डोमाक, गेरहार्ट : (३० ऑक्टोबर १८९५–२४ एप्रिल १९६४). जर्मन विकृतिवैज्ञानिक व सूक्ष्मजंतुवैज्ञानिक. प्रॉन्टोसील या पहिल्याच सूक्ष्मजंतुरोधी सल्फा औषधाच्या शोधाबद्दल त्यांना वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञान या विषयाचे १९३९ चे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते परंतु नाझी सत्ताधाऱ्यांनी डोमाक यांना हे पारितोषिक स्वतःच नाकारल्याचे पत्र लिहिण्यास भाग पाडले. पुढे १९४७ मध्ये डोमाक यांना नोबेल सुवर्ण पदक देण्यात आले, परंतु पारितोषिकाची रक्कम नोबेल फाऊंडेशनला परत करण्यात आलेली असल्यामुळे ती त्यांना मिळू शकली नाही.
त्यांचा जन्म लागो ब्रांडनबुर्क येथे झाला. कील विद्यापीठात शिक्षण घेत असताना पहिले महायुद्ध सुरू झाल्यामुळे त्यांनी सैन्यात नोकरी पत्करली. पुढे युद्धानंतर १९२१ मध्ये त्यांनी एम्.डी. पदवी मिळविली. काही काळ ई. होपेझायलर या रसायनशास्त्रज्ञांचे साहाय्यक म्हणून काम केल्यानंतर १९२४ मध्ये ते ग्राइफ्सव्हाल्ट विद्यापीठात विकृतिविज्ञानाचे प्रपाठक झाले. पुढील वर्षी म्यून्स्टर येथील विकृतिवैज्ञानिक संस्थेत सामान्य विकृतिविज्ञान व विकृतिवैज्ञानिक शारीर या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९२७ साली आय्. जी. फार्बेन इंडस्ट्री (बायर) या रंजक तयार करणाऱ्या कंपनीच्या व्हुपर्टाल-एल्बफेल्ट येथील प्रायोगिक विकृतिविज्ञान व सूक्ष्मजंतुविज्ञान या विषयांच्या प्रयोगशाळेचे ते संचालक झाले. पुढे १९५८ मध्ये ते पुन्हा म्यून्स्टर येथे प्राध्यापक झाले.
नवीन रंजकांसंबंधी रसायनचिकित्सेच्या दृष्टीने संशोधन करीत असताना डोमाक यांच्या सहकाऱ्यांनी एक नवीन ॲझो संयुग तयार केले व या संयुगाला त्यांनी प्रॉन्टोसील सब्रम (–४’ सल्फोनामाइड -२-४- डायअमायनोॲझोबेंझॉल) असे नाव दिले. हे सल्फोनामाइडयुक्त संयुग उंदरातील मालागोलाणू (स्ट्रेप्टोकॉकस) जंतुसंसर्गावर प्रभावी असल्याचे व ते कमी विषारी असल्याचे अनेक प्रयोग केल्यानंतर डोमाक यांच्या लक्षात आले. हे संयुग त्यांनी स्वतःच्या मुलीला टाचणी टोचल्यामुळे झालेल्या तीव्र मालागोलाणू जंतुसंसर्गावर यशस्वी रीत्या उपचारार्थ वापरले. या शोधाची वाच्यता मात्र १९३५ पर्यंत करण्यात आली नव्हती. वैद्यकशास्त्रात या शोधामुळे रसायनचिकित्सेचे (व ‘सल्फा’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या औषधांचे) युग सुरू झाले. डोमाक यांच्या शोधामुळे फुप्फुसशोथ (न्यूमोनिया), बाळंत रोग, अरुणचर्म (एक त्वचारोग) इत्यादींसारख्या अनेक भयंकर व प्रसंगी मारक ठरणाऱ्या रोगांच्या प्रागनुमानात (रोगाच्या परिणामासंबंधीच्या अनुमानात) मोठा बदल घडून आला. डोमाक यांनी कर्करोग व क्षयरोग यांवरही रसायनचिकित्सेच्या दृष्टीने संशोधन केले होते.
नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना पॉल अर्लिक सुवर्ण पदक, एडिंबरोचे कॅमरन पदक इ. बहुमान मिळाले. अनेक यूरोपीय व अमेरिकन विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या. लंडनच्या रॉयल सोसायटीचेही ते परदेशी सदस्य होते. ते बरबर्ग (प. जर्मनी) येथे मृत्यू पावले.
भालेराव, य. त्र्यं.