चंपा: (१) प्राचीन मालिनी, चंपा-मालिनी, चंपावती, कर्णपुरी वगैरे. आधुनिक चंपानगर किंवा चंपापूर. बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्याच्या भागलपूर या मुख्य ठाण्यापासून पश्चिमेस सु. ७ किमी. व चंपा-गंगा संगमावर वसलेली एक प्राचीन नगरी. रामायण, महाभारत, बौद्ध साहित्य आणि यूआन च्वांगच्या प्रवासवर्णनात हिचा उल्लेख वारंवार आढळतो. रामायणकाळात ही लोमपाद राजाची, तर महाभारतकाळात कर्णाच्या अंग देशाची राजधानी होती. चंपा नावाच्या राजावरून अगर येथील चंपक वृक्षांच्या विपूलतेमुळे हिला चंपा नाव पडले असावे. येथे काही बौद्ध अवशेष सापडले आहेत, असे म्हणतात. तसेच प्राचीन काळी येथे जैन धर्माचे मोठे केंद्र असून त्यांचे बारावे तीर्थकार येथेच जन्मले व मृत्यू पावले, अशी आख्यायिका आहे. गौतम बुद्ध, महावीर व गोशाल यांनी या नगरीला अनेकदा भेट दिल्याचे उल्लेख आढळतात. हे एक समृद्ध नगर आणि व्यापाराचे केंद्र असून येथील व्यापारी समुद्रमार्गाने व्यापार करण्याबाबत प्रसिद्ध होते.