केर्च : रशियन संघराज्यांपैकी युक्रेन राज्यातील औद्योगिक शहर. लोकसंख्या १,२८,००० (१९७०). क्रिमिया ओब्लास्टमध्ये, केर्च द्वीपकल्पाच्या पूर्व टोकावर, काळा व ॲझॉव्ह समुद्र जोडणाऱ्या केर्च सामुद्रधुनीवर हे वसलेले आहे. जहाजबांधणी, मासेमारी, डबाबंदी, तंबाखू हे येथील प्रमुख उद्योग. अनेक सत्तांतरांनंतर १७७१ मध्ये ते रशियाने घेतले. दुसऱ्या महायुद्धात ते जर्मनांनी व्यापले होते. त्यांनी नष्ट केलेला येथील लोखंड पोलादाचा कारखाना पुन्हा उभारण्यात आला आहे.                                   

कुमठेकर, ज. ब.