ताव्हेर्न्ये, झां बातीस्त : (१६०५–८९) फ्रेंच जगप्रवासी आणि जडजवाहिरांचा एक व्यापारी. त्याने फ्रान्सबाहेर सहा प्रवास केले. पौर्वात्य जगात इराण, भारत, जावा, इंडोनेशिया या देशांना त्याने भेटी दिल्या. इराणमधील बंदर आब्बास यातून निघून तो ५ मे १६६५ रोजी सुरत बंदरात आला. तो आपला तरुण पुतण्या, चार नोकर व एक वैद्य यांच्यासह प्रवास करीत होता. सुरतेस काही दिवस मुक्काम करून बऱ्हाणपूर, ग्वाल्हेर, आग्रा असा प्रवास करीत तो दिल्लीस आला. प्रवासात राजमहाल येथे त्याची बर्निअर या दुसऱ्या प्रवाशाशी भेट झाली. पुढील प्रवास त्या दोघांनी मिळून केला. दिल्लीत तो काही आठवडे राहिला. १० नोव्हेंबर १६६५ रोजी त्याने सम्राट औरंगजेब याचा मूल्यवान जवाहिऱ्यांचा संग्रह पाहिला आणि आपल्याजवळील काही मूल्यवान पाचू त्याला नजर केले. त्यांतील काही पाचू तीनशे कॅरटपेक्षा अधिक वजनाचे असून पुढे १७३८ मध्ये दिल्लीवर केलेल्या आक्रमणात नादिरशाहने लुटून ते इराणमध्ये नेले. ते पाचू इराणच्या शाही रत्नसंग्रहात आहेत. २५ नोव्हेंबर १६६५ रोजी ताव्हेर्न्ये याने दिल्लीचा निरोप घेतला व तो बर्निअरसह बंगालकडे गेला.
या प्रवासांचा वृत्तांत त्याने आपल्या Six Voyages en Turquie, en Perse et aux Indes (१६७६–७७) या पुस्तकात लिहून ठेवला आहे. तो प्रॉटेस्टंट पंथीय होता. १६८५ मध्ये तो रशियातून पूर्वेकडे जाण्यास निघाला. या त्याच्या सातव्या प्रवासात असतानाच तो मृत्यू पावला.
दीक्षित, विजया