तू’ या प्रीतिदर्शक सर्वनामाचा उपयोग करतो. किमान शहरात तरी गृहकृत्यांत पुरुष स्त्रियांना मदत करतात. घरगुती आहारात पाव प्रमुख असून सर्वत्र तो सहज उपलब्ध होतो. तुर्की लोक जेवणात काट्याचमच्यांचा उपयोग करतात. त्यांच्या आहारात जगप्रसिद्ध तुर्की पुलाव व कबाब यांना प्राधान्य असते. ग्रामीण भागात प्रचलित असलेला खास पद्धतीचा पुलाव ‘बुलगुर पुलाव’ म्हणून ओळखला जात असून तुर्कस्तानातील ‘योगुर्त’ (दही) मशहूर आहे. तुर्कांचे खाद्यपदार्थ बहुतेक ऑलिव्ह तेलामध्ये बनविले जातात. आधुनिकीकरणानंतर मद्यपानाचे प्रमाण तेथे बरेच वाढले असून ‘राकी’ हे त्यांचे राष्ट्रीय पेय आहे.
समाजकल्याण व आरोग्य : तुर्कस्तानात १९२० मध्ये आरोग्य व समाजकल्याण मंत्रालयाची स्थापना करण्यात आली.
विद्यार्थी आणि कामगार यांना निःशुल्क मदत दिली जाते. १९६७ च्या कायद्यानुसार कामाच्या शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या अन्वये वार्षिक पगारी सुट्यांचे अभिवचन देण्यात आले असून सोळा वर्षांखालील मुलांकडून आठ तासांहून अधिक काम करून घेण्याला बंदी आहे. १९४७ पासून कामगार संघटना चळवळही सुरू करण्यात आली आहे. संप व टाळेबंदी यांचे १९६३ च्या कायद्यानुसार नियंत्रण केले जाते. सर्व कामगारवर्ग समाजविमायोजनेत सामील करून घेण्यात आला आहे.
१५ वर्षांच्या कालावधीत संपूर्ण आरोग्यसेवेचे राष्ट्रीयीकरण करण्याचे १९६३ मध्ये ठरविण्यात आले. अंकारा, इस्तंबूल, इझमिर व एर्झरूम या चारही विद्यापीठांत वैद्यकीय विभाग आहेत. साधारणपणे १९६५ पासून पूर्व ॲनातोलियाच्या दहा प्रांतांतील ग्रामीण जनतेला मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. क्षय, मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य रोगांचे प्रमाण बरेच कमी झाले असून, बालमृत्यूच्या प्रमाणातही घट झाली आहे.
तुर्कस्तानात योग्य पात्रता असलेल्यांनाच वैद्यकीचा व्यवसाय करण्याची अनुमती दिली जाते. १९७२ मध्ये तेथे सु. ७९१ रुग्णालयांतून ८०,००० रुग्णशय्या व १६,२८४ डॉक्टर होते. १८७७ साली स्थापन झालेली त्यांची ‘हिलाले अहमद’ ही एक रेडक्रॉसप्रमाणेच रेडक्रेसंट सोसायटी आहे.
