घोडनदी : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातून वाहणारी भीमेची आग्नेयवाहिनी उपनदी. आंबेगाव तालुक्यातील आहुपे गावाजवळ हिचा उगम असून दौंडच्या वायव्येस पाच किमी. सांगवीनजिक ती भीमेस मिळते. या नदीची एकूण लांबी अंदाजे १४५ किमी. असून मीना आणि कुकडी या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. आंबेगाव, घोडेगाव, वडगाव आणि शिरूर ही तिच्या काठांवरील मुख्य गावे. घोडखोऱ्याचा मध्य व पूर्व भाग कमी पावसाच्या दुष्काळी भागात मोडतो त्यामुळे शिरूर तालुक्यात या नदीवर मातीचे धरण बांधून शेतीस पाणी नुकतेच उपलब्ध करून दिलेले आहे.
कुलकर्णी, गो. श्री.