डांगी बोली : द्विभाषिक मुंबई राज्याच्या विभाजनानंतर डांग हा प्रदेश गुजरात राज्यात घालण्यात आला. या प्रदेशाच्या उत्तरेला बडोदे जिल्हा, पश्चिमेला सुरत जिल्हा, दक्षिणेला नाशिक जिल्हा व पूर्वेला खानदेश आहे. डांगच्या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या बोलींना डांगी हे नाव आहे.
खानदेशातून डांगमार्गे गुजरातेत जाताना कोणताही भाषिक बदल एकदम झाल्याचे जाणवत नाही. याचाच अर्थ हा, की डांगी बोली या खानदेशी व गुजरातीमधील संक्रमक बोली आहेत. त्यामुळे गुजराती व मराठी या दोन्ही भाषांशी त्यांचे पुष्कळ साम्य आहे. मात्र खानदेशीशी असलेले त्याचे साम्य अत्यंत निकटचे आहे.
ग्रीअर्सनने डांगी बोली व खानदेशी यांना भिल्ल भाषांच्या सदरात घातलेले आहे पण हे वर्गीकरण विशेषतः या बोलींचे भौगोलिक स्थान व त्यांच्या भाषिकांचा मानववंश यांकडे पाहून केलेले दिसते. ते पूर्णपणे ग्राह्य मानण्याचे कारण नाही.
डांगीचा अभ्यास द्विभाषिकाच्या विभाजनपूर्व काळात बराच झाला पण त्यामागे ती मराठी किंवा गुजराती ठरवण्याचा आग्रहच प्रामुख्याने होता. संक्रमक बोलींच्या बाबतीत असा आग्रह धरणे इष्ट नसते.
उतारा : तवळ तेना वडील पोंसा खेतमा व्हता. तो घर-कडे येवाले लागला तदळ त्याले काई वाजा व नाच ऐकु आना. तदळ मजुर करपयकी येक जणला तो इचारू बी लगणा, ‘हाई गंमत कसानी ह ?’ तवळ मजुरकरनी त्याले सांगा की, ‘तुना भाऊ वना ह, आनी तो बांसला सुखे-सनमाने येई मिळना म्हनीसनी बांसनी मोठी जेवणावळ कई’
भाषांतर : त्या वेळी त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराकडे यायला लागला तेव्हा त्याला काही गाणे व नाच ऐकू आला. त्या वेळी मजुरांपैकी एकाला तो विचारायलादेखील लागला, ‘ही गंमत कशाची आहे?’ त्यावेळी मजुराने त्याला सांगितले की ‘तुझा भाऊ आला आहे आणि तो बापाला सुखासन्मानाने येऊन भेटला म्हणून मोठी पंगत केली ’.
संदर्भ : Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol. IX Part III, Delhi 1968.