ब्रजभाषा : शास्त्रीय संगीतातील आपल्या असंख्य चिजांनी अखिल भारताच्या परिचयाची असलेली संतकवी ⇨सूरदास याच्या साहित्याची भाषा ही पश्चिम हिंदीच्या पाच बोलींपैकी एक महत्त्वाची बोली आहे. तिचेही अनेक स्थानिक भेद आहेत. तिला ‘ब्रजभाखा’ आणि ‘अंतर्बेदी’ ही नावेही आहेत.

‘ब्रज’ हा शब्द संस्कृत ‘व्रज’ (चराईचे रान, कुरण गुरांचे वसतिस्थान) यावरून आला आहे. पण प्राचीन साहित्यात ती एक भौगोलिक संज्ञाही असून ती मथुरा व तिच्या भोवतालचा प्रदेश यांनाही लावण्यात येते. ग्रीअर्सन यांच्या मते तिचे भाषिक भेद मथुरा, अलीगढ, आग्रा, बुलंदशहर, एटा, मैनपुरी, बदाऊन व बरेली या भागांत प्रचलित असून लिंग्विस्टिक सर्व्हेत (१९१६) तिच्या भाषिकांची संख्या ७८,६४,२७४ इतकी दिली आहे. धीरेंद्र वर्मा यांचा अंदाज दीड कोटीचा आहे, भारतीय जनगणनेनुसार (१९६१) हा आकडा ७६,१८९ इतकाच आहे. ब्रज भाषेत कोणत्या प्रदेशांचा व बोलींचा समावेश करावा हे निश्चित नसल्यामुळे हा फरक उत्पन्न झालेला दिसतो. तिच्या ठळक भाषिक वैशिष्टयांबद्दल मात्र सामान्यतः एकवाक्यता दिसते.

ध्वनिविचार : ब्रज भाषेतील ध्वनी पुढीलप्रमाणे आहेत :

स्वर : (शुद्ध) अ आ इ उ ए ओ, (संयुक्त) ऐ औ. शुद्ध स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ असू शकतात. त्याचप्रमाणे ते व संयुक्त स्वर अनुनासिकही असू शकतात.

व्यंजने : स्फोटक (कंठ्य) – क ख ग घ (मूर्धन्य) – ट ठ ड ढ (दंत्य) – त थ द ध (ओष्ठ्य) – प फ ब भ अर्धस्फोटक (तालव्य) – च छ ज झ अनुनासिक – ङ ण न न्ह म म्ह द्रव – र ऱ्ह ल ल्ह घर्षक – स ह अर्धस्वर – य व.

व्याकरण – नाम : प्रमाण हिंदीप्रमाणेच ब्रज भोषेतही पुल्लिंग व स्त्रीलिंग ही दोन लिंगेच आहेत. लिंगनिर्णायक असा कोणताही खास नियम नाही. केवळ विशेषणाची वेगवेगळी रुपे वापरल्याने हा भेद लक्षात येतो : बडो माट (पु.) ‘मोठे मडके’, सांकरी खोरी (स्त्री.) ‘चिंचोळी गल्ली’.

  

लिंगाप्रमाणेच एकवचन व अनेकवचन अशी दोन वचने आहेत. बहुतांश सरळरूपांत, म्हणजे कर्तृवाचक प्रत्ययहीन रूपांत अनेकवचन एकवचनासारखेच असते. फक्त ओ किंवा औ अंती असणाऱ्या एकवचनी नामांचे रूप अनेकवचनात या स्वरांच्या ऐवजी ए हा स्वर येऊन होते : जनो ‘(एक) जण’, जने ‘(अनेक) जण’. ऊकारांत स्त्रीलिंगी रूपाला ऐं हा अनेकवचनी प्रत्यय लागताना अंत्य ऊचा उ होतो.

सामान्यरूपात फक्त पुल्लिंगी अंत्य ओच्या जागी ए येतो. सामान्यरूपाचे अनेकवचन मूळ सरळरूपाला अन हा प्रत्यय लागून होते : नैन – ‘डोळ्या -’ नैनन – ‘डोळ्यां -’ आम – ‘आंब्या – ’, आमन – ‘आंब्यां – ’. मराठीतील शब्दयोगी अव्ययांप्रमाणे ब्रजमध्येही प्रत्यय येतात. असा प्रत्यय शून्यही असू शकतो : मृतक गऊ जीवाय ‘मेलेल्या गाईला जिवंत करून’, जाति अबलाई ‘जातीमुळे अबला’, सब सखियन लै संग ‘सर्व सख्यांना बरोबर घेऊन’, सांतिन मारि ‘छड्यांनी मारून’.

