टॉम्पसन, फ्रान्सिस :(१८ डिसेंबर १८५९–१३ नोव्हेंबर १९०७). इंग्रज कवी. प्रेस्टन, लँकाशर येथे जन्मला. वैद्यकाचा अभ्यास करण्यासाठी मँचेस्टर येथे तो गेला तथापि साहित्यात अधिक रमला. वैद्यकाच्या परीक्षेत तीन वेळा अपयश आल्याने १८८५ मध्ये उदरनिर्वाहाचे काही साधन शोधावे, म्हणून तो लंडनला आला. तेथे हलाखीचे जीवन त्याला कंठावे लागले, प्रकृती बिघडली अफूचे व्यसनही जडले. विल्फ्रिड मेनल ह्या इंग्रज पत्रकाराने आणि त्याची पत्नी ॲलिस मेनल या कवयित्रीने त्याला त्याचा पहिला कवितासंग्रह काढण्यासाठी मदत केली.

पोएम्स(१८९३) हा त्याचा पहिला कवितासंग्रह. त्यानंतरसिस्टर साँग्ज(१८९५),न्यू पोएम्स(१८९७) हे त्याचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले.

टॉम्पसन हा रोमन कॅथलिक होता आणि त्या पंथाच्या निष्ठेची प्रभावी अभिव्यक्ती त्याच्या काव्यातून स्पष्टपणे दिसून येते गूढगुंजनाची प्रवृत्ती प्रत्ययास येते काही कविता दुर्बोधही वाटतात. ‘हाउंड ऑफ हेवन’ ही त्याची विशेष प्रसिद्ध कविता. मनुष्याच्या आत्म्याचा पाठपुरावा करणारे ईश्वरी प्रेम हा ह्या कवितेचा विषय. त्याने गद्यलेखनही केले आहे. त्यात त्याने शेलीवर लिहिलेला निबंध विशेष उल्लेखनीय आहे.

१८९३ ते १८९७ पर्यंतचा जवळजवळ सर्व काळ त्याने उत्तर वेल्समधील एका फ्रान्सिस्कन मठात काढला. लंडनमध्ये क्षयाने त्याचे निधन झाले.

बापट, गं. वि.