तीळ-१ : (हावरी हिं. जिंजली, जिंजिली, तील गु. तल पं. तिली क. एळ्‌ळु सं. तिल, तिलक इं. सिसॅम, जिंजेली लॅ. सिसॅमम इंडिकम, सि. ओरिएंटेल कुल–पेडॅलिएसी). सु. एक मी. उंच व सरळ वाढणाऱ्या ह्या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) व फांद्या असलेल्या केसाळ ⇨ ओषधीचे मूलस्थान आफ्रिका असून फार प्राचीन काळी तेथून भारतात स्थलांतर करून आलेल्या मनुष्यांनी ती आणली असावी. सिंधूच्या खोऱ्यातील प्राचीन संस्कृतीत ती लागवडीत असावी, असे हडप्पाच्या उत्खननात (इ. स. पू. ३६००–१७५०) सापडलेल्या जळक्या तिळाच्या दाण्यांवरून दिसून येते. आशिया व आफ्रिका या खंडांतील प्राचीन काळातील तिळाच्या लागवडीमुळे तिचे मूलस्थान विवाद्य आहे. आफ्रिकेतील ॲबिसिनिया हे तिळाच्या रानटी पूर्वजांचे प्राथमिक उगमस्थान असावे आणि मध्य भारत, आसाम व ब्रह्मदेश येथे लागवडीतील जातींचा उगम झाला असावा, असे काही तज्ञ मानतात तसेच चीनमधील मध्य व पूर्वेकडील डोंगराळ प्रदेश हा लागवडीतील जातींचे दुय्यम मूलस्थान असावे. तेथील प्रमुख प्रकार खुजे आहेत. यांशिवाय आणखी दोन प्रमुख उगमस्थाने आहेत : यांपैकी एक पंजाब, काश्मीर, पाकिस्तान व अफगाणिस्तान असून दुसरे इराण व तुर्कस्तान हे आशिया मायनरमधील प्रदेश आहेत. येथे तिळाची दुसरी उपजाती (सि. बायकार्पेलेटम) मुख्यतः लागवडीत आहे. या दोन प्रकारच्या (प्राथमिक व दुय्यम) उगमस्थानांतून तिळाची वाटचाल दोन मार्गांनी झाली : पूर्वेकडे चीन व इंडोचायना यांमधून जपानकडे आणि पश्चिमेकडे भूमध्यसामुद्रिक प्रदेशाकडे. भारतातील लागवडीत असलेल्या सर्वांत प्राचीन धान्यांपैकी तीळ हे एक असून तैत्तिरीय व शोनक संहितांच्या काळापासून त्याचा उल्लेख आढळतो. ‘होमधान्य’ आणि ‘पितृतर्पण’ असाही त्याचा उल्लेख आहे. भारतातील अनेक भाषांतील तिळाची नावे ‘तिल’ या संस्कृत नावाशी संबंधित दिसतात. तैल (तेल) हा संस्कृत शब्द ‘तिल’ या शब्दावरून रूढ झाला. हिंदू लोक अद्याप अनेक धार्मिक विधींत तीळ वापरतात. संक्रांतीच्या दिवशी ‘तिळगूळ’ परस्परांना देऊन शुभेच्छा प्रकट करतात या सर्व गोष्टी विचारात घेतल्यास तिल (तीळ) ही ओषधी भारतीय असावी, असा ग्रह होतो. ठाणे व कुलाबा जिल्ह्यांत रान तीळाची झाडे आढळतात. सि. लॅसिनेटम ही जाती माळरानात तणाप्रमाणे वाढलेली आढळते ती जमिनीवर पसरत वाढते. भारतात सिसॅमम वंशातील एकूण सहा जाती आढळतात. सि. इंडिकम या जातीतील शरीर कोशिकांत (पेशींत) २६ रंगसुत्रे (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक) असतात, तर सि. लॅसिनेटममध्ये ती ३२ असतात. तिळाची लागवड कारवार व कोकणाखेरीज भारतात सर्वत्र (१,२०० मी. उंचीपर्यंतच्या भागात) आणि पाकिस्तान, बलुचिस्तान व वझीरीस्तान येथेही करतात.

