टोकिओ : जपानची राजधानी व लोकसंख्येने जगातील सर्वांत मोठे शहर. हे होन्शू बेटावर टोकिओ उपसागराच्या उत्तर व पश्चिम भागात असून त्याची लोकसंख्या ८५,८३,००० (मार्च १९७३) व १,१६,७०,००० (ऑक्टो. १९७५) आहे. टोकिओ व बृहत् टोकिओ असे याचे दोन भाग असून २,१४१ चौ. किमी. क्षेत्रफळाच्या बृहत् टोकिओत २३ विभाग, ९ औद्योगिक वसाहती, २५ उपनगरे, १४ खेडी व प्रशांत महासागरातील काही बेटांचा अंतर्भाव होतो. जपानच्या एकूण लोकसंख्येपैकी सु. १/१० नागरिक टोकिओ-निवासी असल्याने जपानी जीवनाच्या अंगोपांगाचे लघुरूप टोकिओत पहावयास मिळते.
वरवर पाहता टोकिओ एखाद्या अमेरिकन शहरासारखे दिसते. अतिरुंद स्वच्छ रस्ते, निरनिराळ्या शासकीय व व्यापारी कंपन्यांच्या प्रचंड इमारती, मोठमोठे कारखाने, भव्य नाट्यगृहे, विश्रांतिगृहे, पदार्थ संग्रहालये व उद्याने सर्वत्र दिसतात. प्रवासी आणि मालमोटारींचा सुळसुळाट, भुयारी आणि जमिनीवरील लोहमार्गाचे जाळे, गिऱ्हाइकांनी गजबजलेली मोठमोठी दुकाने, टोकिओभ्रमणास निघालेल्या हौशी प्रवाशांचे लहानमोठे गट इ. शहरी धावपळीच्या सर्वपरिचित विविध दृश्यांवरून येथील गतिमान जीवनाची सहज कल्पना येते. अमेरिकेसारख्या गगनचुंबी उत्तुंग इमारती मात्र येथे दिसत नाहीत कारण कायद्यानुसार दहा मजल्यांपेक्षा उंच इमारती बांधता येत नाहीत. तथापि १९६० नंतर यापेक्षा उंच इमारतींस परवानगी मिळाली. कासुमिगासेकी इमारत १४७ मी. उंच असून १९७१ मध्ये टोकिओत चाळीस मजली तीन इमारती होत्या. मात्र टोकिओचे अमेरिकेन शहरांशी साम्य केवळ दिखाऊ आहे, हे सर्वत्र दिसणारी शिंतो-पंथीय व बौद्ध मंदिरे, इतस्ततः फिरणारे रंगीबेरंगी पोशाखातील जपानी स्त्री-पुरुष या सर्वत्र विखुरलेल्या जपानी जीवनवैशिष्ट्यांवरून सहज दिसून येते.
या अतिप्रचंड शहराला कोणी सुंदर म्हणत नाही पॅरिस, बँकॉक, क्योटो इ. सौंदर्य-नगरींशी टोकिओ स्पर्धा करू शकत नाही. येथील हवामान मोसमी प्रकारचे असून उन्हाळ्यात अतिशय उकाड्याचे (२६·४° से.) व हिवाळ्यात गारठून टाकणारे (३·७° से.) असते. वार्षिक सरासरी तापमान १४·७° से. असते. उष्मा किंवा गारठा नसेल तेव्हा येथे पावसाची पिरपिर चालू असते. वार्षिक सरासरी पाऊस १५६·३ सेंमी. असतो. पावसाळ्यात येथे दर वर्षी दोनतीन तुफाने होतात. जानेवारी ते मार्चपर्यंत अनेक वेळा हिमवर्षाव होतो. येथील वस्ती अतिशय दाट आहे. येथे काडीमात्र शांतता लाभत नाही. राहणीही अत्यंत महागडी आहे.
