पिसी : (लॅ. लिटसिया स्टॉक्साय कुल-लॉरेसी). ह्या लहान, विभक्तलिंगी सदापर्णी वृक्षाचा प्रसार भारताच्या फक्त द्विपकल्पीय भागातच असून (प्रदेशनिष्ठ) महाराष्ट्रात तो कोकण, महाबळेश्वर, चंदगड इ. ठिकाणी आढळतो. पाने साधी, चिवट, एकांतरित (एकाआड एक) किंवा अर्धसंमुख (अर्धवट समोरासमोर), दीर्घवृत्ताकृती-आयत, साधारण टोकदार व त्यांच्या कडा बहिर्वलित (बाहेर वळलेल्या) असतात सिराविन्यास (शिरांची मांडणी) पिसासारखा फुलोरे स्तबके [→ पुष्पबंध] पानांच्या बगलेत मंजरीवर पर्णकिणांपासून (पाने पडून गेल्यावर खोडावर होणाऱ्या वणांपासून) येतात. स्तबकात एकलिंगी ४–८ फुले सप्टेंबर ते ऑक्टोबरात येतात. फळ बनत असताना देठही वाढतो. छदे ४–६ व लोमश (कडेवर लांब केस असलेली) परिदले केसाळ सहा किंवा स्त्री-पुष्पात ७–८ केसरदले १२ [→ फूल] मृदुफळ दीर्घवर्तुळाकार (सु. १·३ सेंमी. लांब), कोवळेपणी हिरवे व त्यावर पांढरे ठिपके पण पिकल्यावर गडद जांभळे व परिदलाच्या पेल्यावर आधारलेले [→ पिशा लॉरेसी] असते. पानांचा फांट [→ औषधिकल्प] बुळबुळीत असून मूत्राशय व मूत्रमार्ग यांच्या दाहावर गुणकारी असतो बियांचे तेल (३१·६%) मुरगळणे, खरचटणे, खाजणे इत्यादींवर लावतात. पिसीच्या वंशातील काही अन्य जातींच्या (लि. सिट्रेटा व लि.मोनोपेटॅला= लि. पॉलिअँथा) पानांवर रेशमाचे किडे पोसतात. ⇨ मैदालकडी व मेडा (रानआंबा लि. पॉलिअँथा) औषधी आहेत. कुरक (लि. डेक्कनेन्सिस) या नावाचा मध्यम उंचीचा वृक्ष दक्षिणेच्या पठारावर (६००–१,८०० मी. उंचीवर) आढळतो त्याचे पिवळट, जड व कठीण लाकूड तराफे, चहाची खोकी व लाकडी पडद्यांकरिता वापरतात. पिसीच्या वंशातील (लिट्सियातील) सु. ४३ जाती भारतात व ४०० जगात आढळतात.
जमदाडे, ज. वि.