गाल–२ : गॅल. उत्तर आफ्रिकेतील– मुख्यत्वे इथिओपियाच्या आसपासच्या परिसरात आढळणारी जमात. सोळाव्या शतकात ते केन्यामधून इथिओपियात आले. हे रंगाने करडे असून त्यांचे केस कुरळे असतात. हॅमिटिक वंशाचे हे लोक कॉकेसाइड वंशातील लोकांसारखे दिसतात. हे हॅमिटिक भाषासमूहातील भाषा बोलतात. यातील दक्षिणेकडील लोक मुख्यत्वे मेंढपाळीचा धंदा करतात व घोडे, गाढवे, मेंढ्या, उंट इ. पाळतात आणि ती जनावरे विकतात तर उत्तरेकडील गाल गवताळ प्रदेशात शेती करून कॉफी, साखर, कापूस यांची पिके काढतात. यांतील गुराखी लोक मागासलेले आहेत. 

बहुतेक गाल पेगन धर्माचे असून त्यांपैकी काहींनी अलीकडे इस्लाम व ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे.

यांच्यात बहुपत्नीत्व रूढ असून लग्नात देज द्यावे लागते. वडिलार्जित संपत्तीचा सर्वांत अधिक वाटा थोरल्या मुलाकडे जातो. 

पुरातत्त्वीय संशोधनात यांची काही डॉलेमेन सापडली असून मृताला पूर्वीपासून हे पुरत असावेत असे दिसते.

राजकीय दृष्ट्या एके काळी ही जमात फार बलवत्तर होती. त्यांच्यात अनेक लहानमोठ्या जमाती असून त्यांत वारंवार संघर्ष चालू असत. गालप्रमुख रास अली हा १८४८ मध्ये इतका सामर्थ्यवान होता, की ब्रिटिशांनासुद्धा व्यापारासाठी त्याच्याशी समझोत्याची बोलणी करावी लागली. परंतु पुढे रास अलीचा दुसरा प्रतिस्पर्धी रास कासा याने पराभव करून थिओदर हे नाव धारण केले आणि १८५५ मध्ये इथिओपियाचा आपण राजा झाल्याचे त्याने जाहीर केले. यांची समाजरचना म्हणजे वयोमानानुसार विभागलेल्या अधिकाराच्या पाच श्रेणी होत. प्रत्येक श्रेणीत आठ वर्षे घालविल्यानंतर श्रेणीतून कामानुसार बढती मिळते. चौथ्या श्रेणीतील व्यक्तींना जमातीची प्रशासनव्यवस्था व पौरोहित्य वगैरेचे अधिकार असून पाचव्या श्रेणीत गेलेल्यांना केवळ मार्गदर्शक म्हणून काम करावे लागते.

संदर्भ : Murdock, G. P. Africa : Its Peoples and Their Culture History, Toronto, 1959.

कीर्तने, सुमति