टोकिओ वसलेल्या एडो खेड्याच्या परिसराचा उल्लेख बाराव्या शतकाच्या उत्तरार्धातील कागदपत्रांत सापडत असला, तरी टोकिओची स्थापना होऊन ५१० वर्षेच झाली आहेत. १ एप्रिल १४५७ रोजी ओटा डोकान नावाच्या एका सेनापतीने एडो नावाचा किल्ला येथे सूमीद नदीमुखाजवळ बांधला. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस ईयाशू टोकुगावा नावाच्या शोगुणाने येथे आपले मुख्य ठाणे ठेवल्यापासून याचा झपाट्याने विकास झाला आणि टोकुगावा कुटुंबाकडेच जपानचे शासन आल्याने क्योटोला अधिकृत राजधानी राहिली, तरी टोकिओच्या विकासात खंड पडला नाही. १८६८ मध्ये सम्राट मुचशुहिटो या मेजीवंशी राजाने एडोला राजधानी आणून त्याला टोकिओ म्हणजे पूर्वीची राजधानी असे नाव दिले. गेल्या शंभर वर्षांत टोकिओने जपानच्या जीवनातील अनेक भल्याबुऱ्या प्रसंगांना तोंड दिले आहे. १९२३ चा भूंकप व तज्जन्य अग्निप्रलय यांत टोकिओचे सु. एक लाख नागरिक मृत्युमुखी पडले व शहराच्या कित्येक पेठा उद्ध्वस्त झाल्या. त्यानंतरच्या पिढीने शहर पुन्हा दिमाखाने उभे केले पण दुसऱ्या महायुद्धातील बाँब-हल्ल्याने शहराचा २५२ चौ. किमी. भाग उद्ध्वस्त झाला व २,५०,००० नागरिक दगावले किंवा बेपत्ता झाले. एकंदर आठ लक्ष इमारती उद्ध्वस्त होऊन शहराला अवकळा आली पण युद्धानंतर टोकिओच्या पुनर्बांधणीचा कार्यक्रम झपाट्याने कार्यन्वित झाला व आज टोकिओची गणना जगातील अद्ययावत शहरांत होत आहे.
झपाट्याने विस्तारणाऱ्या शहराच्या विकासाला निश्चित दिशा लागावी म्हणून जुन्या शहराच्या भोवती ५० किमी. क्षेत्रात एक विस्तीर्ण वर्तुळ कल्पून, टोकिओ स्थानकाभोवतालचा १५ किमी. पट्टा, त्याच्या बाहेर १० किमी. रुंद हिरवा पट्टा आणि त्याच्या सभोवार २०·२५ किमी.चे विस्तीर्ण क्षेत्र असे तीन भाग करण्यात आले. पहिल्यातील बांधकामासंबंधी कडक नियम असून, भूकंपात टिकून राहतील अशी घरे बांधण्याकडे लक्ष दिले आहे. सु. ७५% घरांच्या बांधकामात लाकूड वापरले जाते परंतु पोलाद आणि काँक्रीट यांचा अधिकाधिक उपयोग होत आहे. हिरव्या पट्ट्यात शेती, बागबगीचे, उद्याने असून यातील ग्रामीण वातावरण आकर्षक वाटते. याच्या बाहेरील पट्टा नव्या औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी राखून ठेवला आहे. बृहत् टोकिओची जास्तीतजास्त १,१६,००,००० लोकसंख्या सामाविली जावी म्हणून वरील योजना कार्यान्वित झाली, पण १९७० मध्येच १,१४,०८,००० लोकसंख्या झाल्याने शहरविकासाच्या नव्या योजनांचा विचार सुरू आहे.
टोकिओला आंतरराष्ट्रीय शहर म्हणणेही योग्य होईल. येथील हानेडा विमानतळावर रोजी ३००–३५० विमानांची आणि वर्षाकाठी सु. ६,००,००० प्रवाशांची जा-ये चालते. त्यांपैकी फार तर पंचवीस टक्केच जपानी असतात. हा विमानतळ रडारसारख्या अत्याधुनिक यंत्रांनी सुसज्ज असून अलीकडे सुमद्र हटवून त्याचा विस्तार करण्यात आला असून त्याने ३५,३४,००० चौ. मी. क्षेत्र व्यापले आहे. हा विमानतळ लवकरच अपुरा पडेल म्हणून याहीपेक्षा दुसरा मोठा विमानतळ बांधण्याच्या योजना कार्यान्वित होत आहेत.
टोकिओचे लोहमार्ग-स्थानकही सदा गजबजलेले असते. पहाटे ४–१५ पासून रात्री १२–४५ पर्यंत येथे गाड्यांची ये-जा चालू असते व दिवसाकाठी सु. ८,४०,००० प्रवासी ये-जा करतात. पूर्वीच्या लोहमार्गांत टोकाईडो मार्गाची १९६४ मध्ये भर पडली असून टोकिओ ते ओसाका ५५६ किमी. अंतर केवळ चार तासांत तोडणाऱ्या गाड्या ह्या मार्गावर धावतात.
