ट्रॉलप, अँटोनी : (२४ एप्रिल १८१५–६ डिसेंबर १८८२). व्हिक्टोरियन कालखंडातील इंग्रज कादंबरीकार. जन्म लंडन येथे. त्याचे बरेचसे शिक्षण हॅरो आणि विंचेस्टर येथे झाले. पुढे त्याने टपाल खात्यात नोकरी केली. १८६५ मध्ये फोर्टनाइट्ली रिव्ह्यू ह्या साप्ताहिकाच्या स्थापनेत त्याने भाग घेतला व सेंट पॉल मॅगझीनचे काही काळ संपादन केले. त्याने सु. ४७ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांपैकी बॅरसेस्टशर नॉव्हेल्स ही सहा कादंबऱ्यांची मालिका (१८५५–६७) विशेष प्रसिद्ध आहे. एखाद्या मर्यादित भूप्रदेशातील लोकजीवन आपल्या अनेक कादंबऱ्यांमधून चित्रित करणे, ही प्रथा त्यामुळे रूढ झाली. आत्मचरित्र व प्रवासवर्णने हे त्याचे इतर उल्लेखनीय लेखन.
2. Cockshutt, A. O. J. Anthony Trollope : A Critical Study, London, 1955.