मृण्मय खडक : गाळाच्या खडकांचा गट. वातावरणक्रियेद्वारे खडकांची झीज होऊन निर्माण होणाऱ्या सर्वांत सूक्ष्म कणांपासून हे बनतात. धूळ, मृत्तिका, चिखल, पंकाश्म, शैल ही मृण्यम खडकांची उदाहरणे असून हे सर्वांत विपुलपणे (४४ ते ५६ टक्के) आढळणारे गाळाचे खडक होत. मृत्तिका आणि चिखल यांत कमीजास्त प्रमाणात (१५ टक्क्यांपर्यंत) पाणी असते व खडक घट्ट होताना ते निघून जाते. अशा काही खडकांत थर निर्माण झालेले आढळतात. यांपैकी जे खडक स्तरणतलाला (थराच्या पातळीला) अनुसरून सहज फुटू शकतात, त्यांना शेल म्हणतात आणि थर असलेल्या वा नसलेल्या तर खडकांना पंकाश्म म्हणतात.

मृण्मय खडक कोणत्या मूळ खडकांपासून बनले आहेत, त्यांवर त्यांचे रासायनिक व खनिज संघटन अवलंबून असते आणि त्यामुळे त्यांच्या संघटनांत खूप विविधता आढळते. यांतील कण अतिसूक्ष्म (०·००२ मिमी.पेक्षा कमी आकारमानाचे) असल्याने ते कोणत्या खनिजाचे बनलेले आहेत, हे ओळखणे अवघड असते. माँटमोरिलोनाइट, केओलिनाइट, गिब्‍साइट,डायास्पोर ही यांच्यातील काही खनिजे असून यांतील खनिजांचे पुढील दोन मुख्य गट पडतात: (१) खडकाच्या अपघटनाने (रासायनिक विक्रियेद्वारे मोठ्या रेणूंचे लहान रेणूंत तुकडे होऊन) बनलेली ॲल्युमिनीयमाची सजल सिलिकेटे, सजल लोह ऑक्साइडे वगैरे आणि (२) खडकाच्या विघटनाने (यांत्रिक रीत्या तुकडे होऊन) बनलेले सापेक्षत: ताजे असे खनिजांचे कण म्हणजे शिलाचूर्ण. यांशिवाय काहींत थोडे कॅल्शियमयुक्त आणि जैव (कार्बन, हायड्रोकार्बनयुक्त) द्रव्य, लोह सल्फाइडाचे सूक्ष्मकण, अभ्रक आणि कधीकधी तत्रजात (जेथे साचले तेथेच निर्माण झालेली) खनिजेही आढळतात.

उत्पत्तिनुसार व साचण्याच्या स्थळानुसार यांचे सागरी, नादेय, हिमानी, सरोवरी, वातज व ज्वालामुखीजन्य असे तीन प्रकार होतात. सागरातील प्रवाळयुक्त तसेच निळा, तांबडा व हिरवा हे चिखल सागरी उत्पत्तीचे असून ज्वालामुखीद्वारे, नदीमुळे व सरोवरातही चिखल निर्माण होतो. ⇨ऋतुस्तर व धोंडेमातीतील मृत्तिका ही हिमनादेय (हिम पाण्याचा प्रवाह यांद्वारे बनलेली) आहे तर धूळ ही वाऱ्याने (वातज) वा ज्वालामुखीद्वारे निर्माण होते. जैव द्रव व लोह सल्फाइड विपूल असणाऱ्या चिखलापासून काळे व निळे शेल खडक बनतात. विपूल जैव द्रव्य असून त्याचे खनिज तेलबिंदूंत रूपांतर झाले असल्यास अशा खडकांना ऑइल शेल म्हणतात. शेलचे कमी प्रमाणात रूपांतरण (दाब व तापमान यांमुळे) बदल होऊन अर्जिलाइट हे खडक बनतात व काहींच्या मते ते मृण्मय खडकच आहेत. ल्युटाइट या नावेनेही मृण्मय खडक ओळखले जातात.

मृण्मय खडकांपासून चिनी, तापसह (दिर्घकाळ उच्च तापमानाला न वितळता टिकून राहू शकणारी), कुंभारकामाची वगैरे मृत्तिका मिळतात तर ऑइल शेलापासून खनिज तेल व अमोनियम सल्फेट मिळू शकतात. शिवाय सिमेंटस्टोन, काही ऊझे (महासागरांच्या, भूखंडापासून दूर असलेल्या भागातील तळाशी मृत सूक्ष्मजीवांची कवचे साचून बनलेले सूक्ष्म कणी गाळ) इ. उपयुक्त मृण्यम खडक आहेत. खनिज तेल व पाणी यांच्या साठ्यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने मृण्मय घटकांचे थर उपयुक्त ठरू शकतात.

पहा: मृत्तिका मृद्-खनिजे.

ठाकूर, अ. ना.