बामाको : पश्चिम आफ्रिकेतील माली प्रजासत्ताकाची राजधानी व प्रमुख नदीबंदर. लोकसंख्या ४,४॰॰॰॰ (१९८॰). हे डाकारच्या पूर्वेस ३९४ किमी. नायजर नदीकाठी वसले असून डाकार ते नायजर नदीपर्यंतच्या लोहमार्गावरील प्रस्थानक आहे. शहराच्या जवळच सोतूबा द्रुतवाह असून तेथून कालवे काढून त्यांचाही वाहतुकीस उपयोग केला जातो. येथे आंतराराष्ट्रीय विमानतळही आहे.
मध्ययुगात (सु.११ ते १५ वे शतक) बामाको हे मुस्लिम विद्याध्ययनाचे केंद्र होते. १८८३ मध्ये ते फ्रेंचाच्या ताब्यात आले व १९॰८ मध्ये फ्रेंच सूदानची राजधानी बनले. फ्रेंच पश्चिम आफ्रिका (दाहोमी, गिनी, आयव्हरी कोस्ट, माली, मॉरिटेनिया, नायजर, सेनेगल) व विषुववृत्तीय आफ्रिका (चॅड, गाबाँ, काँगो प्रजासत्ताक, झाईरे, मध्य आफ्रिका प्रजासत्ताक) यांची १९४६ मध्ये या शहरी परिषद भरून ‘रॅसेंब्लेमेंट डेमॉक्रॅटिक आफ्रिकन’ या प्रमुख राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे या शहरास अधिकच महत्व प्राप्त झाले. शहराची उत्तरोत्तर प्रगती होत असून येथे साबण, कापड, कातडी कमाविणे, औषधनिर्मिती, मासेमारी इ. उद्योग विकसित झालेले आहेत. बामाको बंदरास अनन्यसाधारण महत्त्व असून येथून सिमेंट, खनिज तेल पदार्थ, तांदूळ, कातडी, कापूस इत्यादींची निर्यात केली जाते.
खांडवे, म. अ.