भाषा-साहित्य : तुर्की हीच तुर्कस्तानची प्रमुख भाषा असून इस्तंबूलमध्ये बोलली जाणारी तुर्की भाषा प्रमाण मानली जाते. शहरी आणि ग्रामीण भागांत बोलल्या जाणाऱ्या तुर्की भाषेच्या उच्चारात थोडासा फरक जाणवतो. १९२८ पासून तुर्कांनी अरबी लिपीचा त्याग करून लॅटिन लिपी स्वीकारल्यामुळे शिक्षणाचा विकास होण्यास मदत झाली. तुर्कस्तानात तुर्की भाषा बोलणारे लोक एकूण लोकसंख्येच्या सु. ९२% असून इतर भाषिकांमध्ये कुर्दी, अरबी, आर्मेनियन व ग्रीक भाषिकांचा समावेश होतो. तुर्कस्तानव्यतिरिक्त रशिया, चीन, इराण व अफगाणिस्तान या देशांतही तुर्की भाषा बोलणारे लोक आढळतात. तुर्की भाषेत अरबी–फार्सी शब्द व रचना यांचे आधिक्य होते. तथापि १९३२ साली स्थापन झालेल्या तुर्की भाषामंडळाने तुर्की भाषेचे शुद्धीकरण व जुन्या तुर्की शब्दांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच पाश्चिमात्य वाङ्मयाच्या प्रभावामुळे सर्व प्रकारच्या वाङ्मयाची निर्मितीही तुर्कीत होऊ लागली आहे [→ तुर्की भाषा]. तुर्की भाषेतील मध्ययुगीन काळातील बगदादवासी श्रेष्ठ कवी फुजुली याच्या व्यतिरिक्त मध्ययुगात तुर्कस्तानमध्ये बाकी, नेदीम आणि कातिब चेलेबी यांच्यासारखे अनेक विख्यात कवी, व्यासंगी विद्वान व साहित्योपासक होऊन गेले. बाकी व नेदीम यांच्या अत्युच्च कलात्मक काव्यात सोळाव्या शतकातील इस्तंबूलच्या वरिष्ठ वर्गातील सुखी व उत्कर्षपूर्ण जीवनाचा अभिजात आविष्कार आढळतो. कातिब चेलेबी याने आपल्या समृद्ध कश्फुज जुनून ग्रंथाने जागतिक इस्लामी वाङ्मयात मानाचे स्थान मिळविले.
तथापि सर्व दृष्टींनी पाहता, सतरावे व अठरावे शतक म्हणजे सामाजिक, सांस्कृतीक व वाङ्मयीन अधोगती आणि राजकीय अराजक यांचाच काळ म्हणावा लागेल. सतराव्या शतकातील महान तुर्की कवी नेफी याने भारतातील जहांगीर बादशहाकडे मोठ्या आशेन पाहिले असल्याचे त्याच्या काव्यावरून दिसते. स्वदेशाची त्याने भारताशी तुलना केली असून तो अभिमानाने स्वतःला ‘तुर्कस्तानचा फैजी’ म्हणवून घेई. या काळातील कवी पूर्वसूरींप्रमाणेच मुख्यतः फार्सी वाङ्मयाचे अनुकरण करीत.
यूरोपमुळे तुर्कस्तान मृत झाले, असे म्हटले जाते. पण स्वार्थी सत्ताधीश, भ्रष्ट अधिकारी आणि संकुचित मनोवृत्तीचे पंडित हेच तुर्कस्तानच्या सांस्कृतिक अधःपाताला मुख्यतः जबाबदार होते, असे म्हटले जाते. तथापि आतातुर्क केमालपाशा याने केलेल्या क्रांतीमुळे जीवनाच्या इतर अंगांप्रमाणे तुर्की साहित्यही सर्व दृष्टींनी समृद्ध होऊ लागले [→ तुर्की साहित्य].
शिक्षण : मध्ययुगीन काळापासूनच तुर्कस्तानात ‘मेदरेसे’ नावाने संबोधिल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्था होत्या. परंतु पहिल्या अब्दुल मजीदच्या (१८३९–६१) राजवटीत परराष्ट्रमंत्री मुस्ताफा रशिद यांनी ‘तंझिमत’ नावाची एक सुधारणायोजना सादर करून शैक्षणिक व मुलकी क्षेत्रांत सुधारणांची एक श्रेणी निर्माण केली. धर्मजातिनिरपेक्ष समता सर्व ऑटोमन प्रजेला बहाल करण्यात आली. अब्दुल अझीझच्या कारकीर्दीत (१८६१–७६) फ्रेंच धर्तीवर लोकशिक्षणाची सोय होती. तथापि शिक्षणाच्या बाबतीत तरुण तुर्कांची बंडखोर संघटना संतुष्ट नव्हती. त्यानंतर १९२६ मध्ये मुस्ताफा केमाल याच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या प्रजासत्ताकात सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगतीच्या नवयुगास प्रारंभ झाला.
