मॉट, जॉन रॅली : (२५ मे १८६५–३१ जानेवारी १९५५). आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अमेरिकन ख्रिस्ती धर्मोपदेशक व जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. त्याचा जन्म लिव्हिंगस्टन मनॉर (न्यूयॉर्क) येथे कर्मठ ख्रिस्ती कुटुंबात झाला. आयोवा येथे प्राथमिक शिक्षण घेऊन त्याने पुढे कार्नेल विद्यापीठातून पदवी घेतली (१८८८). विद्यार्थिदशेतच त्याने ख्रिस्ती विद्यार्थी संघ संघटित करण्यात पुढाकार घेतला होता आणि आंतरमहाविद्यालयीन वाय्‌.एम्‌.सी.ए. या संस्थेचा तो सचिव झाला (१८८८). त्याने कॅनडा व अमेरिकेतील विद्यापीठांना भेटी देऊन तेथील विद्यार्थीसमूह संघटित केले. पुढे तो विद्यार्थी सचिव म्हणून वाय्‌.एम्‌.सी. ए. चे काम करू लागला. व्हाडस्टेना (स्वीडन) येथे कार्ल फ्रीस याच्या सहकार्याने त्याने आतंरराष्ट्रीय ख्रिस्ती विद्यार्थी संघाची स्थापना केली (१८९५) आणि त्याचा तो पहिला सचिव झाला. नंतर तो विद्यार्थी स्वयंसेवक चळवळीचा अध्यक्षही  झाला. विद्यार्थी जगतात आंतरराष्ट्रीय सामंजस्य व सहकार्याची भावना या तत्त्वांच्या प्रसाराचे काम करीत असतानाच तो मिशनरी कार्यातही मग्न होता.

एडिंबर्ग येथे भरलेल्या जागतिक मिशनरी परिषदांचे अध्यक्षपद त्याला देण्यात आले (१९१०). त्यामुळे प्रॉटेस्टंट पंथातील एक थोर मिशनरी विभूती म्हणून त्याला अधिमान्यता लाभली. मिशनरी कार्यानिमित्त त्याने १९१२–१३ दरम्यान विविध देशांना विशेषतः अतिपूर्वेकडील राष्ट्रांना भेटी दिल्या. त्यानंतर त्याची वाय्. एम्. सी. ए. या संस्थेच्या प्रमुख सचिवपदी नियुक्ती झाली (१९१५–१९२८).

पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्याने उभय बाजूंच्या राष्ट्रांतून आंतरराष्ट्रीय सामंजस्य व सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी अविश्रांत प्रवास करून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तसेच युद्धकाळात व युद्धसमाप्तीनंतरही युद्धपीडितांसाठी वाय्. एम्. सी. ए. द्वारे चालविलेल्या मदतकार्यात, विशेषतः निराश्रित व जखमी सैनिक कैद्यांच्या बाबतीत, त्याने पुढाकार घेऊन सर्वतोपरी सहकार्य दिले आणि या कार्यासाठी त्याने नियोजित रकमेपेक्षा कितीतरी मोठी रक्कम विविध देशांचे दौरे काढून गोळा केली. १९२०–३० हे दशक त्याने आंतरराष्ट्रीय मिशनरी कौन्सिलच्या (वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्च) संघटना कार्यात व्यतीत केले. त्याचा हेतू वाय्. एम्. सी. ए. आणि ऑर्थडॉक्स चर्च यांत वैश्विक एकोपा निर्माण करणे हा होता. त्याच्या सामाजिक व्यक्तिमत्त्वाचा व व्यावहारिक ज्ञानाचा राजकीय फायदा घेण्यासाठी राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन याने त्यास चीनमधील राजदूत किंवा विद्यापीठीय अध्यक्ष यांसारखी उच्च पदे देऊ केलीपण ती पदे त्याने नाकारली. तसेच वर्णविद्वेषाविरुद्ध मोहीम काढून त्याने निग्रो व आशियाई काळे लोक यांच्या समान हक्कांची जपणूक व्हावी, म्हणून सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामंजस्य व सर्व वर्णांबद्दलचा आदरभाव वाढीला लागण्यास मदत झाली. या व पहिल्या महायुद्धातील कार्याबद्दल शांततेचे नोबेल पारितोषिक एमिली बॉल्चबरोबर त्यास देऊन त्याचा गौरव करण्यात आला (१९४६). याशिवाय त्यास सन्मान्य सात पदव्या, बहुमानदर्शक सुवर्णसेवा पदक व इतर अनेक मानसन्मान मिळाले. १९४८ पासून त्याची वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चिसचा मानसेवी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. उर्वरित आयुष्य त्याने वाय्. एम्. सी. ए. व चर्च कौन्सिल या संस्थांच्या ध्येयधोरणांचा पाठपुरावा व पुरस्कार करण्यात व्यतीत केले. त्याने चर्चचे कार्य, ख्रिस्ती पंथ आणि ख्रिस्ती धर्मातील प्रेरणा इ. विषयांवर विपुल ग्रंथलेखन केले आहे. द फ्यूचर लीडरशिप ऑफ द चर्च (१९०९), लिबरेटिंग द ले फोर्सिस ऑफ ख्रिश्चॅनिटी (१९३२), फाइव्ह डेकड्स अँड अ फॉरवर्ड व्ह्यू (१९३९) आणि द लार्जर इव्हँजिलिझम (१९४४) हे त्याचे महत्त्वाचे ग्रंथ होत. तो ऑर्‌लँडो (फ्लॉरिडा) येथे निधन पावला.

संदर्भ : Mackie, R. C. &amp Others, Layman Extraordinary: John R. Mott, 1865-1955, New York, 1965.

शेख, रुक्साना