वेंकटेश मंदिर, तिरुपती.

तिरुपती : आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्याच्या चंद्रगिरी तालुक्यातील हिंदूंचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र. लोकसंख्या ६५,८४३ (१९७१). विजयवाड्याच्या दक्षिणेस ३७० किमी. रेनिगुंटा रेल्वे प्रस्थानकापासून ११ किमी. गुडूर–काटपाडी फाट्यावरील तिरुपती (ईस्ट) स्थानकावर उतरून सु. २५ किमी. वरील तिरुपतीस देवस्थानच्या बसने जाता येते. तिरुपती गावात अनेक मंदिरे आहेत. त्यांत गोविंदराजस्वामींचे मंदिर प्रमुख आहे. त्यात २४४ सेंमी. लांबीची गोविंदराजाची निद्रितावस्थेतील मूर्ती आहे. जवळच तिरुचानूर येथे पद्मावतीचे व अन्य मंदिरे आहेत. पण शेषाचलाच्या म्हणजेच वेंकटाचलाच्या सु. ८५३ मी. उंचीच्या तिरुमलई शिखरावरील वेंकटेश्वराच्या मंदिरासाठीच तिरुपती प्रसिद्ध आहे.

मंदिर प्राचीन असून तेथे इ. स. ७९० मधील एक शिलालेख आहे. या मंदिराला पल्लव आणि चोल राजांचा आश्रय होता. निरनिराळ्या काळांतील द्राविडी वास्तुशिल्प येथे पहावयास मिळते. हे भारतातील अत्यंत श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. येथे प्रेक्षणीय गोपुरे असून मंदिरास तीन प्राकार आहेत. विमान प्राकारातून वैकुंठ प्राकारात जाण्याचा दरवाजा व गाभाऱ्यावरील विमान सुवर्णाने मढविलेले आहे. गाभाऱ्यात २१३ सेंमी. उंचीची वेंकटेश्वराची मूर्ती आहे. मूर्तीमध्ये विष्णू व शंकर यांची वैशिष्ट्ये एकत्र असल्याने शैव व वैष्णव भक्तांस हे दैवत सारखेच पूज्य आहे. प्रमुख पुजारी व बहुतेक भक्तही वैष्णवच आहेत. मूर्तीच्या अंगावर दररोज ८·५ मण वजनाचे जवाहिर व सोन्याचे दागिने असतात. शिवाय उत्सवाचे अन्य अलंकार वगैरे खूपच आहेत. येथे दररोज सु. ६,००० यात्रेकरू येतात. सप्टेंबर–ऑक्टोबरमध्ये आश्विनी पोर्णिमेस ‘ब्रम्होत्सव’ यात्रेस लाखो भाविक जमतात. देवस्थानाची व्यवस्था विश्वस्त मंडळ पाहते. देवास द्यावयाचे द्रव्य, अलंकार वगैरे टाकण्यासाठी तेथे एक हुंडी म्हणजे पिशवी टांगलेली असते.

काही भाविक स्त्री–पुरुष मुंडन करून वेंकटेश्वरास केस अर्पण करतात. देवस्थानचे वार्षिक उत्पन्न रु. दोन कोटींपेक्षा जास्त आहे. त्यातून देवस्थानची व यात्रेकरूंची व्यवस्था, धर्मशाळा, श्रीव्यंकटेश विद्यापीठ, प्राथमिक व माध्यमिक शाळा, गोशाळा, संस्कृत पाठशाळा, प्रकाशन व मुद्रणसंस्था, दवाखाना, रुग्णालय इ. सार्वजनिक कामे केली जातात. देवळाजवळच स्वामी पुष्करिणी हे कुंड असून जवळच वराहस्वामीचे मंदिर आहे. अन्य धर्मीय लोक मंदिर बाहेरून पाहू शकतात. डोंगरावर अनेक धबधबे, कुंडे असून आकाशगंगा, गोगर्भम्, पापनाशनम् इ. तीर्थे आहेत. डोंगरावर चंदनाची झाडे खूप असून चंदनी वस्तूंसाठी तिरुपती प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात हे ठिकाण ‘गिरिबालाजी’ म्हणून प्रसिद्ध आहे.

कोळेकर, वा. मो.