१९२८ मध्ये लॅटिन मूळाक्षरांनी अरबी मूळाक्षरांची जागा घेतली व १९२९ पासून अरबी मूळाक्षरांत पुस्तके छापण्यास बंदी घालण्यात आली. १९३२ साली नव्या शासनातर्फे छोट्या प्रमाणावर स्थापन झालेल्या व कालांतराने संख्येने क्रमशः वाढत गेलेल्या लोकसदनांनी सांस्कृतिक व शैक्षणिक प्रबोधनाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. अशा लोकसदनांमधून १९४४ पर्यंत सु. २ लक्ष प्रौढ नागरिकांना नवी लिपी शिकविण्यात आली. १९२७ मध्ये १०·६% असलेले साक्षरतेचे प्रमाण १९७० मध्ये ४९ टक्क्यांपर्यंत वाढले.
तुर्कस्तानात शासनाने शिक्षणाला प्राधान्य दिले असून १९४७ मध्ये ८ कोटी लिरा, तर १९५४ मध्ये जवळजवळ २६·३ कोटी लिरा शासनाने शिक्षणावर खर्च केले. शिक्षण मोफत असून ७ ते १२ वर्षे वयापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक असे शाळांचे प्रकार असून ग्रामीण भागातील मुलांना धंदे-शिक्षण देणाऱ्या संस्थाही आहेत. ४०० हून कमी लोकवस्तीच्या सु. चाळीस हजारांहून अधिक खेड्यांना प्रशिक्षित शिक्षक अल्पावधीत पुरविणे अशक्यप्राय असल्यामुळे तेथील शिक्षणमंत्रालयाने कृषकांसाठी ते शिक्षक होऊ शकतील अशा प्रकारची एक योजना अंमलात आणली. या अभ्यासक्रमासाठी स्वतःची जमीन असलेल्या, लष्करी सेवा पार पाडलेल्या व थोडेबहुत शिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. हा अभ्यासक्रम योग्य त्या शेतावर पार पाडला जाई. एका शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या दहादहांच्या गटांना रोज सकाळी सांस्कृतिक व तात्त्विक शिक्षण दिले जाई आणि दुपारचा वेळ प्रात्यक्षिके, शेतीची कामे व हस्तोद्योग यांत घालविता येई. जे शेतकरी अभ्यासक्रमाच्या शेवटी यशस्वी रीत्या उत्तीर्ण होतील, त्यांना प्रशिक्षक म्हणून बहुधा त्यांच्या खेड्यातच नेमले जाई. या दिशेने १९३६ मध्ये झालेल्या यशस्वी आणि सफल प्रयोगामुळे या योजनेला विलक्षण गती मिळाली. प्रौढांसाठी सायंकालीन वर्गही भरविले जात व त्यांत राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समस्यांवर चर्चा करण्यात येई. १९७२-७३ मध्ये देशातील ४०,००५ प्राथमिक शाळांतून ५२,४४,००० विद्यार्थी व १,५५,२९९ शिक्षक होते. तसेच २,०४० मिड्ल स्कूल्समधून ९,३०,००० विद्यार्थी व २५,५७२ शिक्षक ६०७ ‘लायसी’ विद्यालयांतून २,९३,००० विद्यार्थी व १२,३६४ शिक्षक ९६८ व्यावसायिक व तंत्रशाळांतून २,६६,००० विद्यार्थी व १५,८१३ शिक्षक व विद्यापीठांसह १५८ उच्च शिक्षणसंस्थांतून १,६९,८९३ विद्यार्थी व ११,१७० शिक्षक होते.