तीळः (१) फुलांसह फांदी, (२) उघडलेला पुष्पमुकुट, (३) किंजमंडल, (४) तडकलेले फळ, (५) बीज (तीळ).तिळाच्या झाडाला साधी, मोठी (७·५–१२·५ सेंमी.) समोरासमोर, पातळ, साधारण केसाळ पाने असून जमिनीजवळ थोडीफार विभागलेली (खंडित) व दातेरी आणि खोडाच्या वरच्या भागात लांबट असतात. सर्व वनस्पतीवरचे केस प्रपिंडयुक्त (चिकट पदार्थ बाहेर टाकणाऱ्या ग्रंथी असलेले) असतात. पानांच्या बगलेत मंजरीवर किंवा एकेकटी, उग्र वासाची, पांढरी गुलाबी फुले असतात. पुष्पमुकुट द्व्‌योष्ठक (दोन ओठांसारखा) असून त्यावर पिवळ्या खुणा असतात. बोंड (फळ) लांबट गोल, उभे, २·५ सेंमी. लांब व चौकोनी असून वरून खाली अर्ध्यापर्यंत तडकत येते. बिया (तीळ) लहान (२·५–३ X १·५ मीमी.), चपट्या, काळ्या तपकिरी, पिंगट किंवा पांढऱ्या असतात. जितका रंग फिकट तितके त्यांतील तेल अधिक व स्वच्छ असते, असा अनुभव आहे. इतर सामान्य शारीरिक लक्षणे तिल कुलात [→ पॅडॅलिएसी] वर्णिल्याप्रमाणे असतात.

लागवडीचे क्षेत्र : अन्न आणि शेती संघटनेच्या १९७० च्या अहवालाप्रमाणे त्या वर्षी तिळाचे जगातील एकूण क्षेत्र ५७·१ लाख हेक्टर व उत्पादन १८·६६ लाख टन होते. भारतात या पिकाखाली सर्वांत जास्त (४२·०३%) क्षेत्र होते आणि उत्पादनातही त्याचा प्रथम क्रमांक होता (२३·६%). भारताखेरीज चीन, सूदान, मेक्सिको व ब्रह्मदेश हे तिळाचे उत्पादन करणारे मोठे देश आहेत. त्यांखालोखाल व्हेनेझुएला, युगांडा, नायजेरिया, पाकिस्तान व तुर्कस्तान या देशांतही या पिकाची कमीजास्त प्रमाणात लागवड होते.

वास्तविक तेलबियांखालील जगातील सर्व पिकांमध्ये एकूण क्षेत्र व उत्पादन या दोन्ही बाबतींत तिळाचा सहावा क्रमांक आहे. एकूण तेलबियांच्या क्षेत्रांपैकी ५·६% क्षेत्र आणि २·७% उत्पादन तिळाचे आहे. असे असले तरी तीळ पिकविणाऱ्या देशांत ते महत्त्वाचे पीक आहे याचे मुख्य कारण त्याचे टिकाऊ आणि श्रेष्ठ प्रतीचे तेल हे होय. भारतातही त्याचा भुईमूग आणि मोहरीनंतर तिसरा क्रमांक आहे.

भारतात १९७२–७३ साली २२·३१ लाख हेक्टरमध्ये तिळाची लागवड होती. त्यापैकी सर्वांत जास्त (६·६८ लाख हेक्टर) क्षेत्र उत्तर प्रदेशात होते. त्याखालोखाल पुढील सहा राज्यांत १ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र होते. राजस्थान (४·५४), मध्यप्रदेश (३·१), आंध्र प्रदेश (२·०१), तमिळनाडू (१·३६), महाराष्ट्र (१·२२) आणि गुजरात (१·०५) तसेच ओरिसात ८१,००० हे. आणि कर्नाटकात ६३,००० हे. क्षेत्र होते. महाराष्ट्रात या पिकाखालील एकूण क्षेत्रापैकी सु. ६९% क्षेत्र नागपूर विभागात, २०% मराठवाडा विभागात व १०% मुंबई विभागात (मुख्यतः धुळे आणि जळगाव जिल्ह्यात) आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा या बाबतीत राज्यात प्रथम क्रमांक लागतो. राज्यातील एकूण क्षेत्रापैकी सु. ३०% क्षेत्र या एकाच जिल्ह्यात आहे. नागपूर, नांदेड, यवतमाळ, उस्मानाबाद, धुळे, परभणी, अमरावती, वर्धा, जळगाव, सोलापूर आणि अकोला हे उतरत्या क्रमाने ७१–७२ मधील तिळाच्या लागवडीचे इतर प्रमुख जिल्हे होते.


हवामान : २१° से. किंवा अधिक तापमानाच्या हंगामात हे पीक उत्तम येते. सपाट प्रदेशात किंवा समुद्रसपाटीपासून १,२०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात या पिकाची लागवड यशस्वीपणे करता येते. जिरायत पिकाच्या हंगामात पावसाचे प्रमाण ५० सेंमी. पेक्षा कमी नसावे. थंडीच्या कडाक्याचा या पिकावर प्रतिकूल परिणाम होतो. सतत जोराचा पाऊस किंवा लांब मुदतीचे अवर्षणही या पिकाला विघातक असते.

