डार्विन, इरॅस्मस : (१२ डिसेंबर १७३१–१८ एप्रिल १८०२). ब्रिटिश शास्त्रज्ञ, संशोधक, कवी, तत्त्वज्ञानी व उत्तम वैद्य. यांचा जन्म नॉटिंगॅमशरमधील एल्स्टन हॉल येथे झाला. १७४१ साली शिक्षणाकरिता त्यांची रवानगी चेस्टरफील्ड शाळेत झाल्यावर तेथेच ते दहा वर्षे राहीले. त्यांचे पुढील शिक्षण सेंट जॉन्स कॉलेज, केंब्रिज येथे झाले तेथे १७५० साली त्यांना एक्झेटर शिष्यवृत्ती मिळाली. लंडन विद्यापीठात एका सत्रात त्यांनी विल्यम हंटर यांच्या अध्यापनाचा फायदा घेतला व १७५४ साली केंब्रिजमधून वैद्यकशास्त्रातील पदवी घेतली व त्यानंतर दोन वर्षे एडिंबरोत वैद्यकशास्त्राचे अधिक शिक्षण घेतले पुढे प्रथम नॉटिंगॅम आणि नंतर लिचफील्ड येथे त्यांनी वैद्यक व्यवसाय सुरू केला. सु.१७५८–८१ या काळात त्यांचा हा व्यवसाय फारच उत्तम चालला. उत्कृष्ट वैद्य म्हणून त्यांनी कीर्ती मिळविली. त्या वेळचे इंग्लंडचे राजे तिसरे जॉर्ज यांनी त्यांना आपले राजवैद्य होण्यास अनेकदा सुचविले, परंतु डार्विन यांनी नकार दर्शविला १७८३ मध्ये ते डर्बी येथे स्थायिक झाले. त्यांचे नातू चार्ल्स डार्विन हे पुढे प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ म्हणून नावाजले गेले. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ ⇨ सर फ्रान्सिस गॉल्टन हेही इरॅस्मस डार्विन यांचे नातू (मुलीचा मुलगा) होते.
इरॅस्मस डार्विन सोळा वर्षांचे असताना त्यांनी संयमाची प्रशंसा व भोगाचे खंडन करणारे लिखाण केले होते व हा दृष्टिकोन त्यांनी शेवटपर्यंत ठेवला होता. वनस्पती व प्राणी यांच्या उपयुक्ततेपेक्षा त्यांच्या विशिष्ट लक्षणांच्या कारणांचा त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला होता. तत्त्वज्ञानाचा अधिक पगडा त्यांच्या मनावर असल्याने सत्य निरीक्षणाला त्यांनी काहीसे गौणत्व दिले. लिचफील्डमध्ये मॅथ्यू बोल्टन, जेम्स कीअर, जेम्स वॉट, टॉमस डे, रिचर्ड एजवर्थ, विल्यम स्मॉल, सॅम्युएल गॉल्टन, जोसेफ प्रीस्टली, जोसाया वेजवुड इ. अनेक मोठ्या व्यक्तींशी त्यांचा संबंध येई. रूसो यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार होता. बोल्टन व स्मॉल यांच्या सहकार्याने त्यांनी बर्मिंगहॅम येथे शास्त्रीय चर्चा करण्यासाठी ‘ल्यूनर सोसायटी’ची १७६६ मध्ये स्थापना केली. लिचफील्डमधील ल्यूनर सोसायटीचे ते नेते होते. डर्बीमध्येही स्थानिक ‘फिलॉसॉफिकल सोसायटी’ची त्यांनी स्थापना केली होती. ल्यूनर सोसायटीतील वर उल्लेख केलेले डार्विन यांचे मित्र व इतर काही सदस्य बौद्धिक दृष्ट्या उत्कृष्ट दर्जाचे , उत्साही व समर्थ असल्याने त्यांचा एक फार परिणामकारक व मर्यादित गट इंग्लंडात बनला होता, असे सी. डी. डार्लिंग्टन यांनी म्हटले आहे त्या सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नांमुळे विज्ञान व तंत्रविद्या यांमध्ये एक अपूर्व आणि पुरोगामी प्रेरणा निर्माण झाली होती. डार्विन