टोकिओचे बंदर कृत्रिम असून ते १९०६ मध्ये बांधण्यात आले. पण त्याची फार झपाट्याने वाढ होऊन वर्षाकाठी सु. १०,००० आगबोटींतून ७७·८ कोटी डॉ. किंमतीच्या मालाची आयात-निर्यात येथून होते. बंदर अपुरे पडू लागल्याने १९६१ मध्ये याच्या विकासाची दरवार्षिक योजना कार्यान्वित झाली. जपानच्या आयात-निर्यातीसाठी मुख्यतः जवळच्या योकोहामा बंदराचा उपयोग होतो. यावरूनही शहराच्या प्रचंड व्यवहारांची कल्पना येऊ शकते.
मरुनौची विभाग म्हणजे टोकिओच्या बँका, विमा, व्यापार, शासनाच्या व्यवहारांचे केंद्रच. १८८८ मध्ये एका विस्तीर्ण दलदलीच्या मैदानावर ह्या विभागाच्या आखणीस सुरुवात झाली. आज हा जपानचा सर्वांत छानछोकी (फॅशनेबल) विभाग असून त्यात डाय इची, क्योवा, मित्सुबिशी इ. प्रमुख जपानी बँका, अनेक परदेशी बँकांच्या शाखा, आशाई, मायनिची, निहॉनकीझाई वगैरे वृत्तपत्रीय छापखाने व त्यांच्या कचेऱ्या, जपानचे आकाशवाणी व दूरचित्रवाणी केंद्र इ. आहेत. मरुनौची विभागात कायम राहणारे नागरिक थोडे. दिवसा येथे दर चौ. किमी. १,९९,००० तर रात्री केवळ ५०,००० माणसे या विभागात असतात.
मरुनौचीच्या पश्चिमेस जपानच्या राजकुटुंबाचे प्रासाद आहेत. प्रचंड खंदकांनी वेष्टित असलेला शेकडो चौ. किमी. व्यापणारा हा भाग दुसऱ्या महायुद्धापूर्वी लोकांना गूढ वाटे. तेव्हा प्रत्यक्ष देवच मानला गेलेला सम्राट व त्याचे कुटुंबीय या विभागात रहात. युद्धोत्तर काळात ह्यातील गूढपणा नष्ट झाला असून जपानचा राजवंश लोकांना आता दूरचा वाटत नाही. याच्या जवळच शहराच्या पश्चिम भागात व मध्य व्यापारी भागात परराष्ट्रीय कचेऱ्या व आंतरराष्ट्रीय संस्था आहेत.
टोकिओ टॉवर हे शहराचे एक नवे भूषण आहे हा ३३३ मी. म्हणजे पॅरिस आयफेल टॉवरपेक्षा २९ मी. उंच आहे. ह्या टॉवरवर जपानचे आकाशवाणी केंद्र व दूरचित्रवाणी केंद्र आहे. जपानी स्थापत्य विशारदांच्या तंत्रज्ञानाचा उच्च दर्जा ह्याच्या रचनेवरून सहज दिसतो.
टोकिओ शहरात शेकडो उपवने व टोकिओ नॅशनल म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट, मेट्रापॉलिटन फाइन आर्ट गॅलरी, नॅशनल सायन्स म्युझियमसारखी अनेक प्रसिद्ध संग्रहालये आहेत. उपवनांत एनो व टामा विख्यात असून एनोत जपानमधील सर्वांत मोठे प्राणिसंग्रहालय आहे. बृहत् टोकियोत वन्यपशू आढळत नाहीत. डोंगराळ भागात रानडुकरे, खोकड, माकडे इ. आहेत. पक्षी मात्र विपुल आहेत. कबुतरे, चिमण्या, कावळे, गल, बदके, इग्रेट, स्कायलार्क वगैरे आहेत. काही स्थलांतरी पक्षीही येतात. सखल भागातील पाणी औद्योगिक प्रदूषणामुळे माशांना अपायकारक ठरले आहे.
