जटापू : आंध्र आणि ओरिसा या राज्यांतील एक वन्य जमात. १९६१ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या ७३,५९५ होती. आंध्रमध्ये पार्वतीपुरम्, पालकोंडा आणि सालूर तालुक्यांत जटापूंची वस्ती जास्त आहे.

जटापूंमध्ये विविध कुळी आहेत. कुळींना प्राण्यांचे गणचिन्ह असते, उदा., थोरिका–रानकोंबडी, नवलिपित्ता–मोर इत्यादी.

जमातीच्या प्रमुखास नायडू किंवा सामंथी म्हणतात. नायडूपद वंशपरंपरेने चालत आलेले असते. जमातीतील वैयक्तिक व सामाजिक तंटे मिटविण्याचे काम नायडू करतो.

वधूमूल्य (व्होली) देण्याची पद्धत आहे. विवाहाचे बरेच प्रकार जटापूंमध्ये आढळतात. सेवा-विवाह, अपहरण-विवाह असेही प्रकार रूढ आहेत. विधवेच्या बाबतीत देवर-विवाह संमत आहे. तसे न झाल्यास पूर्वीच्या वरपक्षाला वधूमूल्य परत करण्याची प्रथा आहे. अलीकडे जटापूंमध्ये वरदक्षिणेचीही पद्धती रुजू होऊ लागली आहे. बहुतेक मृतांना पुरतात पण सर्पदंशाने वा अपघाताने मृत्यु आल्यास दहन करतात.

शेती ही जटापूंचा मुख्य व्यवसाय आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार ५०% लोकांना स्वतःची जमीन आहे. त्या खालोखाल इतर लोक शेतमजुरी व जंगलातील अन्नसंकलन करणे हे व्यवसाय करतात. तांदूळ, रागी, भुईमूग व तंबाखू ही मुख्य पिके पिकवितात.

जटापूंचे मुख्य सण गोडाळी, पांडुगो व अवगम पांडुगो हे आहेत. जाकारादेवी व दुर्गादेवी (ग्रामदेवता) ह्यांची ते पूजा करतात. त्या वेळी डुकरे, कोंबड्या किंवा मेंढ्या बळी देतात.

आंध्रमधील जटापू प्रामुख्याने जटापू आणि खोंड भाषा बोलतात. ओरिसात जटापू कोया भाषा बोलतात.

भागवत, दुर्गा