चंबळ—२ : (हिं. मलजन इं. कॅमल्स फूट क्लाइंबर लॅ. बौहीनिया वाह्ली कुल-लेग्युमिनोजी). ⇨आपटा व ⇨कांचन यांच्या वंशातील आणि अनेक लक्षणांत त्यांच्याशी साम्य असणारी शिंबावंत (शेंगा येणारी) ⇨ महालता भारतात डोंगराळ भागातील जंगलांत (कोकण, गोवा, खंडाळा, आसाम, मध्य प्रदेश, बिहार) आणि उप-हिमालयात ९३० मी. उंचीपर्यंत आढळते. हिच्या जाड खोडावर वळ्या व खोलगट रेषा असून पानांसमोर असलेल्या प्रतानांच्या (तणाव्यांच्या) साहाय्याने ती खूप उंच चढते. पाने मोठी, १०—२५ सेंमी. लांबीची, लांब देठाची, साधी व अर्धी विभागलेली (त्यावरून इंग्रजी नाव पडले आहे) असतात. फूले लहान, अनेक, पांढरी असून ती एप्रिलमध्ये येतात. शिंबा चपटी, कठीण, २२—३० x ५—७ सेंमी., तांबूस व लवयुक्त असते तडकल्यावर तीतून ६—१२ चापट, गर्द पिंगट व चकचकीत बिया बाहेर पडतात.
हिच्या फांद्यांपासून टोपल्या व चटया, सालीतील बळकट धाग्यांपासून दोऱ्या वगैरे, पानांपासून छपरे, छत्र्या व टोपल्या अशा वस्तू बनवितात. कोवळ्या शेंगा भाजीकरिता व मोठी पाने पत्रावळीप्रमाणे वापरतात. खोडातील टॅनीन द्रव्य कातडी कमविण्यास चांगले उपयोगी पडते. बिया कच्या किंवा भाजून खातात. पिकलेल्या बिया काजूसारख्या लागतात. त्या पौष्टिक व कामोत्तेजक असतात. पाने पिच्छिल(बुळबुळीत पदार्थयुक्त) व शामक असतात.
पहा : लेग्युमिनोजी (सीसॅल्पिनिऑइडी).
परांडेकर, शं. आ.
“