उच्च माध्यमिक स्तरांवर इंग्रजी, फ्रेंच व जर्मन यांपैकी एक परकीय भाषा आवश्यक आहे. उच्च माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या पुष्कळ शाळा तेथे आहेत. ‘गाझी पेडागॉगिक’ संस्था १९२६ मध्ये स्थापन करण्यात आली. स्त्रियांसाठी एक प्रशिक्षण देणारे महाविद्यालय अंकारा येथे १९३४-३५ मध्ये स्थापण्यात आले. तुर्कस्तानमधील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची व व्यावसायिक शाळांची स्थापना व कारभार शासनाकडूनच केला जातो.
तुर्कस्तानात इस्तंबूल येथे तीन, अंकारा येथे तीन, इझमिर येथे एक व ट्रॅबझान येथे एक अशी विद्यापीठे आहेत. संपूर्ण मध्यपूर्वेची शिक्षणविषयक गरज भागविण्याकरिता अंकारा येथे एक मध्यपूर्व तंत्रविज्ञान विद्यापीठ आहे. अंकारा विद्यापीठात प्राच्यविद्यांचा एक संपूर्ण विभाग आहे.
शासनाने देशी भाषेच्या समृद्धीसाठी ग्रीक व संस्कृतसारख्या अभिजात भाषांतील साहित्याचा अनुवाद करण्याची व्यवस्था केली आहे. तुर्की इतिहास मंडळ, तुर्की भाषा मंडळ, तुर्की लोकसाहित्य मंडळ यांसारख्या विद्वत्सभा भाषाविषयक व ऐतिहासिक महत्त्व असलेली जुनी मूल्यवान हस्तलिखिते प्रसिद्ध करीत असतात.
ग्रंथालये आणि वस्तुसंग्रहालये : ऑटोमन काळातील ग्रंथसंग्रहाचा वारसा आधुनिक तुर्कस्तानला मिळाला. त्यांत प्रामुख्याने ‘बेयझीद’, ‘फातेह’, ‘सुलैमानिया’, ‘सेंट सोफिया’, ‘तोप्कपीसराय’ ही ग्रंथसंग्रहस्थाने आज आधुनिक ग्रंथालयस्वरूपात जनतेला उपलब्ध झाली आहेत. प्राचीन राजांच्या दप्तरांचा फार मोठा खजिना प्रधानमंत्र्यांच्या पुराणवस्तुसंग्रहालयात सुरक्षित ठेवला आहे.
तुर्कस्तानला म्हणूनच ग्रंथालयांचा देश म्हटले असता वावगे होणार नाही. कारण जवळजवळ प्रत्येक शहरात ग्रंथालयसंचालनालयाच्या देखरेखीखाली ग्रंथालये असून त्यांत दुर्मिळ अरबी व फार्सी हस्तलिखिते ठेवली आहेत. शासनाने अंकारा येथे एक राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले असून तेथे आधुनिक प्रकाशने व वृत्तपत्रे जतन केली जातात.
तुर्कस्तान हा वस्तुसंग्रहालयांकरिताही विख्यात आहे. हिटाइट, बायझंटिन, सेल्जुकी आणि ऑटोमनसारख्या अनेक राजवटी तेथे होऊन गेल्याने त्या त्या काळातील कितीतरी भव्य स्मारके व अवशेष आजही तेथे दिसतात. ५३७ मध्ये कॉन्स्टँटिनोपल येथे बांधलेल्या ‘सेंट सोफिया चर्च’ चे १४५३ मध्ये मशिदीत व पुढे १९३४ मध्ये वस्तुसंग्रहालयात रूपांतर करण्यात आले. तेथील आंतरसजावट बायझंटिन चित्रकलेचा उत्कृष्ट नमुना होय.
