ट्रॉट्‌स्की, लीअन : (७ नोव्हेंबर १८७९–२१ ऑगस्ट १९४०). रशियन क्रांतिकारक नेता. लेनिनने क्रांती केली, स्टालिनने नवा रशिया निर्माण केला आणि ट्रॉट्‌स्कीने क्रांतीबरोबर संघटनाकार्य केले. रशियाचा पहिला विदेशमंत्री, लालसेनेचा रचनाकार व युद्धमंत्री (१९१८–२५) आणि कम्युनिस्ट इंटर नॅशनलचा एक प्रस्थापक म्हणून नव्या रशियाच्या उभारणीसही त्याने हातभार लावला. प्रतिभाशाली लेखक, प्रभावी वक्ता, बुद्धिमान पक्षनेता आणि क्रांतीवर विश्वास असलेला ध्येयवादी कम्युनिस्ट अशा विविध नात्यांनी ट्रॉट्‌स्कीचे व्यक्तिमत्त्व संपन्न होते. त्याचा जन्म युक्रेनमधील खेरसॉन प्रांतातील ईव्हानफ्क या गावी झाला. ट्रॉट्‌स्की हे टोपण नाव मूळ नाव ल्येव्ह डव्हिडव्ह्यिच ब्रनश्टाइन. त्याचे वडील अशिक्षित पण सधन शेतकरी होते. वंशाने ते ज्यू होते. लहनपणापासून ट्रॉट्‌स्कीला शिक्षण देण्याची वडिलांची इच्छा होती. ट्रॉट्‌स्कीनेही त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. वयाच्या नवव्या वर्षी तो ओडेसा शहरी शिक्षणासाठी गेला. शाळेत त्याने आपल्या बुद्धीची चमक दाखविली. साहित्य आणि भाषा यांचा त्याने अभ्यास केला. वयाच्या अठराव्या वर्षापासून क्रांतिकारक चळचळीशी त्याचा संबंध आला. त्यापायी त्याला शाळा सोडावी लागली. विस्तृत वाचन आणि अमोघ वक्तृत्व यांच्या जोरावर तो त्याच्या परिसरातील मार्क्सवादी तरुणांचा पुढारी बनला. लवकरच त्याला अटक झाली. १८९८ ते १९०२ पर्यंतचा काळ त्याला तुरुंगवासात वा हद्दपारीत काढावा लागला. १९०२ साली तो हद्दपारीतून पळाला. त्या वेळी लेनिन लंडनमध्ये होता. त्याने ट्रॉट्‌स्कीला मुद्दाम बोलावून घेतले व इस्क्रा या वृत्तपत्राच्या संपादक मंडळावर नेमले. त्याच्या लेखणीने क्रांतिवादी विचारांना धार आली. १९०५ च्या सेंट पीटर्झबर्ग येथे झालेल्या झारशाहीविरुद्ध उठावाचे त्याने नेतृत्व केल्यामुळे तो पुन्हा तुरुंगात डांबला गेला. तेव्हाच त्याने १९०६ साली सतत क्रांतीच्या सिद्धांतावर ग्रंथ लिहून प्रसिद्ध केला. नंतर तो तुरुंगातून यूरोपात पळाला व १९०९ मध्ये तो पुन्हा रशियात आला. काही दिवस भूमिगत राहिल्यावर त्याला अटक करण्यात आली. तरुंगात काही दिवस काढल्यावर पुन्हा पश्चिम यूरोपात तो पळून गेला. त्याने व्हिएन्ना येथून प्रावदा नावाचे वर्तमानपत्र सुरू केले.

