राजशिष्टाचार :(प्रोटोकॉल): सामान्यपणे राजकीय, शासकीय व्यवहारातील आचारसंहिता किंवा शिष्टाचारविषयक संकेत. इंग्रजीतील ‘प्रोटोकॉल’ या संज्ञेचा राजशिष्टाचार हा मराठी प्रतिशब्द आहे. प्रोटोकॉलम या मध्ययुगीन लॅटिन शब्दावरून प्रोटोकॉल ही संज्ञा इंग्रजीत रूढ झाली. तिचा शब्दशः अर्थ सर्वांत महत्वाचा दस्तऐवज व दप्तरात सर्वांच्या आधी डकवून त्याचा अग्रक्रम सूचित करणे, चिकटविणे असा आहे. विशिष्ट प्रकारचा राजनैतिक दस्तऐवज या दुसऱ्या अर्थानेही प्रोटोकॉल ही संज्ञा वापरण्यात येते. राजनैतिक प्रतिनिधींनी परस्परांशी कसे वागावे? कोणत्या पोषाखात भेटावे? आपली संमती अगर असंमती कशी व्यक्त करावी, या व अशा बाबींचे संकेत विकसित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध सभा-समारंभात आणि भेटीगाठी व दौऱ्याच्या प्रसंगी संबंधित देश परस्पर महत्त्वाच्या दृष्टीने विशिष्ट प्रकारची औपचारिक आचारसंहिता पाळतात. राजनैतिक संकेत, रूढी,परंपरा यांना धरून हे राजशिष्टाचार असतात. राजदूतावासातील प्रत्येक अधिकाऱ्याची कामे ठरलेली असतात. त्याबद्दलच्या सूचना, कार्यपद्धती आणि अग्रक्रम यांच्याशी सुसंगत असतात. परराष्ट्रखात्याच्या प्रत्येक कार्यालयात किंवा अशा प्रकारच्या परदेशातील संबंधित कार्यालयात राजशिष्टाचारासाठी स्वतंत्र अधिकारी वर्ग असतो. आंतरराष्ट्रीय राजकारणातील राजशिष्टाचाराशिवाय लष्करात तसेच औद्योगिक व्यवहारातही शिष्टाचारांचे काही संकेत रूढ झाले असून त्याचीही कार्यपद्धती निश्चित झाली आहे. राज्याच्या अंतर्गत व्यवहारातही राज्यप्रमुख, पंतप्रधान, मंत्री, न्यायाधीश, राज्यपाल इ. पदाधिकाऱ्यांच्या बाबतींत आणि लष्करी अंमलदारांच्या बाबतीतही शिष्टाचार ठरलेले असतात तसेच राष्ट्रीय समारोह, अधिकारग्रहण इ. प्रसंगी श्रेष्ठ-कनिष्ठ पदांप्रमाणे राजशिष्टाचार ठरलेले असतात.

प्रोटोकॉल या संज्ञेचा वापर आंतरराष्ट्रीय विधिनियमांच्या संदर्भातही केला जातो. एखाद्या आंतरराष्ट्रीय करारात ज्या दस्तऐवजाच्या द्वारा उभय संमतीने मर्यादित स्वरूपाची भर घातली जाते किंवा त्या करारातील कलमांचें उभयमान्य विशदीकरण केले जाते, त्यादस्तऐवजास प्रोटोकॉल असे म्हणतात. राजशिष्टाचारविषयक दस्तऐवजास त्या त्या राज्यांच्या विधिमंडळाची संमती आवश्यक नसते. अर्थात अपवादात्मक प्रसंगी अशा संमतीची अट खुद्द प्रोटोकॉलमध्येच समाविष्ट केली जाते. प्रोटोकॉलविषयीची महत्वाची गोष्ट अशी, की कायदेशीर बंधनकारकतेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय करार आणि राजशिष्टाचार यांमध्ये फरक नसतो. म्हणजे दोन्हीही सारखीच बंधनकारक असतात.

राष्ट्रसंघाच्या कारकीर्दीत राजनैतिक इतिहासातील एक उल्लेखनीय असा प्रोटोकॉल करण्यात आला (१९२४). जिनीव्हा प्रोटोकॉल या नावाने तो प्रसिद्ध आहे. राष्ट्रसंघाच्या करारनाम्यामध्ये सामूहिक सुरक्षिततेच्या दृष्टीने ज्या उणिवा होत्या, त्या दूर करण्याच्या उद्देशाने जिनीव्हा प्रोटोकॉलची निर्मिती झाली. सर्व राज्यांनी आंतरराष्ट्रीय प्रश्नांची सोडवणूक न्यायालय अथवा लवाद अशा शांततापूर्ण मार्गांनी करावी आणि असे करण्यास नकार देणाऱ्या राज्यास आक्रमक समजण्यात यावे, हा जिनीव्हा प्रोटोकॉलचा मथितार्थ होता तथापि ब्रिटनच्या सक्त विरोधामुळे तो कार्यवाहीत येऊ शकला नाही. लोकार्नो करार (१९२५) आणि केलॉग-ब्रिआंड (२७ ऑगस्ट १९२८) तह या महायुद्धोत्तर तहनाम्यांतही जिनीव्हा प्रोटोकॉलचेच तत्त्व आचरणात आणले आहे.

संदर्भ: 1. Shotwell, J. T. Plans and Protocols to End War, Oxford, 1925.

2. Wood, J. R. Diplomatic Ceremoullas and Protocol, New York, 197०.

तवले, सु.न.