टोकिओचे आरक्षक दल व अग्निशामक दल विश्वविख्यात आहेत. दोन्ही दलांत प्रशिक्षित कामगारांचा भरणा असून नेहमी होणारे भूकंप व तज्जन्य अग्निप्रलयांमुळे दोन्ही अत्यंत कार्यक्षम ठेवण्याची विशेष दक्षता घेतली जाते.
टोकिओ हे जपानचे प्रसिद्ध औद्योगिक शहरही आहे. पोलाद, जहाजबांधणी, रेल्वेचे मालवाहू व प्रवासी डबे यांसारखी अवजड कारखानदारी येथे बरीच असली, तरी हलक्या मध्यम आकारांच्या कारखान्यांचे टोकियो हे आगरच आहे. अचूक यंत्रसाधने, दृष्टिविषयक उपकरणे, वैद्यकीय उपकरणे, विजेची लहान-मोठी यंत्रे, कापडचोपड, रबरी वस्तू, दुचाक्या, शिवणयंत्रे, खेळणी, खाद्यपदार्थ असे विविध उत्पादन येथील कारखान्यांत होते. मात्र औद्योगिकीकरणामुळे प्रदूषणाची मोठी समस्या उभी राहिली आहे. पूर्वी जेथून फूजीयामा स्वच्छ दिसत असे, तेथून आता ते कारखाने बंद असतील आणि वाऱ्याने धूर व धुके वाहून नेले तरच दिसू शकतो. टोकिओला टोने, किनू, कात्सूरा, शिनानो व अझुसा नद्यांपासून जलविद्युत्, दोन औष्णिक व दोन आण्विक केंद्रांपासून मिळणारी वीज पुरविली जाते. टामा, एडो व इतर नद्यांचे पाणी पुरविले जाते.
शेती व मच्छीमारी हेही टोकिओचे महत्त्वाचे उद्योग आहेत. खाद्यनीय समुद्रतृण, उथळ पाण्यातील कालव, गोड्या पाण्यातील ट्राऊट, कार्प इ. मासे, तसेच खोल समुद्रात सापडणारे मासे ह्या जपानच्या मत्स्योद्योगाच्या मुख्य शाका असून वर्षाकाठी ३,७५,००० टनांचे केवळ कालवांचेच उत्पादन होते.
टोकिओतील ३,४६,००० नागरिक शेती करतात. यांची संख्या कमी वाटली, तरी शहराला ताज्या भाज्यांचा संपूर्ण पुरवठा ते करतात. लहान प्रमाणात दुग्धोद्योगही टोकिओत चालतो.
खाद्यपदार्थांचा क्रयविक्रय टोकिओ शासनामार्फत चालतो. त्यासाठी ३३ घाऊक व ३५,००० किरकोळ दुकाने आहेत. शहर-शासनाचा खाटिकखानाही आहे. पण अलीकडे सामिष आहाराची आवड वाढल्याने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी देशांतून मांस आयात करावे लागते.
टोकिओ हे जपानचे प्रमुख सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. जपानमधील ४६५ विद्यापीठांपैकी १४६ टोकिओला असून त्यांत सु. अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. शहरातील दाटीमुळे कित्येक विद्यापीठांची उपकेंद्रे शहराच्या मध्यभागापासून दूरच्या भागांत उघडण्यात आली आहेत. वैद्यकीय सोयी व सार्वजनिक आरोग्य पाश्चात्त्य शहरांच्या तोडीचे आहे.
टोकिओच्या प्रशासनासाठी एक राज्यपाल, कार्यकारी आयोग, त्याची विविध मंडळे व १२० सभासदांचे विधिमंडळ आहे. राज्यपालाची निवडणूक दर चार वर्षांनी होते. याच्या निवडणुकीसाठी वीस वर्षांवरील नागरीकांना मताधिकार असून तीस वर्षांखालील नागरिक राज्यपालपदाला पात्र समजला जात नाही. विधिमंडळसदस्याचे वय पंचवीसपेक्षा कमी नसते. त्यांचीही निवडणूक दर चार वर्षांनी होते. निवडून आलेले सभासद आपल्यांतून अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करतात. विधिमंडळाच्या बैठका वर्षातून चारदा होतात. निवडणूका, तपासणी, शिक्षण, सार्वजनिक सुरक्षितता, नगरसेवा इ. कामे कार्यकारी आयोगामार्फत चालतात.
ओक, द. ह.
“