यांनी बनविलेल्या बोलणाऱ्या यंत्रातील शब्द त्याकडे न पहाता ऐकणाऱ्याला खरेच वाटून त्याची फसवणूक होत असे. कार्यालयात प्रती (नकला) काढण्याकरिता त्यांनी बनविलेले, उत्तम कार्यक्षम यंत्र पाहून पुढे वॉट यांनी रासायनिक पद्धतीचे प्रती बनविण्याचे यंत्र बनविले. पाण्याशी संबंध येत असलेली अनेक छोटीमोठी यंत्रेही त्यांनी बनविली (उदा., अनेक पंप, स्वयंचलित चाव्या, तारेने ओढली जाणारी तरी अथवा लहान नाव, कालव्यातील उच्चालक इ.) त्यांपैकी कित्येक पुढे शंभर वर्षांनंतरही त्याच उपयोगात असलेल्या कोणत्याही नवीन यंत्रापेक्षा डार्विन यांनी बनविलेली यंत्रे कमी प्रतीची नव्हती. बाटलीतील हवेच्या दाबामुळे आपले पंख फडफडविणारा कागदी पक्षी, हायड्रोजन-ऑक्सिजन-रॉकेट मोटर, अनेक आरसे व भिंगे बसवून बनविलेल्या दुर्बिणी अशा अनेक वस्तूंतून त्यांनी भविष्यकालातील संशोधनाला जणू विधायक सूचना दिल्या. आर्टेशियन विहिरीच्या शोधाचे पहिले स्पष्टीकरण त्यांनी दिले (१७८५) तसेच सर्व प्रकारच्या ऊष्मा एंजिनांत आढळणाऱ्या अक्रमी प्रसरणाच्या (उष्णतेचा लाभ वा व्यय न होता होणाऱ्या प्रसरणाच्या) तत्त्वाचे पहिले स्पष्टीकरणही त्यांनी दिले. त्यांनी हवामानशास्त्रातही बरेच लक्ष घातले होते ढगांच्या निर्मितीचा शोध त्यांनीच लावला. यांशिवाय गुलामगिरीचे उच्चाटन, वनरोपण, प्राण्यांचे मायावरण, कृत्रिम वीर्यसेचन, सौंदर्यशास्त्र, ध्रुवीय प्रकाश इ. अनेक विविध वस्तू व घटना यांच्या शोधाशी त्यांचा निकट संबंध पोहोचतो.
सजीवांचा ⇨ क्रमविकास (उत्क्रांती), वनस्पतींच्या पोषणाचे व ⇨प्रकाशसंश्लेषणाचे पृथक्करण, मनोवैज्ञानिक कल्पना यांसंबंधीची डार्विन यांनी दिलेली माहिती आणि ढगांच्या उत्पत्तीच्या प्रमुख प्रक्रियेचा शोध यांचे बरेच मोठे श्रेय त्यांना दिले गेले आहे. साहित्यिक टीकाकारांनी त्यांना जे मानाचे स्थान दिले आहे ते त्यांच्या काव्यनिर्मितीबद्दल नसून वर्डस्वर्थ, कोलरिज, शेली व कीट्स यांसारख्या निसर्गवेड्या व भावनाप्रधान कवींवर पडलेल्या डार्विन यांच्या प्रभावाबद्दल आहे. त्यांच्यानंतर विविध बुद्धिगम्य ज्ञान-विज्ञानशाखांत त्यांच्याइतकी समज दर्शविणारा दुसरा बहुश्रुत शास्त्रज्ञ क्वचित आढळला आहे. त्यांची तुलना त्या दृष्टीने प्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा व्हींची व जर्मन कवी गटे यांच्याशी केलेली आढळते. दैनंदिन जीवन, साहित्य आणि विज्ञान यांशी संबंधित तत्त्वे व व्यवहार यांबाबत त्यांचे अतुलनीय सामर्थ्य वाखाणण्यासारखे असूनही त्यांच्या योग्यतेचे मूल्यमापन वाजवीपेक्षा फारच कमी झाल्याचे आढळते कारण एकच व्यक्ती अनेक विषयांत प्रवीण असू शकत नाही, असा सर्वसाधारण समज आहे शिवाय डार्विन घराण्यातील एका व्यक्तीने [→ डार्विन, चार्ल्स रॉबर्ट] फार मोठी कीर्ती त्यानंतर मिळविली व घराण्याचे नाव उज्ज्वल केले, त्यामुळे इतरांची फारशी दखल घेण्याची आवश्यकता उरली नाही.
