ट्रायासिक : (ट्रायस). भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका विभागाचे नाव. हा मध्यजीव महाकल्पाचा सर्वांत जुना विभाग असून त्याचा कालखंड सु. २३ ते २० कोटी वर्षांपूर्वीचा आहे. काळाच्या विभागाला ट्रायासिक कल्प व त्या कल्पात तयार झालेल्या खडकांच्या गटाला ट्रायासिक संघ म्हणतात. या संघाचे अध्ययन प्रथम मध्य जर्मनीत झाले. तेथल्या ट्रायासिक खडकांचे तीन ठळक विभाग दिसून येतात. त्यावरून या संघाला ट्रायासिक (त्रिभागी) हे नाव फ्रीड्रिख फोन आलबेर्टी यांनी दिले (१८३४). जर्मनीतल्या ट्रायासिक खडकांच्या तळ विभागाला बुंटर म्हणतात. तो लाल थरांचा म्हणजे जमिनीवर साचलेल्या वालुकाश्मांचा व शेलांचा बनलेला आहे. मधल्या विभागाला मुश्शेलकाल्क म्हणतात. तो खंडांलगतच्या उथळ सागरात व आखातात साचलेल्या चुनखडकांचा, शेलांचा व वालुकाश्मांचा आहे. तिसरा व वरचा भाग कॉयपर हा तळ विभागाप्रमाणेच, असागरी, लाल थरांचा आहे. जर्मनीतल्या खडकांसारखेच ट्रायासिक खडक उ. यूरोपात, फ्रान्समध्ये, स्पेनमध्ये व उ. आफ्रिकेत आढळतात.

जिब्राल्टरपासून इंडोनेशियापर्यंतच्या आल्प्स, हिमालय इ. पर्वतरांगा असलेल्या प्रदेशांत व उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळच्या पट्ट्यांत उघड्या समुद्रात तयार झालेले व सागरी प्राण्यांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) असलेले खडक आढळतात. हजारापासून नेपाळपर्यत पसरलेल्या हिमालयाच्या आतल्या रांगांत ट्रायासिक खडकांच्या संपूर्ण व प्रचंड राशी आहेत. स्पिटीतील लीलाँगजवळ विपुल जीवाश्म असलेल्या ट्रायासिक खडकांचे उत्कृष्ट छेद पहावयास मिळतात. काश्मीरातही तशाच प्रचंड पण सापेक्षतः कमी जातींचे जीवाश्म असलेल्या राशी पहावयास मिळतात. पाकिस्तानातील मिठाच्या डोंगरात या कल्पाच्या खालच्या आणि बलुचिस्तानात व ब्रह्मदेशात वरच्या भागाचे खडक आहेत.

दक्षिण गोलार्धातील खंडातले भारताच्या द्वीपकल्पातले ट्रायासिक मुख्यतः जमिनीवर साचलेल्या गाळांचे आहेत. भारताच्या द्वीपकल्पातील गोंडवन संघाचा मधला भाग अशा खडकांचा आहे.

पुराजीव महाकल्पाच्या (सु. ६० ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या कल्पाच्या) अखेरच्या काळात घडून आलेल्या कवचाच्या हालचालीमुळे भूगोलात क्रांतिकारक बदल होऊन सागरांचे विस्तार कमी झाले होते. सागरातील परिस्थितीतही बदल होऊन ती प्राण्यांना प्रतिकूल झाली असावी, असे दिसते. पूर्वीच्या कल्पातील सागरी प्राण्यांचे कित्येक गट निर्वंश झाले व काहींचे थोडेच वंश शिल्लक राहिले. ट्रायासिक कल्पाच्या पूर्व भागात फोरॅमिनीफेरांचे व ब्रायोझोआंचे जीवाश्म विरळाच आढळतात आणि प्रवाळांच्या शैलमाला आढळत नाहीत, असे म्हटले तरी चालेल.

क्रिनॉयडियांचे व एकिनॉयडियांचेही थोडेच वंश शिल्लक राहिले. स्पिरिफेरॉयडिया, टेरेब्रॅट्युलॉइड व ऱ्हिंकोनेलॉइड या गटांखेरीज इतर ब्रॅकिओपोडा नष्ट झाले होते. ट्रायासिक कल्पातील सागरी प्राण्यांपैकी प्रमुख म्हणजे ॲमोनाइट होत. त्यांच्यापैकी बहुतेकांच्या सेवन्या (शिवणीच्या रेषा) सेराटाइटी प्रकारच्या होत्या पण ॲमोनाइटी प्रकारच्या अधिक जटिल सेवन्या असणारेही काही वंश होते. खडकांचे विभाग करण्यासाठी व दूरदूरच्या क्षेत्रातल्या खडकांचे सहसंबंध ठरविण्यासाठी ॲमोनाइटांच्या जीवाश्मांचा अतिशय उपयोग होतो. बायव्हाल्व्हिया, गॅस्ट्रोपोडा व नॉटिलॉइडिया हे ॲमोनाइटांपेक्षा कमी, पण एकंदरीत पुष्कळ असत. बेलम्‍नॉइडियांच्या आदिम (आद्य) जाती अवतरल्या होत्या.

जमिनीवरील जीवांत मात्र खंड पडला नाही. लॅबिरिंथोडोंट गटाचे उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे प्राणी) या कल्पात होते, पण कल्पाच्या अखेरीस ते नाहीसे झाले. त्याच सुमारास बेडकांचे पूर्वज अवतरले.

सरीसृपांचा विकास वेगाने झाला. सरपटणाऱ्या सरीसृपांचे व सस्तन प्राण्यांसारख्या सरीसृपांचे पर्मियन कालातील (सु. २७·५ ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) काही गट ट्रायासिक कल्पात टिकून होते. त्यांच्यात नव्या गटांची भर पडली व ते विस्तीर्ण क्षेत्रात पसरले, बहुतेक सरीसृप जमिनीवर राहणारे होते पण सरीसृपांच्या समुद्रात राहणाऱ्या काही जाती (उदा., कासव) निर्माण झाल्या होत्या.

या कल्पाच्या जवळजवळ अखेरपर्यंत वनस्पतींना विशेष अनुकूल असे हवामान नव्हते. पूर्वीच्या पर्मियन कल्पातील वनस्पतींचे गट याही कल्पात टिकून होते. कल्पाच्या अखेरीस टेरिडोस्पर्मी निर्वंश झाल्या पण कानिफेरेलिझांची प्रगती चालू राहिली. कल्पाच्या अखेरीस मात्र वनस्पतींची बरीच वाढ व विकास होऊन सायकॅडोफायटा व गिंकोएलीझ या गणांतील वनस्पती अवतरल्या.

  

केळकर, क. वा.