हंगाम : उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्राचा काही भाग आणि पंजाब राज्यात हे पीक खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर घेण्यात येते. पेरणी जून–जुलैमध्ये आणि कापणी ऑक्टोबर–नोव्हेंबरमध्ये होते. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा काही भाग आणि ओरिसात ते रबी हंगामात आणि शिवाय उन्हाळ्यात बागायती पीक म्हणून घेण्यात येते. रबी पीक ऑक्टोबर–नोव्हेंबर मध्ये पेरतात आणि डिसेंबर–जानेवारीत त्याची कापणी करतात. उन्हाळी पिकाची रबी पिकानंतर फेब्रुवारी–मार्चमध्ये पेरणी करून मे–जूनमध्ये कापणी करतात. आंध्र प्रदेशात भातपिकाची कापणी केल्यावर ओल्या जमिनीत हे पीक पेरतात. दक्षिणेकडील अक्षांशांच्या प्रदेशात जेथे सु. १२ तासांचा दिवस असतो (म्हणजेच दिवस आणि रात्र यांमध्ये फार फरक असत नाही) अशा भागांत वर्षाच्या कोणत्याही ऋतूत जमिनीत पुरेशी ओल असल्यास हे पीक घेता येते.

लागवडीतील प्रकार : तिळाच्या लागवडीतील प्रकारांत फुलांचा रंग, बोंडांचा आकार, आकारमान व त्यांची झाडावरील मांडणी, बियांचा रंग व आकारमान आणि पेरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी या बाबतीत भिन्नता आढळून येते. एकांतरित (एकाआड एक) अथवा संमुख (समोरासमोर) मांडणीमध्ये पानांच्या बगलेतील बोंडांची संख्या निरनिराळ्या प्रकारांत १ ते ३ असते व प्रत्येक बगलेत ४ ते ५ पर्यंत बोंडे काही प्रकारांत आढळून आली आहेत. लागवडीतील बहुसंख्य प्रकार काळ्या अगर पांढऱ्या रंगाच्या बियांचे असतात. बाजारात हे पांढरे व काळे तीळ म्हणून ओळखले जातात. वाढीच्या हंगामाप्रमाणे हळवे, निमगरवे आणि गरवे असेही प्रकार आहेत. हळव्या प्रकारांना पेरणीपासून कापणीपर्यंत सु. ८५ दिवस व गरव्या प्रकारांना सु. १४५ दिवस लागतात.

निवड आणि संकर पद्धतींनी तिळाचे नवे प्रकार निर्माण करण्याचे काम भारतात १९२५ पासून सुरू आहे. स्थानिक प्रकारापेक्षा १२० ते २००% उत्पन्न देणारे तिळाचे सु. ३० सुधारित प्रकार देशातील निरनिराळ्या संशोधनकेंद्रांत निर्माण करण्यात आले आहेत. तमिळनाडूसाठी टीएमव्ही–१, २ आणि ३ मध्य प्रदेशासाठी क्र. ४१ आणि ६२–३२ उत्तर प्रदेशासाठी टी–१०,१२ आणि १३ राजस्थानसाठी सी–५० आणि गुजरातसाठी मृग–१ आणि पूर्वा–१ हे सुधारित प्रकार आहेत. महाराष्ट्रासाठी शिफारस केलेल्या सुधारित प्रकारांची माहिती कोष्टकात दिली आहे.

महाराष्ट्रातील तिळाचे सुधारित प्रकार

प्रकार

खरीप

अगर रबी

पेरणी

कापणी

पेरणीपासून कापणीपर्यंत दिवस

हेक्टरी

उत्पन्न (किग्रॅ.)

कोणत्या जिल्ह्यासाठी

योग्य

क्र. ८५

खरीप

जुलै सुरुवात

ऑक्टोबर अखेर

१२०

३४०

पश्चिम महाराष्ट्र

क्र. ८

निमरबी

सप्टेंबर सुरुवात

जानेवारी सुरुवात

१३०

१९१

नागपूर, वर्धा, चंद्रपूर

क्र. १२८

खरीप

जुलै सुरुवात

ऑक्टोबर

१२०

४२०

नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा.


जमीन : तिळाचे पीक सपाट, रेताड, दुमट जमिनीत उत्तम येते. जमीन चांगल्या निचऱ्याची तसेच पाणी धरून ठेवणारी असावी. खोलगट, बिननिचऱ्याची जमीन चालत नाही. भारतात तिळाचे पीक राजस्थानातील रेताड जमिनीपासून, आंध्र प्रदेशातील चिकण मातीच्या आणि कर्नाटक व महाराष्ट्रातील भारी काळ्या अशा विविध प्रकारांच्या जमिनीत घेतात. जमीन नांगरून ३ ते ४ कुळवाच्या पाळ्या देऊन भुसभशीत करतात.