इस्तंबूल या एकाच शहरात ‘तोप्कपीसराय’ सारखी काही वस्तुसंग्रहालये असून त्यांत अनेक ऐतिहासिक स्मृतिचिन्हे जपून ठेवलेली आहेत. पर्गमॉन येथील उत्खननात सापडलेले अनेक ऐतिहासिक अवशेष तेथे आढळतात. तुर्कस्तानातील अशी स्मारके व वस्तुसंग्रहालये अनेक प्रवाशांची आकर्षणस्थाने आहेत.
वृत्तपत्रे : अठराव्या शतकाच्या अखेरीस तुर्कस्तानात मुद्रणालये स्थापन झाली. १८३१ मध्ये प्रकाशित झालेले तक्विमे वकाये हे तुर्कस्तानातील प्रारंभीचे वृत्तपत्र होय. प्रजासत्ताकाच्या निर्मितीनंतर आधुनिक पद्धतीची उलूस, जुम् हुर्रियत, झफर यांसारखी राजकीय वृत्तपत्रे प्रकाशित होऊ लागली. फोरम, यॉन आणि सोस्यल अदालत ही तीन नियतकालिके १९६० नंतर राजकीय नियतकालिके म्हणून नावारूपाला आली. राजकारणाशी संबंधित नसलेले हुर्रियत हे अतिशय लोकप्रिय वृत्तपत्र असून वाङ्मयीन नियतकालिकांमध्ये वार्लिक, यदितेपे आणि तुर्क दिली ही महत्त्वपूर्ण मानली जातात. तुर्कीत प्रसिद्ध होणाऱ्या ४४३ दैनिकांपैकी ५५ इस्तंबूलमध्ये आणि २ अंकारामध्ये प्रकाशित होतात. ग्रीकमध्ये २ फ्रेंचमध्ये १, आर्मेनियनमध्ये २ आणि इंग्लिशमध्ये १ दैनिके निघतात.
त्याचप्रमाणे अंकारा विद्यापीठातील भाषा, इतिहास व भूगोल विभागाचे, इस्तंबून विद्यापीठातील वाङ्मयविभागाचे व तुर्की इतिहास मंडळाचे बेलेतन इ. नियतकालिके प्रसिद्ध आहेत.
कला–क्रीडा : चौदाव्या शतकात ऑटोमन साम्राज्याच्या उदयाबरोबर इस्लामी–तुर्की संस्कृतीचे एक नवे युग सुरू झाले. दुसऱ्या मुहंमदाने कॉन्स्टँटिनोपल जिंकल्यानंतर (१४५३) तसेच ‘मॅग्निफिसेंट सुलेमान’ च्या कारकीर्दीतील कुशल राज्यव्यवस्थेमुळे तुर्कस्तानाला कलाप्रांतातही गौरवपद प्राप्त झाले. सुसंवादी वास्तुशिल्पीय रचनांबद्दल प्रसिद्ध असलेला शिल्पकार सिनान याने योजिलेल्या सुलेमानी मशिदीच्या शिल्पात आजही हा गौरव प्रतिबिंबित झालेला दिसतो. ज्यांना शाळा जोडण्यात आल्या अशा कितीतरी मशिदींचेही बांधकाम करण्यात आले. अनेकविध कारवान सराया, जलकेंद्रे, दवाखाने आणि सार्वजनिक स्नानगृहेदेखील उभारण्यात आली. इस्तंबूल आणि बुर्सा येथे ऑटोमन साम्राज्याचे आणखी एक वैशिष्ट्य असलेल्या आच्छादित बाजारपेठा निर्माण करण्यात आल्या. सुलेखनकला, चिनी मातीची भांडी आणि गालिचे यांची निर्मिती इ. उद्योगदेखील भरभराटीस आले. निळ्या व हिरव्या रंगांच्या फरशा बनविण्याचे प्रमुख केंद्र इझनिक हे होते. तुर्की वस्त्रोद्योग व भरतकाम नमुनेदार असून व्हेनिसचे कलाकार त्याचे अनुकरण करीत. ऊशाक व कूला येथील रग प्रसिद्ध होते. त्यांची निर्यात सिमिर्ना बंदरातून यूरोपला होत असल्यामुळे त्यांना ‘सिमिर्ना रग्ज’ असे म्हणत. सतराव्या शतकापर्यंत संपूर्ण तुर्कस्तानचेच नव्हे, तर पूर्व यूरोप खंडाचेही बुर्सा हे रेशीम व इतर पदार्थांचे मुख्य व्यापारी केंद्र होते. १५०२ मध्ये बुर्सा येथे हजारांहून अधिक रेशीम माग होते. भारतीय व्यापारी तेथे मसाले आणि सुगंधी द्रव्ये आणीत. त्यांची लोकप्रियता एवढी विलक्षण होती, की एका तुर्की कवीने वसंत ऋतुला भारतीय व्यापाऱ्याची उपमा दिली. ‘बाहरात’ हा तुर्की भाषेतील मसाल्याचा समानार्थक शब्द कदाचित भारताशी संबंधित असावा.