बऱ्याच वेळा शब्दयोगी प्रत्ययापूर्वी नामाला के अथवा की हा प्रत्यय लागतो. काही प्रत्ययांची उदाहरणे पुढीलप्रमाणे : या (के) आगे ‘त्या (च्या) पुढे’ पिया (के) बिन, बिना ‘प्रियाकरा (च्या) वाचून’ बन (के) बीच ‘राना (च्या) मधे’ मुख (के) ढिंग ‘तोंडा (च्या) जवळ’ निज तरंग कर, करि ‘स्वतः लाटांनी’ त्यहिं लगि ‘त्यांच्यासाठी’ कान लो ‘कानापर्यंत’ जमुन (के) निकट ‘यमुने (च्या) जवळ’ तीर (के) से ‘बाणाप्रमाणे’ मोह ताई ‘तोंडापर्यंत’ हरी तन ‘हरिकडे’ चरण तर, तरू ‘पायाखाली’ इत्यादी.

सर्वनाम : काही रूपे नमुन्यादाखल : पुरूषवाचक (सरळरूप) १ मैं, में, हौ, हों, हूं – हम. २ तू, तृं, तैं – तुम. ३ (पु.) बौ, बु, बो वौ, वो, गु – बे, बै वे, वै, ग्वे (स्त्री.) वा, वा, ग्वा – (पु. प्रमाणे) : (सामान्यरूप) १ मो, मोहि-हम. २ तो-तुम. ३ (पु. स्त्री) बा, वा, ग्वा – (सामान्यरूप) (पु. स्त्री.) या, जा, ग्या – (अ. व. पु. स्त्री.) इन, जिन.

क्रियापद : काही रूपे पुढीलप्रमाणे : आहे या अर्थी (होनो) : १ हौं – हैं २ है-हौ ३ है-हैं. धातू मार – चा वर्तमानकाळ : १ मारौं., मारूं-मारैं, मारहिं. २ मारै, मारहि – मारौ, मारहु. ३. मारै, मारहि – मारैं, मारहिं.


भविष्यकाळ : १ मारिहौं, माहैहौं, मारौंगौ, मारुंगौ – मारिहुइं, मारिहैं, मारैंगे. २ मारिहै, मारैहै, मारैगौ – मारिहौ, मारैहौ, मारौगै. ३ मारिहै, मारैहै, मारैगौ – मारिहैं, मारैहै, मारैंगै.

आज्ञार्थ : मार, मारहि, मारि – मारौ. बाकीचे काण प्रमाण हिंदीच्या धर्तीवर आहेत.

दोन नमुने : ब्रज भाषेचा प्रतिनिधिक नमुना देता येणे कठीण आहे. खाली तिचा एक जुन्या साहित्यातील व एक अर्वाचीन स्थानिक बोलीतील असे दोन नमुने दिले आहेत. ग्रिअर्सन यांनी एकंदर तेरा नमुने दिले आहेत.

“ब्रज घर घर सब भोजन साजत सबके द्वार बधाई बाजतसकट जोरि लै चले देवबलि गोकुल ब्रजवासी सब हिलि मिलि”

– सूरदास

अर्थ : ब्रजमध्ये घरोघरी भोजन तयार होता आहे. सर्वांच्या दारी आनंददर्शक वाद्ये वाजताहेत. गोकुळ व ब्रज इथले सर्व रहिवासी एत होऊन, गाड्या जोडून देवाचा प्रसाद घेऊन चालले आहेत.

“ग्वा खन ग्वा – की बडौ बेटा खेत – में. ओ। जब गु घर-के जौरें आयौ तौ ग्वा-ने गाईबौ नाचिबौ नाचिबौ सुन्यौ । औरू एकु नौकरु बुलायौ औरु पूछी कि यां का है –    रह्यो-ए। ग्वा-ने ग्वा-सूँ कही कि तेरौ भैया आय-गयौ-ए औरू तेरे बाप – ने ग्वा-की महमानी करी ए।”

(अलीगढची बोली)

अर्थ : त्या क्षणी त्याचा मोठा मुलगा शेतात होता. जेव्हा तो घराच्या जवळ आला तेव्हा त्याने नाचगाणे ऐकले. आणि एक नोकर बोलवला आणि विचारले की हे काय चालून राहिले आहे. त्याने त्याला सांगितले की तुझा भाऊ आलेला आहे आणि तुझ्या बापाने त्याला मेजवानी केली आहे.

संदर्भ : 1. Grierson, G. A. Ed. Linguistic Survey of India, Vol. IX, Part I, Delhi, 1968.          2. वर्मा, धीरेंद्र, अनु, ब्रज भाषा (मूळ फ्रेंचचा अनुवाद), अलाहाबाद, १९५४.

कालेलकर, ना. गो