पेरणी : जमिनीत पुरेशी ओल असताना पेरणी बी फोकून अथवा ओळीमध्ये २० ते ३० सेंमी. अंतर ठेवून पाभरीने करतात. हे बी बारीक व हलके असल्यामुळे ते सारखे पेरले जावे यासाठी शेणखताच्या भुग्यामध्ये किंवा बारीक वाळूमध्ये मिसळून पेरतात आणि मागाहून हलक्या वखराने झाकून घेतात. पाभरीने पेरण्यासाठी हेक्टरी २·५ ते ७·५ किग्रॅ. व फोकून पेरण्यासाठी १२·५ किग्रॅ. बी लागते. मिश्रपीक म्हणून घेतल्यास पिकाच्या ओळींच्या संख्येप्रमाणे बियाण्यांचे प्रमाण राहते. ओळीमध्ये पेरलेल्या पिकाची उगवून आल्यानंतर २ ते ३ आठवड्यांनी विरळणी करतात आणि त्या वेळी कोरडवाहू पिकात दोन झाडांमध्ये १५–२० सेंमी. व बागाईतात ३० सेंमी. अंतर ठेवतात.

आंतर मशागत : कोरडवाहू खरीप पिकाची पहिली कोळपणी पेरणीनंतर दोन आठवड्यांनी करतात. त्यानंतर आवश्यकतेनुसार दुसरी कोळपणी व निंदणी करतात. ज्या वेळी तिळाचे पीक मिश्रपीक असते त्या वेळी मुख्य पिकाप्रमाणेच त्याची आंतर मशागत होते.

खत : भारतात तिळाच्या पिकाला सहसा खत देत नाहीत. ज्या पिकात हे मिश्रपीक घेतात त्या पिकाला अथवा फेरपालटातील पिकाला दिलेल्या खताचा फायदा तिळाच्या पिकाला मिळतो. ज्या वेळी हे स्वतंत्र पीक घेतले जाते त्या वेळी हेक्टरी २० ते २५ किग्रॅ. नायट्रोजन पेरणीच्या वेळी देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. बागायती पिकाला मशागतीच्या वेळी ६·२५ टन शेणखत आणि नंतर ३३ किग्रॅ. नायट्रोजन दिल्याने फायदा होतो. यूरिया पाण्यात मिसळून पानांवर फवारल्यामुळेही फायदा होतो.

फेरपालट : राजस्थान वगळता भारताच्या बहुतेक भागांत तिळाचे पीक फेरपालटात घेतले जाते. राजस्थानच्या कोरड्या व रूक्ष भागात फक्त तिळाचे एकच पीक घेतात. याउलट तमिळनाडूत एकाच वर्षात नागली, मूग व तीळ ही पिके लागोपाठ घेतात. या दोन टोकांमधील फेरपालटाचे अनेक प्रकार निरनिराळ्या भागांत प्रचलित आहेत. महाराष्ट्रात तीळ व कपाशीच्या मिश्रपिकानंतर ज्वारीचे अथवा तीळ व ज्वारीच्या मिश्रपिकानंतर कपाशीचे पीक घेतात. फेरपालटामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकाशिवाय तिळाचे खरिपाचे पीक बाजरी, ज्वारी, मका, तूर, कपाशी, भात, भुईमूग आणि कमी महत्त्वाची तृणधान्ये यांजबरोबर मिश्रपीक म्हणून घेतले जाते. रबी पीक मात्र स्वतंत्रपणे सलग पेरतात.

रोग : मूळकूज, पानांवरील ठिपके, पर्णायित पुष्प (फुलाच्या अवयवांचे पानांत रूपांतर होणे), खोडकूज आणि मर हे तिळाचे प्रमुख रोग आहेत.

