फूजो : (मिनहो). चीनच्या फूक्येन प्रांताची राजधानी व प्रमुख बंदर. लोकसंख्या ६,२३,००० (१९५८ अंदाज). हे पूर्व चिनी समुद्रावर तैवान सामुद्रधुनीच्या उत्तर टोकाशी मिन नदीमुखापासून आत सु. ४० किमी. वर वसले आहे. चीनचे एक प्रमुख व्यापारी व औद्योगिक शहर म्हणूनही यास महत्त्व आहे.

फूक्येन प्रांतातील प्राचीन शहरांत फूजोचा समावेश होतो. च्यीन व हान राजघराण्यांच्या काळात (इ.स.पू. २२१ ते इ.स. २२०) हे मिन व यूए या स्वतंत्र राज्यांच्या अखत्यारित होते. थांग राजघराण्याच्या काळात (इ.स. ६१८-९०६) याचे फूजो असे नामकरण झाले आणि ते फूजो प्रांताचे मुख्य ठिकाण बनले. चीनच्या इतिहासात अराजकाचे अर्धशतक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळातील (९०७-६०) मिन साम्राज्याची राजधानी काही काळ (९०९-४४) येथे होती. सुंग (९६०-१२७९) व मिंग (१३६८-१६४४) राजघराण्यांच्या काळात फूक्येन प्रांताची राजधानी येथे करण्यात आली व तेव्हापासून ती तेथेच कायम आहे. तेराव्या शतकात मार्को पोलोने (१२५४-१३२४) यास भेट दिली होती. च्यिंग राजघराण्याच्या काळात (१६४४-१९१२) यास व्यापारकेंद्राचे स्वरूप प्राप्त झाले व त्याचा उत्तरोत्तर विकास होत गेला. चीन-ब्रिटनमधील अफूच्या युद्धानंतर (१८३९-४२) हे बंदर व्यापारास खुले करण्यात आले. एकोणिसाव्या शतकात चहा निर्यातीचे हे प्रमुख बंदर होते. १८६७ मध्ये येथे ‘फूजो नेव्ही यार्ड’ची स्थापना करण्यात आली व फ्रेंचांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रागार, जहाज कारखाना व नाविक शाळा सुरू करण्यात आली. पुढे येथे नौसेना अकादमीही उघडण्यात आली. येथे यूरोपीय भाषा व तंत्रविज्ञान यांच्या अध्ययनाच्या सुविधा असल्याने त्यास अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. १९३७ मध्ये चीन-जपान युद्धात हे जपानच्या ताब्यात होते. दुसऱ्या महायुद्धकाळात जपान्यांनी यावर दोन वेळा अंमल प्रस्थापित केला होता.

फूजो हे प्रमुख बंदर असले, तरी नदीच्या मुखाशी असलेल्या वालुकाभित्तींमुळे मोठ्या बोटी बंदरात येऊ शकत नाहीत. त्यामुळे मोठ्या बोटींवर मालाची चढउतार सु. १६ किमी. वरील लशिंग्टा (पॅगोडा) या ठिकाणी केली जाते. फूजोच्या जवळच मामॉई हा आरमारी तळ आहे. शहराच्या जवळच असलेल्या नान्‌ताय बेटावरील यूरोपीय लोकांची जुनी वसाहत ४१० मी. लांब व ४ मी. रुंद अशा वानशो या प्रसिद्ध पुलाने जोडली आहे.

येथे रसायने, कागद, कापड, साखर डबाबंदीकरण, लोखंड-पोलाद इ. उद्योगांचा विकास झालेला आहे. पारंपरिक हस्तोद्योग हा येथील एक प्रमुख व्यवसाय असून लाकूडकामासाठी हे शहर विख्यात आहे. ‘बोहिया चहा’ (बोहिया पर्वतउतारावर पिकविला जाणारा उच्च प्रतीचा काळा चहा) येथून निर्यात होतो. येथे फूजो विद्यापीठ, फूक्येन वैद्यक महाविद्यालय, फूक्येन कृषिसंस्था, चिनी वैद्यकीय विज्ञान अकादमीची एक संस्था इ. उच्च शैक्षणिक संस्था आहेत.

शहराजवळच गूलिंग (उंची ६१० मी.) हे विहारस्थळ आहे. येथील बौद्ध मंदिरे, कृष्ण पॅगोडा (४८ मी., इ.स. ७८५), श्वेत पॅगोडा ( ८० मी., इ. स. ९०३) इ. प्रेक्षणीय आहेत.

ओक, द. ह. गाडे, ना. स.