क्वीबिशेव्ह : सोव्हिएट रशियाच्या क्वीबिशेव्ह विभागाची राजधानी. लोकसंख्या १०,९४,००० ( १९७२). हे व्होल्गा व समारा नद्यांच्या संगमावर मॉस्कोच्या आग्नेयीस ८५० किमी. वर वसले आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये या शहरात काही काळ रशियाची राजधानी होती. हे मध्य व्होल्गा प्रदेशाचे सांस्कृतिक केंद्र समजण्यात येते. येथे विद्यापीठ, उच्च शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या अनेक संस्था आहेत. जलमार्ग, लोहमार्ग, सडका, विमानतळ यांच्या उत्तम सोयी असलेले हे शहर लाकूड, अन्नधान्ये आणि जनावरे यांच्या व्यापाराकरिता पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. कृषियंत्रे, काटेकोर व अवजड यंत्रसामाग्री, यंत्रोपकरणे, विजेचे साहित्य व उपकरणे, आगगाड्या, विमाने, ट्रॅक्टर आणि त्यांचे सुटे भाग, मद्य, मांस, कातडी, दुग्धपदार्थ, दळणे, जहाज बांधणी, बॉलबेअरिंग, पादत्राणे, कपडे, लाकूडकाम वगैरे उद्योगधंदे येथे आहेत. क्वीबिशेव्ह द्वितीय बाकू तेलक्षेत्रात असल्यामुळे तेलशुद्धीकरण, त्याची यंत्रे, तेलनळ यांचे कारखाने येथे आहेत व त्या अनुषंगाने भोवती इतर औद्योगिक शहरे उदयास आली आहेत. जवळच व्होल्गावरील प्रचंड बंधारा व तेथे उत्पादन होणारी वीज उद्योगधंद्यांस साहाय्यक आहेत. १५८६ मध्ये समारा नावाने लष्करी ठाणे म्हणून स्थापन झालेले हे शहर, सायबीरिया व मध्य आशियात जाणारे लोहमार्ग तयार झाल्यावर आणि दुसऱ्या महायुद्धानंतर वेगाने वाढले आहे. १९३५ मध्ये क्वीबिशेव्ह या बोल्शेव्हिक देशभक्ताचे नाव त्याला देण्यात आले.

 लिमये, दि. ह.