मूळकूज : हा रोग मॅक्रोफोमिना फॅसिओलाय कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होतो. हा रोग सुरुवातीला झाडाच्या खोडावर जमिनीलगत आढळून येतो आणि पुष्कळ वेळा खोडाचा हा भाग मोडून पडतो. मुळे रोगाने कुजलेली आढळून येतात. मागाहून हा रोग बोंडावर व बियांवर आढळून येतो. रोगट जागी गर्द तपकिरी ते काळसर रंगाचे ठिपके अगर चट्टे आढळतात व त्यांत कवकाच्या असंख्य गर्तिका (कवक बीजुकफलाचा प्रकार) असतात. रोगट मुळांमध्ये आणि खोडांमध्ये जालाश्म (कवकाच्या तंतूंचे कठीण पुंजके) आढळतात. बोंडे अपक्व स्थितीत उकलतात आणि त्यांतील बिया रोगट व लहान आकारमानाच्या असतात. रोगामुळे उत्पन्न घटते. रोगाचा प्रादुर्भाव रोगट बियांमार्फत आणि जमिनीतून होतो. बियांना पेरणीपूर्वी पारायुक्त कवकनाशक चोळणे, पिकांची फेरपालट करणे व रोगप्रतिकारक प्रकारांची लागवड करणे हे या रोगावर उपाय आहेत. तिळाच्या सर्व जातींवर आणि अनेक पोषक वनस्पतींवर हा रोग पडतो त्यामुळे संपूर्णपणे रोगप्रतिकारक प्रकार अद्याप उपलब्ध नाहीत.

पानांवरील ठिपके : हा रोग सर्कोस्पोरा सिसॅमी या कवकामुळे होतो. पानांवर लहान लहान वाटोळे ठिपके दिसून येतात व रोगट पाने गळून पडतात. रोगाचे प्रमाण जास्त असल्यास हा रोग बोंडांवरही आढळून येतो. शेतातील पालापाचोळा गोळा करून जाळणे व रोगट बी पेरणीपूर्वी ५३° से. गरम पाण्यामध्ये एक तास ठेवून नंतर वाळवून घेणे हे रोगनिर्मूलनाचे उपाय आहेत. रोग पडल्यावर कॅप्टन (०·५%), फायटोलान (०·३%) अथवा ऑरियोफंजीन (१ लक्ष भाग पाण्यात ५ भाग) झाडांवर फवारल्यामुळे रोगाचे अंशतः नियंत्रण होऊ शकते.

खोडकूज : याला फायटोप्थारा ब्लाइट (करपा) असेही नाव आहे. हा रोग फायटोप्थारा पॅऱासिटिका या कवकामुळे होतो. रोगामुळे सुरुवातीला खोडाचा जमिनीलगतचा काही भाग ओलसर काळा पडतो व थोड्या दिवसांनी खोडावर काळसर रेघा आढळून येतात. मागाहून रोग खोडावर व फांद्यांवर पसरतो आणि रोगामुळे खोड संपूर्णपणे वेढल्यास झाड मरते. पुष्कळ वेळा झाडे फुलावर असताना रोग पडतो. अशा वेळी रोगामुळे पाने व फुले वाळतात. जी झाडे रोगातून वाचतात त्यांच्या बोंडांची वाढ खुरटते व त्यांतील बिया आकारमानाने फार लहान असतात. पाण्याचा योग्य निचरा नसणाऱ्या शेताच्या भागात या रोगाचे प्रमाण फार असते. रोगकारक कवक जमिनीतच जिवंत राहात असल्यामुळे या रोगावर प्रभावी उपाय नाही. शेतात पाण्याचा योग्य निचरा करण्यामुळे रोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.


मर : हा रोग फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम फॉर्मा सिसॅमी या कवकामुळे होतो. या रोगात प्रथम पाने पिवळी पडून खाली लोंबतात व काही दिवसांनी वाळतात. झाडाचा शेंडा वाळतो व वाकतो. मुळाचा आणि खोडाचा आतील भाग तपकिरी काळपट झालेला आढळून येतो. रोगकारक कवक जमिनीत जिवंत रहात असल्यामुळे रोगप्रतिकारक प्रकारांची लागवड करणे हाच खात्रीचा उपाय आहे.

पर्णायित पुष्प : हा रोग पीक फुलावर असताना आढळून येतो. फुलाच्या एका अगर सर्व भागांचे हिरव्या पानासारख्या संरचनेत रूपांतर होते. त्याचबरोबर झाडाला भरपूर प्रमाणात फांद्या फुटतात व लहान आकारमानाची पुष्कळ पाने फुटून येतात. अशा प्रकारच्या सर्व विकृतींमुळे झाडाच्या फांद्यांच्या शेंड्याकडील भागाचे गुच्छांत रूपांतर होते व त्यामुळे झाडे भारावून वाकतात. फुलांच्या विकृतीमुळे बी धरत नाही. १९७२ पर्यंत हा रोग व्हायरसामुळे होतो असे सर्वसामान्यपणे मानले जात होते. परंतु भारतीय कृषी संशोधन संस्थेत झालेल्या संशोधनामुळे हा रोग मायकोप्लाझ्मामुळे (सूक्ष्मजंतूंशी पुष्कळ साधर्म्य असलेल्या परोपजीवी सूक्ष्मजीवाच्या प्रकारामुळे) होत असावा असे मानण्यात येते. हा रोग तुडतुड्यांमार्फत पसरतो म्हणून रोगट झाडे उपटून नष्ट करणे व कीटकनाशके फवारून तुडतुडे नष्ट करणे या उपायांमुळे रोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. यांशिवाय कवकजन्य कवडी रोग, सूक्ष्मजंतुजन्य अंगमारी व घाण्या रोग आणि व्हायरसजन्य पाने वाळण्याचा रोग हे तिळावरील इतर कमी महत्वाचे रोग आहेत.