रशियातील १९१७ मधील क्रांती घडवून आणण्याचे श्रेय लेनिनच्या खालोखाल ट्रॉट्‌स्कीला द्यावे लागेल. सातत्यशील आंतरराष्ट्रीय क्रांती हीच खरी समाजवादी क्रांती बनू शकते, असे ट्रॉट्स्कीचे मत होते स्टालिनला ते मान्य नव्हते. लेनिनच्या निधनानंतर त्याचा व स्टालिनचा मतभेद वाढत जाऊन सत्तासंघर्ष सुरू झाला. त्यात स्टालिन यशस्वी झाला. ट्रॉट्‌स्कीला रशियातून हद्दपार करण्यात आले. स्टालिनच्या हुकूमशाहीने त्याचा पिच्छा सोडला नाही. या देशातून त्या देशात हकालपट्टी होत होत ट्रॉट्‌स्की अखेरीस मेक्सिकोमध्ये स्थायिक झाला. तेथे स्टालिनने १९४० साली आपल्या हस्तकाकरवी त्याचा खून केला. रशियात त्याची मुलेही स्टालिनच्या द्वेषाला बळी पडली. टेररिझम अँड कम्युनिझम  (१९२०), लेनिन  (१९२५), लिटेरचर अँड रेव्होल्यूशन (१९२५), हिस्टरी ऑफ द रशियन रेव्होल्यूशन, (तीन खंड १९३१–३३), स्टालिन स्कूल ऑफ फॉल्सफिकेशन (१९३७) इ., व्यासंगपूर्ण सुंदर शैलीचे ग्रंथ ट्रॉट्‌स्कीने लिहिले. त्याचे माय लाइफ (१९३०) हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्याशिवाय क्रांतिकाळात त्याने अफाट लेखन करून रशियन जनतेला झारशाहीविरुद्ध उठाव करण्यास उत्तेजित केले. पक्षाच्या संघटनेवर नियंत्रण ठेवण्यात मात्र त्याला यश आले नाही. त्याच्या अपयशाचे हेच मुख्य कारण होते.

ट्रॉट्‌स्कीवाद : लेनिनच्या मृत्यूनंतर साम्यवादी क्रांतीच्या ध्येयधोरणासंबंधी ट्रॉट्‌स्की आणि स्टालिन यांच्यातील मतभेद वाढू लागले. आर्थिक कार्यक्रम, पक्षाची संघटना आणि परराष्ट्र धोरण या तीनही क्षेत्रांत त्यांचे संघर्ष विकोपाला गेले आणि शेवटी ट्रॉट्‌स्कीला रशियाबाहेर हद्दपार करण्यात आले. या संघर्षाच्या काळात ट्रॉट्‌स्कीने रशियाचे धोरण आणि जागतिक क्रांती यांसंबंधी जे विचार मांडले, ते ‘ट्रॉट्‌स्कीवाद’ या नावाने ओळखले जातात.

लेनिनचा मृत्यू १९२४ मध्ये झाला. त्या वेळेपर्यंत पश्चिम यूरोपातील कम्युनिस्ट पक्षांचे अपयश रशियन नेत्यांच्या लक्षात आले होते. जागतिक क्रांती करणे त्या वेळी तरी अशक्य आहे, याची वास्तव जाणीव स्टालिनलाही होऊ लागली. त्यामुळे त्याने ‘एकाच देशात समाजवाद’ असे धोरण घोषित केले. रशियाने आपल्या देशातील क्रांती अधिक दृढ करावी, जगातील कामगारांना आदर्श वाटेल अशी समाजरचना निर्माण करावी आणि मग त्या देशातील कामगारांना क्रांतीला उद्युक्त करावे, अशी स्टालिनच्या घोषणेमागची भूमिका होती पण ट्रॉट्‌स्कीला ही भूमिका मान्य नव्हती. त्याच्या मते क्रांतीचे वातावरण सर्व देशांमध्ये पसरवून तापवीत ठेवण्याचे कार्य रशियाने करावे. त्यासाठी इतर देशांतील कम्युनिस्ट पक्षांना सर्व मार्गांनी साहाय्य करावे, त्यांच्या संघटना कार्यप्रवण कराव्यात, कामगारांना क्रांतीसाठी प्रोत्साहन द्यावे आणि अशा प्रकारे मार्क्सवादाचे जागतिक कामगारक्रांतीचे स्वप्न साकार करावे, या दोन परस्परविरोधी विचारांवर रशियाच्या कम्युनिस्ट पक्षात कडाक्याची चर्चा होऊ लागली. प्राथमिक पक्ष केंद्रापासून पॉलिटब्यूरोपर्यंत सर्व पातळ्यांवर या वादाने धुमश्चक्री उडविली. पत्रके, पुस्तके आणि इतर साहित्य यांच्या द्वारे दोन्ही गटांकडून जोराने प्रचार होऊ लागला. सतत तीन वर्षे हा संघर्ष चालू होता. एप्रिल १९२५ मध्ये भरलेल्या रशियन कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीने प्रथम स्टालिनला अनुकूल असा निर्णय घेतला. त्यानंतर ऑक्टोबर १९२६ आणि डिसेंबर १९२७ या दोन वेळा भरलेल्या अनुक्रमे चौदाव्या व पंधराव्या पक्षपरिषदांनी मध्यवर्ती समितीच्या निर्णयाला मान्यता दिली. त्यामुळे ट्रॉट्स्कीवादाचा रशियन कम्युनिस्ट पक्षापुरता तरी पराभव झाला.

