घुबड : हा सगळ्या जगभर आढळणारा पक्षी आहे. याचा स्ट्रायजिडी या पक्षिकुलात समावेश केलेला आहे. याच्या सु. १३५ जाती असून अनेक उपजाती आहेत. भारतात घुबडाच्या आठ–दहा जाती सापडतात.
हा एक रात्रिंचर आणि हिंस्र पक्षी आहे. चेहरा थबकडा असून प्रत्येक डोळ्याभोवती वाटोळ्या खोलगट तबकडीसारखे वलय असते आणि त्याच्या काठावर पिसांची झालर असते. पिसांच्या वैपुल्यामुळे डोके वाजवीपेक्षा मोठे आणि मान आखूड दिसते. सगळी पिसे मऊ असल्यामुळे उडताना पंखांचा आवाज होत नाही. पाय आखूड, मजबूत आणि बहुधा पिसांनी झाकलेले असतात. बोटांवरील नख्या वाकड्या, तीक्ष्ण व बळकट असतात. चोच वाकडी असून तिच्या टोकाशी आकडी असते. चोचीच्या बुडाशी वरच्या बाजूला मेदुर (मांसल मऊ जागा) असून त्यात नाकपुड्या असतात. डोळे मोठे व पुढच्या बाजूला असतात. चेहऱ्यावरील वलयांच्या काठाच्या लगेच मागे कान असून ते आकाराने आणि आकारमानाने सारखे नसतात या आकारभेदामुळे आवाजाचे निश्चित स्थान समजण्यास मदत होते. डोळ्याभोवतालच्या खोलगट वलयांचा उपयोग प्रकाश आणि ध्वनी गोळा करण्याकरिता आणि त्यांचे संकेंद्रण (केंद्रीकरण) करण्याकरिता होतो. रात्री भक्ष्य मिळविण्याच्या कामी याचा उपयोग होतो.
लहान घुबडे किडे, लहान उंदीर व पक्षी खातात परंतु मोठी घुबडे ससे, घुशी, पक्षी, साप इत्यादींवर उपजीविका करतात काही घुबडे मासे, बेडूक, खेकडे वगैरे खातात. भक्ष्य मोठे असले, तर चोचीने त्याचे लचके तोडून ते खातात, पण लहान प्राणी ते सबंध गिळतात. अन्नाचे पचन झाल्यावर भक्ष्याची हाडे, पिसे, केस व इतर न पचणाऱ्या पदार्थांचे लहान गोळे बनतात व घुबड ते ओकून टाकते.
निरुपयोगी जुनाट इमारती, पडक्या भिंतीमधील पोकळ्या किंवा भोके, झाडांच्या ढोल्या इ. ठिकाणी घुबडे घरटी करतात. घरट्याकरिता फारसे पदार्थ वापरलेले नसतात. अंडी पांढरी व वाटोळी असतात.
भारतात आढळणाऱ्या घुबडांपैकी पांढरे घुबड हे सामान्य होय. भारतात ते सगळीकडे आढळतेच पण सगळ्या जगभरही ते आढळते. त्याचे शास्त्रीय नाव टायटो आल्बा असे आहे.
हे डोमकावळ्याएवढे असते. पाठीचा रंग सोनेरी पिवळसर व करडा आणि त्यावर काळे पांढरे ठिपके खालची बाजू पिवळसर पांढरी व त्यावर तपकिरी ठिपके नर व मादी यात फरक नसतो. मनुष्यवस्तीच्या जवळपास त्याचप्रमाणे उजाड गावे, पडक्या इमारती, जुनाट किल्ले वगैरे ठिकाणी हा पक्षी नेहमी असतो. हे जोडप्याने किंवा एकएकटे असतात. आवाज किंचाळल्यासारखा असतो. हा फक्त उंदीर आणि घुशी खाणारा असल्यामुळे उपयुक्त पक्षी आहे.
याचा विणीचा हंगाम ठराविक नाही. झाडाच्या ढोलीत अथवा भिंतीच्या भोकात गवत, चिंध्या वगैरे घालून घरटे केलेले असते. मादी ४–७ अंडी घालते.
शृंगी घुबड आणि मासे खाणारे तपकिरी घुबड या घुबडांच्या दोन जाती भारतात सगळीकडे आढळतात. ही दोन्ही घारीएवढी मोठी असतात. रात्री अपरात्री आपल्याला घू घू असा जो घुमणारा आवाज ऐकू येतो तो शृंगी घुबडाचा असतो. याच्या डोळ्यांच्या वरच्या बाजूस पिसांचे दोन झुपके असतात. ते शिंगासारखे दिसत असल्यामुळे याला शृंगी घुबड हे नाव मिळाले असावे. मासे खाणारे घुबड फक्त मासे खाते. एक साळुंकीएवढे लहान घुबड भारतात सर्वत्र आढळते. त्याला ⇨ पिंगळा म्हणतात.
घुबडाचे वेदकालीन नाव उलूक आहे. पुराणात घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले आहे. हिंदू समाजात घुबड दिसणे किंवा त्याचे ओरडणे अशुभ मानतात. अनर्थाचे पूर्व चिन्ह म्हणून त्याचा पुष्कळदा उल्लेख केलेला आढळतो. याच्या उलट प्राचीन ग्रीसमध्ये घुबड हे शास्त्र व कला यांच्या वास्तव्याचे दर्शक चिन्ह होते.
कर्वे, ज.नी.
“