कीड : पानावरील व बोंडावरील सुरवंट (अँटिगॅस्ट्रा कॅटालाउनॅलिस) ही तिळावर दर वर्षी कमीजास्त प्रमाणात पडणारी कीड आहे. सुरवंट कोवळी पाने खातात व कोवळ्या पानांच्या गुंडाळीमध्ये आश्रय घेतात. काही प्रसंगी ते खोड व बोंड यांना भोक पाडून नुकसान करतात. विशेषकरून ही कीड तिळावरच आढळून येते. १०% बीएचसी अथवा ५% डीडीटी पिस्कारतात.

पाने खाणारा सुरवंट : (ॲन्चेरोन्झिया स्टिक्स). हा मोठ्या आकारमानाचा सुरवंट अधाशीपणे झाडाची सर्व पाने खातो. ही कीड भारतात सर्वत्र आणि तिळाखेरीज वाल व वांगी यांवर आढळते. सुरवंट मोठे असल्याने हाताने वेचून मारणे शक्य असते. नांगरटीमुळे कोश वर येतात. ते वेचून नष्ट करण्यामुळे किडीचे प्रमाण कमी होते. १०% बीएचसी पिस्कारतात.

पिटिकादंशुक (ॲस्फाँडिलिया सिसॅमी) या डासासारख्या माशीची अळी फुलांत आढळते. अळीमुळे बोंडाऐवजी कळ्यांसारख्या गाठी आढळून येतात. काही काळाने या गाठी वाळून पडतात. अळ्या असलेल्या फुलांच्या गाठी हाताने वेचून नष्ट करतात. तसेच ५% बीएचसी पिस्कारतात.

कापणी व मळणी : तिळाच्या झाडांना फुले येण्याचे बंद झाल्यावर पाने पिवळी पडून लोंबकळू लागतात. अशा स्थितीत बोंडे हिरवी अगर पिवळसर असतांना झाडे जमिनीलगत कापतात. ती पूर्ण वाळेपर्यंत थांबल्यास बोंडे तडकून बी खाली गळण्याची शक्यता असते. कापलेली झाडे खळ्यावर नेऊन त्यांचा वर्तुळाकार ढीग रचतात. ढिगात झाडाची मुळे बाहेरच्या बाजूला असतात. दिवसा ढिगातील झाडे काढून वाळत ठेवतात व रात्री पुन्हा ढीग रचतात. सर्व बोंडे वाळून तडकेपर्यंत (६-७ दिवस) हे वाळविण्याचे काम चालते. नंतर झाडे उलटी धरुन हालविल्यामुळे बहुतेक बी खाली पडते. झाडे मोगरीने हलके बडविल्याने राहिलेली (न तडकलेली) बोंडे फुटून बी पडते. बी गोळा करून उफणणी करून ते स्वच्छ करतात.

उत्पन्न आणि उत्पादन : भारतातील तिळाचे हेक्टरी सरासरी उत्पन्न १९७२-७३ मध्ये १५९ किग्रॅ. होते. सर्वसाधारणपणे हेक्टरी खरीप (कोरडवाहू) पिकाचे २३० ते ५४५ किग्रॅ. रबी (कोरडवाहू) चे ११५ ते ३४० किग्रॅ. आणि बागायती पिकाचे ३४० ते ६८० किग्रॅ. उत्पन्न येते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील पहिल्या सहा राज्यांतील हेक्टरी सरासरी उत्पन्न (किग्रॅ. मध्ये) पुढीलप्रमाणे होते : उत्तर प्रदेश ११०, राजस्थान ५९, मध्यप्रदेश १९७, आंध्रप्रदेश ११२, तमिळनाडू ३२०, महाराष्ट्र १८९. ओरिसात तिळाखाली क्षेत्र कमी असले तरी हेक्टरी उत्पन्न सर्वात जास्त (४७३ किग्रॅ.) होते. १९४४-४५ मध्ये भारतात तिळाखालील क्षेत्र सु. १५ लाख हेक्टर होते. ते १९७० मध्ये २४ लाख हेक्टरपर्यंत वाढले, परंतु एकूण उत्पादनात (सु. ४ लाख टन) फारशी वाढ झाली नाही. याचा अर्थ हेक्टरी उत्पन्नात घट झाली असाच होतो. तिळाच्या लागवडीखालील क्षेत्रात भारताचा प्रथम क्रमांक असला, तरी हेक्टरी उत्पन्नाच्या बाबतीत तो जवळजवळ शेवटच्या टोकाला आहे. मेक्सिकोत भारताच्या सु. / (एक सप्तमांश) क्षेत्रफळ असूनही तिळाचे उत्पादन भारताच्या निम्यापेक्षा जास्त आहे. आफ्रिकेतही भारताच्या सु. ४०% क्षेत्र असून उत्पादन भारताच्या सु. ८०% पेक्षा जास्त आहे.

