चंबळ—१ : यमुनेची प्रमुख उपनदी. लांबी सु.१,०४० किमी. मात्र उगम व संगम यांतील काकोड्डाण अंतर फक्त ५२८ किमी. ही मध्य प्रदेशात नैर्ऋत्येस १५ किमी. वर ७०० मी. उंचीच्या जानापाव डोंगरात उगम पावून माळव्याच्या पठारावरून उत्तरेकडे वाहत जाते. सीतामाऊ येथे तिला उज्जयिनीवरून आलेली क्षिप्रा मिळते. उगमापासून ३१२ किमी. चौरासीगड येथे ती राजस्थानात शिरते आणि पठार छेदून खाली आल्यावर तिचे पात्र अरुंद होत जाते. बामणीच्या संगमाच्या थोडे वर तिच्यावर द्रुतवाह व २० मी. उंचीपर्यंतचे प्रपात आहेत. तेथे १० ते १३ मी. खोल व आतून काही ठिकाणी जोडल्या गेलेल्या गर्ता असून त्यांत प्रचंड भोवरे तयार झालेले आहेत. यानंतर चंबळ ईशान्यवाहिनी होते. कोटाजवळ ती रुंद व अगदी संथ असून तिचे पाणी निळेशार दिसते. पुढे ती दोन्ही बाजूंच्या भव्य, लोंबत्या कड्यांमधून व पात्रातील उभ्या खडकांमधून जाते. येथे काठचा प्रदेश दाट झाडीने व वन्य श्वापदांनी भरलेला आहे. प्राचीन केशोराय पाटण गावावरून गेल्यावर तिला कालीसिंध, मेज व पार्वती या नद्या मिळतात. अरवलीत उगम पावलेली बनास, राजस्थानातून येऊन रामेश्वराजवळ तिला मिळते. मध्य प्रदेश व राजस्थान यांच्या सीमेवरून ईशान्येकडे जाऊन चंबळ पूर्ववाहिनी होते व उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवरून थोडे आग्नेयीस जाऊन इटावा शहराच्या आग्नेयीस ४० किमी. वर यमुनेला मिळते. शेवटच्या सखल, गाळजमिनीच्या भागात तिच्या काठी खोल व अरुंद घळींची उत्खातभूमी निर्माण झाली आहे.

चंबळेच्या खोऱ्यात गहू, ज्वारी, मका, कापूस, एरंडी, भुईमूग, ऊस, तंबाखू इ. पिके होतात.

चंबळप्रकल्पातील गांधीसागर, राणा प्रतापसागर व जवाहरसागर ही धरणे आणि कोटा येथील बंधारा व कालवे यांपासून मध्य प्रदेश व राजस्थान यांच्या एकूण ५·६६ लक्ष हे. जमिनीस पाणी व ३८६ मेगावॉट शक्ती असे लाभ अपेक्षित आहेत.

चंबळेला चर्मण्वती म्हणत. रंतिदेव राजाने केलेल्या यज्ञात मारलेल्या पशूंच्या कातड्यांच्या डोंगरावर पाऊस पडून तिचे पाणी तांबडे झाले अशी कथा आहे. चंबळ खोऱ्यातील उत्खननात असुर किंवा भारशिव द्रविड लोकांची संस्कृती सापडली आहे.

यार्दी, ह.व्यं.