टाईन नदी : उत्तर इंग्लंडमधील पूर्ववाहिनी नदी. लांबी सु. ४८ किमी. किंवा नॉर्थ टाईन धरून १२८ किमी. कंबर्लडमधील क्रॉसफेलहून आलेली साउथ टाईन व चेव्ह्यट टेकड्यांमधून आलेली नॉर्थ टाईन यांच्या संगमापासून पूर्वेस ही न्यूकॅसल अपॉन टाईन, गेट्सहेड, साउथ शील्ड्स यांवरून जाऊन टाईनमथ येथे उत्तर समुद्राला मिळते. मुखापासून न्यूकॅसलपर्यंत हिच्या दोन्ही तीरांवरील प्रदेश कोळसाखाणी व लोखंड-पोलाद, जहाजबांधणी, यंत्रे इत्यादींचे कारखाने यांनी गजबजलेला आहे. येथे सागरगामी बोटी चालतात. गेट्सहेड येथील हिच्या उतारावरून स्कॉटलंडकडे जाणारा प्राचीन मार्ग होता.
यार्दी, ह. व्यं.