बनवासी : वनवासी. कर्नाटक राज्याच्या उत्तर कानडा जिल्ह्यातील पुरावशेषांसाठी प्रसिद्ध असलेले प्राचीन स्थळ. हे शिर्सी तालुक्यात वरदा नदीच्या (तुंगभद्रेची उपनदी) डाव्या तीरावर, शिर्सीपासून २२ किमी. वर वसले आहे. याचे ‘क्रौंचपुर’, ‘जयंतीपुर’, ‘वैजयंती’ इ. नामोल्लेख आढळतात. महाभारतात या प्रदेशाला ‘वनवासक’ म्हटले आहे. वनवासकाळात पांडव याच भागात राहत होते, असे समजतात. स्कंद पुराणातही या नगरविषयीची कथा आढळते. सम्राट अशोकाने इ. स. पू. २४५ मध्ये रक्खित (रक्षित) नावाच्या भिक्षूला या गावी बौद्ध धर्मप्रसारासाठी पाठविल्याचा उल्लेख महावंश ग्रंथात आहे. विद्यमान बनवासी शहराविषयी टॉलेमीनेही उल्लेख केला आहे. सातवाहनांच्या काळात (इ.स. दुसरे-तिसरे शतक) येथे वस्ती असल्याचे उल्लेख प्राचीन विटांवरील व नाण्यंवरील कोरीव लेखांत आढळतात. येथील मधुकेश्वराच्या (महादेवाच्या) प्राचीन मंदिरातील नागाच्या प्रतिमेभोवती कोरलेल्या ब्रह्मी कोरीव लेखात या नगरावर चुटू (सातवाहनांचे आश्रित) राजांची सत्ता असल्याचा उल्लेख सापडतो. त्यानंतर काही काळ या प्रदेशावर पल्लवांची सत्ता होती. इ. स. सहाव्या शतकापर्यंत ही कदंब वंशाची राजधानी होती. त्यानंतर हे शहर चालुक्यांनी घेतले. तथापि या प्रदेशाची सत्ता कदंब या चालुक्यांच्या मांडलिक राजांकडेच राहिली. १२७८ मध्ये बनवासी देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होते. चौदाव्या शतकापासून १५६५ पर्यंत ते विजयानगरच्या अंमलाखाली होते.

येथील मधुकेश्वराच्या मंदिरातील एका शिलालेखात हारितीपुत्र सातकर्णीचा उल्लेख आढळतो. बनवासी गावात अनेक शिलालेख असून ते ऐतिहासिक दृष्टया अत्यंत उपयुक्त ठरतात.

चौंडे, मा. ल.