डेंग्यूज्वर : (हाडमोड्या ज्वर). एका अतिसूक्ष्म विषाणूच्या (व्हायरसाच्या) संसर्गामुळे होणाऱ्या विशिष्ट रोगाला डेंग्यू किंवा हाडमोड्या ज्वर असे म्हणतात. या विषाणूचे वाहक आणि प्रसारक ईडिस या वंशाचे डास असतात. ज्वर, अशक्तपणा व त्वचेवर एका तऱ्हेचे विशिष्ट स्फुटन (पुरळ) ही या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत

या रोगाचे मूळ कारण असणारा विषाणू एका रोग्यापासून दुसऱ्या व्यक्तीत डासामार्फत जातो. रोग्याचे रक्त शोषून घेतल्यानंतर ८ ते १० दिवसांनी डास संसर्गक्षम होतो. या डासांची उत्पत्ती आणि प्रजनन (प्रजोत्पत्ती) उष्ण व दमट हवेत होत असल्यामुळे या रोगाच्या साथी वसंत व हेमंत ऋतूंमध्ये येतात. हा रोग मुख्यतः उष्ण कटिबंधातील असला, तरी समशीतोष्ण प्रदेशांतही त्याच्या साथी येऊ शकतात.

हाडमोड्या ज्वराचा परिपाककाल (रोग विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यापासून रोगलक्षणे दिसेपर्यंतचा काळ) ४ ते १० दिवस असून त्यानंतर एकाएकी थंडी वाजून ताप चढतो. तो क्वचित ४१° से. पर्यंतही चढतो. सर्वांगास विशेषतः गुडघे, पाठ, कंबर व मांड्या यांना तीव्र ठणका लागून रोगी अगदी अस्वस्थ होतो. कधीकधी नाकातून रक्तस्त्राव आणि उलट्याही होतात. दोन दिवसांनंतर ताप थोडा कमी होतो परंतु आणखी १-२ दिवसांत तो पुन्हा चढून सर्व लक्षणे तीव्र होतात. त्याच वेळी सर्वांगावर विशेषतः गुडघे, घोटे आणि कोपरे या ठिकाणी लाल पीटिका (पुरळ) उठतात. चेहऱ्यावर मात्र त्या क्वचितच दिसतात. पीटिकांचे क्षेत्र रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. हातापायांना सूज येते. मूठ वळणे अशक्य होते. आणखी १-२ दिवस अशीच स्थिती राहून मग एकदम ताप उतरतो आणि त्वचेवरील स्फुटन मावळून त्वचेचा कोंडा जाऊ लागतो. रोगी सात दिवसांत पूर्ण बरा होतो, परंतु अशक्तपणा मात्र पुढे पुष्कळ दिवस राहतो.

तापाच्या मुदतीत नाडीचे प्रमाण तापाच्या मानाने कमी असते. तसेच रक्तातील श्वेतकोशिकांचे (पांढऱ्या पेशींचे) प्रमाणही कमी होते. मूत्रातून श्वेतक (एक प्रकारचे प्रथिन, अल्ब्युमीन) जाते.

वृद्ध, हृद्‌विकारी आणि वृक्कविकारी (मूत्रपिंडाचा आजार असलेल्या) लोकांमध्ये हा रोग मारक होऊ शकतो. एरव्ही मृत्यूचे प्रमाण फार कमी असते.

या रोगाला विशिष्ट अशी चिकित्सा नाही. रोग्याची शक्ती टिकवून धरणे, योग्य ती शुश्रूषा करणे आणि लक्षणानुवर्ती उपचार करणे एवढेच करणे शक्य असते.

ढमढेरे, वा. रा.

पशूंतील डेंग्यु ज्वर : गायीगुरांत विशेषतः आफ्रिका आणि आशिया या खंडांमध्ये हा रोग आढळून आला आहे. पशूंमध्ये ताप तीन दिवस टिकतो म्हणून याला ‘तिवा’ असे म्हणतात. डास व वालुमक्षिका यांसारख्या कीटकांमार्फत रोगप्रसार होतो [⟶ गाय].

दीक्षित, श्री. गं.