तुर्कस्तानात स्थापत्य, शिल्प व हस्तोद्योग यांखेरीज चित्रकलाही मध्ययुगीन काळात राजाश्रयाने संपन्न झाली. तथापि ही कला सुलेखन व विशेषतः लघुचित्रण यांपुरतीच मर्यादित होती. लेवणीने लघुचित्रकलेमध्ये विशेष प्राविण्य मिळविले. तसेच शाह कुली व वलीजान यांनी विशेषतः स्वर्गातील पऱ्यांवर आधारित चित्राकृतीमध्ये नैपुण्य मिळविले. काही चित्रकारांनी प्रसिद्ध पुस्तकांतील प्रसंगांवर आधारित चित्रे रेखाटली. विसाव्या शतकात शासनाने इस्तंबूल येथे एक कला–अकादमी व अंकारा येथे कलाशिक्षण–प्रशिक्षण संस्था स्थापन केली आहे.
संगीतकलेच्या बाबतीत ‘कोपुझ’ हे त्यांचे वाद्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. फार पूर्वी अल् फाराबी या तुर्की संगीतज्ञ तत्त्वज्ञाने संगीतावर ग्रंथलेखन केले आहे. इतरी हा प्रसिद्ध संगीतज्ञ सतराव्या शतकात विशेष प्रभावी ठरला.
आधुनिक तुर्कस्तानमध्येही संगीतावर विशेष भर देण्यात आला आहे. देशात व परदेशात परकीयांशी आलेल्या संपर्काचा व लष्करी बँडवरील संगीताचा परिणाम म्हणून प्रथमच पाश्चिमात्य संगीतही तेथे प्रचारात आले. पुढे तुर्की संगीतज्ञ पाश्चात्त्य संगीतावर आधारित स्वररचना करू लागले पण तरीही तुर्की संगीताचे स्फूर्तिस्थान लोकगीतेच राहिले.
अंकारा येथील राष्ट्रपती–वाद्यवृंद प्रसिद्ध असून अहमद अदनान सैगुन व उलवी जमाल एरकिन यांनी पाश्चात्त्य धर्तीच्या संगीतात विशेष प्राविण्य मिळविले आहे. संगीत प्रशिक्षणाचे एक केंद्र अंकारा व दुसरे इस्तंबूल येथे आहे. अंकारा येथे शासनातर्फे आणि इस्तंबूल येथे नगरपालिकेतर्फे ऑपेरा सादर करणाऱ्या संस्था आहेत.
