डकोटा : उत्तर अमेरिकेतील इंडियन जमातींच्या एका गटाचे नाव. सू या नावानेही या गटातील जमाती ओळखल्या जातात. ते स्वतःस डकोटा किंवा लकोटा (मित्र) म्हणवून घेतात. त्यांच्यात अनेक पोटजमाती असून त्यांपैकी सांती, यांक्तॉन, तेतॉन या प्रसिद्ध आहेत. त्यांनाच अनुक्रमे डकोटा, नकोटा व लकोटा अशी पर्यायी नावेही दिली जातात. सांती मिनेसोटामध्ये राहतात, यांक्तॉन उत्तर व दक्षिण डकोटा संस्थानात राहतात, तर तेतॉन मिसूरी नदीच्या पश्चिमेकडील प्रदेशात राहतात. त्यांची लोकसंख्या सु. ६०,००० होती (१९६१). १६४०च्या सुमारास त्यांचा प्रथम युरोपीय वसाहतकारांशी संबंध आला. तत्पूर्वी मिनेसोटा व त्याच्या आसपासच्या प्रदेशात त्यांचे वास्तव्य होते. शिकार हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता. त्यांपैकी काही मच्छीमारीही करीत. ते थोड्या प्रमाणात शेती करीत आणि मका पिकवीत. अठराव्या शतकात गोऱ्या लोकांनी शिकारीच्या व सोन्याच्या अभिलाषेने त्यांच्या शिकारीच्या जागा व्यापल्या. एवढेच नव्हे, तर त्यांच्या पारधीचे प्राणीही मारले. त्यामुळे साहजिकच त्यांपैकी सांती लोकांनी १८६२ मध्ये उठाव केला. १८९० पर्यंत त्यांचे वारंवार उठाव होत. १८६८ मध्ये तेतॉन लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थायिक होण्याचे ठरविले पण त्यांना शेतीचा अनुभव नव्हता, शिवाय जमीनही खराब होती. तेव्हा यांनी उठाव केला. १८७६ मध्ये कर्नल जॉर्ज कस्टर याने त्यांचा मोड केला. १८९० मध्ये डकोटांच्या एका जमातीने पिशाच नृत्य (घोस्ट डान्स कल्ट) पुरस्कारून पुन्हा अशांतता निर्माण केली. तेव्हा संघराज्याच्या फौजेने त्यंचा कायमचा बंदोबस्त केला.

डकोटा हे चांगले लढवय्ये असून अमेरिकन इंडियन भाषासमूहातील सू भाषा गटातील डकोटा ही भाषा बोलतात. वाकन टान्का ही त्यांची प्रमुख देवता. सर्वशक्तिमान परमेश्वराशी सुसंवाद साधण्याचा मार्ग म्हणजे धर्म, अशी त्यांची धर्मासंबंधी धारणा आहे. त्यांचे सूर्यनृत्य प्रसिद्ध होते पण या नृत्यात ते विलक्षण देहयातना करून घेत असल्याने यातना करू नयेत म्हणून सरकारने त्यांच्या प्रयोगांवर बंदी घातली.

संदर्भ : Howard, J. H. The Dakota or Sioux Indians, New York 1966.

भुटाटकर, रामचंद्र