रासायनिक संघटन : तिळाच्या बियांमध्ये जलांश ५·८%, प्रथिने १९·३%, स्निग्ध पदार्थ (तेल) ५१%, कार्बोहायड्रेटे १८%, कॅश्लियम १·००% आणि फॉस्फरस ०·७% असतात. त्यांत थायामीन (०·००१%) आणि निॲसीन (०·००५%) ही जीवनसत्वे पुष्कळशा प्रमाणात आढळतात. प्रथिनांमध्ये मिथिओनीन व ट्रिप्टोफेन ही गंधयुक्त ॲमिनो अम्ले विशेष प्रमाणात आढळून येतात. यासाठी डाळी, सोयाबीन, भुईमूग व हरभरा यांतील प्रथिनांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी तिळाचा वापर करण्याची शिफारस केली जाते. तेल काढलेल्या बियांत थायामीन, रिबोफ्लाविन, निकोटिनिक अम्ल, पँटोथिनिक अम्ल, फॉलिक अम्ल, बायोटीन, पिरिडॉक्सीन, इनॉसिटॉल, कोलीन इ. द्रव्ये असतात.


तिळाच्या तेलातील विशिष्ट स्वादामुळे ते तेल काढल्यामुळे शुद्ध न करताच खाण्यासाठी विशेष पसंद करतात. इतर तेले आणि चरबी यांत तिळाच्या तेलाचा थोडासा अंश असला, तरी तेलातील सिसॅमोलीन किंवा सिसॅमॉल या घटकांच्या अस्तित्वामुळे विशिष्ट रासायनिक पद्धतीने तो ओळखता येतो. भारतात व यूरोप खंडातील काही देशात कोणत्याही तेलाचे हायड्रोजनीकरण (हायड्रोजनाचा समावेश करण्याची विक्रिया) करून त्याचे वनस्पती तूप बनविताना त्यात ५ ते १०% तिळाचे तेल घालण्यासंबंधी कायद्याची सक्ती आहे. अशा प्रकारे तयार केलेल्या वनस्पती तुपाचा शुद्ध तूप अगर लोणी यात भेसळीसाठी वापर केल्यास त्यात असलेल्या तिळाच्या तेलामुळे भेसळ ओळखणे शक्य होते.

इतर कोणत्याही तेलात नसलेले दोन रासायनिक घटक (सिसॅमीन आणि सिसॅमोलीन) तिळाच्या तेलात असतात. पायरेथ्रीन प्रकारांच्या कीटकनाशकांचे सूर्यप्रकाशामुळे विघटन होते, परंतु या कीटकनाशकांची क्षमता आणि टिकाऊपणा सिसॅमीन व सिसॅमोलीन या सहकारी पदार्थांमुळे वाढतात. तसेच ऑक्सिडीकरणाला [→ ऑक्सिडीभवन] विरोध करणारा सिसॅमॉल हा रासायनिक घटक तिळाच्या तेलात अल्पांशाने असल्यामुळे तिळाचे तेल सर्व वनस्पतिज तेलांत जास्त टिकाऊ (खवटपणाला विरोध करणारे) आहे. हायड्रोजनीकरणामुळे या तेलाचा टिकाऊपणा आणखी जास्त वाढतो. हे तेल टिकाऊ असल्यामुळे त्याचा स्वाद बिघडत नाही आणि त्यातील जीवनसत्वही नष्ट होत नाहीत. डुकराची चरबी टिकाऊ बनविण्यासाठी तीत हयड्रोजनीकरण केलेले तिळाचे तेल घालतात.

