विखदिर : उष्ण कटिबंधातील ⇨बिबळा, पळसवेल [⟶ पळस] यांसारख्या काही झाडांपासून मिळणाऱ्या डिंकासारख्या पदार्थाला विखदिर म्हणतात. इंग्रजीत याला कीनो वा कीनोगम असे म्हणतात. या झाडाच्या सालींवर चिरा पडल्यास त्यांच्यातून हा रसाच्या रूपात पाझरतो व थोड्याच वेळात सुकतो. हा गर्द तांबडा वा काळा असून याचे सामान्यतः वाटाण्याएवढे अनेक कोनयुक्त खडे असतात.ते सहज फुटून लहान खडे बनतात. विखदर एथिल अल्कोहॉलात विरघळतो.त्याचे इतर गुणधर्म ⇨काताप्रमाणे असतात. पुढील वनस्पतींपासून विखदर मिळतो.कंसात त्या त्या वनस्पतींच्या विखदराचे नाव दिले आहे. बिबळा (ईस्ट इंडियन वा मलबार कीनो), पळस (बंगाल किंवा पळस कीनो), ⇨यूकॅलिप्टसाच्या वेगवेगळ्या जाती (बॉटनी बे, आँस्ट्रेलियन गमरेड, रिबन गम इ. कीनो) व आफ्रिकन रोझवूड (टेरोकापर्स एरिनेसियम आफ्रिकन कीनो). झाडांपासून मिळणारा विखदर पाण्यात उकळून , स्वच्छ करून सुकवितात याला व्यापारी विखदर म्हणतात.विखिदर स्तंभक (आकुंचन करणारा) व पौष्टिक असून तो मुख्यतः कातडी कमाविण्यासाठी व औषधांत वापरतात.

परांडेकर शं. आ.