तुर्कांमध्ये प्राचीन काळापासून ‘करागोझ’ म्हणून ओळखले जाणारे छायानाट्य आणि ‘ओरता ओयुनु’ म्हणून माहित असलेले खुले रंगमंदिर अस्तित्वात असलेली दिसतात. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पाश्चात्त्य धर्तीची रंगमंदिरे आर्मेनियनांच्या सहकार्याने उभारण्यात आली. प्रजासत्ताकाच्या काळात एक नगरपालिका रंगमंदिर इस्तंबूल येथे व एक राज्य नाट्यगृह अंकारा येथे बांधण्यात आले. १९३० साली तुर्क तियास रोसु नावाचे नाट्यकलाविषयक पाक्षिक सुरू करण्यात आले. नामिक केमाल आणि इतर नाटककारांची नाटके सुरुवातीला राष्ट्रीय जागृतीकरता सादर करण्यात आली. आज मात्र सर्व प्रकारचे नाट्यवाङ्मय निर्माण होत असून ते प्रयोगरूपाने दाखविले जाते. हलदुम तानेर व रेफीक एन्दुरन हे आजचे प्रसिद्ध नाटककार होत. १९४५ नंतर नाट्यक्षेत्रातील नव्या चळवळींना गती मिळाली आणि ‘यिलदिज केनतर’ यासारख्या खाजगी नाट्यसंस्था पुढे आल्या.
अश्वारोहण व कुस्ती या मैदानी खेळांचे तुर्की लोकांना पहिल्या पासून विशेष वेड आहे. कुस्ती हा त्यांचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. जुन्या पद्धतीप्रमाणे सर्वांगाला तेलमर्दन करून त्यानंतर खेळावयाच्या कुस्तीचा एक प्रकार तुर्कस्तानातील किर्कपिनार येथे आजही पहावयास मिळतो. तसेच मुक्त (फ्री स्टाईल) कुस्तीच्या जागतिक स्पर्धांतही ते भाग घेत असतात. आधुनिक खेळांत फुटबॉल व व्हॉलीबॉल हे त्यांचे आवडते खेळ आहेत. १९ मे हा युवकांचा क्रीडादिन असून त्या दिवशी ते त्यांच्या राष्ट्रीय खेळांचे प्रदर्शन करतात.
नईमुद्दीन, सैय्यद
महत्त्वाची स्थळे : भारताप्रमाणे तुर्कस्तान हा इतिहासप्रसिद्ध देश आहे. पश्चिम व दक्षिण तुर्कस्तानात अनेक इतिहासप्रसिद्ध शहरे आहेत. यांपैकी बरीच अलेक्झांडर बादशाहच्या वेळेपासून प्रसिद्ध आहेत. इस्तंबूल येथील गोल्डन हॉर्न, इझमिर (स्मर्ना) ही शहरे पुरातन व इतिहास प्रसिद्ध आहेत. यूरोप–अमेरिकेतून, जपान–ऑस्ट्रेलियातून जा–ये करणारे पर्यटक इस्तंबूल येथे थांबतातच तसेच भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर हिवाळ्यात अनेक पर्यटक येतात. लष्करी करारात तुर्कस्तान अमेरिकेच्या बाजूने असल्याने अनेक बडे लष्करी व मुलकी अधिकारी, अरब देशातील पर्यटक व व्यापारी यांची उठबस हल्ली पर्यटन केंद्राकडे वाढलेली आहे. इस्तंबूल, इझमिर येथे वस्तुसंग्रहालये असून ऑटोमन साम्राज्याचे अवशेषही आहेत. इस्तंबूल येथे टोकापी ही प्राचीन इमारत असून आज त्यात मौलिक चित्र व कलाकृती संग्रह आहे. जवळच सेंट सोफिया म्युझीयम, बायझंटिन चर्च व ब्लू मॉस्क ही प्रेक्षणीय मशीद आहे. ग्रीक कलेचाही चांगला संग्रह येथे आहे. इजीअनच्या किनाऱ्यावर अनेक प्राचीन शहरांचे अवशेष आहेत. त्यांत इफेसस, पेरगामम, इलियम हलिकार्नास इ. प्रसिद्ध आहेत, त्यांस बरेच प्रवासी भेटी देतात. १९७२ साली नऊ लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी देशास भेट दिली. ही दोन्ही शहरे सांस्कृतिक केंद्रे आहेत.