औषधी गुणधर्म : तिळाचे बी स्निग्ध, वेदनाहारक, पौष्टिक, मूत्रल (लघवी साफ करणारे) व दुग्धोत्पादक असून मूळव्याधीवर गुणकारी असते. काळा तीळ आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारा) असून त्याचे पोटीस जखमेवर लावतात. भाजलेल्या अगर पोळलेल्या जागी तीळ वाटून त्याच लेप लावतात. तिळाचे तेल अमांशशामक (आव कमी करणारे) व मूत्र विकारावर इतर औषधांबरोबर देतात. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी तिळाचे तेल खाण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. तिळाचा जवसाबरोबर केलेला काढा कामोत्तेजक आहे. ताजी पाने मूत्रपिंड व मूत्राशय यांच्या श्लेमक (बुळबुळीत) भागावरील सुजेवर उपयुक्त असतात. डोळे व कातडी यांच्या तक्रारीवर पाने बाहेरून (वाटून) लावतात. केशवर्धनासाठी पाने व मुळे यांचा काढा केस धुण्यास वापरतात. वनस्पतीचा श्लेष्मल रस केसांतील उवा मारण्यास उपयुक्त असतो.

उपयोग : (१) तीळ : भारतात उत्पादन होणाऱ्या तिळापैकी सु. ७८% तिळाचे तेल काढले जाते. सु. २०% घरगुती वापरासाठी आणि सु. २% तीळ बियांसाठी वापरले जातात. खाद्य म्हणून तिळाचा वापर करण्यापूर्वी त्याची टरफले काढतात. टरफले काढण्यासाठी घरगुती पद्धतीमध्ये रात्रभर तीळ भिजवून ते दुसऱ्या दिवशी थोडे वाळवून खडबडीत पृष्टभागावर घासून टरफले काढतात आणि पाखडून स्वच्छ करतात. सुधारलेल्या व्यापारी पद्धतीत दाहक (कॉस्टिक) सोड्याच्या ०·६% द्रावणात ९६° से. तापमानात १ ते २ मिनिटे तीळ बुडवून नंतर पाण्यात धुतल्यावर टरफले निघतात. टरफले काढलेले तीळ तव्यावर भाजल्यास तिळाचा विशिष्ट स्वाद निर्माण होतो.

साल काढलेले तीळ मिठाई आणि इतर खाद्यपदार्थात वापरतात. महाराष्ट्रात बाजरीच्या भाकरीला तीळ लावण्याची पद्धत आहे. अमेरिका आणि यूरोपीय देशात तिळाचा उपयोग पावावर आणि बेकरीत तयार होणाऱ्या पदार्थांवर लावण्यासाठी करतात. व्हेनेझुएलामध्ये भाजलेले तीळ वाटून त्यात दूध व साखर घालून खीर तयार करतात.

(२) तेल : बैलघाणीत २ तासांत २० किग्रॅ. तिळाचे तेल काढता येते. बियांतील ४६ ते ५२%  तेलापैकी ३६ ते ३८% तेल बैलघाणीतून निघते व ४० ते ४२% यंत्रघाणीतून निघते. बैलघाणीतून तेल काढताना ताडगूळ अगर काकवीचा थोड्या प्रमाणात उपयोग करतात. यामुळे तेलाला चांगला स्वाद येतो. यंत्रघाणीमध्ये पूर्वी जलदाब यंत्राचा वापर करीत, परंतु सध्या कमी आणि मध्यम शक्तीच्या स्क्रू–दाबयंत्राचा उपयोग करतात.

भारतात उत्पादन होणाऱ्या तिळाच्या तेलापैकी ८२% तेल खाण्यासाठी वापरतात. निरनिराळ्या खाद्यपदार्थांसाठी, वनस्पती तूप बनविण्यासाठी, तसेच साबण, सौंदर्यप्रसाधने, अत्तरे, कीटकनाशके आणि औषधी वस्तूंच्या निर्मितीत ते वापरतात. हे तेल लवकर खराब होत नाही म्हणून त्याचा उपयोग सुगंधी तेल करण्यासाठी (सुगंधी फुले तेलात भिजवून) करतात. तेलात विरघळणारी औषधे शरीरात टोचण्यासाठीही या तेलाचा वापर करतात. इतर वनस्पतिजन्य तेलांना टिकाऊपणा आणण्यासाठी त्यांत तिळाचे तेल मिसळतात.

(३) पेंड : हे जनावरांचे पौष्टिक खाद्य आहे परंतु ती लवकर खराब होते. खळ, डिंक, खाद्यप्रथिन आणि कॅल्शियम प्रोटिनेट गोळ्या बनविण्यासाठी तिचा वापर येण्यासारखा आहे. पेंडीचा उपयोग भारतामध्ये काही भागांत (विशेषकरून गरीब वर्गात) स्वयंपाकात करतात.

संदर्भ : 1. Aiyer, A. K. Y. N. Field Crops of India, Bangalore, 1958.

   2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.

   3. y3wuohi, A. B. Sesamum, Hyderabad, 1961.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ. कुलकर्णि, य. स. 

रुईकर, स. के. गोखले, वा. पु.