तितिकाका सरोवर : दक्षिण अमेरिकेतील सर्वांत मोठे सरोवर. बोलिव्हिया व पेरू यांच्यामध्ये विभागलेले हे सरोवर समुद्रसपाटीपासून ३,८०२ मी. उंचीवर आहे. इतक्या उंचीवर एवढे मोठे सरोवर जगात इतरत्र नाही. याचे क्षेत्रफळ ८,२८८ चौ. किमी. आहे. तीकीना या अरुंद पाणीपट्ट्याने याचे दोन भाग झाले असून वायव्येकडील चूक्कीतो १२८ किमी. लांब व ७८ किमी. रुंद आणि आग्नेयीकडील वीनामार्का २४ किमी. लांब व ५६ किमी. रुंद आहे. याची सरासरी खोली सु. १०० मी. असली, तरी याचा तळ बोलिव्हियाकडे जास्त उतरता होत गेला असून जास्तीत जास्त खोली २८१ मी. आहे. तीकीनाच्या दुसऱ्या बाजूच्या छोट्या भागाची सरासरी खोली मात्र फक्त सु. १० मी. आहे. याच्या ईशान्य किनाऱ्यावर ६,४०० मी. पेक्षा उंच शिखरे असलेली कॉर्डिलेरा रेआल पर्वतराजी आहे. तितिकाकाचे पाणी किंचीत मचूळ आहे. त्याची क्षारता सु. ५·२% ते ५·५% आहे. याच्या भोवतीच्या सु. ५८,२४० चौ. किमी. क्षेत्राच्या द्रोणी प्रदेशातून पंचवीसाहून अधिक नद्या तितिकाकाला येऊन मिळतात. रामीस ही वायव्येकडून येणारी नदी त्यांपैकी सर्वांत मोठी होय. देसाग्वादेरो ही छोटीशी नदी सरोवराचे जेमतेम ५% जादा पाणी दक्षिणेकडे वाहून नेते. बरेचसे जादा पाणी बाष्पीभवनाने नाहीसे होते. सरोवराच्या कमाल व किमान पातळ्यांमधील फरक सु. ५ मी. पर्यंत जातो परंतु आतापर्यंतच्या रूढ समजुतीप्रमाणे सरोवर कमी कमी होत नसून त्याच्या पातळीतील चढउतार एका विशिष्ट चक्राप्रमाणे चालू असतो. सरोवरात एक दोन प्रकारचे मासे सापडत असत. आता त्यात ट्राउट माशांची पैदास होत आहे.
याच्या भोवती इंडियन जमातींची वस्ती प्राचीन काळापासून आहे व यातील ४१ लहान मोठ्या बेटांपैकी इस्ला देल सॉल (सूर्यद्वीप) बेटावर इंका संस्कृतीचा जन्म झाला असे समजतात. आजही याच्या सभोवार अनेक इंडियन खेडी असून त्यांच्या शेतीवर अजूबाजूंच्या वैराण प्रदेशाची गुजराण होते. तितिकाकाच्या पाण्याचे तपमान स्थिर, सु. १४° से. आहे. त्यामुळे एवढ्या उंचीवर मका व गहू पिकवता येतो. बटाट्याची सर्वप्रथम निपज या किनाऱ्यावर झाली असा समज आहे.
पेरूच्या किनाऱ्यावरील पूनोपासून बोलिव्हियाच्या किनाऱ्यावरील ग्वाकीपर्यंत नियमित जहाजवाहतूक चालू असते. पूनोपासून पॅसिफिकवरील आरेकीपापर्यंत अरुंदमापी लोहमार्ग आहे. अतिशय उंचावरील या जलाशयाचा उपयोग वीज उत्पादनासाठी करण्याच्या योजना आहेत.
शहाणे, मो. ज्ञा.