ट्रॉट्स्कीवादातील एक महत्त्वाचा मुद्दा असा, की जगात मोठ्या प्रमाणावर कारखानदारीची वाढ झाल्यानंतर जग ही एक बाजारपेठ बनून सर्व देशांचे निकटचे संबंध निर्माण होतात. त्यामुळे त्यांचे आर्थिक धोरणही एकमेकांवर अवलंबून राहते. अशा परिस्थितीत कामगारवर्गाच्या हितसंबंधांना अधिक प्रोत्साहन देण्यात आले, तर वर्गीय संघर्ष तीव्र होत जाईल आणि मग कोणत्याही एक देशात समाजवादी क्रांतीची ज्योत पेटली, तरी तिचे लोण जगभर पसरून जागतिक क्रांती घडून येईल. कार्ल मार्क्सनेच क्रांतीसंबंधी अशी मीमांसा केली आहे आणि रशियन क्रांतीच्या यशानंतर ती अधिक वास्तव ठरली आहे.

ट्रॉट्स्कीवादाचा दुसरा एक मुद्दा असा, की केवळ एकाच देशात समाजवादी क्रांती करून स्वस्थ बसावयाचे ठरविले, तरी आजूबाजूची भांडवलशाही राष्ट्रे तसे बसू देणार नाहीत. भांडवलशाही राष्ट्रांच्या एकजुटीपुढे समाजवादी राष्ट्रांचा टिकाव लागणार नाही. त्यामुळे त्या देशातील क्रांती तर अयशस्वी होईलच पण इतर देशांत क्रांती घडवून आणणे अशक्य होऊन बसेल.

ट्रॉट्स्कीवादाचा दुसरा एक मुद्दा असा, की एकाच देशात समाजवाद ही घोषणा क्रांतिकारक समाजवादाच्या संदर्भात फसवी ठरते. रशियाने असे धोरण पतकरणे म्हणजे, संकुचित राष्ट्रवाद आणि त्याला पूरक ठरणारे स्वार्थी हित यांचा स्वीकार करण्यासारखे आहे. क्रांती यशस्वी करून दाखविलेल्या रशियाने असे आपल्या पायापुरतेच धोरण स्वीकारले, तर त्याचा जगातील क्रांतिकारक विचारांवर व चळवळीवर दुष्परिणाम घडून येईल. त्यात कामगारांचा विश्वासघात आहे आणि मार्क्सवादाने दिलेल्या क्रांतिकारक विचारांची वंचनाही करण्यासारखे आहे. म्हणून रशियाने केवळ आपल्या राष्ट्रीय हितापुरते क्रांतीचे शस्त्र मर्यादित न ठेवता जगभर वापरले पाहिजे. क्रांती देशांच्या व राष्ट्रांच्या सीमांना सतत ओलांडत राहिली पाहिजे व तिची जग व्यापण्याची प्रक्रिया सातत्यानेच चालली पाहिजे तसेच क्रांती एका खालच्या अवस्थेकडून वरच्या अवस्थेकडे सतत परिणत होत गेली पाहिजे. हा द्विविध क्रम एकाच विवक्षिय राष्ट्रात समाजवाद या धोरणाने कुंठित होऊन प्रतिक्रांती होण्याचे भय आहे. या सिद्धांताला सतत क्रांतीचा सिद्धांत म्हणून ओळखले जाते.

संदर्भ : 1. Deutscher, Isaac, The Prophet Armed Trotsky : 1879–1921, London, 1954.

   2. Deutscher, Isaac, The Prophet Unarmed Trotsky : 1921–1929. London, 1959.

   3. Deustscher, Isaac, The Prophet, Outcast Trotsky : 1929–1940, New York, 1963.

  4. Wolfe, B. D. Three Who Made a Revolution, Toronto, 1948.

गर्गे, स. मा.