अंकारा ही तुर्कस्तानची नवीन राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे शहर असून लोकसंख्या १२, ०८,७९१ (१९७०) आहे. पूर्वी इस्तंबूल ही राजधानी होती. परंतु ॲनातोलियाच्या पठारावरील साधारण मध्यवर्ती शहर व तुर्कस्तानच्या शंत्रूपासून व किनाऱ्यापासून दूरचे शहर म्हणून अंकाराची निवड करण्यात आली. अंकारातील बागा, सरकारी इमारती प्रेक्षणीय आहेत. इस्तंबूल हे शहर बहुढंगी आहे. या शहराची लोकसंख्या २३,१२,७५१ (१९७०) आहे. देशाचा ७०% व्यापार येथून चालतो. इझमिर ७,५३,४४३, आडाना ३,४७,४५४ व बुर्सा २,७५,९५३ (१९७०) ही महत्त्वाची शहरे आहेत. पर्यटन उद्योग वाढला असून १९७२ मध्ये ९० लक्ष पर्यटकांनी तुर्कस्तानला भेट दिली.
संपूर्ण अरब जगात तुर्कस्तान हा देश लोकसंख्येने मोठा असून निसर्गाची विविधता तेथे आढळून येते. देशाचे भौगोलिक स्थान मोक्याचे असल्याने अरब जगतात तुर्कस्तान मानाचे स्थान आहे. तुर्कस्तानातील नैसर्गिक साधनसामग्री मर्यादित असली, तरी सद्यस्थितीला पुरेशी आहे. तुर्कस्तानातील लोक प्रगतिशील असून शिस्तप्रिय व उद्योगी आहेत.
सोव्हिएट रशियाने १९५३ सालीच तुर्की प्रदेशावरील हक्क सोडल्याने तुर्कस्तानची रशियबद्दलची भीती कमी झाली. परंतु ग्रीसबरोबरचे झगडे मात्र सायप्रस बेटामुळे चिघळले. तुर्की बहुमताचा सायप्रसचा आर्थिक महत्त्वाचा भाग तुर्कांनी १९७५ साली ताब्यात घेतल्याने ग्रीसबरोबरचे संबंध खूपच बिघडले. भरीस भर म्हणून इजीअन समुद्राखालील खनिज संपत्तीचा शोध घेण्याचे काम विशेषतः खनिज तेलासाठी दोघांनी चालू केल्याने त्या महत्त्वाच्या जलसीमेवरून ग्रीस व तुर्कस्तान यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही देश नाटो लष्करी संघटनेचे सभासद असल्याने अमेरिका व पाश्चात्त्य देश यांची काहीशी पंचाइतच झाली आहे परंतु तुर्कस्तान बलाढ्य असल्याने त्याकडे झुकते माप आहे. वरील कारणामुळे अमेरिकेकडून लष्करी मदत मिळूनही तुर्कस्तानला लष्करावर एकूण मिळकतीच्या ४०% खर्च करावा लागतो. त्यावरून व एकंदर तुर्की सरकारच्या धोरणावरून रशियाच्या भीतीपेक्षा ग्रीस विरुद्ध लष्करी प्राबल्य रहावे म्हणूनच तुर्कस्तान लष्करी गटात सामील झाला आहे असे वाटते. प्रादेशिक सहकारामुळे पाकिस्तान व इराणलाच तुर्कस्तानचा फायदा जास्त होणार आहे.
भागवत, अ. वि. कुमठेकर, ज. ब.
संदर्भ : 1. Ali Riza, Turkey, London, 1963.
2. Inalcik, H. The Ottoman Empire, New York, 1973.
3. Karpat, K. H. Turkey’s Politics, Princeton, 1959.
4. Lane-Poole, S. Turkey, London, 1908.
5. Lewis, G. L. Turkey, London, 1965.
“