डार्विन : ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दर्न टेरिटरी राज्याची राजधानी. लोकसंख्या ३७,०६० (१९७१). हे नैसर्गिक बंदर असून तिमोर समुद्राच्या क्लॅरेन्स सामुद्रधुनीवर वसले आहे.

 १८७२ मध्ये संदेशवहन स्थानक असलेल्या पामर्स्टनचे नाव प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ चार्ल्‌स डार्विनच्या स्मरणार्थ डार्विन ठेवण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात येथे लष्करी विमानतळ, इंधन तेल पुरवठा-केंद्र आणि बोटींचा धक्का बांधण्यात आला व त्यामुळे डार्विन दोस्त राष्ट्रांचे महत्त्वाचे लष्करी नाके बनले. १९४२ मध्ये जपान्यांनी डार्विनवर प्रचंड बाँबवृष्टी केली. युद्धानंतर बंदर आधुनिक करण्यात आले. 

डार्विनचे सरासरी वार्षिक तापमान २८°से. व सरासरी वार्षिक पर्जन्यमान १४९ सेंमी. असते. शासकीय व्यवहार, विटा व कौले,  फळे डबाबंदी, मांस संवेष्टन, लाकूड कापणे, मोत्यांचे शिंपले काढणे हे येथील प्रमुख उद्योग आहेत. खाणउद्योग, कृषिउद्योग व ग्रामोद्योग यांनी पृष्ठप्रदेश संपन्न आहे. येथून मोत्यांचे शिंपले,

डार्विन बंदराचे विहंगम दृश्य

 युरेनियम धातुक, तांदूळ, भुईमूग, गुरे व मांस ह्यांची निर्यात होते. येथे सिंगापूर – सिडनी हवाई मार्गावरील आंतरराष्ट्रीय विमानतळ असून पूर्व व पश्चिम किनारी जलवाहतूक, डार्विन – बर्डम ५०९ किमी.चा लोहमार्ग, डार्विन–ॲलिस स्प्रिंग्ज १,५२७ किमी.चा स्ट्यूअर्ट हमरस्ता, डार्विन – ॲडिलेड तारायंत्र केंद्र व डार्विन – ब्रिटन समुद्री तार यांमुळे हे वाहतूक आणि दळणवळण यांचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. येथे रुग्णालय, हवाई वैद्यकीय सेवा केंद्र, नभोवाणी, दूरचित्रवाणी, कला संगीत-नाट्यसंस्था व माध्यमिक शिक्षणापर्यंतच्या सोयी आहेत.

 गद्रे, वि. रा.