द बोटॅनिक गार्डन या नावाचा काव्यमय ग्रंथ डार्विन यांनी दोन भागांत प्रसिद्ध केला यांपैकी पहिला(वास्तविक दुसरा) द लव्ह्ज ऑफ प्लॅंट्स (१७८९) व दुसरा (वास्तविक पहिला) द इकॉनॉमी ऑफ प्लॅंट्स (१७९१) होय. त्यावेळचे दीर्घकाव्य आज साहित्यिक जिज्ञासापूर्तीकरिता उपयुक्त ठरले आहे यात विविध विषयांवर टिपण्या असून वनस्पतींतील लैंगिक जीवनासंबंधी काव्यमय भाषेत माहिती आलेली आहे व ती त्या वेळच्या आरामी जीवन उपभोगणाऱ्या जनतेला फार रुचकर वाटली. तसेच ⇨ कार्ल लिनीअस यांची वानस्पतिक पद्धतीही वर्णिलेली आहे. कोलरिज या कवींनी डार्विन यांना जणू ‘साहित्याचे नेपोलियन’ अशी उपाधी देऊन यूरोपातील पहिले ‘साहित्यपात्र’ ठरविले होते. झूनॉमिया ऑर लॉज ऑफ ऑर्गॅनिक लाइफ हा त्यांचा ग्रंथ १७९४–९६ सालांत प्रसिद्ध झाला यामध्ये ‘जैव क्रमविकास’ व ‘सामान्य पूर्वजांपासून उगम’ ह्या दोन महत्त्वाच्या कल्पनांसंबंधी ढोबळ मानाने केलेल्या सूचना व तपशील आढळतो. ह्या मूलभूत कल्पनेचा व काही प्रमाण-पद्धतींचा उपयोग त्यांच्यानंतर ⇨ लामार्क व चार्ल्स डार्विन यांनी आपापले क्रमविकासावरचे सिद्धांत बनविण्यास केला ह्या ग्रंथाच्या पुढे आणखी दोन आवृत्या निघाल्या (१७९९ १८०१) त्याची जर्मन, फ्रेंच व इटालियन भाषांत भाषांतरे झाली. ए प्लॅन फॉर द काँडक्ट ऑफ फीमेल एज्युकेशन इन बोर्डिंग स्कूल्स (१७९७) या त्यांच्या पुस्तकात स्त्रीशिक्षण व लैंगिक समता यांचा त्यांनी पुरस्कार केलेला आढळतो. फायटॉलॉजिया ऑर ए फिलॉसॉफी ऑफ ॲग्रिकल्चर अँड गार्डनिंग (१८००) या ग्रंथात वनस्पतिजीवनाचे सर्वेक्षण असून कार्बन डाय-ऑक्साइड ते खते ह्या त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचा स्थूल परामर्श घेतलेला आहे. वनस्पतींचे पोषण, प्रकाशसंश्लेषण, शर्करानिर्मिती, सौर प्रकाशाचा संबंध, ऑक्सिजनमुक्ती इत्यादींसंबंधी स्थूलमानाने विचार प्रदर्शित केले असून प्राण्यांच्या जीवनाचा व वनस्पतींतील शर्करानिर्मितीचा अन्योन्यसंबंधही दर्शविला आहे. नायट्रोजन व फॉस्फरस यांचे वनस्पतींच्या पोषणातील महत्त्व वर्णिले आहे. द टेंपल ऑफ नेचर ऑर द ओरिजिन ऑफ सोसायटी, ए पोएम विथ फिलॉसॉफीकल नोट्स (मरणोत्तर प्रसिद्धी १८०३) ह्या त्यांच्या शेवटच्या काव्यग्रंथात डार्विन यांनी प्रारंभिक सागरातील सूक्ष्मजीवांपासून वनस्पतीजीवन, मासे, उभयचर (पाण्यात व जमिनीवर राहणारे) प्राणी, स्थलवासी प्राणी आणि पक्षी अशी क्रमविकासाची कल्पना मांडली आहे. त्यांचे नातू चार्ल्स डार्विन यांनी क्रमविकासाचा सिद्धांत (ओरिजिन ऑफ स्पीशीज, बाय नॅचरल सिलेक्शन ह्या ग्रंथाधारे) सप्रमाण मांडला (१८५९) तत्पूर्वी म्हणजे पन्नास वर्षे आधी इरॅस्मस डार्विन यांनी तीच कल्पना स्थूलमानाने प्रसिद्ध केली होती. डर्बीजवळील ब्रेडसॉल प्रिओरी येथे वयाच्या सत्तराव्या वर्षी ते हृदयविकाराने ख्रिस्तवासी झाले.
पहा : क्रमविकास.
संदर्भ : King-Hele, Desmond, Erasmus Darwin, master of many crafts Vol. 247, London, 11 Jan. 1974.
जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.