टूफा : (कॅल्क वा कॅल्केरियस टूफा). स्पंजाप्रमाणे सच्छिद्र असा एक प्रकारचा चुनखडक. हा खडक सर्वसामान्य वातावरणीय परिस्थितीमध्ये झऱ्यांच्या थंड वा गरम पाण्याद्वारे कॅल्शियम कार्बोनेट (कॅल्साइट) निक्षेपित होऊन (साचून) तयार झालेला असतो. तो बहुधा स्तरित असून त्याची मऊ व भुसभुशीत होण्याकडे प्रवृत्ती असते. झऱ्याभोवतालच्या झाडांच्या पानांवर वा खोडांवर अतिसंपृक्त (विरघळलेल्या पदार्थांचे प्रमाण कमाल प्रमाणापेक्षाही जास्त असलेल्या) विद्रावाद्वारे कॅल्शियम कार्बोनेट निक्षेपित झाल्यास कधीकधी वनस्पतींच्या संरचना त्यात टिकून राहतात. त्याचे निक्षेप थोडेच असून तो बहुधा प्लाइस्टोसीन व आधुनिक काळातील (गेल्या सु. ६ लाख वर्षांतील) खडकामध्ये आढळतो. सच्छिद्र खडक या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून टूफा हे नाव पडले आहे.
पहा : उन्हाळे चुनखडक ट्रॅव्हटाईन.
ठाकूर, अ. ना